चतुरस्र कृषिवैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन

विवेक मराठी    23-Nov-2021
Total Views |
@डॉ. क.कृ. (नाना) क्षीरसागर 9422080865
भारतीय हरित कृषिक्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एम.एस. स्वामीनाथन यांच्या विश्वव्यापी कार्याचा परिचय करून देणारा लेख.

krushi_3  H x W

विशिष्ट क्षेत्रात कार्य करणार्‍या सुप्रसिद्ध व्यक्तींचं उल्लेखनीय काम त्यांच्या नावाशी कायमचं जोडलं जातं. त्यानुसार डॉ. स्वामिनाथन यांच्या नावाशी हरित कृषिक्रांती जोडली गेली आहे. त्यांच्या कर्तृत्वााचा हा शिखरबिंदू आहे. हे खरं असलं तरी इतर अनेक क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीमुळे त्यांची कीर्तिकमान सतत उंचावत गेल्याचं प्रत्ययाला येतं. डॉ. स्वामिनाथन म्हणजे एक उत्तुंग आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्वच आहे. त्यांच्या विश्वव्यापी कार्याची ओळख त्यामुळेच महत्त्वाची ठरते.
बालपण व शिक्षण
डॉ. मोणकोंबू सांबशिवन तथा एम.एस. स्वामिनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम या ठिकाणी झाला. तंजावर जिल्ह्यातलं हे गाव तसं मागासलेलंच. केरळातील व्यक्तींची नावं त्यांच्या गावावरून ठरतात. मोणकोंबू हे नावही कुट्टनाड परिसरातल्या कावेरी काठच्या अलेप्पी जिल्ह्यातल्या एका गावाचं नाव. हे गाव समृद्ध शेतीने व्यापलेल्या शेतकर्‍यांचं गाव. एकमेकांना मदत करून राहाणार्‍या, परस्परांची काळजी घेत बाराबलुतेदारी पद्धतीने जगणार्‍या गावकर्‍यांची इथे वस्ती आहे. जमीनदार या बलुतेदारांची काळजी वाहणारा असतो. गाव म्हणजे एक संयुक्त कुटुंबच. मोणकोंबू गावातील डॉ. सांबशिवन आपल्या शेतकरी कुटुंबाचे प्रमुख, म्हणजे गावकुटुंबाचेही प्रमुखच. घरची शेती असली तरी त्यांना शिक्षणाची आणि लोकसेवेची ओढ होती. म्हणून डॉक्टर या नात्याने गावाची आरोग्य सेवा त्यानी स्वीकारली. बालवयापासूनच म. गांधींच्या सेवा विचारांनी संस्कारित झालेल्या या पित्याच्या विचारांचे संस्कार त्यांच्या मुलावर, म्हणजे स्वामिनाथन यांच्यावर न होते तरच नवल. समाजसेवेसाठी लोकसंग्रहसुद्धा करावा लागतो. वडिलांप्रमाणेच त्यांनीही आपल्या कार्याशी असंख्यांना जोडलं. ते समाजरूपच होऊन गेले, याचा प्रत्यय त्यांच्या पुढच्या जीवनकार्यातून सतत येत राहतो.
स्वामिनाथन यांच्या मनावर आणि कार्यशैलीवर केवळ त्यांच्या वडिलांच्याच विचारांचा प्रभाव पडला, असं नाही; तर राष्ट्रप्रेमाने भारलेल्या त्यांच्या आईची कृतिशील शिकवणही स्वामिनाथन यांचं व्यक्तिमत्त्व घडवायला कारणीभूत ठरली. आई थंगम्मल यांचं माहेर तामिळनाडूमधील पडीकोट्टी गावचं. पुढे त्यांना साथ लाभली गांधीभक्त डॉ. सांबशिवन यांची. गांधीविचारांनी जगण्याची शिकवण त्यांच्या तिन्ही मुलांना आणि कन्येला मिळाली.
त्या काळात समाजावर चातुर्वर्ण्य पद्धतीचा पगडा होता. परंतु उच्चवर्णीय, ब्राह्मण कुटुंबात जन्मूनही वर्णभेदाचे संस्कार त्यांच्यावर झाले नाहीत. त्यामुळेच ब्राह्मदर्शक आडनावाचा त्याग कुटुंबियांनी केला. आईचं छत्र दीर्घकाळ लाभलं असलं, तरी पितृछत्र मात्र वयाच्या अकराव्या वर्षीच (12 ऑक्टोबर 1936 रोजी) त्यांना गमवावं लागलं. त्यांच्या शिक्षणाची सुरुवात नेटिव्ह हायस्कूल आणि लिट्ल फ्लॉवर स्कूल या कुंभकोणममधील शाळांपासून झाली. वडिलांच्या नंतर त्यांचे धाकटे भाऊ एम.के. नारायणस्वामी यांनी त्यांचे भाऊ, बहीण व आई यांचा सांभाळ केला.
1940 साली शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वामिनाथन वडील भावाबरोबर त्रिवेंद्रम् म्हणजे आताचं तिरूअनंतपुरम या गावी महाविद्यालयीन शिक्षणासाठी गेले. तिथे त्यांना त्यांचे थोरले काका एम.के. नीलकण्ठ अय्यर यांचं पालकत्व आणि मार्गदर्शन मिळालं. ते त्यावेळच्या त्रावणकोर संस्थानचे सचिव होते. स्वामिनाथन् यांनी आपली पहिली प्राणिशास्त्र विषयातील बी.एसस्सी. ही पदवी युनिव्हर्सिटी कॉलेजमधून मिळविली. शिक्षण घेतानाच 1942मध्ये स्वातंत्र्यलढ्याचेही धडे त्यांनी गिरविले. त्रिवेंद्रम विद्यापीठ विद्यार्थ्यांनी बंद पाडलं. परंतु प्रा. रामस्वामींनी त्यांना त्यापासून परावृत्त केलं. अभ्यास हे विद्यार्थ्यांचं पहिलं कर्तव्य असल्याचं त्यांना पटवून दिलं. याच काळात बंगालच्या भीषण दुष्काळाचं संकटही उभं राहिलं होतं. हजारो लोकांचे भूकबळी गेले. त्याचा परिणाम स्वामिनाथन यांच्या तरुण मनावर झाला आणि धान्योत्पादन वाढीच्या विचारांचं बीजांकुरण त्यांच्या मनात त्या काळातच झालं. पुढच्या अभ्यासाची पायाभरणी त्यामुळे झाली.
 
