नाशिक परिसरातील प्रमुख बोलींमधील साहित्य

01 Dec 2021 13:08:39
नाशिक परिसरातील बोलींचे साहित्यातील उपयोजन वाढवण्याची जबाबदारी वस्तुत: बोलीभाषकांचीच आहे. बोली जशा ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत, तशाच त्या वाङ्मयीन आविष्कारांचे माध्यमही बनल्या पाहिजेत. मराठी वाङ्मयीन आविष्कारांना रसरशीत जिवंतपणा आणि अर्थसौंदर्यासाठी बोलींशी संवादी-समावेशकतेचे नाते असले पाहिजे.

Literature_1  H
पवित्र गोदावरीच्या उगमस्थानापासूनच नाशिकच्या बोलीचे मंत्रबोल खळाळते राहत आले आहेत. भावना, संवेदना, ज्ञान, माहिती, कल्पना, स्वप्ने यांची देवघेव करण्याचे, संदेशनाचे कार्य भाषेला, बोलीला करावे लागते. नाशिकची प्रमाणबोली ही वाङ्मयनिर्मितीतून आविष्कृत झाली आहेच. संत निवृत्तीनाथांचे समाधिस्थळ त्र्यंबकेश्वरी आहे, निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सान्निध्यात ध्यानधारणा केली, तशी अभंगनिर्मितीही केली आहे. देशीकार लेणे घडवणार्‍या संत ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांची प्रेरणाही होती.
 
समर्थ रामदास स्वामी नंदिनी व गोदावरी या दोन नद्यांच्या संगमस्थळी - म्हणजे टाकळी या गावी (पंचवटी) बारा वर्षे राहिले होते. ‘जुना दासबोध’ या अध्यात्म-उपदेशाची रचना येथेच झाली. शिवकालीन मराठीचे साद-पडसाद दासबोधातून उमटत राहिल्याचे लक्षात येते.
 
नाशिक ही मंत्रनगरी आणि यंत्रनगरी म्हणूनही ओळखली जाते. धर्मक्षेत्र म्हणून गोदेकाठी पूर्वी संस्कृत पाठशाळा होत्या. त्र्यंबकेश्वरीही संस्कृत पाठशाळा होत्या. देशभरातून, जगभरातून लोक धर्मक्षेत्री येत असतात. परिणामत: विविध प्रदेशांतील, समाजांतील लोकांचे हे आगमन - भाषाव्यवहार नाशिकच्या बोलीभाषेत भर घालणारेच ठरत आले आहेत. पुणे-मुंबई या महानगरांतल्या प्रमाण बोलीपेक्षा नाशिकची बोली ही अधिक समावेशक अशी झालेली दिसते. ‘एकवचनी राम’ हा आदर्श तर आहेच, म्हणून नाशिकच्या बोलीभाषकांना शब्दांना पक्के राहावे लागत असावे!

Literature_2  H
दिलेला शब्द पाळण्याचे हे व्रत नाशिक आणि परिसरातील बोलीभाषकांना अनुसरावे लागते. म्हणून शब्दप्रामाण्याला अनुभवप्रामाण्याची, प्रयोगप्रामाण्याची जोड द्यावी लागत असावी. भाषेची काळजी घेणे, भाषा समर्थ करणे ही जबाबदारीही या ‘एकवचनी-त्वात’ अभिप्रेत आहे. कवी कुसुमाग्रज तर म्हणाले होतेच - “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे.” ज्ञानभाषा आणि लोकभाषा यांचा समन्वय साधणारी दीर्घ परंपरा येथे जपलेली आढळून येते. लोकभाषा आणि प्रमाणभाषा परस्परांना पोषकही ठरतात.
 
