मराठी विज्ञान साहित्य काल, आज आणि उद्या

विवेक मराठी    01-Dec-2021
Total Views |
@निरंजन घाटे 9049979308
 
 जगातील इतर भाषांतील विज्ञान साहित्याप्रमाणे मराठी विज्ञान साहित्यावरही त्या त्या काळातील वैज्ञानिक घटनांचा परिणाम होऊ लागला, ह्याची बरीच उदाहरणे आहेत. इ.स. 2000नंतरच्या काळातल्या विज्ञान साहित्यावर कॉमिक्स, ग्राफिक - म्हणजे चित्रित कांदबर्‍यांचा आणि हॉलीवूडच्या चित्रपटांचा प्रभाव पडलेला दिसतो. त्या मानाने 2000पूर्वीच्या काळातल्या कथा जास्त वास्तविक वाटतात.
 

Marathi  literature_1&nbs

‘मराठीतील विज्ञान साहित्याचा इतिहास’ या विषयावर बरेच लिहून आले आहे. सर्वसाधारणपणे हा इतिहास इ.स.2000पर्यंतचा लिहिला गेला आहे. त्याची थोडक्यात उजळणी करून मग 2000 ते 2020पर्यंतच्या लेखनाकडे वळतो. त्यानंतर विज्ञान साहित्यातले बदलते विषय आणि विज्ञान साहित्याची समीक्षा ह्याबद्दल थोडक्यात लिहितो.
त्याआधी विज्ञान साहित्याची - म्हणजे सायन्स फिक्शनची व्याख्या बघू या. मराठीमध्ये बरेचदा सायन्स फिक्शनसाठी विज्ञानकथा हा शब्द वापरला जातो. ह्यात विज्ञानकथा, कादंबर्‍या ह्या साहित्यप्रकारांचा समावेश असतो. विज्ञान साहित्य हा शब्द सर्वसमावेशक आहे. इ.स. 1983 साली मुंबई विद्यापीठात झालेल्या चर्चासत्रात हा शब्द वापरला होता. तोपर्यंत विज्ञान साहित्यनिर्मितीचे प्रमाण वाढले होते. जयंत नारळीकर लिहू लागल्यापासून विज्ञान साहित्याला साहित्य क्षेत्रात हळूहळू मान्यता मिळू लागली होती. त्यामुळेच ह्या चर्चासत्राचे आयोजन केले गेले होते. ‘साहित्य म्हणजे सर्जनशील निर्मिती, वाङ्मय म्हणजे सर्व प्रकारचे लेखन’ हे डॉ. व.दि. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. पु.शि. रेगे यांनी साहित्य मानवकेंद्रित असावे यावर भर दिला होता. त्या वेळी आजच्या विज्ञानाचे भविष्यकाळात केलेले प्रक्षेपण आणि भविष्यकाळातील मानवाच्या व्यक्तिगत जीवनावर आणि समाजव्यवस्थेवर त्या प्रक्षेपित वैज्ञानिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा होणारा परिणाम ह्याचे चित्रण करणारे साहित्य म्हणजे विज्ञान साहित्य, असे सुचवले गेले. पुढे 1985मध्ये झालेल्या विज्ञान लेखक मेळाव्यात हे सर्वसाधारणपणे मान्य केले गेले. वृत्तपत्रीय परीक्षणापलीकडे खर्‍या अर्थाने विज्ञान साहित्याची खर्‍या अर्थी समीक्षा कधी झालीच नाही. काही अपवाद आहेत, नाही असे नाही, पण ते अपवादच आहेत आणि ते दुर्लक्षितच राहिले.
 
