हिंदुत्वाचा वाढता स्वीकार

विवेक मराठी    20-Nov-2021
Total Views |
 
@ल.त्र्यं. जोशी 9699240648
राहुल गांधी जेव्हा हिंदुत्व वेगळे आणि हिंदू धर्म वेगळा असा मुद्दा मांडतात, तेव्हा ते स्वत:ची व स्वत:बरोबर इतरांचीही फसवणूक करतात. मुळात त्यांचे व त्यांच्या सहप्रवाशांचे ना हिंदुत्वाशी, ना हिंदू धर्माशी काही देणेघेणे आहे. त्यांना फक्त आणि फक्त सत्तेशी देणेघेणे आहे. ज्या सहजतेने त्यांनी कथित धर्मनिरपेक्षतेचा तोंडी लावण्यापुरता वापर केला आहे, त्याच पद्धतीने ते आज हिंदू धर्माचा वापर करीत आहेत.

congress_1  H x
देशातील सद्य:स्थितीचे सूक्ष्म अवलोकन केले, तर एका बाबीचा स्पष्टपणे संकेत मिळतो व ती म्हणजे हिंदुत्वाचा वाढता स्वीकार. याच देशात एक काळ असा होता की, ‘तुम्ही मला गाढव म्हटले तरी चालेल, पण हिंदू म्हणू नका’ असे म्हणण्यात काही मंडळींना कुठलाही संकोच वाटत नव्हता. अनेक महाभागांनी हिंदुत्वाची उपहासगर्भ तुलना ‘किराणा’ मालाशी करण्यात धन्यता मानली होती. हिंदुत्व समजावून सांगण्यासाठी मुस्लीम वा ख्रिस्ती धर्ममतांचा संदर्भ देणे अपरिहार्य मानले जात होते. तथाकथित धर्मनिरपेक्षतेचा उदोउदो करण्याच्या बेगडी धर्मनिरपेक्षतेच्या त्या काळात लालकृष्ण अडवाणी यांनी तिचे खरे स्वरूप उघड करेपर्यंत तिने तुष्टीकरणाचे पुढचे टप्पे गाठले होते. पण विश्वबंधुत्वाच्या आधारावरील हिंदुत्वाने उपेक्षा, उपहास, उपमर्द सहन करून या विचाराची शुभशक्ती एवढी वाढविली की, आज देशात या विचाराचा स्वीकार दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.
 
 
अर्थात हे संकेत देणार्‍या सर्वच शक्तींनी त्याचा मूळ अर्थ लक्षात घेऊन ते स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे, असे म्हणता येणार नाही. त्यांची काही प्रमाणात असाहाय्यताही असू शकते, स्वार्थही आहेच. तो साधण्यासाठी का असेना, पण आपण हिंदुत्वाला सरसकट नाकारू शकत नाही, हे संबंधितांच्या लक्षात येणे हीसुद्धा काही कमी फलश्रुती म्हणता येणार नाही. त्याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे काँग्रेस पक्षाचे म्हटले तर माजी, म्हटले तर भावी आणि अप्रत्यक्षपणे का होईना, कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष राहणारे राहुल गांधी यांनी नुकत्याच सेवाग्राम येथे आटोपलेल्या काँग्रेस कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गामध्ये हिंदुत्वाचे विश्लेषण करण्याचा केलेला प्रयत्न.
 
 
तसे पाहिले, तर राहुल गांधी गंभीर विचार करणारे नेते म्हणून ओळखले जात नाहीत. राजकीय विचारांबाबतचा त्यांचा वकूबही वेळोवेळी लोकांच्या लक्षात आला आहे. द्वेषपूर्ण आक्रमकतेच्या भावनेतून त्यांनी वेळोवेळी केलेल्या ‘वन लायनर’ टिवटिवाटातूनही त्यांची पातळी सर्वांना कळली आहे. संघ व भाजपा यांच्याविषयीचा कमालीचा द्वेष त्यांच्या या टिवटिवाटातून लपून राहिलेला नाही. त्यामुळे असे व्यक्तित्व जेव्हा तथाकथित धर्मनिरपेक्षतेला बाजूला सारून हिंदुत्व आणि हिंदू धर्म यांची चिकित्सा करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा त्यातून हिंदुत्वाची अपरिहार्यता अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.
 
