लाल क्रांती नेतृत्वहीनतेच्या दिशेने

विवेक मराठी    26-Nov-2021
Total Views |
@मंजूषा कोळमकर
 
13 नोव्हेंबरचा दिवस नक्षल चळवळीला प्रचंड हादरा देणारा ठरला. महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांच्या सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्ती जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 पथकाने तब्बल 26 नक्षल्यांना यमसदनी पाठवले. या 26मध्ये नक्षल्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे याचाही समावेश होता. मिलिंदचे जाणे हा तेलंगण, आंध्र, महाराष्ट्र व छत्तीसगढ या चार राज्यांच्या सीमांवरील जंगल क्षेत्रात पसरलेल्या नक्षल चळवळीला बसलेला जबरदस्त हादरा आहे.
 

naxlist_1  H x  
गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाने खास सशस्त्र नक्षलवाद्यांशी लढण्यासाठी तयार केलेल्या सी-60 पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तीन वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातच याच पथकाने दोन वेगवेगळ्या मोहिमांमध्ये तब्बल 42 नक्षल्यांना ठार केले होते. त्यानंतर गेल्या 13 नोव्हेंबरला 26 नक्षल्यांना टिपले व त्यात कुख्यात नक्षली नेता व नक्षल्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश होता. त्याच्याबरोबर दोन डिव्हिजनल कमांडरही या चकमकीत मारले गेले. दहा वर्षांपूर्वी, 24 नोव्हेंबर, 2011 रोजी पश्चिम बंगालमधील जंगलात सर्वोच्च नक्षली नेता मल्लाजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी पोलिसांबरोबरच्या चकमकीत मारला गेला. त्यानंतर पोलीस दलाला मिळालेले हे पहिलेच मोठे यश आहे.
 
 
तेलतुंबडेसह 26 नक्षली चकमकीत मारले जाणे, याला मोठी प्रसिद्धी मिळणे स्वाभाविक होतेच. पण याच महिन्यात नक्षल चळवळीत घडलेल्या काही घटना या चकमकीमुळे झाकोळल्या गेल्या. नक्षल सेंट्रल कमिटीचा सदस्य तेलतुंबडे ग्यारापत्तीच्या जंगलात झालेल्या चकमकीत मारला गेला, आणि आणखी तीन सदस्य पोलिसांच्या तावडीत सापडले. हे चौघेही देशभरात पसरलेल्या नक्षल चळवळीच्या नेतृत्वाचे प्रमुख स्तंभ होते, हे लक्षात घेतले पाहिजे. ही बाब नक्षल चळवळीला नेतृत्वहीनतेच्या दिशेने नेणारी ठरणार आहे. हे अधिक स्पष्टपणे जाणून घेण्यासाठी नक्षल चळवळीचे संघटनात्मक स्वरूप माहीत करून घेतले पाहिजे.


naxlist_1  H x
 
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेच्या नावाने देशभरात नक्षल कारवाया चालतात. याआधी नक्षल्यांच्या दोन संघटना होत्या - पीपल्स वॉर ग्रूप (पीडब्ल्यूजी) व माओइस्ट कम्युनिस्ट सेंटर (एमसीसी) या त्या दोन संघटना. या दोन्ही संघटना 2004मध्ये एकत्र झाल्या व एकच नवी संघटना तयार झाली, ती संघटना म्हणजेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट). दहा हजारांच्या आसपास सशस्त्र नक्षल्यांचा समावेश असलेल्या या संघटनेचा सर्वोच्च नेता, म्हणजेच जनरल सेक्रेटरी नम्बाला केशव राव उर्फ बसवराज हा आहे. संघटनेची सर्वोच्च समिती म्हणजेच सेंट्रल कमिटी. त्यात 28 सदस्य आहेत. संघटनेचे सर्व महत्त्वाचे निर्णय हीच समिती घेते. धोरण आखणे, हिंसक कारवायांची रणनीती ठरवणे या सार्‍या जबाबदार्‍या या समितीकडे असतात. या समितीचे दोन विभाग आहेत. पहिला आहे राजकीय धोरण ठरविणारी पॉलिटब्युरो व दुसरा आहे सशस्त्र दलांची सेंट्रल मिल्ट्री कमिशन. पॉलिटब्युरोमध्ये जनरल सेक्रेटरी बसवराज याच्यासह सहा सदस्य आहेत, तर सेंट्रल मिल्ट्री कमिशनचा प्रमुख खुद्द बसवराज हाच आहे. या दोन्ही विभागांचे राज्य, विभाग व जिल्हास्तरीय उपविभाग आहेत. एकंदरीत सेंट्रल कमिटी हीच संघटनेची मुख्य धोरणनिर्धारक आहे.