वृत्तपत्रीय परीक्षणकर्त्यांनी नारळीकर यांची भूमिका गृहीत धरली. ‘यक्षाची देणगी’ या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी ‘विज्ञानकथेकडे मी विज्ञान शिकवण्यासाठी वापरायची शर्करावगुंठित गोळी म्हणून बघतो’ असे लिहिले आहे. त्यामुळे विज्ञानकथेच्या परीक्षणात ती कथा विज्ञान किती शिकवते, ह्यावरून ती कथा चांगली की वाईट हे ठरवले जाऊ लागले. खरे तर नारळीकरांचे पुढचे वाक्य ‘हे माझ्यापुरतं आहे’ ह्या अर्थाचे आहे. ते विसरले गेले, जिथे मला श्रीधर व्यकंटेश केतकरांची आठवण होते. ‘महाराष्ट्रीयांचे काव्य परीक्षा’ ह्या त्यांच्या पुस्तकात एके ठिकाणी ते म्हणतात - ‘संतकवींच्या बाबतीत एक गोष्ट म्हणता येईल, एकदा का देवभक्तिपर रचना केली की ती कशीही असली तरी तिला वाईट म्हणायचे नाही, असा एक चुकीचा पायंडा. त्यामुळे सुमार काव्यालाही चांगले म्हटले जाऊ लागले.’ विज्ञान साहित्याच्या बाबतीतही असेच काहीसे घडले, असे म्हणावे लागते. कुठल्याही लेखकाच्या लेखनाचे वस्तुनिष्ठ असे समीक्षण झाले नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागते. त्याची मला संभाव्य वाटणारी कारणे पुढे येतीलच.
मराठीतील सुरुवातीच्या विज्ञान साहित्यात ‘केरळ कोकीळ’चे मोठे योगदान आहे. अनुवादित स्वरूपात का होईना, पण केरळ कोकीळमध्ये सर्वप्रथम विज्ञान साहित्य लिहिले गेले. केरळ कोकीळचे संपादक मराठी भाषा चित्रमयूर कृ.ना. आठल्ये यांनी ज्यूल्स व्हर्नच्या कादंबर्‍यांचे अनुवाद केले होते. चंद्रलोकची सफर, काकाजींची पाताळयात्रा ह्या दोन कादंबर्‍या केरळ कोकीळमध्ये प्रकाशित झाल्या, पण त्या पुस्तकरूपात मात्र आल्या नाहीत. हॅलेचा धूमकेतू येऊन गेल्यानंतर श्री.बा. रानडे यांनी ‘तारेचे हास्य’ ही कथा लिहिली. तेव्हापासून विज्ञान साहित्य लेखक वैज्ञानिक घटना किंवा एखादे तंत्रज्ञानविषयक संशोधन प्रसिद्ध होताच त्या घटनेचे किंवा संशोधनाचे भविष्यकालीन परिणाम काय होऊ शकतील, ह्यावर आधारित त्यांच्या कल्पना रंगवू लागले.


Marathi  literature_6&nbs

1942-43पर्यंत मराठीत तुरळक प्रमाणात विज्ञान साहित्य प्रकाशित होत होते. दोन युटोपियन (utopian) कादंबर्‍याही प्रसिद्ध झाल्या. वि.वा. शिरवाडकर ह्यांची ‘कल्पनेच्या तीरावर’ आणि ना.के. बेहेरे यांची ‘ध्येयाकडे’ ह्या त्या दोन कादंबर्‍या. ‘आदर्श समाजरचना’ ही कल्पना ह्या दोन्हीत वापरलेली आहे. ह्यानंतरच्या काळात, म्हणजे दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरच्या काळात मराठीत बर्‍याच लेखकांनी विज्ञान साहित्याकडे लक्ष वळवले. भा.रा. भागवत, द.पां. खांबेटे, द.चिं. सोमण, नारायण धारप, गजानन क्षीरसागर, ग.रा. टिकेकर असे अनेक लेखक ह्या काळात विज्ञान साहित्य लिहू लागले. ह्या सगळ्यांनीच इंग्लिश अमेरिकन विज्ञान साहित्य - विशेषत: कथा मराठीत आणल्या. परंतु त्यांनी सरसकट फक्त अनुवादच केले, हे म्हणणे योग्य होणार नाही. ‘उडती छबकडी’ ह्या त्यांच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत भा.रा. भागवतांनी ‘मला अमेरिकन नियतकालिके मुंबईच्या फुटपाथांवर स्वस्तात मिळत. त्यातल्या विज्ञानकथांच्या मध्यवर्ती कल्पना वापरून मी माझ्या कथांचा डोलारा त्यावर उभारत असे’ असे स्पष्ट केले आहे. एकच मध्यवर्ती कल्पना वापरून लिहिलेल्या अनेक इंग्लिश अमेरिकन कथा आहेत, तसेच हे. तसे बघायला गेले, तर नारळीकरांबद्दल लिहिलेल्या ‘सोबत’मधील एका लेखात अ.पां. देशपांडे यांनी, ‘प्रेषित ह्या कांदबरीची कल्पना आपल्याला ‘सुपरमॅन’ हा चित्रपट पाहून सुचल्याचे सांगितले’ असे लिहिले होते, म्हणजे एक मध्यवर्ती कल्पना वापरून वेगवेगळे लेखक आपापल्या कल्पना वापरून त्यांची साहित्यनिर्मिती करू शकतात, हेच दिसून येते.