 
अर्थात ते राहुल गांधींनीच कशाला सांगायला पाहिजे? आतापर्यंत जे लोक तथाकथित धर्मनिरपेक्षतेचे कौतुक करताना थकत नव्हते, हिंदुत्वाला नाकारणे हाच मुळी ज्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा आधार होता, त्या नादात ज्यांनी मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची अवहेलना करण्यास मागेपुढे पाहिले नाही, तीच मंडळी आज ‘जय श्रीराम’ या शब्दात उद्घोष करू लागली आहेत, गाजावाजासहित अयोध्येला जाण्यात धन्यता मानत आहेत, रामलल्लाचे गुणगान करीत आहेत, तेव्हा त्यातून रामाची व पर्यायाने हिंदुत्वाची अपरिहार्यताच सूचित होते. आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, बसपाच्या मायावती, सपाचे अखिलेश यादव, तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांची ताजी वक्तव्ये त्या संदर्भात पुरेशी बोलकी आहेत. मुस्लीम मतांंवर डोळा ठेवून या मंडळींनी प्रत्येक वेळी अयोध्या आंदोलनाला जातीय, धार्मिक, हिंसक, द्वेष पसरविणारे आदी दूषणे देण्यात धन्यता मानली होती. लालूप्रसाद यादव यांनी तर रथयात्रेद्वारे अयोध्येला निघालेले लालकृष्ण अडवाणी यांना अटक करण्यात बहादुरी मानली होती. त्या आंदोलनाची टिंगलटवाळी करण्यात स्वत:ला ‘जाणता राजा’ समजणारे शरद पवारही मागे राहिले नव्हते.
 

congress_2  H x
राहुल गांधी यांचे हिंदुत्व आणि हिंदुइझम यातील फरक सांगणारे ‘विश्लेषण’
 
पण आज परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. भारताच्या न्यायपालिकेचे त्यात अतिशय महत्त्वाचे योगदान आहे याबद्दल वादच नाही, पण तरीही हिंदुत्वाचे पाईक असलेल्या लक्षावधी कारसेवकांपासून त्याचे श्रेय कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मात्र हिंदुत्वाच्या वाटचालीचा तो प्रारंभबिंदू म्हणता येणार नाही. त्याचे खरे श्रेय द्यायचे झाल्यास गेली उणीपुरी शंभर वर्षे अखंडपणे, निर्धाराने हिंदुत्वाचा विचार सुदृढ करणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू जागृतीच्या संघटित चळवळीलाच द्यावे लागणार आहे. या काळात संघाला पावलोपावली किती प्रखर विरोध झाला? पण ‘न निश्चितार्धात वीरमंति धीरा:’ या उक्तीनुसार त्याने चरैवेती चरैवेतीचा मंत्र सार्थ केला आणि त्यातूनच आज हिंदुत्वाचा स्वीकार दिसू लागला आहे.
 
 
अर्थात आपले कार्य अद्याप संपलेले नाही. अजून भरपूर वाटचाल करून विश्वबंधुत्वाचे आपले स्वप्न साकार करायचे आहे, याची संघाला यथार्थ जाणीव आहे, हा हिंदुत्वासाठी आश्वासक विचार आहे.
 
