त्रिपुरातील अफवा, महाराष्ट्रात आग

विवेक मराठी    19-Nov-2021
Total Views |
@सिद्धाराम भै. पाटील
त्रिपुरामध्ये मुसलमानांवर अत्याचार सुरू असल्याचे खोटे व्हिडिओ बनवून महाराष्ट्रात वातावरण तापवण्याची खेळी काही संघटना करत आहेत. अमरावती, नांदेड येथील जिहादी गटांच्या कृत्याकडे इतक्या मर्यादित दृष्टीने पाहणे ही स्वत:ची आणि इतरांचीही फसवणूक ठरेल. खोट्या घटनांचा वापर करत अफवा पसरवून देणे, त्या माध्यमातून सर्वसामान्य मुसलमान लोकांमध्ये हिंदू समाजाविरुद्ध संतापाची भावना निर्माण करणे आणि त्या समाजाला लोकाशाही पद्धतीने निषेध करण्यासाठी म्हणून रस्त्यावर आणणे आणि त्यानंतर शक्य तेथे हिंसाचाराची सुरुवात करून जमावाला उकसवणे.. अशी प्रणाली आहे.

amravati_2  H x
 
शुक्रवार. दि. 12 नोव्हेंबर 2021. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा दिवस सामान्यच होता. वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, अन्य मीडिया यांच्यासाठी कान, नाक आणि डोळे असलेले त्यांचे वार्ताहर नेहमीप्रमाणेच उठून आपल्या रूटीन दिनचर्येला लागले. काही जिहादी धर्मांध गट हे या शुक्रवारचा (जुम्मा) वापर हिंसाचार, जाळपोळ आणि हिंदू समाजाविरुद्ध हल्लाबोल करण्यासाठी करत होते, याचा यत्किंचितही मागमूस मीडियाला नव्हता. पोलिसांनाही याची खबरबात नव्हती. असणार तरी कशी?
 
 
पोलीस यंत्रणा काम कशी करते? मीडिया कशी सक्रीय होते? राजकीय पक्ष दंगलकाळात आणि त्यानंतर कशी भूमिका घेतात? बुद्धिजीवी वर्ग कशी भूमिका घेतो? याचा अभ्यास आणि अनुभव जिहादी अराजक घडवून आणणार्‍या शक्तींकडे पुरेसा आहे आणि याउलट दंगली कशा घडवल्या जातात, त्यामागील यंत्रणा कशी काम करते याचा अभ्यास क्वचित केला जातो. Riots and Wrongs; Islam and Religious Riots : Case Study हा अभ्यासग्रंथ भारतीय गुप्तचर खात्यात मोलाची कामगिरी बजावलेले आणि राष्ट्रपती पोलीस मेडल, इंडियन पोलीस मेडल मिळवलेले वरिष्ठ अधिकारी आरएनपी सिंग यांनी लिहिला आहे. परंतु, असे ग्रंथ वाचण्याची, त्याद्वारे प्रबोधन करण्याची आणि सज्ज राहण्याची ना मीडियाला गरज वाटते, ना सत्ता राबवणार्‍या धुरीणांना. पोलीस यंत्रणेतील जबाबदार अधिकार्‍यांना याचा अनुभव असतो, पण त्यातील बहुतेकांना जिहादींची प्रेरणा आणि जिहादी शक्तींच्या षड्यंत्राला हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येने बळी पडून प्रक्षोभक कृती करायला, जाळपोळ, दंगल घडवायला रस्त्यावर उतरणारा सर्वसामान्य मजहबी समुदाय याची प्रक्रिया याविषयीचे अज्ञान असते.
याचाच परिणाम म्हणजे शुक्रवार, दि. 12 नोव्हेंबरसारख्या घटना घडतात. त्या दिवशी बंद पाळण्याचे नियोजन रझा अकादमीसारख्या काही मुस्लीम संघटनांनी केले. मशिदी आणि मदरसा यातून याचे नियोजन केले गेले. त्रिपुरामध्ये मुसलमानांवर अत्याचार सुरू असल्याचे खोटे व्हिडिओ बनवले गेले. म्यानमार व अन्य घटनांचे एक-दोन वर्षांपूर्वीचे फोटो वापरून त्रिपुरात मुसलमानांवर अत्याचार सुरू असल्याच्या पोस्ट व्हायरल केल्या गेल्या. पूर्वी कधी भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या मशिदींचे फोटो दाखवून त्रिपुरात मशिदी उद्ध्वस्त करत असल्याच्या पोस्ट्स बनवल्या गेल्या. नाशिकमधील झाडून सार्‍या माशिदींमधून त्रिपुरा राज्यातील न झालेल्या हिंसाचारात बळी पडलेल्या मुस्लिमांसाठी प्रार्थना करण्यात आली. त्या काल्पनिक घटनेच्या निषेधासाठी अमरावतीत 15 ते 20 हजार लोकांचा जमाव रस्त्यावर उतरला. त्याला मोर्चा म्हटले गेले. या जमावातील लोकांनी ठरवून हिंदू दुकानांवर हल्ला चढवला. तोडफोड केली. नांदेड, मालेगाव भागात दगडफेक करण्यात आली. धुडगूस घातला गेला. अकोला, बुलढाणा, कारंजा, चिखली, सिंदखेडराजा येथे मूक मोर्चे काढण्यात आले.
मुळात त्रिपुरात मशिदी पाडल्याच्या, कुराण ग्रंथाचा अवमान झाल्याच्या घटना घडल्याच नाहीत. समजा, तेथे दुर्दैवाने तशा घटना घडल्या असत्या, तरीही महाराष्ट्रातील शहरांमध्ये जाळपोळ, दगडफेक करून दंगल घडवण्याचे समर्थन होऊ शकत नाही. परंतु अमरावती, नांदेड येथील जिहादी गटांच्या कृत्याकडे इतक्या मर्यादित दृष्टीने पाहणे ही स्वत:ची आणि इतरांचीही फसवणूक ठरेल. खोट्या घटनांचा वापर करत अफवा पसरवून देणे, त्या माध्यमातून सर्वसामान्य मुसलमान लोकांमध्ये हिंदू समाजाविरुद्ध संतापाची भावना निर्माण करणे आणि त्या समाजाला लोकाशाही पद्धतीने निषेध करण्यासाठी म्हणून रस्त्यावर आणणे आणि त्यानंतर शक्य तेथे हिंसाचाराची सुरुवात करून जमावाला उकसवणे.. अशी प्रणाली आहे.
 
