शिवचरित्र रक्तात भिनवणे हीच शिवशाहिरांना श्रद्धांजली!

विवेक मराठी    23-Nov-2021
Total Views |
 @आनंद हर्डीकर 9158634213
 
शिवचरित्राचे संस्कार आपल्या समाजावर, विशेषत: तरुण पिढीवर, माता-भगिनींवर, गर्भवती असतील त्यांच्या गर्भांवरही झाले पाहिजेत, असे बाबासाहेब नेहमीच म्हणत. त्या संस्कारांच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी उभी हयात वेचली, त्यांच्या त्या व्यक्तिमत्त्वाला खरीखुरी आदरांजली वाहायची, म्हणजे अशा विजिगीषू वृत्तीचे व्रत घ्यायचे!

babasaheb_2  H

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समर्पित जीवनाची अखेर सांगता झाली. आता मागे उरलेल्या आपण त्यांचा कोणता सांगावा स्मरावा आणि तो कसा स्मरावा, हा प्रश्न पिंगा घालू लागला. अनेक उत्तरे समोर येऊ लागली.
बाबासाहेब तीन महिन्यांच्या अभ्यासदौर्‍यासाठी इंग्लंडला गेले होते, तेव्हाची गोष्ट. तिकडच्या ग्रंथालयीन संस्कृतीच्या ते प्रेमातच पडले होते. इंडिया ऑफिस लायब्ररी हे लंडन शहरातील प्राचीन ग्रंथालय आहे. त्या ग्रंथालयात त्यांना खजिनाच असल्याचे दिसले होते. ऐतिहासिक साधनसामग्रीचा, कागदपत्रांचा, अहवालांचा खजिना. इ.स. 1962नंतरच्या हिंदुस्थानाबद्दल कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल, तर संबंधित अभ्यासकाने तिथे किमान काही आठवडे तरी संशोधन केले पाहिजे, असे त्यांना जाणवले... आणि त्यांना एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे इतके प्रचंड संकलन तेथे आढळले की, त्याचे चरित्रच लिहिले गेले पाहिजे असे त्यांना वाटू लागले.

त्या अक्षरश: लक्षावधी कागदपत्रांमधून डोकावणारे व्यक्तिमत्त्व होते रंगो बापूजींचे. 1857च्या स्वातंत्र्यसमराशी निगडित त्या दुर्लिक्षित राजदूताचे प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले एकुलते एक चरित्र सोडले, तर मराठीत त्यांच्यावर फारसे काही लिहिले गेलेले नाही, हे बाबासाहेबांना जाणवले. त्या ग्रंथालयात अत्यंत व्यवस्थितपणे जतन करून ठेवलेल्या कागदपत्रांचा धांडोळा घेऊन रंगो बापूजींचे नवे, विस्तृत, साधार चरित्र लिहिले पाहिजे, असे त्यांना वाटले. शक्य असते, तर त्यांनीच ते काम मनावर घेऊन पूर्ण केले असते.


babasaheb_3  H

पण बाबासाहेबांची ती अपुरी राहिलेली इच्छा आतातरी पुरी व्हावी, म्हणून एखादा अभ्यासक पुढे येईल का? इंग्लंडमध्येच स्थायिक झालेल्या आणि भारतीय इतिहासाबद्दल मनस्वी आस्था असणार्‍या अभ्यासकांपैकी कुणीतरी ही जबाबादारी घेईल का? तशा प्रयत्नांतून सिद्ध होऊ शकणारे पुस्तक बाबासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजलीच ठरेल.

आपल्या राष्ट्रपुरुषांशी संबंधित वस्तू जागतिक करारावर लिलावात विकल्या जात असताना त्या खरेदी करण्यासाठी प्रचंड रकमा मोजल्या जात असतात. कधी सरकारी खजिन्यातून, तर कधी दानशूर धनदांडग्यांतून तो व्यवहार झाल्याच्या वार्ता वेळोवेळी कळत असतात. मग इतिहासाशी संबंधित असणारी परदेशी ग्रंथालयांमधील साधनसामग्री मायदेशीही उपलब्ध व्हावी - निदान छायाप्रतींच्या रूपात किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून डिजिटल रूपात - म्हणून शासकीय आणि बिगरशासकीय (सांस्कृतिक/शैक्षणिक) स्तरावर एखादी व्यापक मोहीम बाबासाहेबांच्या नावाने सुरू करता येईल का?

