छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणारे स्वराज्ययोद्धे किंवा मावळे हे आपल्या मातीतील सुपरहिरो आपल्या मुलांच्या खेळविश्वात का दिसत नाहीत? हा प्रश्न काही मूठभर पालकांनाच पडत असेल. पुण्यातील दोन पालकांना तो पडला आणि त्यातून जन्म झाला ‘मावळा - द बोर्ड गेम’चा.
मुलांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीत महत्त्वाच्या ठरणार्या मैदानी आणि बैठ्या खेळांची जागा गेल्या काही वर्षांत नकळतपणे मोबाइल गेम्स, व्हिडिओ गेम्स, कार्टून चॅनल्स यांनी व्यापली आहे. आयर्न मॅन, थॉर, स्पायडरमॅन, हल्क, थानोस यांसारखे पाश्चात्त्य काल्पनिक सुपरहिरोज किंवा शिनचॅन, डोरेमॉन यासारखी कार्टून कॅरेक्टर्स त्यांच्या खेळजगतातले साथीदार बनले आहेत. यात भारतीय सुपरहिरोंची मात्र वानवाच दिसते.. की आपणच त्यांची ओळख त्यांना करून द्यायला कमी पडतो? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सुपरहिरो - ज्याला संपूर्ण जगात शूर, आदर्श राजा म्हणून ओळखले जाते, त्यांचे तितकेच शूर आणि स्वराज्यासाठी आपले तन-मन-धन अर्पण करणारे स्वराज्ययोद्धे किंवा मावळे हे काही सुपरहिरोंपेक्षा कमी नाहीत. शौर्यभावना जागवणार्या या खास आपल्या मातीतील सुपरहिरोजची ओळख मुलांना केवळ इतिहासाच्या पुस्तकातून अतिशय औपचारिकरित्या करून दिली जाते. नाही म्हणायला अशा व्यक्तिमत्त्वांवर काही चित्रपट येतात, ज्यात सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीच्या अनेक गोष्टी दाखवल्या जातात. (याला काही मोजके अपवादही आहेत.) या व्यक्तिमत्त्वांवर जे काही अॅनिमेटेड चित्रपट उपलब्ध आहेत, त्यांचाही दर्जा सुमारच आहे. हे सुपरहिरो आपल्या मुलांच्या खेळविश्वात का दिसत नाहीत? हा प्रश्न काही मूठभर पालकांनाच पडत असेल. पुण्यातील दोन पालकांना तो पडला आणि त्यातून जन्म झाला ‘मावळा - द बोर्ड गेम’चा.
‘मावळा - द बोर्ड गेम’ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मोहिमांवर तयार केलेला खेळ आहे. साधारणत: नवा व्यापार या खेळाची आठवण करून देणारा हा खेळ आहे. शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती असलेल्या अतिशय आकर्षक पॅकिंगमध्ये हा खेळ उपलब्ध होतो. खेळपट अर्थात बोर्ड, त्यावरच्या ट्रेमध्ये चार रंगांतील मावळ्यांचे टोकन (4 पायदळातील व 4 घोडदळातील, असे एकूण 8), दोन प्रकारचे फासे, 20 मावळा कार्ड्स, दहा दुर्ग कार्ड्स, शिवकालीन चलन होन (100, 500 आणि 1000 मूल्यांचे) हे या खेळातील घटक आहेत. प्रत्येक खेळाडू स्वराज्यमोहिमेतील मावळा बनून खेळतो. शिवजन्मापासून सुरू होणारा हा खेळ शिवराज्याभिषेकाच्या प्रसंगाने संपतो. या संपूर्ण प्रवासादरम्यानच्या स्वराज्यमोहिमा आणि महत्त्वाचे प्रसंग बोर्डवरील घरांमध्ये नमूद करण्यात आले आहेत. यात चांगल्या प्रसंगांबरोबरच वाईट प्रसंगांचाही समावेश आहे. प्रसंगानुरूप त्या घरावर येणार्या खेळाडूचा फायदा अथवा नुकसान होते. खेळादरम्यान मिळणारी मावळा कार्ड आणि दुर्ग कार्ड ही खेळणार्याला संपन्न बनवतात. शेवटच्या - म्हणजेच शिवराज्याभिषेकाच्या घरात पोहोचल्यानंतर प्रत्येक मावळा आपली संपत्ती स्वराज्यासाठी अर्पण करतो. जिंकणार्यासाठी ‘मावळा’चा बॅच हे खास आकर्षण असते. सर्वसाधारणपणे ही या खेळाची रूपरेषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यमोहिमांमध्ये आपण सहभागी आहोत ही कल्पनाच मुलांना भन्नाट वाटते. त्यामुळेच या खेळातून मनोरंजनाबरोबरच स्वराज्याचा इतिहास मुलांपर्यंत पोहोचवण्याचा दुहेरी उद्देश साध्य झाला आहे. मुख्य म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषांत हा खेळ उपलब्ध आहे.