भा.रा. भागवतांचे ‘उडती छबकडी’, द.पां. खांबेटे यांचे ‘माझं नाव रमाकांत वालावलकर’ हे मराठी साहित्यातले मैलाचे दगड आहेत. त्याशिवाय नारायण धारपांचे ‘अबक’ आणि इतर कथासंग्रहही महत्त्वाचे मानावे लागतात. फक्त त्यांच्याकड दुर्लक्ष झाले, याचे कारण त्या काळात विज्ञान साहित्य हे बिनदर्जाचे मानले जात होते. साहित्याच्या मुख्य प्रवाहात त्याला स्थान नव्हते. अलीकडच्या काळात विज्ञान साहित्यावर संशोधन करणार्‍या प्राध्यापकांनी अनुवादक म्हणून भा.रा. भागवतांची संभावना केली आहे. मला वाटते त्यांचे विज्ञान साहित्याचे मर्यादित वाचन हे याचे कारण असावे.




Marathi  literature_2&nbs
जगातील इतर भाषांतील विज्ञान साहित्याप्रमाणे मराठी विज्ञान साहित्यावरही त्या त्या काळातील वैज्ञानिक घटनांचा परिणाम होऊ लागला, ह्याची बरीच उदाहरणे आहेत. त्या घटनांचा मागोवा घेतला तर काय दिसते? दुसरे महायुद्ध संपताना अणुबाँब वापरले गेले. त्यानंतर लगेच तिसर्‍या महायुद्धात अण्वस्त्रांमुळे जग नष्ट झाले अशा प्रकारच्या कथांची संख्या वाढली. 1957मध्ये स्पुटनिक अवकाशात भ्रमण करू लागल्यानंतर अवकाश प्रवासाच्या घटना विज्ञान साहित्यात वाढल्या. माणूस 1969मध्ये चंद्रावर उतरला, त्यानंतर परग्रहावरील वसाहतींच्या कथा वाढल्या. त्या आधी होत्या, नव्हत्या असे नाही, पण त्यांची संख्या वाढली. त्या काळात नवल आणि वाङ्मयशोभा या मासिकांतून विज्ञानकथा छापल्या जात असत. त्यांचे अंक चाळले की हे स्पष्ट होते.
 