 
खरे तर राहुल गांधी जेव्हा हिंदुत्व वेगळे आणि हिंदू धर्म वेगळा असा मुद्दा मांडतात, तेव्हा ते स्वत:ची व स्वत:बरोबर इतरांचीही फसवणूक करतात. मुळात त्यांचे व त्यांच्या सहप्रवाशांचे ना हिंदुत्वाशी, ना हिंदू धर्माशी काही देणेघेणे आहे. त्यांना फक्त आणि फक्त सत्तेशी देणेघेणे आहे. ज्या सहजतेने त्यांनी कथित धर्मनिरपेक्षतेचा तोंडी लावण्यापुरता वापर केला आहे, त्याच पद्धतीने ते आज हिंदू धर्माचा वापर करीत आहेत. अन्यथा त्यांनी कथित धर्मनिरपेक्षतेची कास सोडून वैचारिक पलटी मारलीच नसती व हिंदू धर्माची महती गायिलीही नसती. आपल्याला हिंदू धर्माशिवाय पर्याय नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आले, काँग्रेस हा मुस्लिमांचा पक्ष म्हणून ओळखला जात आहे हे जेव्हा त्यांना कळले, तेव्हा त्यांना शिव आठवू लागले, जनेऊ आठवू लागले, मंदिरांमध्ये प्रदक्षिणा कराव्याशा वाटू लागल्या. गंगास्नान करावेसे वाटू लागले. हे परिवर्तन बेगडी असले तरी ते स्वागतार्हच मानले पाहिजे. कारण त्यातून हिंदुत्वाची अपरिहार्यता सूचित होते.
 
 
राहुल गांधी जेव्हा उपनिषदे वाचल्याचा दावा करून जणू काय आपल्यालाच हिंदुत्व आणि हिंदू धर्म यातील कथित फरक समजल्याचा दावा करतात, तेव्हा त्यांच्यातील पोकळपणा लक्षात आल्याशिवाय राहत नाही. मुळात हिंदू धर्माला उपासनापद्धतीच्या बंधनात अडकविण्याचा प्रयत्न करणे हेच चुकीचे आहे. कारण इंग्लिशमध्ये ज्याला रिलीजन म्हटले जाते, त्या शब्दाचे भाषांतर अद्याप होऊ शकलेले नाही. हिंदू धर्म हा त्या शब्दाच्या खूप पुढे आहे. कारण ‘एकं सत् बहुला वदन्ती’ - सत्य एकच आहे, लोक ते विविध पद्धतीने सांगत असतात, हे या विचारसरणीचे मूलतत्त्व आहे. ईश्वर एक आहे, त्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने भजू शकता, ही या प्रणालीची मान्यता आहे. त्याला तुमच्या भाषेचे, वेशभूषेचे, खानपानाचे, रंगसंगतीचे कोणतेही बंधन नाही, असे ती सातत्याने स्पष्ट करते. कोणत्याही साचेबद्ध आचाराशी वा विचारसरणीशी किंवा उपासनापद्धतीशी तिची तुलना होऊच शकत नाही. आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने अधिकृतपणे ‘ती एक जीवनप्रणाली आहे’ असे वारंवार स्पष्ट करून हे सांगितले आहे. कदाचित ‘अडगळ’ असली तरी ती ‘समृद्ध’ आहे, असे ज्ञानपीठ विजेत्या भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या विद्वानालाही म्हणावे लागले आहे, तिची तुलना कोणत्याही प्रस्थापित एकेश्वरी उपासनापद्धतींशी कशी होऊ शकेल? पण हा सूक्ष्म फरक राहुल गांधींसारख्या ओंजळभर पाण्यात गटांगळ्या खाणार्‍याच्या कसा लक्षात येईल? त्यांनी सरळसोट विचार केला की, हिंंदुत्व ही संघ-भाजपाची संपत्ती आहे. एकवेळ ते हजारो वर्षांच्या इतिहासाचा दाखला देऊन हिंदू धर्मापासून वेगळे केले की, आपण आपला द्वेषपूर्ण अजेंडा पुढे रेटण्यास मोकळे होऊ. म्हणून हिंदुत्वाचा त्याग आणि हिंदू धर्माचा स्वीकार. पण हे करताना आपण हिंदुत्वाच्या जवळ जात आहोत, हे बहुधा त्यांच्या लक्षात आले नसेल. किंवा आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी त्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आले असेल.
 