जितका हा खेळ रंजक आहे, तितकीच या खेळाची जन्मकथाही रंजक आहे. वर म्हटल्याप्रमाणे दोन पालकांनी आणि तेही दोन पित्यांनी या खेळाच्या संकल्पनेला जन्म दिला. शंतनू कुलकर्णी व अनिरुद्ध राजदेरकर हे ते दोन पालक. दोघांमध्ये व्यावसायिक मैत्री. खेळ बनवणे किंवा ऐतिहासिक अभ्यास किंवा दुर्गभ्रमंती या सगळ्यांशी दोघांचाही तसा काहीच संबंध नव्हता. दोघेही हार्डकोअर औद्योगिक क्षेत्रात काम करणारे. शंतनू कुलकर्णी यांची अॅनिमेशन फर्म औद्योगिक क्षेत्रातील उत्पादन क्षेत्रासाठी काम करते, तर अनिरुद्ध गोदरेजच्या उत्पादन विभागाचे चॅनल पार्टनर आहेत. लॉकडाउनमध्ये जेव्हा सगळ्या कामांची गती मंदावली, तेव्हा मुलांसाठी भरपूर वेळ देता येऊ लागला. त्या वेळी मुलांचे खेळविश्व या पालकांना जवळून पाहता आले. त्याचबरोबर मुलांची आकलनशक्ती, बौद्धिक क्षमता, त्यांच्या भावविश्वातील त्यांच्या सुपरहिरोंचे स्थान, गॅझेट हाताळण्याची सहजता या सर्व गोष्टी त्यांच्या लक्षात यायला लागल्या. परंतु, आपला इतिहास, आपली संस्कृती या लहान मुलांना समजावी यासाठी खेळ म्हणून आपण त्यांना काहीच देऊ शकत नाही, याची या पालकांना खंत वाटू लागली.
खेळता खेळता मुलांना आपला इतिहास समजावण्याची कल्पना अनिरुद्ध राजदेरकर यांनी एकदा शंतनूसमोर मांडली. तीन-एक तास गहन चर्चा झाल्यानंतर हळूहळू या संकल्पनेचा आकार स्पष्ट होऊ लागला. शंतनूची अॅनिमेशनची टीम आणि अनिरुद्धची संकल्पना अशी कामाला सुरुवात झाली. शंतनू यांनी त्यांच्या वर्क फ्रॉम होमवर असलेल्या टीमला या खेळासाठीचे क्रिएटिव्ह व्हिज्युअल्स बनवायला दिले. वर्ष-दीड वर्ष सखोल काम करून आज उपलब्ध असलेला ‘मावळा - द बोर्ड गेम’ तयार झाला. अनेक इतिहासतज्ज्ञ, जाणकार यांना हा गेम दाखवून त्यांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या.
लॉकडाउनमध्ये प्रायोगिक स्वरूपात उदयाला आलेल्या या खेळाची व्यावसायिक स्वरूपात निर्मिती करण्याच्या अनुभवाबद्दल शंतनू सांगतात, “आज भारताची टॉय इंडस्ट्री 1.85 अब्ज डॉलर्सची आहे, त्यांपैकी 90 टक्के आपण चीनकडून आयात करतो. आज आपण खेळांच्या दुकानात गेलो, तर आपल्याला एखाददुसरे उदाहरण सोडले, तर बहुतेक सर्व खेळ पाश्चिमात्य विचारसरणीवर आधारलेले असल्याचे दिसून येते. भारत सरकारने भारतीय खेळांच्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘टॉयकॅथॉन’ म्हणून स्पर्धा घेतली होती. आम्ही त्यात सहभागी झालो. ‘इंडियन कल्चर अँड इथॉस’ या प्रकारात आम्हाला बक्षीस मिळाले. या स्पर्धेसाठी 19 हजार प्रवेश आले होते. आयआयटीचे लोक या स्पर्धेचे परीक्षक होते. 4 दिवस सतत ते या स्पर्धेसाठी परीक्षण करत होते. या स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर आमचे धारिष्ट्य वाढले. आता या खेळाचे मास मॅन्युफॅक्चरिंग करण्यास हरकत नाही, असा विश्वास वाटू लागला. स्वत:च्या मुलांना आपला इतिहास शिकवावा या विचारातून जन्मलेल्या या संकल्पनेला विस्तृत स्वरूपात आकार मिळाला. या खेळासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रिंटिंगच्या कामासाठी व्ही.जी.ए. डिजिटल प्रिंटर्सचे मांडके सर यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. ते या व्यवसायात पार्टनर म्हणून सहभागी झाले.”
‘मिती इन्फोटेनमेंट एलएलपी’च्या माध्यमातून या खेळाच्या व्यावसायिक स्वरूपातील उत्पादन आणि विक्रीला सुरुवात झाली. शंतनू कुलकर्णी, अनिरुद्ध राजदेरकर आणि व्यंकटेश मांडके यात भागीदार म्हणून आपापल्या भूमिका पार पाडत आहेत. या खेळाची माहिती देण्यासाठी समाजमाध्यमांचा कल्पक आणि सातत्यपूर्ण वापर हे या टीमचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
या खेळात महाराजांचे मावळे आणि त्यांनी मिळवलेले दुर्ग हे महत्त्वाचे घटक आहेत. स्वराज्यमोहिमेत सहभागी झालेले कितीसे मावळे आपल्याला माहीत असतात? बाजीप्रभू, तान्हाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते, कान्होजी आंग्रे आदी अगदी मोजकीच नावे सोडली, तर आपणही त्याबाबत अनभिज्ञच असतो. पण या मावळा कार्डमध्ये एकूण 20 मावळ्यांचा समावेश आहे आणि त्या प्रत्येक मावळ्याला त्याचे व्यक्तिमत्त्व स्पष्ट करणारे चित्ररूप दिलेले आहे.