1978मध्ये ल्युसी ह्या नलिका बालिकेचा जन्म झाला. अशा तर्‍हेची ही पहिलीच घटना खूप गाजली होती. त्यानंतर ह्या घटनेचा आधार घेऊन कृत्रिम गर्भधारणेच्या कथा लिहिल्या गेल्या. त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी पहिल्या फुटवा (क्लोन) पद्धतीने गर्भधारणा झालेल्या डॉली ह्या मेंढीचा जन्म झाला. त्या घटनेवर आधारित कथा लिहिल्या गेल्या. 1970नंतर तंत्रज्ञानाचीही घोडदौड सुरू झाली. विशेषत: ट्रान्झिस्टरची जागा मायक्रोचिपने घेतली, ही तंत्रज्ञानातील एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली. हिला संपर्क तंत्रज्ञानातील एक महत्त्वाची घटना म्हटले जाते. यामुळे विद्युतमंडळांचे सूक्ष्मीकरण अगदी वेगळ्या पातळीवर गेले. यातून कृत्रिम बुद्धिमत्तेची कल्पना उदयास आली. त्यामुळे विज्ञान साहित्यिकांना कल्पनेचा फुलोरा फुलवण्यासाठी आणखी एक विषय मिळाला. यंत्रमानव ही कल्पना अगदी दुसर्‍या महायुद्धकाळापासून पाश्चात्त्य विज्ञानकथांतून राबवली जात होती. मराठीत ती थोडी उशिरानेच आली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात भा.रा. भागवत आणि नारायण धारप यांनी ही कल्पना वापरून मराठीत यंत्रमानवांना प्रवेश मिळवून दिला. आयझॅक अ‍ॅसिमॉव ह्यांच्या कथांतून प्रेरणा घेऊन मीही यंत्रमानवांना भारतीय संस्कृतीत बसवले. नंतरच्या काळातही अनेक लेखकांनी यंत्रमानव ही कल्पना त्यांच्या साहित्यात वापरली.


Marathi  literature_5&nbs

1995च्या सुमारास विज्ञानात प्रगतीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची घटना घडली. या वर्षी जिनोम प्रकल्प जाहीर झाला. ह्या प्रकल्पामुळे पुढे विज्ञानजगतात नैतिकतेच्या प्रश्नावरून खळबळ माजणार आहे, याची त्या वेळी कुणालाही कल्पना आली नव्हती. मानवी गुणसूत्रांवर असलेल्या जनुकांचा आराखडा तयार करायचा - म्हणजे गुणसुत्रांवरील कुठली जनुके कुठल्या गुणधर्मासाठी जबाबदार ठरतात, हे शोधून काढण्यासाठीच्या ह्या प्रकल्पात जगभरचे शास्त्रज्ञ सामील झाले होते. आनुवंशिक व्याधींवर उपचार करता येतील ह्या आशेने प्रकल्पाची निर्मिती झाली होती. त्या कल्पनेवर मराठीत आधी तुरळक प्रमाणात कथा लिहिल्या गेल्या होत्या. ह्या प्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट होताच मराठी विज्ञान साहित्यात ही कल्पना जोराने पुढे आली. विज्ञान साहित्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते ज्या कल्पना नव्याने पुढे येतात, त्यांचा कशा तर्‍हेने दुरुपयोग होऊ शकतो, हा धोका सर्वात आधी विज्ञान साहित्यातून बघायला मिळतो. पाश्चात्त्य देशात लोकप्रतिनिधी अशा विषयांवरचे विज्ञान साहित्य आवर्जून वाचतात. भारतातले लोकप्रतिनिधी पौराणिक वाङ्मय सोडून इतर काही वाचतात का, अशी शंका घ्यायला वाव आहे. हे लिहायचे कारण जिनोम प्रकल्प वर्षभर आधीच पूर्ण झाला. त्यानंतर लगेचच, म्हणजे 2002मध्ये ह्या प्रश्नाचा ऊहापोह करण्यासाठी एडवर्ड केनेडी समितीची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अमेरिकेत जनुकात ढवळाढवळ करण्यास बंदी करणारा कायदा करण्यात आला.