 
घरचा वैद्यकीय वारसा पुढे चालवावा, या कुटुंबीयांच्या विचारापलीकडचा कृषिक्षेत्रात काम करण्याचा विचार त्यांनी उचलून धरला. म्हणून त्यांनी कोईमतूरच्या कृषिमहाविद्यालयात प्रवेश घेतला.

 
1947मध्ये त्यांनी कृषी विषयाची पदवी पहिल्या क्रमांकाने पारितोषिकांसह मिळविली. त्यामुळे पुढची उच्च कृषी शिक्षणाची आणि संशोधनाची दिशा पक्की झाली. दरम्यान आप्त-स्वकीयांच्या आग्रहामुळे त्यांनी पोलीस खात्याची आय.पी.एस. ही परीक्षा दिली व त्यात ते सन्मानासह उत्तीर्ण झाले. आता मनात द्वंद्व निर्माण झालं. पोलीस अधिकारी व्हायचं की कृषिसंशोधक? या पर्यायातून त्यांनी दुसराच पर्याय स्वीकारला. त्यांना भारतीय कृषिसंशोधन संस्थेची साहाय्यक संशोधकाची अभ्यासवृत्तीसुद्धा मिळाली. दिल्लीमधील पुसा कृषी संशोधन संस्था (आय.ए.आर.आय.) या ठिकाणी त्यांचं जनुक शास्त्रांतर्गत उच्च संशोधन सुरू झालं. कुंभकोणममध्ये अंकुरलेलं त्यांच्या जीवनबीजाचं रोप पुढे यशाच्या फळाफुलांनी डवरलं.
 