‘राजा शिवछत्रपती’ लिहिताना तर बाबासाहेबांनी विविध कागदपत्रांचा अभ्यास केला होताच, पण ते पुस्तक प्रकाशित होऊन लोकप्रिय ठरल्यानंतरसुद्धा त्यांनी तशा ऐतिहासिक साधनांचा शोध थांबवला नव्हता. उलट वेळोवेळी त्यांनी इतस्तत: विखुरलेली, उपेक्षित-दुर्लक्षित राहिलेली कागदपत्रे, वाडे वाळवीच्या किंवा न्हाणीघरांतल्या बंबांच्या ‘उपयोगात’ आणली जाण्यापूर्वीच संकलित केली जाण्याची गरज समाजासमोर पोटतिडकीने मांडली होती.

 
त्यांच्या अमोघ वक्तृत्वाच्या आठवणी ताज्या असताना तशा भाषणांमधून बाबासाहेबांनी वारंवार व्यक्त केलेली ती इच्छा यापुढील काळात तरी आपण मनावर घेऊ शकू का? बाबासाहेबांचे हजारो-लाखो चाहते आपले शिवरायांवरचे कर्तव्य म्हणून तरी आता ग्रंथालयीन दस्तऐवजांचे जतन-संवर्धन करण्याच्या मोहिमेत स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले, तर तीही त्यांना वाहिलेली सकारात्मक श्रद्धांजलीच ठरेल की!
 
भावनिक आवेगात वाहावत जाऊन माझ्यासारख्या एका अतिसामान्य इतिहासप्रेमी अभ्यासकाने मांडलेली कविकल्पना म्हणून या वर सूचित केलेल्या मोहिमेकडे कुणीही पाहू नये. प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या आयुष्यात अशा कागदपत्रांचा शोध घेण्यासाठी त्यांनी किती खस्ता खाल्ल्या होत्या, हे अनेकांनी त्यांच्याबद्दलच्या आठवणींमध्ये नोंदवलेले आहे.


babasaheb_5  H
एकच उदाहरण इथे मुद्दाम उल्लेखितो. त्यांचे समानधर्मी स्नेही गो.नी. उर्फ अप्पासाहेब दांडेकर यांनी लिहून ठेवलेली एक आठवण. पावसाळ्याचे दिवस होते. अप्पासाहेब कोकणातून महाबळेश्वरमार्गे पुण्याला एस.टी.ने परत येत होते. त्यांची बस महाबळेश्वर स्थानकावर थांबली होती. पाऊस मुसळधार पडत होता. अप्पासाहेबांनी सहज कुतूहल म्हणून खिडकीवरचा पडदा बाजूला सारला आणि बाहेर पाहिले. त्यांना दिसले की, त्या तशा पावसात कुणीतरी एक तरुण सायकलवरून वाईकडून निघाला आहे, बहुधा प्रतापगडाकडे. त्यांनी जरा निरखून पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, ते बाबासाहेब आहेत. ते लगेच बसमधून खाली उतरले, धावत त्यांनी त्या सायकलस्वार बाबासाहेबांना गाठले आणि “कुठे निघालात?” असे विचारले. त्यावर बाबासाहेबांनी सांगितले, “प्रतापगडाहून हडपांचा निरोप आला की काही महत्त्वाचे शिवकालीन कागद मिळाले आहेत, तातडीने निघा. म्हणून निघालो.” एसटीच्या प्रवासाचे भाडे देण्याइतके पैसे जवळ नसल्यामुळे बाबासाहेबांनी हक्काचे घोडे म्हणजे सायकल पिटाळली होती!

 
आपले पुस्तक प्रसिद्ध होऊन गाजू लागल्यानंतरही शिवरायांवरच्या बावनकशी श्रद्धेमुळे शिवचरित्रासाठीची अस्सल साधने मिळवण्यासाठी असे उन्हातान्हातून, भर पावसातून वणवण भटकणार्‍या बाळासाहेबांबद्दल, त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल जर अंत:करणापासून कृतज्ञता व्यक्त करायची असेल, तर अशीच संकलन मोहीम आखायला हवी, अमलात आणायला हवी!
आणि सगळ्यांत चांगली आणि शिवशाहिरांना - त्यांच्या आत्म्याला - सात्त्विक समाधान मिळवून देणारी श्रद्धांजली वाहायची असेल, तर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा संदेश आपल्या धमन्यांमधून वाहणार्‍या रक्तामध्ये भिनवून घ्यावा लागेल. ते नेहमी म्हणत, “आपले राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यासाठी शिवरायांचे आयुष्य हे आपले माध्यम झाले पाहिजे!” आपण आपली शिवाजी महाराजांबद्दलची आदरभावना फक्त त्यांचे अश्वारूढ पुतळे उभारण्यापुरती किंवा त्यांच्या जयजयकारापुरती मर्यादित करून टाकली आहे. ते इंग्लंडमध्ये अभ्यासदौर्‍यासाठी गेले होते, तेव्हा तेथल्या एका ग्रंथालयात ज्या तज्ज्ञांच्या सहकार्याने माहितीचा शोध घेत असत, त्यांना सारखे विचारीत, “इकडे सर विन्स्टन चर्चिल या तुमच्या विजेत्या नेत्याचे पुतळे कुठेच कसे दिसत नाहीत?” ते तज्ज्ञ तो प्रश्न बर्‍याच वेळा हसण्यावारी नेत, पण एकदा मात्र त्यांनी एकाच वाक्यात बाबासाहेबांना उत्तर दिले - “चर्चिल इज इन अवर ब्लड... ही इज इन अवर ब्लड!”
 