 
अर्थात राहुलच्या लक्षात आले नाही म्हणून काही फरक पडत नाही. पण त्यांच्या पक्षाचेच ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी तो फरक लगेच लक्षात आणून दिला. अन्यथा हिंदुत्वाची तुलना आयसिस वा बोको हरम यांच्याशी करण्याची हिंमत त्यांनी केलीच नसती. खरे तर संघाची हिंदुत्वाची व्याख्या व्यष्टीपासून सृष्टीपर्यंतच नव्हे, तर त्याच्याही पुढे परमेष्टीपर्यंत किती व्यापक आहे, हे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांनी स्पष्टपणे अधोरेखित केले आहे. त्यासाठी त्यांना काही मंडळींची नाराजीही पत्करावी लागत आहे. पण शेवटी सत्य ते सत्यच असते. ते पचायला वेळ लागू शकतो, पण अंतिम विजय सत्याचाच होत असतो, हे नाकारून चालणार नाही. मग राहुल गांधींसारख्या उथळ राजकारण्याने कितीही बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न केला, तरी काहीही फरक पडत नाही. उलट त्यातून हिंदुत्वाची अपरिहार्यताच अधिकाधिक स्पष्ट होते.
 
 
लोकांचा बुद्धिभेद करून आपण काँग्रेसचे पुनरुज्जीवन करू शकू असे जर राहुल गांधी यांना वा अन्य कुणा संघविरोधकांना वाटत असेल, तर ते कुठल्यातरी नंदनवनात वावरत आहेत, असे म्हणावे लागेल. कारण सत्ताप्राप्ती हे संघाचे उद्दिष्ट कधीच नव्हते. ‘परमवैभवम्नेतुमएतत स्वराष्टलम’ हेच ध्येय उराशी बाळगून गेली उणीपुरी शंभर वर्षे त्याची वाटचाल सुरू आहे. तिला संपर्क, संस्कार आणि सेवा यांचे भक्कम अधिष्ठान आहे. संतती, संपत्ती आणि सत्ता यातून भ्रष्टाचार, दुराचरण कसे फोफावते, हे लोकांनी ओळखले आहे आणि संघटित सेवा कार्याची फळेही चाखली आहेत. त्यामुळे राहुलसारख्यांनी भ्रमात न राहिलेले बरे.
 
 
हिंदू धर्माची भलावण करून आपण संघ-भाजपाला कसे निरुत्तर केले, अशी शेखी राहुल गांधी मारत असले तरी त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्याच पक्षात वादळ निर्माण झाले आहे व काँग्रेस संस्कृतीला हिंदुत्वाबद्दल किती घृणा आहे, हेही समोर आले आहे. या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ लोकसभा सदस्य, माजी मंत्री व हल्ली जी-23 समूहात असलेले मनीष तिवारी यांची प्रतिक्रिया उल्लेखनीय आहे. राहुल गांधींची ही भूमिका काँग्रेस कार्यकर्त्यांना गोंधळात टाकणारी असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, “पक्षाची अशी भूमिका असेल तर लोकांनी काँग्रेसमध्ये कशाला राहायचे? जे हिंदू असतील ते हिंदू महासभेत जातील आणि मुस्लीम असलेले एआयएमएमसारखा पर्याय निवडतील.” काँग्रेस अजूनही कथित धर्मनिरपेक्षतेच्या सापळ्यात अडकलेली आहे, हेही त्यातून सूचित होते. राहुलच्या अकाली धसमुसळेपणावर शिक्कामोर्तब होते, ते वेगळेच.
 
 
ज्येष्ठ पत्रकार, नागपूर.