चिनी सामर्थ्याची कारणमीमांसा

विवेक मराठी    23-Nov-2021
Total Views |
भारत-चीन सीमावादाचा आणि त्या अनुषंगाने परस्पर संबंधांचा वेध राम माधव यांनी त्यांच्या 'Because India Comes First' या पुस्तकात घेतला आहे. विस्तारवादी चीनच्या बाबतीतील भारताचे वेळोवेळचे धोरण आणि त्याचे झालेले दीर्घकालीन परिणाम याची कारणमीमांसा या पुस्तकात केली आहे.

book_3  H x W:
 
श्री. विजय गोखले यांचे 'The Long Game : How the Chinese Negotiate with India' या पुस्तकातील पहिल्या प्रकरणाचा सारांश मागील लेखात आपण वाचला. या लेखाचा विषयदेखील भारत आणि चीन हाच आहे. "Because India Comes First'  हे राम माधव यांचे पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. परराष्ट्र धोरणासंबंधी काही लेख या पुस्तकात आहेत. चीनसंबंधात किमान पाच लेख आहेत. त्यातील दोन लेखांचा गोषवारा येथे बघू या.
 
 
या लेखांचे लेखन जेव्हा झाले, तेव्हा राम माधव भाजपामध्ये होते. पण भाजपाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी या लेखांचे लेखन केलेले नाही. खूपसे तटस्थ राहून त्यांनी लेखन केलेले आहे. त्यामुळे अनेक लेख भाजपात नसलेल्या माणसालादेखील विचार करायला लावणारे झाले आहेत. लेखनासाठी तटस्थ वृत्ती, विश्लेषण, अचूक संदर्भ आवश्यक असतात. यामुळे लेखाची उंची वाढते. राम माधव यांच्या बहुतेक लेखांसंबंधी चांगल्या उंचीचे लेख असे म्हणायला हरकत नाही.
 
 
चीनविषयी लिहिताना ते म्हणतात, ‘आपण चीनच्या आर्थिक प्रगतीने भारावून जाऊन विचार करतो. आपले राष्ट्रप्रमुख चीनला किती वेळा भेट देऊन आलेत, याचेही कौतुक करतो. चीनला त्याच्याशी काहीही घेणेदेणे नसते. चीन समजून घेण्यासाठी चीन ही केवळ आर्थिक महासत्ता नसून चीन ही एक संस्कृती आहे, हे लक्षात घ्यावे लागते. समाजाचा आर्थिक विकास कधी खूप मोठा तर कधी खूप कनिष्ठ असा असतो. परंतु समाजाची संस्कृती आणि तिचे खोलवरचे संस्कार यात असे चढउतार निर्माण होत नसतात. म्हणून चीन समजून घ्यायचा असेल तर कन्फ्युशियस, सन त्झू यांचे Art Of War हेे पुस्तकदेखील वाचायला पाहिजे. चीन जरी बौद्ध झाला असला, तरी त्याने या दोघांना सोडलेले नाही. याव्यतिरिक्त चीनचे टाओ तत्त्वज्ञान आहे आणि असंख्य टाओ कथा आहेत. चीनचे मानस समजून घेण्यासाठी या सर्वांचा अभ्यास करावा लागतो.’
 
 
book_2  H x W:
 