 
संशोधन आणि इतर कार्याचा आलेख


1947 साली कोईमतूरच्या कृषी विद्यापीठातून स्वामिनाथन पहिला क्रमांक मिळवून कृषिपदवीधर झाले. पुसा संशोधन संस्थेत संशोधनाला सुरुवात करताना त्यांना अनेकांकडून अनेक सूचना मिळाल्या. मुळात त्यांची पदवी प्राणिशास्त्रातील होती. त्यामुळे त्या वेळचे संस्थेचे संचालक डॉ.जे.एन. मुखर्जी आणि प्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ डॉ. बिपिनचंद्र पाल यांनी त्यांना वनस्पती-कीटकशास्त्र हा विषय सुचविला. परंतु शेवटी वनस्पती-जनुकशास्त्राचीच त्यांनी निवड केली. 1948चं वर्ष म्हणजे फाळणीनंतरचं रक्तबंबाळ वर्ष. निर्वासित लोंढ्याबरोबरच अनेक प्रश्न शासनाला सोडवायचे होते. त्यात अन्नप्रश्न सर्वात मोठा होता. या परिस्थितीत जानेवारी 1948मध्ये पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी पुसा-कृषि-संशोधन संस्थेला भेट दिली. ज्येष्ठ कृषिशास्त्रज्ञांना उद्देशून त्यांनी आवाहन केलं की आपण सारे एकत्र येऊन संशोधनाचे निष्कर्ष शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवा, कृषिउत्पादन वाढवा, ही घोषणा त्यांनी दिली आणि संशोधनाला एक दिशा मिळाली. डॉ. स्वामिनाथन यांच्याही कामाची दिशा ठरली. दोन वर्ष झपाट्याने उलटली. 1949 साली त्यांना युनेस्कोकडून अधिच्छात्रवृत्ती मिळाली. नेदरलँडमध्ये त्यांना वॅगेनिजेन कृषिविद्यापीठात वनस्पती-जनुकशास्त्र संशोधनाची संधी मिळाली. परंतुु वर्षभरातच त्यांना इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी.साठी संशोधन पाठ्यवृत्ती मिळाली. पी.एच.डी.साठी मार्गदर्शक होते. डॉ. एच.डब्ल्यू. हॉवर्ड जनुकशास्त्राच्या आधारे बटाट्याच्या नव्या वाणाची निर्मिती करण्यावरचं त्यांचं संशोधन यशस्वी ठरून त्यांना ही पदवी 1952मध्ये मिळाली. (प्रबंधाचा विषय होता. Species Differentiation and nature of Polyploidy in certain species of the genus solanum-section Tuberarium) इतर वनस्पतीप्रमाणेच प्रत्येक बटाट्याच्या जातीची मूलभूत गुणसूत्र संख्या ठराविक असते. त्यामध्ये बदल करण्याचं बहुगुणन तंत्र वापरून त्यांनी नव्या प्रजाती निर्माण केल्या. प्रारंभीच्या संशोधनात लागवडीच्या बटाटा पिकाची (सोलॅनम ट्युबरारियम, लिन.) उत्पत्ती आणि विकास यावर त्यांचं संशोधन होतं. 1952 साली अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात त्यांना संशोधकपद मिळालं. तिथेही त्यांचं हे पुढील संशोधन ख्यातनाम झालं. बर्फाळ हवामानात टिकून राहाणार्‍या कणखर, अलास्का फ्रॉस्टलेस या नव्या वाणाची त्यांनी निर्मिती केली. मात्र बटाटा संशोधनाचं त्यांचं पर्व इथे पूर्ण होत होतं. कारण 1954मध्ये त्यांना भारताच्या अन्न समस्यांनी बचैन केलं होतं.
 
 
परतल्यावर त्यांना 1955मध्ये जीवनसाथ मिळाली ती पूर्वाश्रमीच्या मीना भूतलिंगम् यांची. त्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक. त्यांचे वडील सुब्रह्मणम भूतलिंगम हे केंद्र सरकारचे सचिव आणि देशप्रेमाने भारलेले नेहरू विचारसरणीचे कर्तव्यदक्ष अधिकारी होते. स्वत:ला बालमानसशास्त्र व बालशिक्षणाशी त्यांनी जोडून घेतलं. आता त्या चैन्नईच्या डॉ. स्वामिनाथन संशोधन प्रतिष्ठानमध्ये वनवासी कृषिविकास क्षेत्र आणि बालशिक्षणासंबंधीचं महत्त्वाचं कार्य करीत आहेत. त्यांना सौम्या, मधुरा आणि नित्या या तीन सद्गुणी कन्या लाभल्या. सर्व कुटुंब मायेनं व स्नेहानं बांधलं गेलंय. त्याचप्रमाणे समाजाशीही ते बांधल गेलं आहे.