 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात
1920च्या सुरुवातीला मलबारमध्ये जे काही घडले, त्याला मोपला बंड म्हटले गेले. खुद्दम-ए-काबा (मक्का मशिदीचे सेवक) आणि सेंट्रल खिलाफत कमिटी या दोन मुस्लीम संघटनांनी केलेल्या आंदोलनाचा तो परिणाम होता. ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखालील भारत हे दार-उल-हरब आहे आणि मुस्लिमांनी त्याविरुद्ध लढलेच पाहिजे आणि ते तसे करत नसतील तर हिजरतचे पर्यायी तत्त्व पाळले पाहिजे, असा प्रचार आंदोलकांनी केला. या आंदोलनामुळे मोपले अचानक जणू खेचले गेले.
 

bhim_1  H x W:
हा उद्रेक मूलत: ब्रिटिश सरकारच्या विरोधात होता. ब्रिटिश सरकारचा पाडाव करून इस्लामचे राज्य स्थापन करणे हे उद्दिष्ट होते. गुप्तपणे चाकू, तलवारी आणि भाले तयार केले गेले, ब्रिटिश सत्तेवर हल्ला करण्यासाठी उन्मादी लोकांच्या टोळ्या बनवल्या गेल्या. 20 ऑगस्ट रोजी मोपला आणि ब्रिटिश सैन्य यांच्यात पीरूनांगडी येथे मोठी चकमक झाली. रस्ते अडवण्यात आले. टेलिग्राफ लाइन कापली गेली. अनेक ठिकाणी रेल्वे उद्ध्वस्त करण्यात आली. प्रशासन हतबल ठरताच मोपल्यांनी स्वराज्य स्थापन झाल्याची घोषणा केली. एका विशिष्ट अली मुदलियारला राजा घोषित करण्यात आले. खिलाफतचे झेंडे फडकवले गेले. एर्नाड आणि वल्लुराना भागात खिलाफत राज्य घोषित करण्यात आले. ब्रिटिश सरकारविरुद्ध बंड म्हणून ते अगदी समजण्यासारखे होते. पण सगळ्यात जास्त धक्कादायक गोष्ट म्हणजे मोपल्यांनी मलबारच्या हिंदूंना दिलेली वागणूक. मोपल्यांच्या हातून हिंदूंच्या नशिबी भयंकर यातना आल्या. नरसंहार, बळजबरीने धर्मांतर, मंदिरांची विटंबना, महिलांवरील घृणास्पद कृत्ये - उदा., खुलेआम गरोदर स्त्रियांना फाडणे, लुटालूट, जाळपोळ आणि नासधूस.
 
