ओमायक्रोन - भीती नको, खबरदारी हवी

विवेक मराठी    02-Dec-2021
Total Views |
@डॉ. प्रिया प्रभू एम.डी.(PSM),
ओमायक्रोनबाबत अद्याप बरीच माहिती मिळालेली नाही आणि ज्या बातम्या किंवा वक्तव्ये आपण वाचत किंवा ऐकत आहोत, ते अंदाज किंवा मते आहेत. आणि उलटसुलट बातम्यांमुळे केवळ मनातील अनिश्चितता आणि भीती वाढते. मानसिक ताण वाढतो. त्यामुळे आपण सर्वात सुरक्षित मार्ग निवडायचा.

corona_1  H x W
 
गेले दीड वर्ष ज्या कोरोना विषाणूशी आपण लढत आहोत, त्या कोरोना विषाणूने नोव्हेंबर 2021मध्ये एका नव्या रूपामध्ये अवतार घेतला आणि संपूर्ण जग या नव्या रूपाबाबत चिंतित झाले. 26 नोव्हेंबर 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने या परावर्तित विषाणूला VoC म्हणजे varitant of concern  (चिंताजनक उप-प्रकार) असा दर्जा दिल्याने या चिंतेला एक अधिष्ठान मिळाले.
आणि या नव्या विषाणूचे बारसे झाले - ओमायक्रोन .

या ओमायक्रोनबाबत शास्त्रज्ञ प्रयोग करण्यात मग्न आहेत. मात्र विविध तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत. प्रयोगांमधून यांची उत्तरे निश्चितपणे मिळतीलच. पण याला वेळ लागेल. मात्र विविध वृत्तवाहिन्यांवरून आणि वर्तमानपत्रांमधून जे अंदाज वर्तवले जात आहेत, त्यामुळे सामान्य जनतेच्या मनामध्ये गोंधळ आणि भीती वाढली आहे.
 
 
ओमायक्रोन हा उत्परिवर्तित (mutated) विषाणू आहे. कोरोना विषाणूच्या आरएनएमध्ये 30,000 बेसेस आहेत. हा आरएनए म्हणजे विषाणूमधील विविध प्रथिने तयार करण्याचा कोड असतो. या कोडनुसार मानवी पेशी नव्या विषाणूच्या प्रती तयार करत असतात.
 
 
ओमायक्रोनमध्ये 30,000पैकी एकूण 50 ठिकाणी उत्परिवर्तन झालेले दिसून येतेय. उत्परिवर्तन ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. महासाथ सुरू झाल्यानंतर असे उत्परिवर्तित झालेले शेकडो-हजारो व्हेरीयंट निर्माण झाले. पण त्यामधील फक्त 5 उपप्रकारांना तेउ म्हणजे चिंताजनक उपप्रकारचा दर्जा मिळाला, ते म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा, डेल्टा आणि हा नवा ओमायक्रोन. या सर्वांमध्ये एक साम्य आहे. यांच्यातील उत्परिवर्तन एस प्रोटीन निर्माण करणार्‍या आरएनएच्या भागामध्ये आहेत. एस प्रोटीनमध्ये बदल झाल्यास विषाणू बलवान होऊ शकतो आणि यामुळे शास्त्रज्ञ चिंतित होतात. आणि ओमायक्रोनमध्ये यापूर्वीच्या चारही VoC मध्ये दिसून आलेले बदल आहेत, त्यासह यापूर्वी कधीही न दिसलेले काही बदलदेखील आहेत. त्यामुळे त्या बदलांचे अर्थ आपल्याला समजून घ्यावे लागतील आणि त्यासाठी थोडा वेळ लागेल. मात्र प्रत्येक बदलामुळे मानवाचा धोका वाढेल असे काही नसते.


corona_2  H x W
 
पूर्वीच्या चार VoCपेक्षा ओमायक्रोन वेगळा आहे. याची कारणे दोन - एक तर एकाच उपप्रकारामध्ये एकाच वेळी 50 बदल हा प्रकार पहिल्यांदा घडला आहे. हे तेव्हाच घडते, जेव्हा विषाणू एखाद्या रुग्णाच्या शरीरामध्ये खूप दिवस राहू शकतो आणि स्वत:च्या प्रती तयार करतो. आणि दुसरे कारण म्हणजे 50पैकी एकूण 34 बदल एस प्रोटीनच्या कोडमध्ये झालेले आहेत. यापैकी 30 replacement, 3 deletion  आणि 1 insertion (हे उत्परिवर्तनाचे प्रकार) आहेत.
 