krushi_1  H x W
 
डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्यासह डॉ. स्वामिनाथन

1954मध्ये परतल्यावर त्यांची नेमणूक ओरिसातील केंद्रीय भातसंशोधन संस्थेत वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणून झाली. भाताच्या सुधारित वाणांच्या निर्मितीसाठी संशोधन सुरू झालं. आयात जपानी वाणांशी संकरित पद्धतीने निर्माण केलेले वाण अपेक्षेप्रमाणे यशस्वी ठरले नाहीत. म्हणून त्यांनी भारतीय प्रचलित वाणांचे नमुने देशभरातून मिळविले. संग्रह केला. पाणथळ भागापासून ते अवर्षणप्रवण प्रदेशातही टिकून राहणारे नवे कणखर वाण निर्माण करण्यासाठी त्यांच्या संशोधनाला गतिमान दिशा त्यामुळेच मिळाली. अगदी खार्‍या पाण्यात टिकतील अशाही जाती त्यामुळे हाती लागल्या. त्यासाठी त्यांनी भारतीय कृषिशास्त्रज्ञांची गटबांधणी केली. त्यांच्या मदतीने भाताच्या जातींचे गुणदोष शास्त्रीय प्रयोगांद्वारे विश्लेषणात्मक पद्धती वापरून नोंदविले. सद्गुणी संकरित वाणांची जनुकशास्त्राच्या आधाराने निवड करून त्यांचं प्रजनन केलं. हेच मूलभूत तंत्रज्ञान पुढे गव्हावरच्या हरितक्रांतीसाठी वापरून त्यांनी ती यशस्वी केली. भारतीय भाताच्या बासमती आणि तैवानच्या ताईचुंग नेटिव्ह-1 या जातींच्या संकराचे प्रयोग झाले. त्यातून अनेक नवे वाण जन्मले. खुजी पुसा बासमती ही पाण्यात तग धरणारी नवी जात जगभर पसंतीला उतरली. त्यातूनच स्पर्धेपोटी अमेरिकन कंपन्यांनी टेक्सामती या नावाने पेटंट मिळविण्याचा प्रयत्न झाला. परंतु त्यात त्यांना यश मिळालं नाही.
 
 
हरितक्रांतीचे उद्गाते
 
स्वातंत्र्यानंतरची 18 वर्षे आपण आयात धान्यावर अवलंबून होतो. Ship to Mouth  म्हणजे बंदरात अन्नधान्याची बोट लागली तरच घरातील चूल पेटायची, अशी अवस्था होती. मात्र हे चित्र 1957-58 पासून हळूहळू बदलू लागलं. इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने या प्रश्नावर लक्ष केंद्रित केलं. त्याचप्रमाणे पंतनगर (उ.प्र.), व लुधियाना (पंजाब) येथे कृषिविद्यापीठे स्थापन झाली. अखिल भारतीय पातळीवर विविध पिकांसाठी समन्वयित प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. सर्व राज्यातील नव्या कृषिविद्यापीठांची साखळी बांधली गेली. शिक्षण, संशोधन व विस्तार यांचा मिलाफ झाला. मोठ्या प्रमाणात गहू, भात, ज्वारी, बाजरी, मका यांच्या संकरीत व उन्नत वाणाची क्षेत्रीय प्रात्यक्षिकं योजिली गेली. लाखो पथदर्शी प्रकल्प साकार झाले. या प्रयत्नांचा दृश्य परिणाम 1965 ते 1970 या काळात हरितक्रांती होऊन 1971मध्ये देश स्वयंपूर्ण झाला. परदेशी अर्थतज्ज्ञांची भीषण भवितव्याची वाणी खोटी ठरली. कृषी मंत्री सी. सुब्रह्मण्यम, कृषी सचिव बी. शिवरामन, डॉ.बी.पी. पॉल, डॉ.आ.भै. जोशी आणि डॉ. स्वामिनाथन यांचे प्रयत्न यशस्वी झाले. देशातील पुरोगामी विचार व आचरणांचे जाणते शेतकरी यांचा यातील सहभाग फार मोलाचा ठरला. डॉ. नॉर्मन बोरलॉग यांचं अनुभवी मार्गदर्शन तितकंच उल्लेखनीय आहे.

 
krushi_2  H x W
1969 साली डॉ. स्वामिनाथन हे भारतीय कृषि-संशोधन संस्थेत (IARI, नवी दिल्ली) वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख झाले आणि 1966 साली तेथेच संचालकही झाले. ते एक आदर्श शिक्षक व संशोधन मार्गदर्शक होते.
 
