संघमग्न दादा पवार

विवेक मराठी    20-Nov-2021
Total Views |
 
जिल्ह्यात ग्रामीण भागात संघकार्य विस्तारले पाहिजे, याचा संघचालक नियुक्तीनंतर त्यांनी जणू ध्यासाच घेतला. प्रथम आपल्या गावापासून प्रारंभ केला. ग्रामीण भागात उसवलेली सामाजिक वीण, गावात संघशाखा सुरू झाल्यावरच दुरुस्त होईल यावर ठाम विश्वास. नातेवाईक, मित्रमंडळी यांना आग्रहपूर्वक संघाला जोडले - अगदी सोबतचा चालकदेखील स्वयंसेवक झाला. त्यामुळे ग्रामीण भागात बहुजन वर्गात संघकार्याचा पाया व्यापक झाला.

RSS_1  H x W: 0

एखादी व्यक्ती संघसंपर्कात येते, संघसंस्काराच्या परीसस्पर्शाने आमूलाग्र परिवर्तन होते ही संघकार्यपद्धतीत रूढ परंपरा. मात्र याला काही जण अपवाद असतात. अशा व्यक्ती जन्मजात स्वयंसेवक असतात. मा. दादा पवार यापैकीच एक! एका अष्टपैलू हिऱ्याला सुवर्णकोंदण लाभावे व त्याचे अंगभूत सोंदर्य अधिकच उजळावे, तसाच हा योगायोग!
 
परभणी जिल्ह्यातील गोदातीरावरील वझुर, ता. पूर्णा येथील पंचक्रोशीत ख्यातकीर्त असलेलेले मातब्बर पवार घराणे. पिढीजात जमीनदार. सुबत्ता, त्याचबरोबर लाभलेली वारकरी संप्रदायाची आध्यात्मिक परंपरा. अशा कुलीन कुटुंबात ज्ञानदेवराव पवार दांपत्याच्या पोटी गंगाधराने जन्म घेतला. 'शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी'. जेष्ठ पुत्र असल्यामुळे दादा हेच नाव रूढ झाले. पुढे 'दादा पवार' या नावाने सुविख्यात झाले. कायद्याचे शिक्षण घेतले, अल्पकाळ शिक्षकी पेश स्वीकारला. मात्र प्राप्त परिस्थिती व शेतीवरील नितांत प्रेम म्हणून गावी परतले. अल्पावधीत 'शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कारप्राप्त शेतकरी बनले. वास्तविक पार्श्वभूमी राजकारणात सक्रिय होण्यास अत्यंत अनुकूल, पण दादांनी हा मार्ग प्रारंभीच अव्हेरला. त्यांच्या गावाकडील बैठकीत 'येथे राजकारणावर चर्चा करू नये' असा पन्नास वर्षांपूर्वी लावलेला फलक आजही दृष्टीस पडतो. मात्र दादा भविष्यात अनेक राजकारण्यांचे अलिप्त मार्गदर्शक राहिले.

'योगियांच्या खुणा योगीच जाणे' या उक्तीप्रमाणे विलक्षण योग घडला. ज्येष्ठ संघप्रचारक, एक अर्थाने तपस्वी व्यक्तिमत्त्व जनुभाऊ रानडे यांच्या कानी मा. दादांची ख्याती कळली. एके दिवशी उन्हाळ्यातील रणरणत्या उन्हात पायी कोस-दीड कोस चालून ते भर दुपारी शेतात पोहोचले. एक अनामिक तरुण एवढ्या उन्हात कोसभर रान तुडवत निरपेक्षपणे "आपल्याला केवळ भेटायला आलो" असे आपल्याला सांगून संघपरिचय देऊन तसाच आल्या पावली रणरणत्या उन्हात परततो, या घटनेचा मा. दादांवर विलक्षण प्रभाव पडला. जणू काही संघदीक्षाच! हा संघस्पर्श - नव्हे, परीसस्पर्शच मा. दादांनी अखेरपर्यत केवळ जपला नव्हे, तर घेतलेला वसा अखेरच्या क्षणापर्यत सांभाळला. नंतर शेजारील गावातील संघप्रचारक मा. दादा लाड यांच्याशी घनिष्ठ संबध आला व दादा संघाच्या अधिकच संपर्कात आले.
प्रगतिशील शेतकरी असल्यामुळे स्वाभाविकच आ.भा. किसान संघाचे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हे दायित्व निर्वाहन केले. मा. दत्तोपंत ठेंगडींचा विलक्षण प्रभाव राहिला. अशा बहुआयामी सात्त्विक व्यक्तिमत्त्वाचा लाभ संघकार्यास व्हावा, या हेतूने मा. दादांकडे परभणी जिल्हा संघचालक हे दायित्व आले. आध्यात्मिक प्रवृत्ती असणाऱ्या मा. अण्णा गोसावी यांच्या निवृत्तीनंतर प्रांतसंघचालक म्हणून दादांकडे दायित्व आले. दादा मा. प्रांत संघचालक झाले. मा. दादांच्या नेतृत्वाखाली झालेला 'देवगिरी महासंगम' संघकार्यास निर्णायक वळण देणारा ठरला.
मा. दादांच्या जीवनाचे विविध पैलू आहेत - अजातशत्रू, व्यासंग, कृतिशील समाजसुधारक, प्रयोगशील शेतकरी, आदर्श कुटुंबप्रमुख, आध्यात्मिक बैठक, कमालीचा साधेपणा अशा विविध गुणांचा समुच्चय म्हणजे दादा!