आधुनिक मराठी साहित्याच्या भाषेला लोकभाषेची, बोलीची परंपरा आहे, हे मात्र लक्षात घ्यायला हवे. नाशिकच्या साहित्यपरंपरेतील भाषा प्रारंभी संस्कृतप्रचुर आणि ज्वलजहाल बोलीच होती. स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद यांची भाषा अशी स्वातंत्र्यवादी प्रेरणांनी भारावलेली आणि स्फूर्तिदायकच असल्याचे दिसते. क्रांतीचा जयजयकार करणार्‍या कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा भाषावापर उपमा, उत्प्रेक्षा, रूपक आदी अलंकारांनी भावसंपन्न झालेला दिसतो. त्यांच्या नाटकांच्या संवादभाषेतही रोखठोकपणा, मूल्यभाव आणि नाट्यात्म अलंकरण दिसते. ज्या अभिजात जीवनमूल्यांचा, आदर्शांचा संस्कार कुसुमाग्रज करू पाहत होते, त्याचे औचित्यच त्यांच्या काव्यभाषेचा मूळ आधार होते. 1980नंतरच्या त्यांच्या काव्यभाषेत समाजशील उपरोध, कणव यांचा शिरकाव झालेला होता. नाशिक परिसरातील ग्रामबोली, लोकसंवादबोली यांचे उपयोजन त्यांच्या कथनात्मक साहित्यातून झालेले दिसते. गंगाघाट, पंचवटी, मखमलाबाद, जुने गल्लीबोळ, वाडे, भिक्षुकी रहिवास स्थळे अशी प्रादेशिक/स्थानिकता मनोहर शहाणे यांच्या कथा, कादंबर्‍या, नाटके यांमध्ये आहे. परिणामत: शहाणे यांचे कथनात्मक साहित्य नाशिकच्या बोलीतूनच आधुनिक आशय मांडू पाहते. अरुण काळे, कैलास पगारे यांच्या विद्रोही समाजशील काव्याशयातही नाशिकची उपेक्षित, वंचित, ग्रामीण भागातून आलेली माणसे, त्यांच्या वेदना, विद्रोहाची तीव्रतमता साठवलेली आहे. कामगार, खेडूत, नोकरदार यांच्या भावविश्वांचे प्रकटीकरण हे भाषासूत्र त्यांच्या काव्यात ठळक झालेले आहे. वामनदादा कर्डकही नाशिक परिसराची बोलीच उपयोजित होते. साहित्यनिर्मितीचा समाजाशी असलेला अनुबंध पाहता समाजबोलींचे, प्रादेशिक बोलींचे महत्त्व लक्षात येते.

Literature_6  H
रानकवी तुकाराम धोंडे
नाशिक शहराचा विस्तार होताना कामगारांचे स्थलांतर स्वाभाविकच होते. कारखाने, व्यापार-उद्योग, बांधकाम, यंत्र-उद्योग यांची वाढ झाली. उत्तर महाराष्ट्रातील खानदेशी बोलीभाषक किंवा पेठ, सुरगाणा, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर परिसरातील आदिवासी बोलीभाषकही रोजगार, काम, धंदे या निमित्ताने शहराकडे आले. जे शहराशी सांधले गेले, त्यांनी नाशिकच्या प्रमाणभाषेत आपल्या बोलींतील म्हणी, वाक्यप्रयोग, शब्द आणि जीवनाचे संस्कृतिक संदर्भ सरमिसळून टाकले. तसेच प्रमाणबोलीतील शब्दसंकेत, अर्थसंकेत आपलेसे केले.
 
नाशिक परिसरातील लगतच्या ग्रामीणांची संवादभाषा, बोली आपल्या अर्थसक्षमतेसह येथील लेखकांच्या पात्रांची संवादभाषा असते. त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, इगतपुरी, सुरगणा, कळवण, सटाणा काही भाग येथे आदिवासी ठाकर, कोकणा व इतर आदिवासी जमातींची भाषाही प्रादेशिक लोकसंस्कृतीच्या आविष्कारक आहेत. शिवाय जातबोलींचे गटसमूहात अस्तित्व असतेच. या लोकबोलींचा लोकवाङ्मयीन आविष्कार भावसौंदर्य आणि जीवनसौंदर्य वाढवणारा आहे. आदिवासींच्या बोलींचे आधुनिक मराठी साहित्यात फारसे उपयोजन झालेले नाही. बोलीभाषकांनी आपआपल्या बोलींमधून साहित्यनिर्मिती केल्यास मराठी साहित्याचा प्रवास संपन्न होईल. इगतपुरी तालुक्यातील रानकवी तुकाराम धांडे प्रमुख आदिवासी बोलीचे कवी म्हणून ओळखले जातात. निसर्गशरणता, लोकश्रद्धा, आदिवासी जीवनमूल्ये, आदिवासींचे जीवनसंघर्ष, लोकवाङ्मयाच्या चाली-लयी धांडे यांच्या कवितांमधून प्रकटतात. डोंगर, रानटी पशू, पक्षी, कृषीतील कष्ट अशा प्रादेशिक अस्मिता त्यांच्या कवितांमध्ये आहे, सोबत असते ती आदिवासी जाणीव आणि लोकबोली! शिक्षणप्रसारामुळे आणि जीवनजाणिवांचा ठणका बसल्यामुळे शिकलेली मुले-मुली आपल्या बोलींचे वाङ्मयीन आविष्कार साधत आहेत, ते मात्र अपवादानेच!
भिल्ली बोलीतील हा आविष्कार पाहा -
 