 
1962च्या ‘जर्नल ऑफ अ‍ॅग्रोनॉमी’ या कृषिशास्त्रीय नियतकालिकात डॉ. ऑरव्हिल यांचा हिवाळी बुटक्या गव्हाच्या जातीवरचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला होता. त्यांच्याकडून या गेन्स गव्हाचे बियाणे डॉ. स्वामिनाथन यांनी मिळवले. त्याप्रमाणे डॉ. बोरलॉग यांच्या खुज्या पण लांब ओंब्यांच्या कणखर जातींवरील प्रयोगांचाही विचार त्यांनी केला. त्या प्रयोगातून मेक्सिकन लेर्मा, रोजो, मायो 64, सोनोरा 6, सोनोरा 64 या गव्हाच्या उत्पन्नांचा तुलनात्मक अभ्यास झाला. पुढे प्रयोगांची भौगोलिक आणि शास्त्रीय स्वरूपाची व्याप्ती नियोजनपूर्वक वाढविली. शास्त्रज्ञ व शेतकर्‍यांच्या सहयोगाने ती वाढविली. खुद्द शेतकरी उत्तम बियाणांच्या निवडीचे व प्रजननाचे तज्ज्ञ झाले. कृषी उत्पादनाचे आलेख चढते राहिले. मात्र हरितक्रांतीनंतरचे संभाव्य धोकेही डॉ. स्वामिनाथन यांनी ओळखले आणि आता सुधारित तंत्रज्ञान वापरून सदाहरितक्रांतीचे विचार पुढे येऊ लागले आहेत. काही विपरीत परिणाम आपल्याला दिसत आहेत. त्यावर उपाय शोधले पाहिजेत असं वाटतं.
 
 
इतर कार्य
 
1981च्या सुमारास डॉ. स्वामिनाथन ग्रामीण आरोग्य, आणि विशेषत: कुष्ठरोग निर्मूलन कार्याकडेही लक्ष देत होते. त्याचवेळी फिलिपाइन्समधील लॉसबेनॉस येथील आंतरराष्ट्रीय भात-संशोधन संस्थेकडून त्यांना नेतृत्वासाठी विचारणा आली आणि त्यांची मुलाखत न घेता तेथील प्रमुखपदी नियुक्तीसुद्धा झाली. घरच्यांची अनुमती त्यांनी मिळविली. त्याचप्रमाणे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही परवानगी त्यांनी मिळविली. मीनाताईंनीही त्यांच्याबरोबर तिथे जाण्यासाठी संमती दिली व ते रुजू झाले.


भारत, चीन, जपान, फिलिपाइन्स या आशिया खंडातील भाताच्या कोठारांची भूमिका असलेल्या देशांचं भात-उत्पादन वाढीसाठी आंतरराष्ट्रीय नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सुमारे सहाशे कृषिशास्त्रज्ञांच्या गटाचं हे नेतृत्व होतं. ते त्यांनी यशस्वी केलं. चीनने 1982मध्ये मार्गदर्शनासाठी त्यांना बोलावून घेतलं. चीननेही भात उत्पादनात आघाडी घेतली. चीनप्रमाणेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, म्यानमार (ब्रह्मदेश), मलेशिया, थायलंड, कांपुचिया, उत्तर कोरिया, व्हिएतनाम, टांझानिया, इराण व इजिप्त याही देशांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं. जागतिक जीवद्रव्य (Germplasm) संकलन पेढीची कल्पना प्रत्यक्षात आणून सत्तर देशातल्या लाखाहूनही जास्त बियाणांचा नमुनासंग्रह या ठिकाणी स्थापित झाला. त्यात चीनच्या तीस हजार व भारताच्या पंधरा हजार जातींचा समावेश आहे. आय.आर.64 या भारतीय उन्नत भातवाणाची निर्मिती उल्लेखनीय आहे. फिलिपाइन्सच्या अध्यक्षा कॉरझन अ‍ॅक्विनो यांनी 10 नोव्हेंबर, 1987 रोजी डॉ. स्वामिनाथन यांना ‘प्रेसिडेन्शीयल गोल्डन हार्ट’ हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. 1999मध्ये टाईम साप्ताहिकाने आशियावर प्रभाव पाडणारे व्यक्तिमत्त्व असा त्यांचा प्रशंसनीय उल्लेख केला. रवींद्रनाथ टागोर व महात्मा गांधींच्या श्रेणीत त्यांना स्थान दिले. 1987 साली त्यांना स्मिथसोनिया इन्स्टिट्यूट, वॉशिंग्टन डी.सी. येथे वर्ल्ड फूड प्राइझ देऊन गौरविले गेले. 1988मध्ये भारतात परतल्यावर चेन्नई (मद्रास) येथे एम.एस. स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन या संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्या ठिकाणी विज्ञान व तंत्रविज्ञान यांचा वापर करून निसर्गात फार ढवळाढवळ न करता पर्यावरणाला पोषक व सामाजिक समतेतून विकास करण्यासाठी त्याचप्रमाणे गरीब व महिला यांच्या उन्नतीसाठी एका यंत्रणेचे जाळेच निर्माण केले. डॉ. स्वामिनाथन यांनी शेती संशोधनाबरोबरच मँग्रोव्ह इकोसिस्टिम (खारफुटी वनस्पतींचे पर्यावरण) जैविक विविधता संगोपन, नैसर्गिक स्रोतांचं संगोपन व समृद्धीकरण, विकास इत्यादी विषयांवरही संशोधन करून ते मार्गदर्शन करीत आहेत. खारफुटीमुळे 2004ची त्सुनामीची तीव्रता कमी करता आली असती असं त्यांचं मत होतं.
 