प्रत्यक्ष महाराज असोत किंवा त्यांचे सर्वज्ञात असलेले मावळे यांची रूपे आतापर्यंत केवळ ऐकीव माहितींवरून साकारलेली आहेत. मग फारसे माहीत नसलेल्या इतर किंवा अगदीच अज्ञात असलेल्या मावळ्यांच्या रूपांची काय बात? पण हा खेळ तयार करणार्यांनी सखोल अभ्यास करून अनुभवी चित्रकारांच्या मदतीने प्रत्येक मावळ्याचे वैशिष्ट्यपूर्ण रूप तयार केले आहे. प्रत्येक कार्डवर त्या त्या मावळ्याचा दर्जा, त्याची कामगिरी यांविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे. खेळणार्यांवर याचा एक वेगळा प्रभाव पडतो. शिवाय होन, दुर्ग, फासे असे वेगळे ऐतिहासिक शब्द मुलांच्या शब्दसंग्रहात भर घालतात. या संचात तीन पुस्तिका आहेत. त्यांपैकी एक या खेळाची नियमावली आहे. अन्य दोन पुस्तिका ही सर्व मावळ्यांच्या कामगिरीची व स्वराज्य मोहिमांची थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती देणारी आहेत.
आज हा खेळ अनेक घरांमध्ये पोहोचला आहे. केवळ मुलांनी आपापसातच नव्हे, तर पालकांनीही मुलांसह हा खेळ खेळावा असा या खेळाची निर्मिती करणारे आग्रह करतात. त्यातून अनेक गोष्टी साधतात. छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा इतिहास अगदी सोप्या रंजक माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचतो. मुलांना महाराजांचा इतिहास समजताना पालकांचाही नव्याने सराव होतो. इतिहासाच्या पुस्तकातील किंवा आतापर्यंत अभ्यासलेल्या इतिहासातील विस्मरणात गेलेल्या अनेक गोष्टींचे स्मरण होते. पालक आणि मुलांमध्ये संवाद, चर्चा होते, ज्यामुळे त्यांच्यातील नाते अधिक घट्ट होते. हे उद्देश सफल होत असल्याचे या खेळाविषयीच्या पालकांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येते. ‘अफझलखानाचा वध केल्याशिवाय आम्ही झोपतच नाही’ अशा प्रकारची प्रतिक्रिया एखादी आई मुलाच्या वतीने देते. किंवा तिसरी-चौथीतील एखादी मुलगी आपल्या अभ्यासातील शिवप्रसंगाबाबत तिला या खेळामुळे नव्याने झालेली माहिती संपूर्ण वर्गासमोर रंगवून सांगते आणि पालक आवर्जून फोन करून हे सर्व कौतुकाने सांगतात.
आपल्या पुढच्या पिढीवर शिवचरित्राचे संस्कार झाले पाहिजेत, असे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणायचे. ते हयात असेपर्यंत त्यांनी याच कार्यासाठी आपले तन-मन अर्पण केले. आज त्यांचा हा विचार पुढे न्यायचा असेल, तर ‘मावळा’सारख्या माध्यमांची आज गरज आहे.
मावळ्यांप्रमाणेच आपल्यात शौर्यभावना जागवणारे आपले दुसरे सुपरहिरो म्हणजे सीमेवर देशाच्या सीमेसाठी लढणारे बहादूर सैनिक. त्यांच्या शौर्यगाथा कितीही प्रेरणादायक असल्या, तरी त्यांपैकी फार कमी आपल्यापर्यंत पोहोचतात. असीम फाउंडेशन या काश्मीरमधील सीमा भागांतील प्रश्नांसाठी काम करणार्या संस्थेने या सैनिकांची माहिती असलेली शौर्य कार्ड्स तयार केली आहेत. ट्रम्प कार्ड स्वरूपातील या शौर्य कार्ड्सवर देशासाठी बलिदान देणार्या किंवा विशेष कामगिरी करणार्या शूर सैनिकांचे फोटो, माहिती दिली आहे. त्यांनी केलेली कामगिरी वाचून आजच्या या लहानग्यांपैकी कोणाला भविष्यात सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली, तर हे या खेळाचे मोठे यश ठरेल. मुलांना सकारात्मक गोष्टीत गुंतवून ठेवणे हे आजच्या सजग पालकांसमोरचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी ‘मावळा’ किंवा ‘शौर्य कार्ड्स’सारखे खेळ योग्य पर्याय ठरू शकतील.