पुस्तकातील एक्कावन्नाव्या लेखाची सुरुवात अक्साई चीनच्या प्रश्नापासून होते. 38 हजार चौरस किलोमीटरचा भारताचा हा भूभाग चीनने बळकाविलेला आहे. 1960पासून चीनने भारताकडे प्रस्ताव ठेवायला सुरुवात केली की, अक्साई चीनचा प्रश्न आपण द्विपक्षीय वाटाघाटी करून सोडवू. चर्चेचा प्रस्ताव मांडताना चाऊ एन लाय नेहरूंना म्हणाले की, “मॅकमोहन लाइन ही साम्राज्यवाद्यांनी दिलेली सीमारेषा आहे, म्हणून चीन आणि भारताने ती नाकारली पाहिजे.” 1960 साली कृष्ण मेनन यांनी योजना मांडली की, भारताने अक्साई चीन, चीनचा आहे हे मान्य करावे आणि अरुणाचल प्रदेशावरून चीनने आपला हक्क सोडून द्यावा.
आपल्या सुदैवाने कृष्ण मेनन यांची योजना स्वीकारली गेली नाही. चीन धूर्तपणे भारताच्याच भूमीच्या बदल्यात भारताची भूमी हडप करण्याचा प्रयत्न करीत होता. अक्साई चीन भारताचा आहे आणि अरुणाचल प्रदेश हाही भारताचाच भाग आहे. भारताच्या एका भागाबद्दल भारताचा दुसरा भाग आम्हाला द्या, असा चीनचा प्रस्ताव होता. मॅकमोहन लाइन (सीमारेषा) चीनला मान्य नाही. ही सीमारेषा ब्रह्मदेश आणि चीन यांचीदेखील सीमारेषा आहे. ती मात्र चीनला मान्य आहे. भारत आणि चीन यांची सीमारेषा म्हणून मान्य नाही.
 
 
अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग आहे, असे चीनचे ठाम म्हणणे आहे. भारताचे राष्ट्रपती तिथे गेले असता चीनने त्याचा निषेध केला. आमच्या प्रदेशात भारताच्या राष्ट्रपतींचे काय काम, असे चीनचे म्हणणे होते. अरुणाचल प्रदेशाच्या तवांग भूभागावर चीनने आपला हक्क सांगितला. 1985 साली भारत आणि चीन यांच्या वाटाघाटीच्या सहाव्या फेरीत चीनने हा आग्रह कायम धरला. 1987 साली चीनने Sumdorong Chu Valley भागात घुसखोरी केली. तेथे हेलिपॅड बांधले. त्याचा प्रतिरोध करण्यासाठी भारतीय सैन्यदल तिथे गेले आणि तिथे मोर्चेबांधणी केली. त्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. नरसिंह राव शासनाने 1993 साली चीनशी करार केला आणि या करारानुसार दोन्ही सैन्य माघारी गेले आणि चू खोरे तटस्थ प्रदेश म्हणून मान्य करण्यात आला. यात चीनचा विजय झाला. तो कसा झाला, तर राम माधव सांगतात - ‘प्रदेश भारताचा, घुसखोरीने बळकावला चीनने, माघारी गेल्यानंतर प्रदेश भारताच्या ताब्यात यायला पाहिजे, परंतु तो न येता तटस्थ प्रदेश म्हणून मान्य करण्यात आला. म्हणजे आपलीच भूमी आपल्यापासून दूर झाली.’
 
 
भारताशी वाटाघाटी करीत असताना चाऊ एन लाय ‘पॅकेज डील’ असा शब्दप्रयोग करीत, नंतर डेंग झियाओपिंग यांनी सेक्टरप्रमाणे ‘वाटाघाटी’ असा शब्दप्रयोग सुरू केला. दोेघांचा अर्थ एकच होतो. भारत-चीन यांची सीमारेषा 2500 किलोमीटर लांबीची आहे. तिबेट, उत्तराखंड आणि हिमाचल यांना लागून असलेल्या चीनच्या सीमा, येथे सीमेचे वाद नाहीत. अक्साई चीनबद्दल चीन काही बोलायलाच तयार नाही. राम माधव खंत व्यक्त करतात की, आपले नेतेदेखील अक्साई चीनसंबंधी काही बोलत नाही. (पं. नेहरू या भागाविषयी म्हणाले होते, “तेथे गवताचे पातेदेखील उगवत नाही.”) राजीव गांधी, नरसिंह राव आणि अटलबिहारी वाजपेयी या तिघांनी चीनला भेटी दिल्या, परंतु यापैकी कुणीही अक्साई चीनचा विषय वाटाघाटीत काढला नाही. वाटाघाटीत जास्तीत जास्त प्रादेशिक लाभ पदरात पाडून घेण्याची चीनची भूमिका असते. म्हणून ते वारंवार अरुणाचल प्रदेशचा विषय द्विपक्षीय करतात. अरुणाचल त्यांचा का? त्याचे उत्तर ते देतात की, दलाई लामा सहावे यांचा जन्म तेथे झाला.
 