 
त्यांच्या अशा नेत्रदीपक कार्याची दखल त्यांना अनेक पुरस्कार व सन्मान देऊन घेण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर पद्मपुरस्कारांसह 30च्या वर, आंतरराष्ट्रीय 24हून अधिक तर भारतीय विद्यापीठांच्या 33 सन्माननीय विद्यावाच्यस्पती पदव्या, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचे 35च्या वर पुरस्कार, आंतरराष्ट्रीय संस्थांचे सन्मानीय सदस्यत्व, अनेक राष्ट्रीय मंडळांचे अध्यक्षपद अशा असंख्य सन्मानांनी हे व्यक्तिमत्त्व अलौकिक झालं आहे. त्यांची ग्रंथसंपदाही समृद्ध आहे.
 
1 ऑगस्ट 2001 रोजी त्यांना पुण्यामध्ये टिळक पुरस्कार देण्यात आला आणि 15 जानेवारी 2003 रोजी न्यायमूर्ती रानडे पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे एच.के. फिरोदियांच्या स्मृतीसाठीचा Excellence in Science and Technology हा पुरस्कार त्यांना मिळाला.


मला व्यक्तिगतरीत्या डॉ. स्वामिनाथन यांच्या कामाचा आणि कार्यशैलीचा परिचय झाला तो 1980च्या सुमारास. त्यावेळी ते अखिल भारतीय मधमाशा पालक संघाचे सल्लागार होते. त्याचप्रमाणे ते 1978 ते 1990पर्यंत लंडनस्थित आंतराराष्ट्रीय मधमाशा संशोधन (इंटरनॅशनल बी रिसर्च असोसिएशन, IBRA) संस्थेचेही अध्यक्ष होते. त्याचवेळी पुणे आणि दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय मधमाशा संशोधन परिषदेचं अध्यक्षपदही त्यांनी भूषविलं होतं. त्यामुळे पुण्याच्या आमच्या केंद्रीय-मधमाशी-संशोधन संस्थेला त्यांनी वारंवार भेटी दिल्या. त्यांच्याशी विचारांचे प्रत्यक्ष आदान प्रदान करण्याची संधी त्यामुळे मलाही मिळाली.


एवढ्या उत्तुंग चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचा परिचय अशा एका लेखातून करून देणे फारच अवघड आहे. म्हणून हा लेख ज्या माझ्याच पुस्तकावर आधारित आहे ते ‘जाणता शेतकरी शास्त्रज्ञ’, डॉ. एम्.एस. स्वामिनाथन हे पुस्तक मुळातून वाचावे अशी माझी सूचना आहे. डॉ. स्वामिनाथन यांची कीर्तिकमान उत्तरोत्तर अशीच उंचावत जावो व त्यासाठी त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही इच्छा.

(‘नामवंत भारतीय कृषिशास्त्रज्ञ’ या पुस्तकातून साभार)