थोडक्यात, मोपल्यांनी क्रूर आणि अनियंत्रित रानटीपणाचा नंगानाच केला. सेना त्या दुर्गम भागात लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोहोचली नाही. सेना पोहोचेपर्यंत हिंदूंवर अनन्वित अत्याचार सुरूच होते.
 
ही हिंदू-मुस्लीम दंगल नव्हती. हे फक्त बार्थोलामेव (राक्षस) होते. अगणित हिंदू मारले गेले, जखमी झाले किंवा धर्मांतरित झाले. ही संख्या माहीत नाही. पण ती प्रचंड मोठी असावी.
 
(संदर्भ - पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन, बी.आर. आंबेडकर, पृष्ठ 153.)
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिहितात, महात्मा गांधींनी मात्र या बंडाकडे मोपल्यांचे धर्मकृत्य म्हणून पाहिले. गांधीजी मोपलांविषयी बोलले की, ‘शूर ईश्वरभक्त मोपले ज्याला मजहब (religious) ) मानतात त्यासाठी लढत होते आणि त्या पद्धतीला ते धार्मिक (religious)  मानत होते. ( Pakistan or the Partition of India, B.R. Ambedkar, p.148.)
 
 
सोलापुरातही दोन दशकांपूर्वी असेच झाले. कोठे युरोपात वा अमेरिकेते म्हणे ख्रिस्ती पादर्‍याने कुराण ग्रंथाचे पान फाडले. त्या घटनेचा विरोध करण्यासाठी सोलापुरात बंदचे नियोजन करण्यात आले. तेव्हाही आताप्रमाणेच मीडिया, पोलिस, सर्वसामान्य हिंदू समाज या प्रकाराबद्दल अनभिज्ञ होता. दसरा सणात अचानक देवी मूर्तीचे भंजन करण्यात आले. त्यानंतर दगडफेक, जाळपोळ, रक्तपात सुरू झाले. त्यानंतर हिंदू समाज संतप्त होऊन प्रतिकारासाठी रस्त्यावर आला. स्वाभाविकच तोवर पोलीस यंत्रणा जागी झालेली. दंगेखोर जिहादी घरात लपले अन हिंदू गटाची गाठ पोलिसांशी. हा प्रकार नेहमीचाच बनून गेला आहे. सोलापुरात ज्या दिवशी दंगलीची सुरुवात झाली, त्याच्या आदल्याच दिवशी काही गटांना याची कल्पना होती. त्या दिवशी नेहमीच्या फळविक्रेत्यांनी आपली दुकाने उघडलीच नव्हती. कारण त्यांना निषेध मोर्चात सहभागी होण्याचे निरोप गेले होते.. दंगलींसंबंधीचे अशी निरीक्षणे टिपण्याची यंत्रणा पोलिसांकडे असलीच पाहिजे. किंबहुना सजग समाजाने ती विकसित केली पाहिजे.
गेल्या वर्षी दिल्लीत दंगली घडवण्यात आल्या. तेथेही खोट्या बातम्यांनी प्रक्षोभ निर्माण केला गेला. हिंदू दुकानांची राखरांगोळी करून दंगलीची सुरुवात करण्यात आली. त्या दंगलीची तयारी कित्येक महिने आधीपासून सुरू होती, हे नंतर कळले. परंतु, ती दंगल होईपर्यंत याचा थांगपत्ता कोणालाही लागला नव्हता. अगदी पोलिसांनाही. ती फार मोठी दंगल होती. हजारो लोकांना त्याची झळ लागली. अर्थातच दंगल घडून गेल्यानंतर पोलीस यंत्रणा सज्ज झाली. हिंदू गटही मोर्चाने प्रत्युत्तर देण्यासाठी रस्त्यावर आला.. पोलीस यंत्रणेने हा संताप नियंत्रणात आला.