 
कौतुक महाराष्ट्र पोलिसांचे
 
naxlist_1  H x
 
जंगलातील नक्षली कारवायांचा व शहरातील नक्षली हितचिंतकांचा बिमोड करण्यात महाराष्ट्र पोलिसांनी बजावलेली कामगिरी अतिशय मोठी व महत्त्वाची आहे. एप्रिल 2018मध्ये दोन वेगवेगळ्या चकमकीत पोलिसांनी 42 नक्षल्यांचा खात्मा केला. त्यानंतर पोलिसांनी 27 नक्षली नेत्यांना ठार केले किंवा अटक केली. गेल्या पाच वर्षांमध्ये अटक केलेल्या वा शरण आलेल्या नक्षल्यांची संख्या 350च्या वर आहे. विशेष म्हणजे, पोलीस दलात असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील बहादुर तरुण जवानांना घेऊन तयार केलेल्या सी-60 पथकाचे नक्षल्यांना नेस्तनाबूत करण्यात प्रमुख योगदान आहे. एल्गार परिषदेनंतर उसळलेल्या दंगलीच्या चौकशीत एक मोठा देशद्रोही कट उघडकीस आणून महाराष्ट्र पोलिसांनी विचारवंत, लेखक, कवी अशा बिरुदावलीच्या मुखवट्याआड दडलेले, पण मुळात शहरी नक्षली असलेले प्रतिष्ठित चेहरे गजाआड केले आहेत.
तेलतुंबडे याच सेंट्रल कमिटीचा सदस्य होता. तेलतुंबडे मारला गेला त्याच्या आदल्याच दिवशी, 11 नोव्हेंबरला झारखंड राज्यामध्ये एक मोठी घटना घडली. झारखंड पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने एका गोपनीय माहितीच्या आधारे झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यातील गिड्डीबेडा टोल नाक्यावर एक पांढरी कार अडवली व त्यातल्या सहा प्रवाशांना ताब्यात घेतले. त्यात एक 82 वर्षांचा वृद्ध व 64 वर्षांची महिलाही होती. तो दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) संघटनेच्या सेंट्रल कमिटीचा आणि पॉलिटब्युरोचाही सदस्य प्रशांत बोस उर्फ किशनदा. आणि सोबतची वृद्ध महिला होती किशनदाची पत्नी शीला मरांडी उर्फ शोभा. तीसुद्धा सेंट्रल कमिटीची एकमेव महिला सदस्य आहे. उर्वरित चौघे जणही कुख्यात नक्षली होते. हे दोघेही पश्चिम बीरभूम जिल्ह्यातील जंगलात वास्तव्य करून होते. संघटनात्मक कामासाठी ते गिरीडिह जिल्ह्यातील पारसनाथ जंगलात गेले होते व तेथून परतताना ते नेमके पोलिसांच्या ताब्यात आले. त्याच्याही दोन दिवस अगोदर, 9 नोव्हेंबरला केरळ पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने मुळात वकील असलेला व नंतर नक्षल चळवळीत उतरून संघटनेच्या सेंट्रल कमिटीच्या सदस्यपदापर्यंत पोहोचलेला बी.जी. कृष्णमूर्ती उर्फ विजय याला कर्नाटकातून केरळमध्ये येताना अटक केली व राष्ट्रीय चौकशी पथकाच्या ताब्यात दिले. म्हणजेच एकाच नोव्हेंबर महिन्यात नक्षली संघटनेच्या सेंट्रल कमिटीचा एक सदस्य तेलतुंबडे मारला गेला आणि किशनदा, विजय व शीला मरांडी हे तीन सदस्य पोलिसांच्या तावडीत सापडले. याअगोदर याच वर्षात जूनमध्ये सेंट्रल कमिटीचे सदस्य असलेले हरिभूषण उर्फ यापा नारय्या उर्फ लकमू दादा (तेलंगण) व ऑक्टोबरमध्ये अक्कीराजू हरगोपाल उर्फ रामकृष्णा उर्फ आरके (आंध्र प्रदेश) हे कोरोनाने दगावले. 28 सदस्यांच्या सेंट्रल कमिटीतील सहा जण एकतर मृत्युमुखी पडले किंवा पोलिसांच्या ताब्यात आले. हे सहाही जण सेंट्रल कमिटीचे प्रमुख सदस्य होते. त्यामुळे नक्षल संघटनेच्या नेतृत्वात जी एक मोठी पोकळी तयार झाली, ती आगामी नजीकच्या काळात भरून येणे शक्य नाही.