Marathi  literature_3&nbs
 
ह्याच जैवतंत्रज्ञानिक क्रांतीबरोबरच तंत्रज्ञानविषयक आणखी एक क्रांती घडली. इ.स. 2000नंतरच्या काळात नॅनो तंत्रज्ञानाच्या उदयास आणि विकासास सुरुवात झाली. त्याच्याही प्रगतीचा प्रभाव विज्ञान साहित्यावर पडणे अपरिहार्य होते. 1990नंतरच्या काळात मराठीत बरेच नवनवे लेखक-लेखिका उदयास आले. ह्यातले बरेच जण विज्ञान-तंत्रज्ञानात उच्च शिक्षण घेतलेले होते. काही लेखक सामान्य होते. (लेखक ह्या शब्दात लेखिकांचाही समावेश आहेच.) ते साहजिकच आहे; पण बरेच लेखक त्यांच्या साहित्यामध्ये खूपच नवनव्या कल्पना वापरत होते. जीवतंत्रज्ञान, नॅनो तंत्रज्ञान यांचा वापर करू लागले. अवकाश प्रवासाची सुट्टी झाली असा मात्र ह्याचा अर्थ नाही.
इ.स. 2000नंतरच्या काळातल्या विज्ञान साहित्यावर कॉमिक्स, ग्राफिक - म्हणजे चित्रित कादंबर्‍यांचा आणि हॉलीवूडच्या चित्रपटांचा प्रभाव पडलेला दिसतो. त्या मानाने 2000पूर्वीच्या काळातल्या कथा जास्त वास्तविक वाटतात. उदा., मूळपेशींचा वापर ही संकल्पना इ.स. 2000पूर्वी खूप चांगल्या प्रकारे वापरली गेली आहे. समांतर विश्व ही अशीच आणखी एक कल्पना. पण ह्या कल्पना अलीकडे फारशा वापरल्या जाताना दिसत नाहीत. वापरल्या गेल्याच, तर पुराणकथात जसे चमत्कार घडत तशा पद्धतीने त्यांचा वापर केला जातो.

 
आतापर्यंतच्या विवेचनात मी नारळीकरांनंतरच्या कुठल्याही लेखकाचे किंवा कथेचे नाव घेतलेले नाही. हे सहेतुक आहे, कारण मराठी वाङ्मयेतिहास - खंड 7, तसेच मी संपादित केलेल्या काही पुस्तकांच्या प्रस्तावना आणि काही गौरव ग्रंथ यांमधून मी ह्यासंबंधी विस्तृत विवेचन केलेले आहे. मराठीतील इ.स. 2010नंतरच्या काळात माझ्या शारीरिक मर्यादा आणि दिवाळी अंक विक्रेत्यांची घटती संख्या यामुळे पूर्वी जेवढे अंक चाळता येत तेवढे मी चाळू शकलो नाही. त्यामुळे काही उगवत्या लेखक मंडळींवर अन्याय होऊ शकतो. त्यामुळेही मी कथांची आणि लेखकांची नावे उद्धृत करणे टाळले आहे.
 
