वनवासी कल्याण आश्रमाचे आधारवड मा. बाळासाहेब देशपांडे

विवेक मराठी    18-Dec-2021
Total Views |
@भास्कर गिरधारी 9823012301
वनवासी कल्याण आश्रम या संस्थेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत हे काम उभे राहिलेले आहे. आजच्या घडीला वनवासी, जनजाती कल्याण आश्रम ही एक प्रबळ शक्ती निर्माण झालेली आहे. या कार्याचे श्रेय निर्विवादपणे बाळासाहेब देशपांडे यांना दिले पाहिजे.
 
rss_1  H x W: 0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक महत्त्वपूर्ण आयाम म्हणून वनवासी कल्याण आश्रम जनजाती बंधुभगिनींच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, उत्कर्षासाठी सिद्ध झालेला आहे.

मा. बाळासाहेब देशपांडे यांनी दि. 26 डिसेंबर 1952 रोजी या संस्थेची स्थापना केली. या संस्थेत सेवा कार्याला सर्वश्रेष्ठ मानलेले आहे. आता वनवासी कल्याण आश्रम या संस्थेला 70 वर्षे पूर्ण होत आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीत हे काम उभे राहिलेले आहे.
रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांचा जन्म 26 डिसेंबर 1913 रोजी अमरावती येथे झाला. वयाच्या तेराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्यांचा संबंध आला होता. तेथेच त्यांना देशभक्तीचे आणि हिंदुत्वाचे संस्कार मिळाले होते. बालपणीच प.पू. डॉक्टर हेडगेवार यांची ओळख झाली होती. पुढे पदवीधर होऊन त्यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण केली, याच काळात संघाची जबाबदारीही ते सांभाळत होते. पुढे ठक्कर बाप्पा आणि गांधीजी यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रत्यक्ष प.पू. गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेने त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाची स्थापना केली. जशपूर क्षेत्र मिशनरी प्रभावापासून मुक्त करण्याची योजना आखण्यात आली, त्यानुसार आदिवासी कल्याण खात्यामार्फत या क्षेत्रात शासनाच्या विकास योजना राबवण्याचे ठरले, त्याकरिता जशपूरचे क्षेत्रीय संघटक म्हणून बाळासाहेबांची नियुक्ती करण्यात आली.

जशपूर क्षेत्र त्या काळात मिशनरी फुटीरतावादी कारवायांचा अड्डा बनले होते. संपूर्ण परिसरात बाळासाहेबांनी 100 शाळा सुरू करण्याची योजना आखली आणि ती यशस्वी करून दाखवली. या कामाने स्वत: ठक्कर बाप्पा प्रभावित होऊन जशपूरला त्यांच्या भेटीला आले होते, त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना रोख पारितोषिक दिले होते. जशपूर येथे अवघ्या दोन विद्यार्थ्यांवर ती पहिली शाळा आणि वसतिगृह सुरू करून पुढे ते कार्य वाढवले आहे. नंतरही अनेक वसतिगृहे आणि आश्रमशाळा, आदिवासी समाजाची शक्तिकेंद्रे झाली आहेत. बाळासाहेबांनी त्यांच्या या कार्यामुळे मिशनर्‍यांचा अधिकार संपुष्टात आणला.

परंतु शासकीय निर्बंधामुळे आपले भारतीयत्वाचे, हिंदुत्वाचे संस्कार प्रभावीपणे करता येत नाहीत, म्हणून त्यांनी शासनाची चौकट सोडून वनवासी जनजाती क्षेत्रात राष्ट्रसमर्पित विचाराचे काम उभे केले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. या काळात त्यांना जशपूरचे राजे विजय भूषण सिंह जुदेव यांचे प्रारंभी खूप सहकार्य मिळाले. त्याचबरोबर संघाचे जुने अनुभवी प्रचारक मोरुभाऊ केतकर या कामात सहभागी झाले आणि अशा तर्‍हेने 1952मध्ये हा वनवासी कल्याण आश्रम स्थापन झाला. त्यानंतर जशपूरच्या परिसरातील आसपासची गावे, खेडीपाडी यांच्या संपर्काने हे वनवासी कल्याण आश्रमाचे काम वाढले. त्यानंतर ओरिसा, मध्य प्रदेश, बिहार यासारख्या विविध प्रांतांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यविस्तार झाला. यातूनच नंतर 1978 या वर्षी वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याला अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. अर्थात सुरुवातीच्या काळात संघर्षाला, आंदोलनाला वेळप्रसंगी तोंड द्यावे लागले. आता या कामाचे रूपांतर स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणेने सेवाधर्मकार्यातून चालू झालेले आहे. ठिकठिकाणी छात्रावास काढले, भारतभर आश्रमशाळा काढल्या. त्यातून जनजातींचे संघटन सामर्थ्य वाढले. बाळासाहेब म्हणत, त्याप्रमाणे वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य हे ईश्वरी कार्य असल्यामुळे ईश्वरी कृपेने पुढे जनसहकार्य वाढले. आज या कार्याचा प्रचंड वटवृक्ष झालेला आहे.