‘मनी बापला स्वत:नी जमीन नही, घर नही. मना बाप दुसरानी तई शेतकाम करी. आमला दोन बहिणीसला शिकाडी रहीत. बाप गरीब सं पण मना बाप आमला शिकाडी रहीत. बापला किती मानसं सांगत बास जया पोरीसना शिक्षण आता काढी घेवा घर. आता आपली जात मं कोण आवढा पोरीसला शिकाडी रहीत. मना बाप सांगं मी जरी दुसरी शिकी तरी मन्या सात पोरीसपैकी दोन पोरीसला शिकाडसू. तव्ह माला शिक्षण ना महत्त्व नव्हता.’ (सोनाली वाघ, बांधिलकी, 2013.)
किंवा
‘आदिवासी मान्सं, बाया यास्ना कवड (परिधान) करानी. पेहराव टोपी, कोपर्‍या धोतर, लंगठी अन् बाईस्ना पेहराव काष्टी लुगडा. आदिवासी भिल होती मजुरीना कांम करंत. शेती मजुरी ना कामं करा शिवाय दुसरा रस्ता नही. शेती कामं दरदिवस करीसन त्यासना पोट करता ते त्या पैसांसवर बाजरी नहीतर दुकानमाथून तांदूळ घी सन आणि मंग नदीमझारून मासा धरी आणिसन त्यावर आपला जीवन जगत... आम्हनं लोकासनी पहिलेपासून परंपरा अशी सय की एक हातमझार ईळा, दोरी दुसरा हात मझार कुर्‍हाड घिद्या का चालनात जंगल मझार, लाकडं काढी तव काढती अन् जर एखादा ससा, तितर, लाव्हरी, कोल्हा दिसना का मंग ते लाकडं काढना सोडीसन आसना मांगं धावत पळत सुटती आणि सेवट ती शिकार पकडीसन लाकडं काढीसन मग वस्तीवर परत येत...’ (सूरज आहिरे, बांधिलकी, 2013.)


Literature_4  H
भिल्ली बोलीतले हे लोकभाषेचे आविष्कार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आविष्कार आहेत. बोलीचे साधेपण आणि कथनक्षमता यातून लक्षात येतात. भिल्ली बोलीत लोकवाङ्मय मात्र प्रचंड स्वरूपात आहे. डोंगर्‍या देवची गाणी, सण, उत्सवाची गाणी, लोकनृत्याच्या, लोकवाद्याच्या साथीवरची गाणी, लोकश्रद्धा आणि निसर्गशरणता या भिल्ली लोकगीतांमधून प्रकट झालेली दिसते.
घागबारी, सुरगाणा परिसरातील कोकणा बोलीतील हा आविष्कार -
‘नाशिक जिल्हामं, कळवण, सुरगाणा, चांदवड, बागलाण या आदिवासी तालुकासमा डोंगर्‍या देव हाव सण पका मोठा प्रमाणमं साजरा करता. डोंगर्‍या देव म्हणजे काय वहता ती काही भागमं म्हणजे शहरी भागमं लोकासला डोंगर्‍यादेव कशा साजरा करता अन कज साजरा करता ती आता मय सांगी राहिनाव. हाय कार्यक्रममं कोकण्या, भिल अन कोळी या जात ना लोकं मोठ्या प्रमानमं डोंगर्‍या देवसमां सामील व्हता. ह्या डोंगर्‍यादेवसा सण कार्तिक महिनाम पोर्णिमा वन्ही का तवा साजरा करता...’ (प्रकाश अनाज गायकवाड, बांधिलकी, 2013.)
किंवा तेथील लोकगीताचा अंश पाहा -
 
‘उचा नारळीना झाड झुकी झुकी जाय। आमना डोंगर्‍या देवं उचा डोंगरवर। आमना डोंगर्‍यादेव उचा डोंगरवर। गगन गड उचा डोंगरवर। उचा नारळीना झाड झुकी झुकी जाय। आमना चितृक्या गड उचा डोंगरवर। उचा नारळीना झाड झुकी झुकी जाय। आमना कन्सर्‍या गड उचा डोंगरवर। उचा नारळीना झाड झुकी झुकी जाय। आमना धनसर्‍या गड उचा डोंगरवर।’ (बांधिलकी, 2013.)
 
