ज्ञान आणि विवेक यांचा सार्थ गौरव

विवेक मराठी    24-Nov-2021
Total Views |
@देविदास देशपांडे  8796752107
 
स्नेहल प्रकाशनाच्या वतीने अंजली रवींद्र घाटपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा प्रतिष्ठेचा स्नेहांजली पुरस्कार प्रा. म.अ. कुलकर्णी (स्वामी प्रज्ञानंद) यांना रविवार, दि. 28 नोव्हेंबर रोजी पुण्याच्या एस.एम. जोशी सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा परिचय करून देणारा लेख.

RSS_1  H x W: 0


कोल्हापूरचे प्रा. म.अ. कुलकर्णी (स्वामी प्रज्ञानंद) यांचा स्नेहांजली पुरस्काराने गौरव होत आहे, ही अत्यंत समाधानाची गोष्ट म्हणायला हवी, कारण भाषेसारख्या ऐहिक ज्ञानाबरोबरच अध्यात्मज्ञानाचेही अधिकारी असलेल्या एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातोय. या पुरस्काराच्या गौरवशाली परंपरेला साजेशीच अशी ही निवड आहे.

प्रा. म.अ. कुलकर्णी यांचे पूर्ण नाव मधुकर अनंतराव कुलकर्णी. सांगली येथे 26 फेब्रुवारी 1937 रोजी त्यांचा जन्म झाला. आध्यात्मिक क्षेत्रात सद्गुरूंनी स्वामी प्रज्ञानंद हे नाव दिले आणि जीवनाच्या कालगतीत ते समाजात आध्यात्मिक तेजोदीप झाले आहेत. आई-वडिलांच्या, तसेच अंगी संतत्व बाळगणार्‍या व्यक्तींच्या संस्काराच्या मुशीतून त्यांची जडणघडण झाली. सांगलीचे केळकर मामा व दादामहाराज, उगारचे यती महाराज, योगिराज गुळवणी महाराज, स्वामी अमलानंद (स्वामी) स्वरूपानंदांचे शिष्य आदींचा सहवास त्यांना लाभला. लौकिकदृष्ट्याच बोलायचे झाले तर पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. असे शिक्षणाचे महत्त्वाचे सर्व टप्पे पार करून त्यांनी अध्यापनाचा पेशा पत्करला. ज्ञानदानाचे कार्य करून विद्यर्थिप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांचा नावलौकिक झाला.
 
प्रा. कुलकर्णी यांना स्वामी प्रज्ञानंद हे नाव मिळाले, ते स्वामी स्वरूपानंद यांच्या स्वरूप संप्रदायातील स्वामी अमलानंदांच्या आशीर्वादाने. संत ज्ञानदेवांच्या संतपरंपरेतील हा संप्रदाय आणि या संप्रदायाचे ते आजचे उद्गाते आहेत. स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या वाणीने आणि कृतीने सुशिक्षित समाजामध्ये शुद्ध परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे महान कार्य केले. आपल्या परात्पर गुरूचे कार्य प्रज्ञानंदांनी अधिक विस्तृत प्रमाणावर केले. त्यांच्या लिखाणातून, वाणीतून आणि वागण्यातून अखंड वाग्धारा स्रवत असते.
 
स्वामी प्रज्ञानंद या नात्याने त्यांची साहित्यसंपदा मोजकी पण प्रभावी आहे. त्यातील संतगौरव, संतकृपा दीप, स्वामी स्वरूपानंदांचे साहित्य व तत्त्वज्ञान, स्वामी अमलानंद व समर्थ रामदास, तुकोबाराय यांची चरित्रे असे ग्रंथ म्हणजे संतसाहित्यातील रेखीव लेणीच आहेत. त्यांनी श्रीक्षेत्र पावस येथील स्वामी स्वरूपानंद संस्थानतर्फे प्रकाशित होणार्‍या श्रीक्षेत्र पावस या अर्धवार्षिकाचे अनेक वर्षे संपादन केले.
 
भारतीय जीवनपरंपरेमध्ये चार वेदांएवढेच चार आश्रमांना विशेष महत्त्व आहे. ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रम व्यवस्थेला ऋषिचिंतनाची व्यावहारिक बैठक व प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. ज्ञानदेवादी सकल संतांनी प्रपंचाला परमार्थाएवढेच महत्त्व दिले आहे. हा संतविचार प्रा. म.अ. कुलकर्णींनी श्रद्धाभावाने अनुसरला. स्वत: त्याचे पालन करतानाच इतरांनाही या विचाराची दीक्षा दिली. हे जग वैराग्यातून सोडून देण्यासाठी त्यात आपल्या कर्तृत्वाची छाप पाडायची आहे, असा सकारात्मक विचार त्यांनी दिला.

अनेक वृत्तपत्रांतून, नियतकालिकांतून व मासिकांतून त्यांनी लेखमाला स्वरूपात लेखन केले. सांगली आकाशवाणीवरील ‘चिंतन’ या सदराचे त्यांनी लेखन केले. काही विशेषांकांचे संपादन करतानाच राज्याच्या विविध भागांतील व्याख्यानमाला, पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळासारख्या प्रतिष्ठित संस्थांचे अध्यक्षपद असे त्यांचे चौफेर कार्य आहे. आपल्या व्याख्यान-प्रवचनांद्वारे परमार्थातील सिद्धान्त, विचार सोप्या भाषेत सांगितले. त्यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या जन्मशताब्दीत उदंड कार्य केले.

अशा अष्टपैलू, ज्ञानी, चिंतक, सत्पुरुष आणि मुख्य म्हणजे विवेकी ग्रंथलेखकास स्नेहांजली पुरस्कार मिळत आहे, ही विशेष आनंदाची गोष्ट ठरते. प्रा. म.अ. कुलकर्णी उर्फ स्वामी प्रज्ञानंदांचे यांचे हार्दिक अभिनंदन!