२६/११ दहशतवादी हल्ला - पुन्हा होऊ शकतो का?

विवेक मराठी    25-Nov-2021
Total Views |
@रुपाली कुळकर्णी-भुसारी
 
आपल्या सुरक्षा यंत्रणा प्रभावी आहेत, म्हणून मोठा दहशतवादी हल्ला नंतर होऊ शकलेला नाही. पण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा अस्थैर्य असल्यामुळे दहशतवादी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: राममंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्यामुळे आणि काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यामुळे देशाबाहेरील इस्लामी धर्मांध गट अस्वस्थ आहेत. येणार्‍या काळात सजग नागरिक हीच आपली सुरक्षा असणार आहे.

MUMBAI_1  H x W
“मी दिवसभर कार्टून बघतेय. तुझ्या ग्रॅज्युएशनसाठी अभिनंदन!” तिच्या नवर्‍याने २००६ ते २००९ दरम्यान भारतात केलेल्या ९ फेर्‍यांचे सार्थक झालेले ती पाहत होती. तिचा नवरा म्हणजे पाकिस्तानी बाप आणि अमेरिकन आई यांचा मुलगा डेव्हिड कोलमन हेडली. भारतात ज्या वेळी मुंबईवर दहा दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या वेळी शिकागोमधून शाझिया गिलानी हिने आनंदाने आपल्या नवर्‍याला एक सांकेतिक ई-मेल केला.
 
 
याच हेडलीमुळे २६/११ची योजना अतिरेक्यांना सहजतेने वास्तवात आणता आली होती आणि त्यात तीन दिवसांसाठी मुंबईला वेठीस धरता आले होते. लष्कर-ए-तय्यबाने आधी केवळ मुंबईच्या ताज हॉटेलवर गोळीबार करण्यासाठी दोन दहशतवाद्यांना भारत-नेपाळ किंवा भारत-बांगला देश सीमा पार करून पाठवायचे ठरवले होते. पण या नियोजनात ‘दम’ नव्हता. हेडलीने मुंबईत टार्गेट हेरले, रेकी केली, व्हिडिओ शूटिंग केले, जीपीएसचा वापर याद्वारे दहशतवाद्यांनी मुंबईत न भूतो न भविष्यती असा हल्ला चढवला. मुंबई हल्ल्याची व्याप्ती आणि तीव्रता दोन्हीही हेडलीमुळे वाढली. या हल्ल्यात १६६ जीव गेले आणि अमेरिकेच्या कोर्टाने २४ जानेवारी २०१३ रोजी हेडलीला केवळ ३५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
 

MUMBAI_4  H x W 
 
हेडली हा लष्कर-ए-तय्यबा, आय-एस-आय आणि अल कायदा या तिघांना सांधणारा महत्त्वाचा दुवा आहे. तरीही दुर्दैवाने आपण त्याच्यावर भारतात खटला चालवू शकलो नाही. ज्याला फाशी व्हायला हवी होती, तो केवळ ३५ वर्षांनी पुन्हा मुक्त होणार आहे.
मुंबईमध्ये दहा दहशतवादी दोन-दोनच्या गटाने हल्ला करत सुटले. लिओपोल्ड कॅफे, हॉटेल ताज, नरीमनचे छाबड हाउस, हॉटेल ट्रायडन्ट-ओबेरॉय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हल्ला चढवला. त्यांना मरेपर्यंत मारत सुटायचे प्रशिक्षण दिलेले होते, त्या अर्थाने तो आत्मघातकी हल्ला आणि लष्करी हल्ला होता. भारताच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला होता. त्यांना पाकिस्तानच्या आय.एस.आय.च्या अधिकार्‍यांनी प्रशिक्षण दिलेले होते.
 


MUMBAI_2  H x W 
 
१९७५मध्ये इस्रायलवर असाच हल्ला झाला होता. दहशतवादी समुद्रमार्गाने आले आणि तेल अवीवच्या हॉटेल सॅव्हॉयमध्ये घुसले. त्यांनी काहींना ओलीस धरले. पण इस्रायलने धडक कारवाई करत ह्या सगळ्या दहशतवाद्यांना ठार केले. तसेच ह्या हल्ल्याची योजना तयार करणार्‍या अबू जिहादला १९८८मध्ये इस्रायलने त्याच्या बेडरूममध्ये घुसून त्याच्या पत्नी आणि मुलासमोर गोळ्या मारून ठार केले. मोसादने आधीच त्याच्या घरात बग लावून ठेवलेले होते. त्याला मारण्याची रंगीत तालीम करताना २२ सेकंदांचा कालावधी लागत होता, पण १६ एप्रिल १९८८ला प्रत्यक्ष कृतीची आज्ञा मिळाली, तेव्हा अबू जिहादच्या प्रवेशद्वारापासून हे सर्व घडवून परत जाईपर्यंत त्यांना फक्त १३ सेकंदांचा कालावधी लागलेला होता. सरावापेक्षा ९ सेकंद कमी!
 