 
 
हे अजब तर्कशास्त्र आहे. चीन बौद्ध आहे, म्हणून गौतम बुद्धांचा जेथे जन्म झाला तो प्रदेश आणि भगवंतांचे महापरिनिर्वाण झाले तो प्रदेशही या तर्काने चीनचा होऊ शकतो, अशा तर्काला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते. आपले राज्यकर्ते ते देत नाहीत. चीनचे राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ HU Jintao 2006 साली भारतभेटीला आले. ते येण्यापूर्वी एक महिना अगोदर भारतातील चिनी राजदूत सन युक्सी  (Sun Yuxi)) यांनी सीएनएन-आयबीन न्यूज चॅनेलला सांगितले की, ‘संपूर्ण अरुणाचल प्रदेश हा चीनचा भूभाग आहे. तवांग जिल्हा त्यातील एक भाग आहे. या सर्वांवर आम्हाला ताबा पाहिजे, ही आमची भूमिका आहे.’ कोणत्याही देशाचा राजदूत स्वत:होऊन कोणतीही भूमिका मांडू शकत नाही. त्याने काय मांडायचे किंवा बोलायचे, हे त्याचे राजकीय बॉस ठरवितात. चिनी राजदूताचे म्हणणे म्हणजे चिनी सत्ताधार्‍यांचे म्हणणे झाले. भारताने चिनी राजदूताची हकालपट्टी केली.
 
 
चीन भारताचा मित्र नाही आणि भारताला सर्वाधिक धोका चीनपासून आहे. याची प्रमुख कारणे अशी - चीन विस्तारवादी आहे. भारतीय भूभागावर त्याचा डोळा आहे. अफाट लोकसंख्येसाठी त्याला नवनवीन भूभाग लागतात. त्याचे लष्करी सामर्थ्य भारतापेक्षा अनेक पटींनी श्रेष्ठ आहे. तो एक आर्थिक महासत्ता आहे आणि कम्युनिझमची आक्रमक विचारधारा त्यांनी स्वीकारलेली आहे. म्हणून चीनविषयी भारतीय जनतेने खूप जागरूक राहणे आवश्यक आहे. पाकिस्तान आपला नैसर्गिक शत्रू आहे हे सहज समजते. परंतु जनमानसात चीनविषयी थोडी जागृती दिसत नाही. ती असती, तर लोक चिनी वस्तूंच्या मागे लागले नसते.
 
 
 
चीनच्या दृष्टीने तिबेट हा संवेदनशील विषय आहे. तिबेट म्हटले की दलाई लामा हा विषय येतो. दलाई लामा भारतात आहेत. तिबेटी जनतेवर त्यांचा जबरदस्त प्रभाव आहे. तिबेटी जनतेला स्वातंत्र्य हवे आहे. दलाई लामा त्यांचे नेतृत्व करतात. तिबेटी जनतेला दाबून टाकणे चीनला जमलेले नाही, म्हणून दलाई लामा यांच्याविषयी चीनची भूमिका फार कडवट असते. दलाई लामा अन्य देशांच्या भेटीला जातात. चीन त्यामध्ये खूप अडथळे आणण्याचा प्रयत्न करतो. तिबेटच्या स्वातंत्र्याचा विषय आपण कधीही उचलून धरलेला नाही. पं. नेहरूंनी तिबेटचे उदक चीनच्या हातावर सोडलेले आहे. चीनच्या अरुणाचल प्रदेशाच्या लुडबुडीला जबरदस्त शह द्यायचा असेल, तर आपणही अरुणाचल प्रदेेशमध्ये लुडबुड केली पाहिजे. तिबेटसंबंधीच्या धोरणात सत्ताधारी वर्गात एकमताचा अभाव आहे, असे राम माधव नोंदवितात. पंतप्रधानांचे कार्यालय, विदेश व्यवहाराचे कार्यालय आणि संरक्षण मंत्रालय वेगवेगळ्या पद्धतींनी विचार करतात. दलाई लामा सन्मानाने तिबेटमध्ये गेले पाहिजेत असे राम माधव नोंदवितात आणि त्या दृष्टीने भारताने प्रयत्नशील असले पाहिजे.
 