चर्चिलसारखेच नव्हे, तर त्याच्यापेक्षाही अधिक शुभंकर आणि तरीही विजिगीषू नेतृत्व आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी गाजवलेले असतानाही आपण मात्र त्यांचे गुणविशेेष अंगी बाणवण्याचा किंवा त्यांच्या मार्गाने समाजाला, देशाला नेण्याचा प्रयत्न करीत नाही. इंग्लंडच्या त्या दौर्‍यात बाबासाहेबांना ही जाणीव झाली आणि पुढे मायदेशी परतल्यावरही ती दिवसेंदिवस वाढतच गेली. आपल्या भाषणांतून, मुलाखतींमधून ते त्यांची ती बोच व्यक्तही करीत असत.

दि. 31 मार्च 2002 रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती होती. पुण्यातील ‘चाणक्य मंडल’ प्रशिक्षण संस्थेने ‘शिवचरित्र आणि वर्तमानकाळ’ या विषयावर बाबासाहेबांचे विशेष व्याख्यान आयोजित केले होते. त्या भाषणात त्यांनी शिवचरित्राचे अनेक पैलू उलगडून दाखवले होते आणि वर्तमानकाळाशी त्या पैलूंची सांगडही घालून दाखवली हाती.
इ.स. 1674मध्ये शिवरायांनी स्वत:ला राज्याभिषेक करून घेतला, त्या घटनेमागे त्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हती, तरी स्वतंत्र सार्वभौम सिंहासन अस्तित्वात आणण्याची राष्ट्रीय दूरदृष्टी होती.

मराठा आरमार उभारताना शिवरायांनी कोणत्याही शास्त्री-पंडिताला किंवा धर्मपीठाधीशांना किनारा ओलांडण्यासाठी परवानगी मागितली नाही, त्यामुळे स्वधर्म बुडेल, अशी भीती बाळगली नाही.

 
मुहंमद कुली खानाला शुद्ध करून घ्यावे का? ते धर्मसंमत ठरेल का? याचा साधकबाधक विचार करून उपाय सुचवण्यासाठी एखादी समिती नेमण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांनी 17 जुलै 1676 रोजी परधर्मात गेलेल्या त्या रणधुरंधरांचे बिनदिक्कतपणे धर्मांतर करून घेतले, एवढेच नव्हे, तर पुन्हा नेताजी पालकर या मूळ नावाने वावरू लागलेल्या आपल्या त्या सेनानीला स्वराज्यात प्रतिष्ठाही मिळावी, म्हणून त्याच्या मुलाशी स्वत:च्या मुलीचे लग्न लावून दिले. राजांची ही प्रागतिक दूरदृष्टी आपण आत्मसात केली नाही, असे बाबासाहेबांनी त्या भाषणात सांगितले.
 