 
कोणत्याही उत्परिवर्तनामुळे विषाणूच्या क्षमता बदलू शकतात. जेव्हा हे बदल विषाणूच्या क्षमता वाढवतात, तेव्हाच ते महत्त्वाचे असतात. विषाणूसाठी 3 क्षमता महत्त्वाच्या - प्रसारक्षमता, संसर्गक्षमता आणि प्रतिकार/उपचारांपासून सुटका.
ओमायक्रोनबाबत काही प्राथमिक अंदाज आहेत.
 
 
याची प्रसारक्षमता वाढलेली असू शकते. ओमायक्रोन 500% (5 पट) अधिक प्रसारक्षम असावा असा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे जर जनतेने प्रसार रोखण्यासाठी कोविड प्रतिबंधाचे उपाय वापरले नाहीत, तर याचा सहज प्रसार होऊन रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होऊ शकते.


corona_3  H x W
 
संसर्गक्षमतेच्या योग्य अंदाजासाठी आपल्याला काही आठवडे लागू शकतात. रुग्णसंख्या वाढल्यावर 3-4 आठवड्यांनी रुग्णालय भरती वाढते. ती वाढ कमी आहे की जास्त आहे, यावरून आपल्याला ओमायक्रोन गंभीर आजार निर्माण करतो का, हे खात्रीशीरपणे समजेल. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णांमध्ये सौम्य आजाराचे प्रमाण अधिक आहे असा प्राथमिक अंदाज आहे. रुग्णसंख्या अतिशय कमी असल्याने याविषयी अजून खात्रीपूर्वक सांगता येणार नाही. पण आपण आशा नक्कीच करू शकतो. जर सौम्य आजार असेल, तर वैयक्तिक धोका कमी होईल; मात्र रुग्णसंख्या अमर्याद वाढली, तर गंभीर रुग्णसंख्यादेखील वाढू शकते.

 
ओमायक्रोन प्रतिकार/उपचारांपासून सुटका मिळवू शकेल का? हा शास्त्रज्ञांसमोर मुख्य प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रयोगशाळांमध्ये प्रयोग सुरू झाले आहेत. कारण असे घडले, तर आपल्याला उपचारतंत्रामध्ये बदल आणि लसीचे नव्या प्रकारचे बूस्टर निर्माण करावे लागतील आणि यासाठी काही काळ जावा लागेल. मात्र हे करणे शक्य आहे. मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मोनोक्लोनल प्रतिपिंडांपेक्षा (antibodyपेक्षा) वेगळी असल्याने व आपल्याकडे पेशीय इम्युनिटीदेखील असल्याने लसींचा प्रभाव पूर्णपणे न संपता केवळ कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे. हे प्रत्येक लसीबद्दल सत्य आहे. कारण लस कोणतीही असली, तरी सुरक्षा केवळ एस प्रोटीनविरुद्धच्या neutralizing antibodyच देऊ शकतात. संसर्ग टाळण्यासाठी इतर अँटीबॉडींचे महत्त्व नसते. मात्र जर अँटीबॉडींचा प्रभाव खूप कमी झालाय असे प्रयोगातून दिसून आले, तर लसीकरण झालेल्या व पूर्वी कोविड होऊन गेलेल्या व्यक्तींनादेखील पुन्हा बाधा होऊ शकेल.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की ओमायक्रोनबाबत अद्याप बरीच माहिती मिळालेली नाही आणि ज्या बातम्या किंवा वक्तव्ये आपण वाचत किंवा ऐकत आहोत, ते अंदाज किंवा मते आहेत. आणि उलटसुलट बातम्यांमुळे केवळ मनातील अनिश्चितता आणि भीती वाढते. मानसिक ताण वाढतो.
 