book_1  H x W:
 
भारत-चीनप्रमाणे, चीन आणि रशिया यांच्यातदेखील सीमावाद आहे. रशियापुढे चीनने प्रस्ताव ठेवला की, हा सीमावाद आपण काही तत्त्वांच्या आधारावर सोडवू या. चीनने तत्त्व सांगितले की, साम्राज्याने निर्माण केलेल्या या सीमा आपण दोघांनी अमान्य केल्या पाहिजेत. रशियाने हा प्रस्ताव धुडकावून लावला. जैसे थे परिस्थिती असेल तरच वाटाघाटी होतील, अन्यथा होणार नाही. 1991 सालापर्यंत हा वाद चिघळत राहिला. जेव्हा चीनच्या लक्षात आले की रशिया आपल्याला भीक घालीत नाही, तेव्हा जी सीमारेषा आहे ती मान्य करण्याशिवाय चीनपुढे पर्याय राहिला नाही. रशियाच्या कैक लाख कि.मी. भूमीवर चीनचा डोळा होता. रशिया हे जाणून होता. मुळात साम्राज्यवादी असलेला रशिया विस्तारवादी चीनला इंचभर जमीन देण्याची शक्यताही नव्हती. भारताप्रमाणे रशिया भोंगळ आदर्शवादात रममाण झालेला नव्हता. या काळात रशियातील राज्यकर्ते बदलले गेले, कम्युनिस्ट राजवट गेली, पण रशियाचे परराष्ट्र धोरण काही बदलले गेले नाही. राम माधव यांनी विस्ताराने रशिया-चीन वाटाघाटीचा वृत्तान्त दिलेला आहे.
 
 
 
भारत आणि चीन यांच्यामध्ये अर्थपूर्ण समझोता होण्यासाठी भारतालादेखील चीनच्या बरोबरीने यावे लागेल. लष्करी सामर्थ्याचा विचार करता भारतापेक्षा चीनचे लष्करी सामर्थ्य अफाट आहे. त्या लष्करी सामर्थ्याशी बरोबरी करण्याऐवजी हे लष्करी सामर्थ्य प्रभावहीन कसे करता येईल, याचे तंत्रज्ञान आपण विकसित केले पाहिजे. अमेरिकेच्या तुलनेत चीनचे लष्करी सामर्थ्य कमी आहे, परंतु अमेरिकेच्या विमानवाहू नौका समुद्रातच नष्ट करण्याचे तंत्रज्ञान चीनने विकसित केले आहे. चीनच्या आसपास असलेले अमेरिकेचे लष्करी तळ नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून नष्ट करण्याचे सामर्थ्य चीनपाशी आहे. अशाच प्रकारचे सामर्थ्य आपल्यालाही विकसित करता आले पाहिजे. चिनी सैन्य, चिनी आरमार, चिनी हवाई दल यांची बरोबरी करणे सोपे काम नाही, परंतु त्या सर्वांची मारकता नष्ट करण्याचे सामर्थ्य प्राप्त करणे शक्य आहे. राम माधव यांनी मांडलेला हा नवीन विचार आहे आणि संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी त्याचा विचार करण्याचा आहे.
 
 
आपल्यासारख्या सामान्य माणसांनी काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे, त्या म्हणजे चीन आपला मित्र नाही. चीनचा पक्ष घेणारे डावे कम्युनिस्ट घरभेदी आहेत. त्यांची विचारसरणी अत्यंत धोकादायक आहे. जो चीनचा तो दुश्मन देशाचा, हे आपण मनात कोरून ठेवायला पाहिजे. जनमताचा रेटा निर्माण झाला की राज्यकर्तेदेखील सावध होतात, दक्ष राहतात आणि शत्रूशी मुकाबला करण्याच्या योजना करू लागतात.
 
 vivekedit@gmail.com