 
Marathi  literature_4&nbs

मराठी वाङ्मयेतिहास खंड - 7, महाराष्ट्र साहित्य परिषद ह्यासाठी लेखन करीत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली होती. मराठीत तरी आतापर्यंत कुणीही ‘विज्ञान-तंत्रज्ञान प्रगती आणि विकास’ ह्यांचा साहित्यावर - विशेषत: विज्ञान साहित्यावर होणारा परिणाम यावर लेखन केलेले नाही, ती उणीव ह्या लेखाद्वारे भरून काढायचा हा एक प्रयत्न आहे. ह्यात सुधारणेला वाव आहे, ह्याची मला कल्पना आहे.
दुसराही एक मुद्दा मला इथे चर्चेस घ्यायचाय, तो मांडणे मला अतिशय आवश्यक वाटते. ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’ याचा मी सुरुवातीस उल्लेख केला, त्याचा इथे संबंध आहे. मराठीत विज्ञान साहित्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण झाले नाही, असे मी सुरुवातीला का म्हटले, हे त्यावरून स्पष्ट होईल. मराठीतील विज्ञान साहित्याचे गंभीरपणे परीक्षणच झालेले नाही. जे केले, ते वृत्तपत्रीय परीक्षण होते. समीक्षण नव्हते. ह्या परीक्षणकर्त्यांचे दोन प्रकार असतात. विज्ञान विषयाशी संबंध नसलेले प्राध्यापक आणि विज्ञानाचे प्राध्यापक. अगदी क्वचित विज्ञान साहित्याचा एखादा अभ्यासक विज्ञान साहित्याचे खर्‍या अर्थाने समीक्षण करतो. सर्वसाधारणपणे विज्ञान विषयाशी संबंध नसलेला परीक्षणकर्ता त्या साहित्यातल्या विज्ञानाची चर्चा करीत नाही. चार वैज्ञानिक शब्द दिसले की त्याला तो विज्ञान साहित्य म्हणून मोकळा होतो. ज्या कथेतील विज्ञान काढून टाकले की ती विज्ञानकथा उरत नाही, अशी विज्ञान साहित्याची सुटसुटीत व्याख्या आहे, ती का कोण जाणे विसरली जाते.
विज्ञान प्राध्यापकांच्या पुस्तक परीक्षणात दुसरे टोक दिसते. ह्या परीक्षणकर्त्यांत दोन प्रकार असतात, आपल्याला साहित्यिक समजणारे आणि साहित्यिकांना कारण नसताना जास्त प्रसिद्धी मिळते म्हणून त्यांच्याबद्दल असूया बाळगणारे. ह्याला जे अपवाद आहेत, ते अर्थातच साहित्यक्षेत्रात मानाचे स्थान पटकावतात. मराठीत बरेच डॉक्टर, इंजीनियर आणि विज्ञान क्षेत्रातल्या व्यक्ती साहित्य आणि कला क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. ह्या अपवादांना वृत्तपत्र परीक्षणात रस नसतो. उरलेले विज्ञान साहित्याचे वस्तुनिष्ठ परीक्षण करत नाहीत.
आणखी एक मुद्दा मराठी विज्ञान साहित्याच्या बाबतीत कधी चर्चेला घेतला गेलेला नाही, तो म्हणजे विज्ञान साहित्यातील गफलतींचा. त्या अनवधानाने झालेल्या असू शकतात किंवा नव्याने सुचलेल्या कल्पनेच्या आकर्षणात अडकून त्यांचा साधकबाधक विचार न करता वापरलेल्या असतात. या कल्पना वापरताना काही मूलभूत गोष्टींचा विचार केलेला नाही, हे जाणवते. माणूस कर्बग्रहणासाठी प्रकाशसंश्लेषणाचा वापर करू शकेल, यासाठी वनस्पतींच्या डीएनएचे मानवी डीएनएवर आरोपण करायचे (फोटोसिन्थेसिसच्या साहाय्याने अन्ननिर्मिती.) याची पुढची पायरी म्हणजे स्नायू सेल्युलोजचे बनवणे. अशा कथा लिहिणार्‍या प्राध्यापकांना जीवशास्त्रीय उत्क्रांतीची प्राथमिक माहिती नाही, हे स्पष्ट होते. सुमारे 55 ते 50 कोटी वर्षांपूवी सागरात वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी अशी सजिवांच्या विभाजनास सुरुवात झाली. त्या वेळी त्यांच्या जननिक संरचनेत आमूलाग्र बदल झाले. प्रकाशसंश्लेषणाच्या साहाय्याने अन्ननिर्मितीसाठी आवश्यक जनुके काही सजिवांत निर्माण झाली. इतर काही सजिवांनी हे आयते अन्न मिळवण्यासाठी आपल्या जनुकीय संरचनेतील बदलांना आपलेसे केले. ह्या जनुकीय संरचना दोन टोकांच्या आहेत. त्यामुळे वनस्पतींची जनुके प्राण्यांमध्ये टोचली, तर त्या प्राण्याला अपाय होण्याची शक्यताच जास्त आहे. मात्र त्याला वनस्पतींचे गुणधर्म प्राप्त करून देणे म्हणजे त्याचे मूलभूत स्वरूप बदलणे. यामुळे अशा कल्पना वापरून लिहिलेल्या कथांना विज्ञान साहित्य म्हणणे योग्य होणार नाही.
अशीच एक संकल्पना वेळोवेळी वापरली गेली आहे, ती म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी उजवा माणूस डावा बनणे. त्यासाठी समांतर विश्व, पीळ बसलेली पट्टी आदी संकल्पनांचा वापर काही लेखकांनी केला आहे. माणसाची दर्पण प्रतिमा होणे ही कल्पना म्हणून ठीक आहे; पण माणूस असा बदलला तर त्याची जननिक संरचनाही बदलेल. आपल्या सृष्टीतील सर्व सजीव हे वामावर्ती आहेत - म्हणजे आपल्या शरीरास आवश्यक अशा सर्व रसायनांची संरचना डावीकडून वळण घेणार्‍या घटकांची असते. आपली गुणसूत्रे, आपले डीएनए रेणू हेसुद्धा असेच डावीकडून उजवीकडे वळणार्‍या वळ्यांचे - स्पायरल - बनलेले असतात. त्यामुळेच जेव्हा एखाद्या व्यक्तीचे रूपांतर दक्षिणावर्ती (म्हणजे ज्याचे जननिक घटक उजवीकडून डावीकडे वळणार्‍या वळ्यांचे) होतील, तेव्हा पृथ्वीवरील अन्न त्याच्या शरीरात जाईल, पण त्याचा त्या व्यक्तीला काहीच उपयोग होणार नाही. तो तहान-भुकेने प्राण गमावून बसेल. अशीच आणखी एक गफलत म्हणजे चपळ प्राण्याच्या मेंदूतील रसायने टोचून, फारसे कधी न धावणार्‍या एखाद्या व्यक्तीला वेगाने पळवणे किंवा सामान्य व्यक्तीला खूप ताकदवान बनवणे. मैदानी खेळांच्या स्पर्धा बघितल्या तर एक गोष्ट लक्षात येईल, वेगाने धावणे आणि शक्ती वापरणे ह्यासाठी सरावाने संबंधित स्नायू तयार करणे (मसल टोनिंग) आवश्यक असते. मेंदूचे काम जिंकण्याची जिद्द निर्माण करण्यापुरते मर्यादित असते. तेव्हा एक इंजेक्शन टोचून माणूस एकदम धावणे किंवा अफाट ताकदवान बनणे शक्य होणार नाही.
 