Literature_5  H
 
आदिवासी कोकणा, ठाकर, कोळी यांच्या बोलींमधील लोकवाङ्मय मोठ्या प्रमाणावर परंपरेने चालत आलेले आहे. दर्‍याडोंगर-नद्या-ओहळ-वनचर, प्राणी-पशू-पक्षी आणि झाडे-जंगले आणि जीवनसंघर्ष यांचा अविष्कार साधणारे हे लोकवाङ्मय लोकसमूहमानसाचा गाभा, घटक आहेत.
 
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेकडील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळ तालुक्यांमध्ये अहिराणी (बागलाणी) ही बोली दैनंदिन व्यवहारांची भाषा आहे. खानदेशी भाषा असेही अहिराणीस संबोधले जाते. या प्रदेशातील अभीर लोकांचा (अभीर न्न अहिर न्न अहिराणी) उल्लेख रामायण-महाभारत या संस्कृत महाकाव्यांत आला आहे, तसाच तो प्राकृत ग्रंथात आहे. संत ज्ञानेश्वरांना संस्कृत, मराठी व बागलाणी भाषा येत असे. वि.का. राजवाडे यांनी संशोधिले आहे. अहिराणीचा लिखित पुरावा चाळीसगाव-पाटण गावातील मंदिर शिलालेखात इ.स. 1206चा आहे. संत ज्ञानेश्वरांनी एक बागलाणी गवळण, रूपकात्मक अभंग व अहिराणी पदे रचली आहेत. उदा., ‘तन्हा मराठी देश मन्ही बागलाणी भाष । मन्हा रे कान्हा, मन्हा रे कान्हा’, किंवा पद -‘यशोदेना बाय तान्हा मले म्हणे हादू लेवो । मी तं बाई साधी भोयी गऊ त्याना जवयी’. अहिराणीचे वाङ्मयीन उपयोजन यादवकाळापासून चालत आले आहे.
 
कसमादे परिसर, नांदगाव तालुक्याचा काही भाग हा अहिराणी बोलीचा प्रदेश होय. ग्रामीण-शेतकरी लोकांची ही भाषा आहे. जुन्या पिढीतील लोकसाहित्याचे अभ्यासक व संग्राहक डॉ. दा.गो. बोरसे यांनी ‘अहिराणीची कुळकथा’ हे संशोधनपर लेखन केले आहे. बोरसे यांनी अहिराणी लोकगीते, लोककथा, सण-उत्सव-लग्न यासंबंधीची गाणी, स्त्रीगीते, जात्यावरची गाणी संग्रहित केली व त्यावरचे भाष्यही लिहिले आहे. म्हणी, वाक्यप्रचार, आहाणे, उखाणे यांचाही संग्रह प्रकाशित केला. खानदेश वाग्वैभव (1953), मधुगीते (कविता), जिभाऊ (कादंबरी), तापीतरंग, अहिराणीची घटना (व्याकरण), लोकसाहित्यसरितेच्या अमृतधारा भाग 1 ते 3, गिरिजा, लोकरामायण, लोकसाहित्य व भारताची एकात्मता ही त्यांची पुस्तके अहिराणीविषयक आहेत. त्यांनी अहिराणी ही गुजरातीची पोटभाषा नाही, असे मांडून ती मराठीची पोटभाषा असल्याचे सिद्ध केले आहे.
अहिराणी बोलीतील लोकसाहित्याची परंपरा फार समृद्ध आहे. जात्यावरची गाणी, सण-उत्सवाची गाणी, लग्नविधीसंबंधी गाणी, कुटुंबसंस्था, ग्रामसंस्था, धर्मश्रद्धा, लोकतत्त्वज्ञानात्मक गाणी, निसर्ग व शेतीसंबद्ध कष्टकर्‍यांची गाणी अशा विषयांवरील लोकगीतांचे प्रचलन आजही सुरू असल्याचे दिसते. काव्यात्मकता आणि लोकजीवनाविष्कार या दृष्टीने अहिराणी लोकगीतांची वाङ्मयीन क्षमता मोठी असल्याचे लक्षात येते. लोकजीवनातील सुख-दु:खे, संस्कृती-मूल्ये, कृषीतले कष्ट, नात्यांमधील घनिष्ठता यांना चाली-लयींमध्ये झंकारत ठेवणार ही बोली अस्मिता म्हणूनही मिरवली जाते. शिक्षणप्रसार, महानगर संपर्क, स्थलांतरे यामुळे इंग्लिशप्रमाणे मराठी-हिंदी या भाषांशी अहिराणीचे संबंध सौहार्दपूर्ण झालेले आहेत. शिक्षितांमध्ये स्व-बोलीच्या उपयोजनाबद्दल उणिवा वाटत असल्या, तरी अहिराणीचा वापर सातत्यपूर्ण आहे. नाशिकच्या ‘सिडको’ वगैरे भागात खानदेशी मंडळी-बागलाणी लोक (कसमादेचे मूळ निवासी) आपआपल्या लोकसमूहात-गटात-कुटुबांत अहिराणी बोलीचे आणि लोकसंस्कृतीचे अनुसरण करीत आहेत.
 
