बांगला देश ते महाराष्ट्र व्हाया त्रिपुरा इस्लामी जिहादाचा हैदोस

विवेक मराठी    19-Nov-2021
Total Views |
@अमिता आपटे 9987883873
बांगला देशातील घडलेल्या सांप्रदायिक हिंसाचाराच्या घटनांचे पडसाद निषेध मोर्च्यांच्या रूपात त्रिपुरामध्ये उमटले. त्याविषयीचा अपप्रचार करत या प्रकरणाला हिंसक वळण देण्यात आले आणि त्यावरून महाराष्ट्रातील अनेक भागांत जिहादी गटांनी हैदोस घातला. काय होता हा घटनाक्रम? यामागची समोर न आलेली तथ्ये?

riots amravati_3 &nb

त्रिपुरामध्ये मुस्लीम समाजाविरुद्ध हिंसाचार भडकल्याच्या, तिथल्या सोळा मशिदींना नुकसान पोहोचवल्याच्या बातम्या गेले दहा-बारा दिवस विविध डाव्या माध्यमांद्वारे पद्धतशीर नियोजनबद्ध रितीने पेरल्या जात आहेत. यात अल-जझीरा, बीबीसी, क्विन्ट, स्क्रोल इत्यादी अनेक मीडिया हाउसेसचा हात आहे. बातम्या तोडून मोडून, खोट्या बातम्या त्यात घुसडून, कुठलेतरी संदर्भहीन जुने फोटो, व्हिडिओ नव्या नावाने आणि एडिट करून, नवा प्रसंग म्हणून समाजाच्या विविध स्तरांमध्ये पंप इन करून मुस्लीम समाजाला उचकावले जात आहे. माध्यमेच नाही, तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष(?) राहुल गांधी, शिवसेनेचे आमदार, खासदार, राष्ट्रवादीचे नवाब मलिक हेही या अनैतिक खेळात यत्किंचितही मागे नाहीत. काही मुल्ला-मौलवींचे अतिशय प्रक्षोभक असे व्हिडिओज गेल्या काही दिवसांत तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर विविध माध्यमांद्वारे केलेल्या या खोट्या अपप्रचाराचा परिणाम महाराष्ट्रातील मालेगाव, अमरावती, नांदेड, परभणी, हिंगोली, परतूर, जालना वगैरे शहरांत मुस्लीम जिहादी गटांच्या हैदोसात परावर्तित झाला. हिंदू समाजाची घरे, दुकाने लुटली गेली. जाळपोळीला ऊत आला. या सगळ्यांचा परिपाक म्हणून तिथे जमावबंदी लागू झाली आहे.

या सगळ्या राक्षसी कृत्यांचे नेतृत्व करत आहे रझा अकादमी नावाचा एक जिहादी गट. हा तोच गट आहे, ज्यांनी 2005 साली भिवंडी येथे दोन पोलिसांची अत्यंत निर्घृण अशी हत्या केली. 2012 साली आझाद मैदानावर धुडगूस घातला. अमर जवान ज्योती स्मारक लाथेने उडवून दिले. महिला पोलीस कर्मचार्‍यांचा विनयभंग केला. विविध प्रकारची पुस्तके वगैरे लेखन साहित्य निर्माण करायच्या मिषाने सुरू झालेली ही अकादमी भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातील अशा हिंसक आंदोलनांची पुरस्कर्ती आहे. बंदी घातला गेलेला सिमी हा इस्लामी जिहादी गट या नावाने आपल्या कारवाया करत असावा, असा संशय जाणकार व्यक्त करत आहेत. साहित्य निर्मिती बाजूलाच राहिली, पण इस्लामच्या नावावर मुस्लीम तरुणांची माथी भडकावणे, जातीय तेढ निर्माण करणे, समाजसंपत्तीची नासधूस करणे, हिंसक आंदोलने घडवून आणणे अशा अनेक दुष्कृत्यांसाठी रझा अकादमीचे नाव पुढे येते आहे. ट्रिपल तलाक, कोविडची लस, फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेले लोकशाहीचा पुरस्कार करणारे भाषण, सौदीमध्ये सुरू झालेली चित्रपटगृहे, या सगळ्याला त्यांचा विरोध आहे. इस्रायल-पॅलेस्टाइन वादात ते पॅलेस्टाइनची बाजू घेतात. वसीम रिझवी यांना ते इस्लामद्रोही ठरवतात. सुदर्शन चॅनलवर केसेस करतात. प्रॉफेट मोहम्मद बिल पास व्हावे, म्हणून शिवसेना मुख्यमंत्र्यांना व खासदारांना भेटतात. अनेक देशद्रोही विघातक कृत्यांत त्यांचा हात आहे असे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशात, आसाममध्ये उसळलेल्या दंगलींमध्येही त्यांचा हात असल्याचे दिसून आले आहे. विघातक कृत्ये करणार्‍या अशा संस्थेला आंदोलने करायला परवानगीच कशी देण्यात आली? त्यांनी जी जाळपोळ केली, नुकसान केले त्यावर महाराष्ट्र सरकार मूग गिळून का गप्प आहे? असा काही प्रकार घडू शकतो, हिंदू समाजाला लक्ष्य करून त्यांना भक्ष केले जाऊ शकते, याचा अदमास महाराष्ट्र पोलीस दल, गुप्तचर संस्था, गृहखाते, गृहमंत्री यांना आला नाही असे कसे शक्य आहे? असे मूलभूत प्रश्न अभ्यासू पत्रकार विचारत नसतीलही.. पण भोळी जनता विचारू लागली आहे! महाराष्ट्रेतर राज्यांतील मुस्लीम समाजाने असे काही का केले नाही बरे? जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गृहमंत्री असतात, तेव्हा प्रत्येक वेळी रझा अकादमी अशी वाह्यात कृत्ये करते, हा योगायोगच समजू या.
 