त्यामुळे आपण सर्वात सुरक्षित मार्ग निवडायचा. नव्या व्हेरियंटमुळे धोका/जोखीम वाढली आहे असे गृहीत धरून खबरदारी वाढवायची. ओमायक्रोनची भीती बाळगून काहीही साध्य होणार नाहीये. ओमायक्रोन कितीही बदलला, तरी तो मूळचा कोरोना विषाणूच आहे. आणि कोरोना विषाणूशी कसे लढायचे, हे आपण गेल्या दोन वर्षांतील अनुभवावरून जाणतो.
 
मात्र नियम सर्वांना माहीत असले, तरीदेखील नियमांचे पालन करणार्‍यांचे प्रमाण मात्र कमी कमी होऊ लागले आहे. साथ थांबवण्याचा खात्रीशीर उपाय असतो - नियम पाळणार्‍या व्यक्तींची संख्या नियम न पाळणार्‍या व्यक्तींपेक्षा वाढायला हवी. असे घडले की विषाणू नव्या मानवी शरीराला बाधित करू शकणार नाही आणि साथ थांबायला सुरुवात होईल.
पण असे तेव्हाच घडेल, जेव्हा समाज एकजूट होऊन कोरोनाशी लढेल. आपल्या आजूबाजूला कितीतरी व्यक्ती आहेत, ज्यांचा कोरोना, जागतिक साथ, नवे व्हेरियंट, नियम, लस आणि लसीकरणाचे फायदे या सर्वांवर काडीचाही विश्वास नाही. त्यांना हे सर्व एका कटाचा भाग वाटते. आणि या चुकीच्या विश्वासामुळे ते नियम पाळण्यास नकार देतात. व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडियामधून जे चुकीचे, गैरसमज पसरवणारे संदेश लोकांपर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे आपणा सर्वांना ही साथ नियंत्रित करण्यामध्ये खूप अडचणी येत आहेत.

 
त्यातील forwarded मेसेज वाचून लोक मास्क वापरत नाहीत, टेस्ट करत नाहीत, धाप लागेपर्यंत रुग्णालय टाळतात, लस घेत नाहीत, गर्दी टाळत नाहीत, सरकारचा दुस्वास करतात. किंवा काही जण साथीविषयी किंवा आजाराविषयी अर्धवट ज्ञानामुळे किंवा अतिआत्मविश्वासामुळेदेखील चुकीचे निर्णय घेतात.
 
यावर उपाय म्हणजे तुम्हाला फॉरवर्ड झालेला कोणताही मेसेज आला की त्याविषयी किंवा त्यातील मुद्द्यांविषयी factcheck  हा शब्द वापरून गूगल सर्च करायचा. शक्यतो त्याबद्दल अधिक माहिती व स्पष्टीकरण उपलब्ध असतेच. किंवा आमच्या UHCGMCMIRAJ या फेसबुक पेजला मेसेज पाठवला, तर त्यावर माहितीपूर्ण व शास्त्रीय स्पष्टीकरण दिले जाईल.

अशा परिस्थितीमध्ये आपण ओमायक्रोनपासून कसे सुरक्षित राहायचे? म्हटले तर सोपे आणि म्हटले तर अवघड आहे. कारण स्वत:ची सुरक्षा इतरांनी नियम पाळण्यावरदेखील अवलंबून असते. सध्या आपण नियम पाळणे सुरू करू शकतो आणि इतरांशी चर्चा करून त्यांना शास्त्रीय माहिती मिळवून देऊ शकतो. तसेच खात्रीशीर स्रोतातील योग्य शास्त्रीय माहिती सोशल मीडियावर फॉरवर्ड करू शकतो, जेणेकरून नियम पाळणार्‍या व्यक्तींची संख्या वाढेल.
 
 
ओमायक्रोनचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधाचे नियम पाळणे आवश्यक आहे. तसेच लसीकरण पूर्ण करणेदेखील आवश्यक आहे.
 