महाराष्ट्र प्रांतदेखील आपली वर्धिष्णू आणि यशस्वी वाटचाल करीत आहे. ही आकडेवारी दिली तर फार विस्तार होईल, पण नुसत्या महाराष्ट्राचे उदाहरण घेतले, तर आज महाराष्ट्रात वीस वसतिगृहे चालतात. प्रकल्पसंख्या खूप वाढलेली आहे. त्यामध्ये शिक्षण, आरोग्य, क्रीडा, ग्रामविकास, सत्संग केंद्र, संस्कार केंद्र असे कितीतरी आयाम कार्यरत आहेत. श्रद्धाजागृती आणि हितरक्षण, आर्थिक विकास, ग्रामविकास यावर विशेष भर दिलेला आहे आणि म्हणून वनवासी, जनजाती कल्याण आश्रम ही एक प्रबळ शक्ती निर्माण झालेली आहे. या कार्याचे श्रेय निर्विवादपणे बाळासाहेब देशपांडे यांना दिले पाहिजे. आज जनजातींमधून कितीतरी डॉक्टर, इंजीनिअर, वकील, प्राध्यापक, कृषितज्ज्ञ, लोकसेवा आयोग आणि केंद्रीय सेवा आयोग, मंत्रालय यात कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील नावलौकिकही सर्वदूर पोहोचलेला आहे.

स्वत:ला कमी न लेखता आपणच आपला उद्धार करायचा आहे, स्वावलंबी व्हावयाचे आहे, हे आता जनजाती समाजाला उमगले आहे.

माननीय बाळासाहेब ही एक प्रभावी व्यक्ती आणि प्रतिभावंत होते, निष्णात वकीलही म्हणून ज्ञात होते. त्यांनी आपल्या कणखर बाण्याने जनजाती कल्याणाचे कार्य केलेले आहे. वेळप्रसंगी पोलीस अधिकार्‍यालादेखील त्यांनी “आपल्याला आदेश आहेत का, तर गोळीबार करा” म्हणून खडसावले आहे. जनजाती समाजातीलच एक होऊन त्यांच्याच बोलीभाषेत त्यांना समजावून सांगून हे कार्य आपले कर्तव्य म्हणून करावयाचे आहे, हे त्यांनी कार्यकर्त्यांवर बिंबवले. आपल्या कार्यकर्त्यांवर त्यांचे निरतिशय प्रेम होते आणि म्हणून ‘बाळासाहेब आजारी आहेत म्हणून कोणी भेटायला येऊ नका’ असे डॉक्टरांनी सांगितले असताना, खोलीबाहेर अशी पाटी लावली असता, त्यांनी आपली खोली बदला असे कार्यकर्त्याला सांगितले; कारण जेथे कार्यकर्ते येत नाहीत, तेथे मी राहू शकत नाही असे म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांबद्दल आत्मीयता दाखवून आपली भावना व्यक्त केली होती. बाळासाहेबांनी आपल्या वकिलीतूनच प्रारंभी वनवासी कल्याण आश्रमाचा खर्च चालवला. त्यांचे बँकेत खातेदेखील नव्हते. एका कार्यकर्त्याने त्यांच्या पत्नीच्या नावाने निदान बँक खाते असावे म्हणून उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला नकार देऊन ते रद्द केले. त्यांच्या त्यागाच्या, समर्पणाच्या अलौकिक कथा ऐकायला मिळतात.

शेवटी त्यांनी हा आत्मीयतेचा भाव, सद्भाव जागवला आणि आज जनजाती समाजाला व सार्‍या समाजाला त्याची सुमधुर फळे चाखायला मिळालेली आहेत.