riots amravati_2 &nb
 
 2012 साली आझाद मैदानावर धुडगूस घातला.
बरे! इतके आक्रमक, विध्वंसक, हिंसक होण्यासारखे त्रिपुरामध्ये नक्की घडले तरी काय? हे समजून घेण्यासाठी आपल्याला बांगला देशात जावे लागेल. या वर्षीच्या नवरात्रीच्या दुर्गापूजा महोत्सवात एका मुस्लीम तरुणाने खोडसाळपणा करून कुराणाची एक प्रत मूर्तीच्या पायाशी ठेवली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. हा मुस्लीम माणूस अर्धवट किंवा मंदबुद्धी असल्याने त्याने हे कृत्य केले, असे पुढे त्या सरकारकडून सांगण्यात आले. परंतु तोवर या संधीचा फायदा घेऊन हा कुराणाचा, इस्लामचा अपमान आहे, अशी घोषणा करत बांगला देशी मुस्लीम समाजाची माथी भडकावून बांगला देशी हिंदूंवर नवरात्रीच्या काळात अनन्वित अत्याचार करण्यात आले. कितीतरी पूजामंडप मोडून तिथे जाळपोळ झाली. कितीतरी मूर्ती तोडून टाकण्यास आल्या. तिथल्या इस्कॉन मंदिराला हानी पोहोचवली गेली, मंदिराच्या पुजार्‍याला मारून टाकल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतीलच. बाकीही अनेक हिंदूंना मारून टाकले गेले. हिंदू महिलांवर अत्याचार ही तर बांगला देशातली सामान्य बाबच आहे.
 
हे सगळे महाभयचकित करणारे प्रकार जिथे घडत होते, ते पुमिला वगैरे भाग बांगला देशात असले, तरी त्रिपुराच्या सीमेपासून अगदीच जवळ आहेत. त्यामुळे या बातम्यांचे पडसाद त्रिपुरात उमटणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्यामुळे बांगला देशी अल्पसंख्याक हिंदू बांधवांबाबत झालेल्या हिंसेचा निषेध म्हणून हिंदू संघटनांनी त्रिपुरात 63 ठिकाणी निषेध मोर्चे काढले, ज्यात साधारणपणे 1,30,000 लोकांनी भाग घेतला. हे मोर्चे शांतताप्रिय मार्गाने आणि अतिशय शिस्तबद्ध रितीने काढण्यात आले होते. उत्तर त्रिपुरा - 4, उनाकोटी - 11, ढोलाई - 13, खोवाई - 4, पश्चिम त्रिपुरा - 2, सिपाहीजला - 14, गोमटी - 7, दक्षिण त्रिपुरा - 8 अशी या निषेधमोर्चांची संख्या आहे. यात कोणत्याही मशिदीला आग लावली गेल्याचे यत्किंचितही वर्तमान नाही. परंतु तरीही हे मोर्चे पाहून ममताच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे गुंड राज्यसभा सदस्या सुश्मिता देवाच्या संरक्षणाखाली रस्त्यावर उतरले.



riots amravati_1 &nb

मुस्लीम समाजाने या गुंडांच्या साथीने सीमावर्ती गाव कदमताला इथे दोन, तर पद्मा बिल इथे 5 हिंदूंची दुकाने जाळली. उनाकोटी इथे एका अभाविपच्या कार्यकर्त्याला भोसकण्यात आले. कुकझार आणि कालिबंदी इथे कालीमातेच्या मूर्ती ध्वस्त केल्या गेल्या. ईशानपुरातील शिवमंदिर तोडले गेले. कालीविसर्जन सोहळ्यावर हल्लाबोल करण्यात आली. इतके सारे होऊनही कोणत्याही राज्यात हिंदू समाजाने ना कोणाला शारीरिक दुखापत केली, ना कुठे कोणत्या मशिदीला नुकसान पोहोचवले. तरीही शिवसेना खासदार संजय राऊत महाराष्ट्राला वेठीस धरण्याच्या या प्रकाराला हिंदू संघटनांना आणि भाजपाला आणि भाजपाच्या नेत्यांनाच जबाबदार ठरवतात.
 
 
 
हिंदू समाजाचे जीव आणि मालमत्ता वेठीला धरून आपल्या राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा हा अत्यंत लाजिरवाणा प्रकार शिवाजीराजांचा महाराष्ट्र सध्या अनुभवतो आहे. खानही असाच मंदिरे फोडत, गावांवरून गाढवाचे नांगर फिरवत आला होता. शेवटी याच मातीत विरून गेला. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे.
 
 
अमिता आपटे
9987883873