naxlist_3  H x

naxlist_2  H x


naxlist_1  H x

तेलतुंबडे मारला गेला, किशनदा, शीला मरांडी व विजय यांना पोलिसांनी पकडले, त्यामुळे चळवळ खिळखिळी झाली...

संघटनेत या सहाही जणांची महत्त्वाची भूमिका होती. पण त्यातही मिलिंद तेलतुंबडेचे स्थान वेगळे व महत्त्वाचे होते. नक्षल चळवळीत दंडकारण्य म्हणून ओळखल्या जाणार्‍या क्षेत्रावर, म्हणजेच तेलंगण, आंध्र, महाराष्ट्र व छत्तीसगढ या चार राज्यांच्या सीमांवर पसरलेल्या जंगल क्षेत्रावर तेलतुंबडेचे साम्राज्य होते. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात असलेल्या राजूर गावचा राहणारा मिलिंद तेलतुंबडे शिक्षणानंतर वेकोलीत नोकरीला लागला. तेथेच तो डाव्या विचारांच्या कामगार संघटनेच्या संपर्कात आला. ते काम करीत असतानाच त्याच्यावर माओवादाचे भूत चढले व नक्षल चळवळीत काम करण्यासाठी त्याने घरदार-गाव सोडून जंगलाचा आसरा घेतला. नक्षली कारवायांच्या व्यवस्थापनात पुढे असलेला मिलिंद काही काळातच संघटनेचा एक प्रमुख आधारस्तंभ झाला. सेंट्रल कमिटीत त्याला स्थान मिळाले. अलीकडच्या काळात त्याच्यावर महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली होती. तेलतुंबडेचे बोलणे व त्याचा मजबूत संपर्क हेच त्याचे बलस्थान होते. त्यामुळेच शहरात वावरणार्‍या नक्षल हितचिंतक संघटना, व्यक्ती यांच्याशी छुपा संपर्क ठेवणे, त्यांच्याकडून निधी मिळवणे, आणखी छुपे हितचिंतक मिळवणे, नक्षल्यांना कायदेशीर मदत पुरवणे व जंगलात वावरणार्‍या सशस्त्र दलासाठी तरुणांची भरती करणे ही जबाबदारी मिलिंद सांभाळत होता. एल्गार परिषद प्रकरणात जे नक्षल हितचिंतक शहरी नक्षली पोलिसांच्या तावडीत अडकले, त्यांच्याकडून चौकशी पथकांनी जी काही पत्रे ताब्यात घेतली, त्या पत्रामध्ये मिलिंद, श्रीनिवास, दीपक, एमटी या ज्या नावांचा उल्लेख आहे, तो मिलिंद तेलतुंबडे याचाच असल्याचा चौकशी पथकांचा दावा आहे. ग्यारापत्तीच्या चकमकीनंतर त्यात मारल्या गेलेल्या नक्षल्यांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त करण्यासाठी बंदचे आवाहन करणारे पत्रक सेंट्रल कमिटीचा प्रवक्ता अभय याने काढले. त्या पत्रकात चकमकीत ठार झालेल्या तेलतुंबडेंसह, दुवीप, सन्नू, चेतन, प्रमोद, किशन, प्रकाश, बंडू या पुरुष व नेरो या महिला नक्षली कमांडर्सची नावे प्रमुख कमांडर्स म्हणून दिली आहेत. त्यातही तीन पानांच्या या प्रसिद्धीपत्रकात तेलतुंबडेच्या कार्याची माहिती देणारी तब्बल दोन पाने आहेत. त्यामुळे नक्षल संघटनेतील मिलिंद तेलतुंबडेचे स्थान लक्षात येते.