 
amravati_1  H x
 
त्यानंतर बंगळुरूतही अशाच रितीने दंगल घडवण्यात आली. सगळीकडे दंगल घडवण्याच्या पद्धतीत सारखेपणा आहे. जिहादी गटांनी मशिदी, मदरसा यांचा आडोसा घेऊन अफवांच्या आधारे मुस्लिमांना भडकवायचे. निषेध, मोर्चाचे निमित्त करून रस्त्यावर यायचे. दंगल घडवायची. त्याला प्रत्युत्तर म्हणून काही हिंदू गट रस्त्यावर येणार. यांना पोलीस नियंत्रित करणार. प्रसंगी लाठीमार करणार. काही जणांवर गुन्हेही दाखल होणार. दंगल सुरू करणार्‍या पाच-पन्नास जिहादींवर गुन्हे दाखल अन् प्रतिकारासाठी रस्त्यावर आलेल्या पाच-पन्नास हिंदूंवरही गुन्हे दाखल. मग येथून सुरू होते बुद्धीच्या क्षेत्रातील दलालांचे नॅरेशन. राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय मुखंडही पुढे येतात. ही दंगल दोन्ही गटांनी मिळून घडवली, अशी हाकाटी पिटली जाते. हिंदू गटही तेवढेच जबाबदार, अशा बातम्या येऊ लागतात. यातून मूळ दार उल इस्लामच्या धर्मवेडातून फोफावणार्‍या दंगली अन् अराजकाकडे दुर्लक्ष केले जाते. आणि पुन्हा पुढची दंगल...
 
सुदैवाने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जिहादी मनसुबे आणि त्यासाठीची कार्यपद्धती याचे भेदक विश्लेषण केले आहे. जे या महिन्यात अमरावती नांदेडात घडले, त्यापूर्वी बंगळुरूत, दिल्लीत घडले, ते शेकडो वेळा पुन्हा पुन्हा घडले आहे. आजपासून शंभर वर्षांपूर्वी केरळात घडले होते. मोपले मुसलमानांतील जिहादी गटाने मोठा नरसंहार घडवला होता. इतिहासातील तो काळा अध्याय कधीही पुढे आणला गेला नाही. त्यामुळे लोकांचे प्रबोधन होणे शक्य झाले नाही.
 
या प्रश्नांचाही विचार व्हावा..
* राज्यात एकाच दिवशी विशिष्ट संघटनांनी अफवा पसरवण्यात दाखवलेली एकी विचार करायला भाग पाडणारी आहे. त्रिपुरातील मुस्लिमांवर अत्याचार झाल्याची अफवा पसरवण्यात आली आणि अफवा पसरवणार्‍या धर्मांध संघटनांकडूनच महाराष्ट्र राज्यात बंदची मोठी योजना केली. थेट रस्त्यावर जमाव येतो, जाळपोळ-दगडफेक सुरू होते, पळापळ सुरू होते... मग तीव्रता ध्यानी येते. त्रिपुरा, म्यानमार येथील मुस्लिमांवर कथित अत्याचार झाले म्हणत सक्रिय होत दंगली, जाळपोळ करणार्‍या धर्मांध संघटना तेव्हा कुठे असतात, जेव्हा बांगला देशात, पाकिस्तानात हिंदूंचे जगणे नरक बनवले जाते?
* अफगाणिस्तानात तालिबानी धुमाकूळ घालून लाखो मुस्लिमांचे जगणे असह्य केले, तरी त्यावर नाशिकमधील सर्व माशिदींमध्ये अमनसाठी दुआ पठण का होत नाही?
* अफगाणिस्तान, बांगला देश, इराक आदी देशांत जिहादी मुस्लीम संघटना क्रौर्याची परिसीमा गाठतात, तेव्हा रझा अकादमी, मुस्लीम पंच कमिटी वगैरे संघटना निषेध, निवेदन देण्यासाठी पुढे आल्याचे का दिसत नाही?
* अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देश येथे एखादी व्यक्ती मुसलमान नाही, ती हिंदू किंवा इतर धर्माची आहे म्हणून त्याचे जगणे नाकारले जाते. अशा अभागी गैरमुस्लीम व्यक्तीस आश्रय व नागरिकत्व देण्यासाठी भारत सरकार उअअ हा कायदा बनवते आणि भारतातील मुस्लीम संघटना उअअला विरोध करण्यासाठी रस्त्यारस्त्यावर शाहीन बाग म्हणत आंदोलन सुरू करतात. जिहादी मुसलमान हे पाकिस्तानातील आणि बांगला देशातील हिंदूंवर मरणप्राय अत्याचार करतात, म्हणून भारतातील या धर्मांध संघटनांना कधी लाज वाटली आहे काय?
*जिहादच्या विविध छटा आहेत. काही जिहादी थेट हातात तलवारी, बंदुका घेऊन रक्तपात करतात, तर काही जिहादी त्यांना पूरक भूमिका घेत त्यांना बळ पुरवतात. कधी मौन राहून कार्यभाग साधतात, कधी निवेदने देतात, कधी निषेध करतात, कधी सेक्युलॅरिझमचा जप करतात... पण हे सर्व करण्यामागे जिहादी गटांना अनुकूलता आणणे हाच एक उद्देश असतो. समाजात हे बेमालूमपणे मिसळलेले असतात. अशांना ओळखणे कठीण असते. अशांना उघडे पाडत राहणे हाच एक लोकशाही मान्य उपाय आहे.