शिवचरित्र रक्तात भिनवून घेणे म्हणजे नेमके काय, हे स्पष्ट व्हावे म्हणून बाबासाहेबांनी त्या भाषणात दिलेली दोन उदाहरणे नव्या राष्ट्रीय संदर्भात इथे उल्लेखावीशी वाटतात. पहिले उदाहरण होते मुंबईबद्दलचे. आपल्या देशाचा अविभाज्य भाग असणार्‍या या बेटावर येऊन राहिलेल्या परक्या पोर्तुगीजांनी एका लग्नसमारंभाच्या निमित्ताने ते बेट ब्रिटिशांना हुंडा म्हणून परस्पर देऊन टाकले. सारस्वतांचे, प्रभूंचे, आगरी लोकांचे बेट - प्रत्यक्षातली सात बेटे ब्रिटिशांना देणे स्थानिक पोर्तुगीज अधिकार्‍यांना खटकले. त्यांनी वरिष्ठांना पत्राने कळवले की, असे करू नका. मुंबई ब्रिटिशांना दिली, तर भारताच्या पश्चिम समुद्रकिनार्‍यावर पूर्ण अधिसत्ता प्रस्थापित करणार्‍या आपल्या महात्त्वाकांक्षी स्वप्नाला धक्का बसेल! आणि त्या बेटांवर राहणारे भारतीय? ते काय करीत होते? पोर्तुगीजांविरुद्ध उठाव करण्याचा आणि मुंबई स्वतंत्र राखण्याचा बेत? नाही. जवळच्याच प्रदेशात पराक्रम गाजवीत असलेला तरुण शिवरायांची मदत घेऊन आपली भूमी निर्वेध करून घेण्याचा प्रयत्न? नाही. ज्या काळात राजे अफझलखानाच्या आव्हानावर यशस्वी मात करून एक लाख पस्तीस हजार सैन्याची धूळधाण उडवीत होते, सिद्धी जौहरचा पराभव करीत होते, शाहिस्तेखानावर अकस्मात हल्ला करून त्याची बोटे छाटीत होते, त्या काळात मुंबईकरांनी केले काय? तर सुरतेला जाऊन, तिथल्या इंग्रजांच्या वखारीत जाऊन चर्चा... तुम्ही मुंबई लवकर ताब्यात घ्या, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू, अशी हमी त्या इंग्रजी व्यापार्‍यांना देणारी ती स्वाभिमानशून्य माणसे.. इतिहासाचा अभ्यास करताना बाबासाहेबांना अशा गोष्टी खटकत, प्रचंड मनस्ताप देत आणि राजांची स्वराज्यप्रीती, त्यांची जिद्द, शत्रूवर तुटून पडण्याची त्यांची साहसी वृत्ती वगैरे लखलखीत गुणवैशिष्ट्ये भारतीय माणसांच्या रक्तात का भिनत नाहीत, हा प्रश्न ते जाहीरपणे विचारीत. इतिहासातील जर-तरच्या हिंदोळ्यावर प्रचंड श्रोतृवृंद झोके घेत राही, पण.. त्या प्रश्नाला उत्तर देणे टाळतच असे.
 
 
आता तरी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहताना ते उत्तर कृतीतून देण्याची जबाबदारी आपण उचलायला हवी.

 
शिवचरित्र रक्तात भिनवून घेणे सोपे नसले, मध्यंतरीच्या प्रदीर्घ काळात आपल्या राष्ट्रीय स्तरावरच्या महान नेत्यांनी ते अडगळीत टाकून दिल्यामुळे आपल्या कचखाऊ मानसिकतेत बदल घडवणे कठीण असले, तरी ते अशक्य नाही. आपण शिवचरित्राचे धडे या आधुनिक काळातही गिरवू शकतो, असे बाबासाहेबांना वाटत असे. 2002 सालच्या त्या भाषणात एका ताज्या घटनेचा उल्लेख करून त्यांनी एका राष्ट्रीय व्यूहरचनेचा पर्याय श्रोत्यांसमोर ठेवला होता. ती ताजी घटना होती आपल्या संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची. आपण जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकलो नव्हतो. सीमेवर हजारो सैनिक तैनात करण्यापलीकडे आपल्या सरकारची मजल गेली नव्हती. “संसद भवनावरचा तो हल्ला म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या स्त्रीवर आपल्यासमोरच अत्याचार झाल्यासारखे वाटते” असे उद्गगार काढून बाबासाहेबांनी पुढे एक-दोन वाक्यांत प्रत्याघाती व्यूहरचना सूचित केली होती.

 सावधगिरी बाळगून ते म्हणाले होते, “इस्लामाबादवर नाही, परंतु त्या अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर बाँब टाकून ती उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही आमची दोन विमाने का बरे पाठवली नाहीत?” शिवचरित्र हाच ज्यांचा प्राण, त्या बाबासाहेबांच्या तोेंडचा तो प्रश्न त्या वेळी दुर्दैवाने हवेतच विरून गेला होता.

 
तथापि काळ पालटला, राजवट बदलली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. राष्ट्रीय सुरक्षाविषयक सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नेमणूक केली गेली आणि चमत्कार घडला. सर्जिकल स्ट्राइक हा अपवाद न राहता नव्या हिंदुस्थानचे धोरण ठरल्याची जगाला - विशेषत: शूत्रला जाणीव झाली. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नव्हे, तर खुद्द पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरही भारतीय सेनादले मर्मांतक हल्ले करू शकतात, हे स्पष्ट झाले.

बाबासाहेबांना हे असेच स्वाभिमानी, पराक्रमी भारताचे चित्र अभिप्रेत होते. शिवचरित्राचे संस्कार आपल्या समाजावर, विशेषत: तरुण पिढीवर, माता-भगिनींवर, गर्भवती असतील त्यांच्या गर्भांवरही झाले पाहिजेत, असे ते नेहमीच म्हणत. त्या संस्कारांच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी उभी हयात वेचली, त्यांच्या त्या व्यक्तिमत्त्वाला खरीखुरी आदरांजली वाहायची, म्हणजे अशा विजिगीषू वृत्तीचे व्रत घ्यायचे!
 
सर्व शिवप्रेमी तसे करतीलच, अशी आशा बाळगावी, बदललेल्या युगाची तशीच तर हमी आहे!