नक्षली क्रौर्याची परिसीमा
गडचिरोलीत प्रमुख नक्षल्यांचा खात्मा झाला, त्याच दिवशी बिहारमधील गया जिल्ह्यात नक्षल्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एकाच दलित कुटुंबातील चार जणांना पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून गोळ्या घालून मारले. नक्षल्यांनी घरातील दोन पुरुष व दोघांच्या पत्नी यांना बेदम मारहाण केली व नंतर गोळ्या घालून ठार केले. इतक्यावरच त्यांचे समाधान झाले नाही, तर ते चारही मृतदेह जनावरांच्या गोठ्यासमोर फासावर लटकवले. नंतर दोघांचीही घरे सुरुंग लावून जमीनदोस्त केली आणि त्यांची वाहनेही जाळून टाकली. चकमकीत नक्षली मेले की सत्यशोधन करण्यासाठी उभा असणारा पुरोगामी कंपू, गरीब दलित आदिवासींचे कैवारी असल्याचा ढोल पिटणारे माओवाद्यांचे शहरी समर्थक आणि ‘संविधान बचाओ’वाले मात्र त्याविरोधात तोंड उघडायला तयार नाहीत.


तेलतुंबडेचे ठार होणे हा नक्षल संघटनेसाठी जितका मोठा हादरा आहे, तितकाच मोठा हादरा म्हणजे प्रशांत बोस उर्फ किशनदा व त्याची बायको शीला मरांडी उर्फ शोभा यांना अटक होणे हासुद्धा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. दोघेही संघटनेच्या सेंट्रल कमिटीचे सदस्य होते. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट) या संघटनेचा जनरल सेक्रेटरी बसवराज हा सशस्त्र लढाईतील तंत्रात निष्णात आहे. तो संघटनेचा संघटनात्मक प्रमुख असला, तरीही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीची वैचारिक क्षमता असलेला नेता म्हणून तो ओळखला जात नाही. अशा स्थितीत संघटनेची वैचारिक व तात्त्विक बाजू मजबूत करण्याची धुरा ज्या ज्येष्ठ नेत्यांच्या अंगावर होती, त्यात किशनदा प्रमुख आहे. वयाची ऐंशी ओलांडली असली, तरी किशनदा मानसिक व बौद्धिकदृष्ट्या मजबूत होता. त्यामुळेच सेंट्रल कमिटीतील स्थान त्याने कायम ठेवले होते. त्याची बायको शीला ही सेंट्रल कमिटीची एकमेव महिला सदस्या होती. सशस्त्र नक्षली दलात तरुणींना सहभागी करून घेणे व अशा महिला नक्षल्यांबाबतची धोरणे निश्चित करणे यात तिचा प्रमुख सहभाग असायचा.
 

naxlist_1  H x
 
सेंट्रल कमिटीतील प्रमुख सदस्यांचे अशा प्रकारे जाणे वा अटक होणे, त्यांच्या नेतृत्वाच्या फळीलाच खिळखिळे करणारे आहे. कमांडर अभयने प्रसिद्धीपत्रकात भलेही या प्रमुख सदस्यांचे वारस लवकर तयार करण्याची अपेक्षा व्यक्त केली असली, तरी ते खूप सोपे नाही, हे संघटनेच्या मुखंडांनाही माहीत आहे. एकतर सुरक्षा दलांनी ज्या प्रकारे जंगल व शहरी क्षेत्रात नक्षल्यांची कोंडी केली आहे, त्यामुळे नक्षली दलातील तरुण-भरती जवळजवळ संपली आहे. नवीन भरती नाही व धोरणात्मक दिशा देणारे जे नेते आहेत, ते सर्व साठी ओलांडलेले आहेत. त्यांच्या शारीरिक वावरावर निर्बंध आहेत. अशा स्थितीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओइस्ट)ची नेतृत्वफळी कमकुवत होणे स्वाभाविक आहे. खरे तर नक्षल चळवळीचे कंबरडे मोडण्यासाठी ही स्थिती अतिशय चांगली आहे. सुरक्षा दले व नक्षलग्रस्त राज्याचे धोरण निर्धारक शासनकर्ते या बाबींचा नक्कीच विचार करीत असतील.