  
दोन दिवसांपूर्वीचीच घटना. एका मोठ्या दैनिकात मोठ्या पदावर मागील 18 वर्षांपासून पत्रकार म्हणून काम करणारा माझा मित्र भेटला. त्याची विश्लेषणबुद्धी फार चांगली आहे. जनरल नॉलेजमध्ये त्याचा हात भले भले धरू शकत नाहीत. इतिहास असो वा क्रीडा, चित्रपट असो वा राजकारण, समाजकारण, पुरोगामी चळवळ इ. अनेक संदर्भ त्याच्या जिभेवर असतात. पण तो मला म्हणाला की, “मी नुकताच मलबारमधील मोपल्यांनी केलेल्या नरसंहाराविषयी एक लेख वाचला. त्यातील डॉ. आंबेडकरांनी केलेल्या नोंदीही वाचल्या. परंतु, आजवर ही घटना मला माहीतच नव्हती. इतिहासातील फार मोठी दुर्दैवी घटना आहे ही. इतके दिवस मला ही घटना माहीत नव्हती, याचे आश्चर्य वाटते.”
एक सजग पत्रकार म्हणून अनेक वर्षे कार्यरत असलेल्या वाचनप्रिय पत्रकार मित्राची ही कथा आहे. सामान्य माणसांची तर बातच नाही. आणि या घटनेत डॉ. आंबेडकर यांनी नोंद केली आहे म्हणून त्या पत्रकाराचा विश्वास बसला. अन्यथा मोपले म्हणजे इंग्रजांविरुद्ध लढणारे स्वातंत्र्यसैनिक होते अशी भूमिका मांडणार्‍या दंगेखोरांची कमतरता नाही. मुंबईत मुस्लीम वस्तीत बाँबस्फोट घडलेला नसताना खोटी माहिती देणार्‍या शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांचीही कमतरता नाही. मुस्लीम नेत्यांची सहमती म्हणजे परवानगी घेऊनच शिवसेनेला महाआघाडीत घेण्यात आल्याचे अभिमानाने सांगणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांचीही येथे कमतरता नाही. ही मंडळी खर्‍याचे खोटे, खोट्याचे खरे करण्यात तरबेज आहेत. ते दंगेखोरांना शांतताप्रेमीही ठरवू शकतात. प्रतिकारासाठी पुढे आलेल्यांना दंगेखोरही ठरवू शकतात.

 
जिहादच्या विविध छटा आहेत. काही जिहादी थेट हातात तलवारी, बंदुका घेऊन रक्तपात करतात, तर काही जिहादी त्यांना पूरक भूमिका घेत त्यांना बळ पुरवतात. कधी मौन राहून कार्यभाग साधतात, कधी निवेदने देतात, कधी निषेध करतात, कधी सेक्युलॅरिझमचा जप करतात... पण हे सर्व करण्यामागे जिहादी गटांना अनुकूलता आणणे हाच एक उद्देश असतो. समाजात हे बेमालूमपणे मिसळलेले असतात. अशांना ओळखणे कठीण असते. अशांना उघडे पाडत राहणे हाच एक लोकशाही मान्य उपाय आहे.
 
याबद्दल समाजानेच सजग बनले पाहिजे. जिहादी प्रवृत्तीविरुद्ध आवाज बुलंद करणार्‍या मुस्लीम समाजातील गटांना बळ पुरवले पाहिजे. खर्‍याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणण्याचे धाडस मीडियामध्ये, पोलिसांमध्ये आणि बुद्धिजीवींमध्ये येण्याची गरज आहे. सत्य समाजाच्या इच्छेप्रमाणे जाऊ शकत नाही, एक ना एक दिवस समाजाला सत्याच्या मागे यावेच, लागेल, अशा आशयाचे स्वामी विवेकानंद यांचे एक वचन आहे.