MUMBAI_5  H x W
 
मुंबई हल्ल्यामागे मास्टरमाइंड असणारा हाफीज सईद मात्र पाकिस्तानात उजळ माथ्याने वावरतो. भारताविरुद्ध गरळ ओकून त्याने अनेक तरुणांचा ‘हिरो’ बनण्याचे कसब मिळवलेले आहे. त्याने म्हटले आहे की, “अमेरिकेने अफगाणिस्तानातून आणि भारतानेही काश्मीरमधून माघार घ्यायलाच हवी.” काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग नाहीच जणू, या थाटातच तो वक्तव्य करतो आणि त्यास वारेमाप प्रसिद्धी मिळतेही.
 
 
मुंबईचा हल्ला हे दहशतवादाचे नवे प्रमेय असल्याचे मानले जाते. नियोजन, समन्वय, संपर्क ह्या सगळ्या बाबतीत हा हल्ला भयंकर होता. दहशतवादी हल्ला करताना परस्परांशी खाणाखुणा करून संवाद साधत होते. शिवाय कराचीहून कंट्रोल रूममधून हाफिज सईद सूचना देत होताच.
 
 
ज्या लष्कर-ए-तय्यबाने हा हल्ला केला होता, त्याची निर्मितीच मुळात अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनच्या आर्थिक मदतीतून झाली आहे. ज्या वेळी तालिबानची राजवट होती, तेव्हा दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये वावरणे अगदी सोपे होते. आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. अफगाणिस्तानमध्ये पुन्हा इस्लामी धर्मांध तालिबान सत्तेवर असून आता त्याला पाकिस्तान आणि चीन यांचा खुला पाठिंबा आहे.
 
पुढील आव्हाने –
 
१) शरिया कायदा
 
२) अफूची शेती
 
३) दहशतवाद
 
 
तसेच अफगाणिस्तानमध्ये सध्या शरिया कायदा लागू केल्यामुळे इस्लाम सोडून अन्य धर्मीयांची सुरक्षा धोक्यात आली आहे. इस्लामप्रसारासाठी, विस्तारासाठी प्रयत्न केले जात आहेत. यातून दहशतवादी संघटना सक्रिय होत आहेत. नुकतेच इसीसने त्यांचे मासिक व्हॉइस ऑफ हिंद ह्याच्या मुखपृष्ठावर छापलेला भगवान शंकरांचा मान कापलेला फोटो व्हायरल झाला आहे. त्यांच्या मानेत इसीसचा काळा ध्वज आहे. ‘इट इज टाइम टू ब्रेक दि फॉल्स गॉड्स’ हे त्याखाली लिहिलेले आहे. यातून त्यांचा रोख भारताकडे आहे हे स्पष्ट आहे. म्हणजे धर्माच्या आधारावर दहशतवाद पसरवणे हे उद्दिष्ट आहे. तसेच अफूची होणारी शेती आणि त्याचे अर्थकारण हा घटक दुर्लक्ष करून चालणार नाही. यातून थेट भारताच्या सुरक्षेला धोका आहे, कारण भारताचे भौगोलिक स्थान!
 


MUMBAI_3  H x W
 
एकूणच आपल्या सुरक्षा यंत्रणा प्रभावी आहेत, म्हणून मोठा दहशतवादी हल्ला नंतर होऊ शकलेला नाही. पण अफगाणिस्तानमध्ये पुन्हा अस्थैर्य असल्यामुळे दहशतवादी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही. विशेषत: राममंदिराच्या उभारणीला सुरुवात झाल्यामुळे आणि काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्यामुळे देशाबाहेरील इस्लामी धर्मांध गट अस्वस्थ आहेत. येणार्‍या काळात सजग नागरिक हीच आपली सुरक्षा असणार आहे.