 
काही लेखकांकडून आणखीही एक गफलत घडते. विज्ञान साहित्य म्हणजे विज्ञान शिकण्याचा सोपा मार्ग असे मानणारे लेखक आहेत, तसेच प्राचीन भारतात खूप वैज्ञानिक प्रगती झाल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, असे ठामपणे म्हणणारे लेखक ‘वीस हजार वर्षांपूर्वी प्राचीन भारतात प्रगत संस्कृती नांदत होती’ असे म्हणतात, तेव्हा काय समजायचे? काही लेखक पुरातत्त्वाबद्दल बोलताना, पाषाणयुगानंतर लोहयुग आल्याचा उल्लेख करतात. खरे तर हा क्रम पाषाणयुग, ताम्रपाषाणयुग, ताम्रयुग, नंतर लोहयुग असा आहे.
त्या मानाने इ.स. 1995नंतर जे लेखक हळूहळू पुढे आले, त्यांचे कौतुक करायला हवे. त्यांना त्यांच्या लेखनातील अशा विसंगती दाखवल्या, तर ते त्या सूचनांचे स्वागतच करतात. त्यातल्या काही लेखकांनी मिळून ‘साय-फाय कट्टा’ नावाचे विज्ञान साहित्यिकांचे एक मंडळ स्थान केले असून तिथे वेगवेगळे उपक्रम चालवले जातात. त्यात सदस्यांच्या साहित्याबद्दल खुल्या दिलाने चर्चा होते, झालेली टीका स्वीकारून साहित्यात सुधारणा केली जाते, ही अतिशय आशादायक घटना आहे.