सटाणा-मालेगाव-कळवण तालुक्यातील लेखक-कवींनी अंशत: किंवा प्रसंगोपात अहिराणीचे वाङ्मयीन उपयोजन केलेले दिसते. कवी डॉ. सुधीर देवरे यांनी अहिराणीतून कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. भिला महाजन, नाना महाजन, राजेंद्र दिघे, कमलाकर देसले, शं.क. कापडणीस, अ‍ॅड. सोमदत्त मुंजवाडकर आदी कवींनीही अहिराणी बोलीतून काव्याविष्कार साध्य केले आहेत. काव्यात्मकता आणि भावाविष्कार या दृष्टीने एस.के. पाटील व शैलेश चव्हाण यांच्या अहिराणी कविता लोकप्रिय ठरल्या आहेत.
डॉ. बापूराव देसाई यांची ‘अख्खी हयाती’ ही कादंबरी अहिराणी बोलीतली आहे. शरद मुंजवाडकर-रामचंद्र मुंजवाडकर यांच्या कथा-कादंबर्‍यांमध्येही अंशत: अहिराणीचे उपयोजन झालेले दिसते. ‘सांगनं नही पण सांगनं वणं’ हे अहिराणीतील पहिलेच ललितगद्य डॉ. दिलीप धोडंगे यांनी लिहिले आहे. अगदी अलीकडे प्रकाशित झालेल्या राकेश वानखेडे यांच्या ‘गिनिपिग’ (2021) या कादंबरीतील पात्रसंवाद, निवेदन-कथन यामध्ये अहिराणीचे अस्सल ग्रामरूप अवतरले आहे.
 
Literature_3  H
देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविद्यालयच्या ‘बांधिलकी’ या वार्षिक नियतकालिकाने (अध्यक्ष प्राचार्य हितेंद्र आहेर) अहिराणीतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लिहिते ठेवले आहे. बोलीचे जतन होऊन उच्च दर्जाची वाङ्मयीन गुणवत्ता असलेले अहिराणीचे साहित्याविष्कार व्हावेत, असेच या नियतकालिकाचे 1978पासूनच धोरण असल्याचे दिसते. महाविद्यालयीन युवकांच्या अहिराणीतील आविष्कारांचा एक अंश पाहा -
 
‘लोक म्हणतंस दुसकाळ पडना, प्येवाले पाणी मिळणार नही. दुसकाळ पडी गया, ढोरसले चारा नही, बहू हाल राहती. या जगले, लोकसले, आसे हुई जाई कुठे जावानं, कोणता गावले जावानं काही तरी काम करीसन पोटभरनं पडयी खावाले जेवन मिळंयी पण, पानी मिळनार नही. कामधंदा पोटमजुरी करनी पडयी. लोकं म्हणतंस आवघड दुसकाळ पडेल शे, काही ठिकाणे प्येवाना पाण ना हाल शेतंस, झाडं भी बळी गयात, झाडंसले पाणी नही शे, जमीन मा वल नही शे, झाडं कसाले जगत दुसकाळ मा शासननं काही मदत देवाले पाहिजे.’ (दिनेश पंढरीनाथ जाधव, बांधिलकी, 2013.)
 
अहिराण बोलीचा गोडवा, अर्थसौंदर्य हे प्रत्यक्ष उच्चारण -श्रवण केल्यास जाणवते. या बोलीतून साहित्यनिर्मितीच्या क्षमताही वाढलेल्या दिसून येतात.
नाशिक परिसरातील बोलींचे साहित्यातील उपयोजन वाढवण्याची जबाबदारी वस्तुत: बोलीभाषकांचीच आहे. बोली जशा ज्ञानभाषा झाल्या पाहिजेत, तशाच त्या वाङ्मयीन आविष्कारांचे माध्यमही बनल्या पाहिजेत. मराठी वाङ्मयीन आविष्कारांना रसरशीत जिवंतपणा आणि अर्थसौंदर्यासाठी बोलींशी संवादी-समावेशकतेचे नाते असले पाहिजे.
 
Powered By Sangraha 9.0