परभणीत मा. दादांची ओळख म्हणजे 'सायकलवाले दादा पवार'! धोतर, सुती स्वच्छ सदरा तोही विनाइस्त्रीचा, गांधीटोपी व माथी चंदनाचा टिळा व सोबत सायकल. अत्यंत संपन्न परिवारात राहूनदेखील त्यांनी साधेपणा व काटकसर कसोशीने जपली. सदैव सायकलवर संचार करणाऱ्या दादांच्या अखेरच्या क्षणी सायकलच सोबतीस होती. पन्नास वर्षांपूर्वी तोट्यातली शेती नफ्यात आणली. आज सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती, झिरो बजेट शेती, शेतीमालावर प्रक्रिया करून मूल्यवर्धन, विपणन हे परवलीचे शब्द आहेत, मात्र दादांनी अशा सर्व विषयांतील अनेक प्रयोग खूप आधी यशस्वी केले. पारंपरिक शेतीचा आग्रह असताना नावीन्याचा नेहमीच ध्यास, त्याकरिता कृषी विद्यापीठातील संशोधकांशी नियमित संपर्क व चर्चा असायची. कुलगुरूंशी जिव्हाळ्याचा संबंध असे. देशी गाय हा दादांचा अत्यंत श्रद्धेचा विषय, घरी गाई असताना अलीकडे मोठी किंमत मोजून 'काँकरेंज' जातीची गाय नुकतीच खरेदी केली होती. ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा, यासाठी नित्य धडपड. यासाठी परिसरातील शंभर गावांतील तरुण शेतकर्‍यांना एकत्रित करून, शेती सेवा गट सुरू केला.

 
दादांचा वाचनाचा व्यासंग दांडगा. कायम बैठकीत नवीन पुस्तक असे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, शेतीविषयक साहित्य यांचा अंतर्भाव असे. रोज किमान तीन-चार वर्तमानपत्रे वाचणे हा नित्यक्रम. वाचताना महत्त्वाचे वाक्य अधोरेखित करत. आपल्याकडील पुस्तक कार्यकर्त्यांना आवर्जून देत व वाचनावर चर्चा रंगायची. शेतीपूरक उद्योगासंदर्भात प्रयोग कानी पडल्यावर विशेषतः तरुणांना सोबत घेऊन पाहून येणे हे ठरलेलेच असायचे.
 
 
दादा आदर्श कुटुंबप्रमुख होते. त्याला सक्षम साथ लाभली ती काकूंची. केवळ आपल्याच परिवारात नव्हे, तर अनेक कार्यकर्त्यांमध्ये, नातेवाइकांत व मित्रपरिवारात त्यांचे हे स्थान होते. नवीन पिढी उच्चशिक्षित झाली पाहिजे, त्याकरिता शेतीचा व्याप भावाकडे सुपुर्द करून तीस वर्षांपूर्वी दादा घरातील सर्व मुलांना घेऊन परभणीस वास्तव्यास आले. त्याचाच परिणाम आज पुढची पिढी उच्चशिक्षित झाली. संजय उपजिल्हाधिकारी, चेतनावहिनी संस्कृतमध्ये पीएच.डी., विजय व सोनालीताई अमेरिकेतून रसायनशास्त्रात पोस्ट डॉक्टरल रिसर्च करून पुण्यात स्थायिक, सोनालीताई पुण्यातील नामवंत फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक. धाकटा धनंजय अभियांत्रिकीत एम.एस., तर भक्तीवहिनी अन्नतंत्रज्ञानात पीएच.डी. अमेरिकेत वास्तव्याला! एवढी गुणवत्ता असणारी ही मंडळी मात्र व्यवहारात अत्यंत सालस, शालीन व आदबशीर.. कारण दादांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव.