 
हे उपाय स्वस्त आहेत, प्रत्येकाच्या आटोक्यातील आहेत आणि यांचे फायदे पूर्णपणे सिद्ध झालेले आहेत. तसेच ओमायक्रोन असो किंवा कोणताही नवा व्हेरियंट, हे उपाय आपली सुरक्षा नेहमीच करतात.
 
 
corona_4  H x W
 
यातील पहिला उपाय आहे - मास्कचा सुयोग्य वापर. इतर व्यक्तीसोबत असताना न चुकता एन-95 किंवा डबल मास्क (आतमध्ये सर्जिकल आणि बाहेरून कापडी मास्क) लावावा, म्हणजे संसर्गापासून 90-95% सुरक्षा मिळते. हे अतिशय महत्त्वाचे आहे. मास्कवर थोडे पैसे खर्च होऊ दे. सवय झाली की जमते. डॉक्टर्स तासनतास एन-95 मास्क लावून गेली 2 वर्षे काम करत आहेत, पण कोणालाही मास्कचा जीवघेणा त्रास नाही झाला. कोविड मात्र जीवघेणा असू शकतो. महत्त्वाचे म्हणजे इतरांसोबत असताना, गर्दीमध्ये, कार्यक्रमामध्ये, बंदिस्त जागेमध्ये मास्क कधी काढू नये. नाक मास्कने झाकलेले असणे अत्यावश्यक आहे.

 
दुसरा उपाय आहे - वायुविजन वाढवणे. घर, कार्यालय सर्व ठिकाणी दारे-खिडक्या उघड्या ठेवणे, ए.सी.चा वापर शक्यतो न करणे, शक्य तेथे एग्झॉस्ट पंखे वापरणे हे ओमायक्रोनसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. जर याची प्रसारक्षमता जास्त असेल, तर त्याला हवेने दूर करणे हा उपाय खूप संरक्षक ठरू शकतो.


corona_5  H x W
 
 
तिसरा उपाय आहे - जिथे गर्दी आणि बंदिस्त जागा असतील अशा ठिकाणी जाणे टाळणे, फक्त अत्यावश्यक असल्यासच जाणे, तिथे एन-95 मास्क वापरणे आणि कोणत्याही कारणाने तिथे मास्क न काढणे हे महत्त्वाचे आहे. यामुळे सुपर स्प्रेडर इव्हेंट टळू शकतात. हे घरगुती ठिकाण असेल किंवा घराबाहेरील, या व्यक्ती ओळखीच्या असतील किंवा अनोळखी, हा उपाय सुरक्षा वाढवतो.
चौथा उपाय आहे - लसीकरण. लसीकरण बहुधा संसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही. पण त्यासाठी आपल्याकडे वरील उपाय आहेत. मात्र लसीकरणामुळे निर्माण होणारी पेशीय इम्युनिटी आपल्याला गंभीर आजारापासून आणि आयसीयूमध्ये दाखल होण्यापासून काही सुरक्षा नक्कीच देईल. तसेच जेव्हा नवे बूस्टर तयार होतील, तेव्हा ते घेतल्यानंतर नव्या व्हेरियंटपासूनदेखील लगेच सुरक्षा मिळेल. मात्र त्यासाठी मूळ लसीकरण पूर्ण झालेले हवे.

याखेरीज हातांची स्वच्छता, शारीरिक अंतर हे उपाय आहेतच. प्रत्येक कोविड संशयिताची लवकरात लवकर आरटीपीसीआर तपासणी करून रुग्ण ओळखणे आणि अलगीकरण आणि विलगीकरण करून पुढील प्रसार रोखणे हे महत्त्वाचे समूहसुरक्षेचे उपायदेखील आहेत. यांचे पालन ओमायक्रोनपासून समाजाचे रक्षण करू शकते.

 
ओमायक्रोनला घाबराल, तर भीतीपोटी चुकीचे निर्णय घ्याल, बेफिकीर व्हाल आणि कुटुंबाची सुरक्षा पणाला लावाल. हा आजार सर्वांसाठी सौम्य नक्कीच नसेल.
 
पण वर सांगितलेली सर्व खबरदारी जर आत्तापासून घ्याल आणि इतरांनाही मनाच्या लॉकडाउनसाठी (स्व-नियमनासाठी) प्रोत्साहित कराल, तर रुग्णसंख्या नक्कीच नियंत्रणात राहील आणि ओमायक्रोन आपले काहीही बिघडवू शकणार नाही, हे नक्की.
काळजी करू नका, काळजी घ्या आणि सुरक्षित राहा!
 
लेखिका मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.