"वसंतराव - आशाताई बेळंबेंचे सहस्रचंद्रदर्शन हे आपल्यासाठी ध्येयचिंतन!" - डॉ. अशोकराव कुकडे यांचे गौरवोद्गार

विवेक मराठी    26-Nov-2021
Total Views |

*लातूरमध्ये रंगला कौटुंबिक - सामाजिक सोहळा*
लातूर : रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते वसंतराव (बापू) बेळंबे व रा. से. समितीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आशाताई बेळंबे या दांपत्याच्या सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने लातूरमध्ये कौटुंबिक व सामाजिक असा एक आगळावेगळा सोहळा रंगला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे यांनी "हा कार्यक्रम आपल्यासाठी ध्येयचिंतन असून आपण जीवनात काय केले पाहिजे याचे दृढसंस्कार करणारा आहे" अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.


Sahasrachandradarshan_1&n
 
या कार्यक्रमास व्यासपीठावर डॉ. अशोकराव (काका) कुकडे यांच्यासह वनवासी कल्याण आश्रमाचे अ.भा. कार्यकारिणी सदस्य सुरेशराव कुलकर्णी, भारतीय किसान संघाचे महाराष्ट्र प्रदेश संघटनमंत्री श्रीरंग (दादा) लाड, राष्ट्र सेविका समितीच्या देवगिरी प्रांत कार्यवाहिका रत्नाताई हसेगावकर आदी उपस्थित होते. तसेच श्रोत्यांमध्ये लातूर व अनेक ठिकाणांहून सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवर मंडळी, तसेच बेळंबे परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने वसंतराव बेळंबे यांनी वनवासी कल्याण आश्रम, भारतीय किसान संघ, राष्ट्र सेविका समिती यासह संघपरिवारातील सामाजिक, सेवा कार्य करणाऱ्या संस्था-संघटनांना काही रक्कम देणगीरूपाने प्रदान केली.

 
या वेळी रत्नाताई हसेगावकर, सुरेशराव कुलकर्णी, श्रीरंग (दादा) लाड आदींनी बेळंबे दांपत्याबद्दल गौरवपर मनोगते व्यक्त केली. वसंतराव व आशाताई यांचे राष्ट्रीय भावनेने आयुष्यभर सामाजिक कार्य करणारे कुटुंब समाजाचे प्रेरणास्थान आहेत, अशा शब्दांत मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


Sahasrachandradarshan_2&n
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अशोकराव कुकडे म्हणाले की, ५७ वर्षांपूर्वी मी लातूरमध्ये आलो, तेव्हा सर्वप्रथम परिचय झाला अशांपैकी एक नाव म्हणजे बेळंबे कुटुंबीय. तो काळ संघासाठी अतिशय प्रतिकूल होता. अशा परिस्थितीत संघकार्यकर्ते म्हणून ठामपणे उभ्या राहणाऱ्यांपैकी बेळंबे कुटुंब हे प्रमुख नाव असल्याचे ते म्हणाले. एकदा व्यक्ती रा.स्व. संघाच्या संपर्कात आली की संघविचार व त्याची बांधिलकी जन्मभर टिकते, ती विधायक कार्याकडे नेते. बापू आणि आशाताई यांच्याकडे पाहून याचा प्रत्यय येत असल्याचे उद्गार त्यांनी काढले.

"माझ्यासाठी संघभाव - समाजभाव एकच!"
या वेळी आपल्या मनोगतामध्ये वसंतराव (बापू) बेळंबे म्हणाले की, माझ्यासाठी संघभाव व समाजभाव एकच झाला आहे. आपले आयुष्य संघासाठी दिल्यामुळेच आपल्या जीवनाचा सिद्धार्थ झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच, येणाऱ्या पाच-दहा वर्षांत आपला देश परमवैभव प्राप्त करेल, असाही विश्वास बेळंबे यांनी व्यक्त केला.



डॉ. कुकडे पुढे म्हणाले की, "रा.स्व. संघाला आता चांगले दिवस दिसू लागले आहेत. हे दिवस येण्यास वेळ लागला, पण एकेकाळची परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती. अशा परिस्थितीतून आजचे चांगले दिवस ज्यांच्या परिश्रमातून आले, ती बापू बेळंबे यांची पिढी आहे. संघाचा विस्तार करणाऱ्या या पहिल्या पिढ्यांनी संघकार्याच्या पायामध्ये स्वतःला अक्षरशः गाडून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. बेळंबे यांच्या समाजकार्याचे स्मरण अशा कार्यक्रमातून आपण केले पाहिजे. हा कार्यक्रम आपल्यासाठी ध्येयचिंतन असून आपण जीवनात काय केले पाहिजे याचे दृढसंस्कार करणारा आहे" असे उद्गार डॉ. कुकडे यांनी या प्रसंगी काढले.

बेळंबे परिवार आणि साप्ताहिक 'विवेक' परिवार
विशेषत्वाने उल्लेखण्याची बाब म्हणजे वसंतराव बेळंबे व बेळंबे परिवार हे साप्ताहिक विवेकचे गेल्या ३०-४० वर्षांहून अधिक काळ वाचक - हितचिंतक आहेत. विवेकचे विविध अंक, विशेषांक, ग्रंथ व त्यातील विशेष नोंदी यांचे त्यांनी गेल्या तीस वर्षांहून अधिक काळ संग्रह, जतन केले आहे. सा. विवेक आणि वसंतराव बेळंबे यांच्या या भावनिक ऋणानुबंधाचा या कार्यक्रमात विशेष उल्लेख करण्यात आला.