जिल्ह्यात ग्रामीण भागात संघकार्य विस्तारले पाहिजे, याचा संघचालक नियुक्तीनंतर त्यांनी जणू ध्यासाच घेतला. प्रथम आपल्या गावापासून प्रारंभ केला. ग्रामीण भागात उसवलेली सामाजिक वीण, गावात संघशाखा सुरू झाल्यावरच दुरुस्त होईल यावर ठाम विश्वास. नातेवाईक, मित्रमंडळी यांना आग्रहपूर्वक संघाला जोडले - अगदी सोबतचा चालकदेखील स्वयंसेवक झाला. त्यामुळे ग्रामीण भागात बहुजन वर्गात संघकार्याचा पाया व्यापक झाला. जिल्हासंघचालक असताना त्यांनी एक अनोखा प्रयोग केला. ग्रामीण भागातील कर्त्या मंडळींना एकत्र बोलवून संघकामाचे प्रत्यक्ष दर्शन घडवण्यासाठी निवासी शेतकरी शिबिर घडवले. त्यांच्यासमोर प्रत्यक्ष शाखा, बौद्धिक वर्ग, बैठक असे सादरीकरण केले. ६१ गावांतून स्वखर्चाने शुल्क देऊन मंडळी आली.
संघात संघचालकांचे स्थान 'कुटुंबप्रमुख' असे असते. मा. दादाचे वागणे असेच, प्रत्येक कार्यकर्त्यांशी कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध. अडीअडचणीच्या प्रसंगी ठामपणे पाठीशी उभे असत. एकदा एक ग्रामीण भागातील कार्यकर्ता जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाला. गंभीर असल्यामुळे संभाजीनगरला हलवायचे ठरले. दादांनी लगेच कार्यकर्त्याकडे मोठी रक्कम सुपुर्द करून सर्वांना आश्वस्त केले. केवळ संघपरिवारातच नव्हे, तर समाजाच्या विविध क्षेत्रांतील मंडळींशी हे संबंध राहिले.
 
वास्तविक दादा कधी विद्वतप्रचुर बौद्धिक अथवा भाषण द्यायचे नाहीत. मात्र विलक्षण प्रभावी प्रेरणादायक हितगुज हे त्यांचे वैशिष्ट्य! त्यामुळे घरात अखंड राबता असायचा. प्रचारकांच्या संदर्भात अत्यंत भक्तिभाव. त्यांच्या लेखी ही संतमंडळीच! त्यामुळे कायम विचारपूस, प्रकृतीची चौकशी, त्यांच्या घरी संपर्क, त्यातून प्रचारकांच्या लेखी दादा हे अत्यंत जिव्हाळ्याचे स्थान. थांबलेला प्रचारक जीवनात स्थिर झाला पाहिजे, याकरिता सर्वोतोपरी मदत व मार्गदर्शन असायचे. अखंड कार्यकर्त्यांची चिंता, सुखदुःखात सहभाग, त्यामुळे अनेक कुटुंबांत दादा मार्गदर्शक होते.

 
ग्रामीण भागातील मंडळींनी, आपल्या नातेवाइकांनी संघदर्शन घ्यावे याकरिता दर वर्षी शेतात हुरडा पार्टीचे आयोजन असे. प्रांतकार्यकर्ते, विभाग व जिल्हा कार्यकर्ते, गावातील नागरिक, नातेवाईक असा शे-दोनशे लोकांचा हा कार्यक्रम. यादरम्यान गोदातीरीच्या शेतात वनविहार, जलविहार, घोडेस्वारी व सर्वांना शेतातील विविध प्रयोग दाखवणे असा कार्यक्रम. त्याचबरोबर रानमेव्याचा यथेच्छ पाहुणचार. समारोप व्हायचा तो शेतावरील सर्व कामगारांच्या परिचय-सत्काराणे व संघप्रार्थनेने. या कार्यक्रमात दादांचा उत्साह अक्षरशः लहान बालकाप्रमाणे असायचा. दोन महिने आधीपासून पूर्वतयारी, कार्यक्रम संघाला शोभेल असाच व्हावा याचा आग्रह व कटाक्ष. निघताना सर्वाना रानमेव्याची शिदोरी भेट असायची.

प्रांतसंघचालक म्हणून निवृत्त झाल्यावर, मला आता अधिक गतीने सामान्य स्वयंसेवक म्हणून काम करत येईल याचा मनस्वी आनंद झाला. आपले गाव ही प्रयोगशाळा समजून, सामाजिक, स्वावलंबनाचे, विकासाचे प्रयोग सुरू केले. संघात उपक्रमांच्या कामाला प्रारंभ झाल्यावर त्यांनी पर्यावरण, गोसेवा, समरसता, कुटुंबप्रबोधन या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयांत खूपच रस घेतला. बऱ्याच वेळा समाजातील परिस्थिती पाहून उद्विग्न व्हायचे, मात्र संघकाम हाच एकमेव पर्याय या भूमिकेवर ठाम राहायचे.
असे बहुआयामी संतप्रवृत्तीचे व्यक्तिमत्त्व क्षणार्धात काळाच्या पडद्याआड गेले, हे मनाला पटतच नाही. सर्वत्र हिंदुत्वाला अनुकूल वातावरण असताना दादांचे नसणे हे क्लेशदायक!

दि. १७ नोव्हेंबर, बुधवार, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी महाप्रयाण झाले. विलक्षण योगायोग - अध्यात्मातील मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशी म्हणजे हरिहर भेटीचा दिवस, पुण्यात्म्याच्या स्वर्गारोहणाचा दिवस, त्यात शुभदिवस बुधवार. देह त्यागला तोदेखील देवाच्या द्वारी!

बुधवार रात्री सायकल घेऊन काही कामासाठी बाहेर पडले, शनी मंदिराच्या दारात अस्वस्थतता जाणवली म्हणून सायकलवरून उतरून पायरीवर विसावले ते कायमचे! वारकरी संप्रदायाचे साधक, नित्य हरिपाठ, ज्ञानेश्वरीचे वाचन, कार्तिकी वारीचा नेम, एकादशीचे व्रत असा संतप्रवृत्तीचा पुण्यात्मा अखेर श्रीचरणी लीन झाला.

क्षणार्धात सर्वत्र वृत्त पसरले. परिसरातील तरुण मंडळी, संघकार्यकर्ते धावले, रुग्णालयात धाव घेतली. मात्र व्यर्थ. दादा आधीच स्वर्गस्थ झाले होते.

गुरुवारी १८ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता राहत्या गावी वझुरला अंत्यविधी निश्चित झाला. मा. प्रांतसंघचालक अनिलजी भालेराव, प्रांतकार्यवाह हरीशजी कुलकर्णी, सहकार्यवाह विलासअण्णा दहिभाते, सहप्रांतप्रचारक परागजी कंगळे, अन्य प्रांत विभाग, जिल्हा कार्यकर्ते, जिल्हा संघचालक डॉ. केदार खटिंग, शहर संघचालक डॉ. रामेश्वर नाईक, लोकसभा सदस्य खा. संजय जाधव, विधानसभा लोकप्रतिनिधी आ. मेघनाताई बोर्डीकर, भारतीय किसान संघाचे अ.भा. संघटन मंत्री मा. दिनेशजी कुलकर्णी, प्रदेश मंत्री मा. दादा लाड, विविध क्षेत्रांतील मान्यवर कार्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित, पंचक्रोशीत आबालवृद्धद् अंतिम दर्शनाला वझुरला पोहोचले. मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. जेष्ठ सुपुत्र संजयने अंत्यविधी केले. पार्थिव अग्निनारायणाच्या स्वाधीन झाले. वारकरी मंडळी तल्लीन होऊन गात होती. ज्वाळा झेपावत होत्या. भजनाचे आर्त सूर आसमंतात पसरले होते. 'आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी' हा अभंग घेतला. मा. दादांचे संतस्वरूप लक्षात घेता, 'झाडू संतांचे मार्ग जग आडराने भरले, उच्छिष्टाचा भाग शेष उरले ते सेवू' या अर्थपूर्ण ओळी सर्वांच्या कानी पडत होत्या. जनसमुदाय खिन्न अंत:करणाने, मात्र विलक्षण प्रेरणा घेऊन मा. दादांच्या पाऊलखुणांवरून मार्गस्थ होत होता.