@डॉ. प्रिया प्रभू
तुमच्या आरोग्याची काळजी जशी तुम्ही घेता, तसेच संपूर्ण समाजाने आणि सरकारनेदेखील घ्यायला हवी. तसेच तुम्ही करता ती एखादी चुकीची कृती जशी तुमचे आरोग्य धोक्यात आणू शकते, तशीच संपूर्ण समाजाच्यादेखील आरोग्यावर परिणाम करू शकते. म्हणून गरज आहे याची जाणीव होण्याची आणि पुढील पिढीच्या आरोग्यासाठी मोठे बदल करण्याची व स्वीकारण्याची!
2009 मध्ये आलेला ‘अवतार’ हा इंग्लिश चित्रपट बघितलाय का? त्यामध्ये एका परग्रहावरील निळ्या रंगांच्या मानवसदृश सजीवांची कथा आहे. त्या चित्रपटामध्ये एक दृश्य आहे, ज्यामध्ये त्या ग्रहावरील सर्व जण मोठ्या जीवनवृक्षाभोवती बसले आहेत आणि एकमेकांसोबत जोडले गेले आहेत असे दाखवले आहे. सर्व म्हणजे ग्रहावरील निळे सजीव, वनराई, प्राणी-पक्षी असे सर्वच! त्यांच्या वेणीचा शेपटा एकमेकांना जोडून ते एकत्रित कृतीदेखील करू शकतात. अतिशय सुंदर दृश्य आहे ते. या माहितीचा या लेखाशी किंवा आपल्या आयुष्याशी काय संबंध? असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. अहो, संबंध आहे म्हणून तर सांगितला ना प्रसंग!
आपण सर्व जण स्वत:चे व कुटुंबीयांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी विविध प्रकारे काळजी घेत असतो. कोणी व्यायाम करतात, कोणी डाएट. कोणी योग तर कोणी झुम्बा. कोणी मायक्रो-ग्रीन खातात, तर कोणी व्हिटॅमिनच्या गोळ्या. कोणी मिठावर नियंत्रण ठेवते, तर कोणी साखरेवर. कोण वेगन बनते, तर कोण प्रोटीन मिळवण्यासाठी डझनभर अंडी खाते. कोणी काढे घेतात, तर कोणी लसी. मात्र प्रत्येक जण आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.
पण तुम्हाला हे माहीत नसते की तुमचे आरोग्य चांगले राहणे/न राहणे हे केवळ तुमच्या एकट्याच्या हातामध्ये नाही. तुम्ही आरोग्याची काळजी घेतली तर नक्कीच आरोग्य सुधारेल. मात्र तुमचे आरोग्य केवळ तुमच्या हातामध्ये नाही. त्या अवतार चित्रपटाप्रमाणे आपण सर्व या पृथ्वीवरदेखील एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत. आपल्या कृतींचा स्वत:वर तसेच समाजाच्यादेखील आरोग्यावर परिणाम होत असतो.
2013मध्ये मुंबई मधील एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर मुलगी आणि 2019मध्ये एक प्रशिक्षणार्थी नर्स MDR टीबीमुळे - म्हणजे औषधांना दाद न देणार्या क्षयरोगामुळे मृत्यू पावल्या. औषधाला दाद न देणार्या अशा टीबीच्या केसेस सध्या वाढत आहेत. फार पूर्वी टीबीचे रुग्ण गोळ्या नियमित घेत नव्हते, किंवा पूर्ण उपचार घेत नव्हते, आजार पूर्ण बरा होण्यापूर्वीच मध्येच गोळ्या बंद करायचे आणि त्यामुळे अशा एकाहून अधिक औषधांना दाद न देणार्या टीबीचा जन्म झाला आणि हळूहळू संख्या वाढत आता रुग्णसेवा करणार्या तरुणांनादेखील MDR टीबी होऊ शकतो. चुका केल्या भूतकाळातील कोणी, मात्र आता इतक्या वर्षांनंतरही त्याचे परिणाम दिसत आहेत आणि वाढतही आहेत.
अशा चुका आपणही करतोय. तुमच्या फेसवॉशमध्ये छोटे छोटे रंगीत मणी (beads) असतात, त्याने चेहरा घासून (scrub) स्वच्छ निघतो. मात्र ते मणी अन्नसाखळीमध्ये शिरून तुमच्या शरीरामध्येदेखील शिरत आहेत, हे माहीत आहे का? सध्या समुद्री प्राण्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मायक्रोबीड्स आढळून येतात.

अन्नसाखळीवरून आठवले. काही वर्षांपूर्वी शीतपेयांमध्ये कीटकनाशके आहेत असे आढळून आले होते, त्या वेळी कंपनीने ती कीटकनाशके पिण्याच्या पाण्यामधून आली असतील असे सांगितले होते. शेतामधील कीटकनाशके पाण्याद्वारे भूजलापर्यंत झिरपली आहेत आणि याचा परिणाम म्हणून एका प्रयोगामध्ये आईच्या दुधामध्येदेखील काही प्रमाणामध्ये कीटकनाशकांचे प्रमाण आढळून आले. आरोग्याचे असे अदृश्य शत्रू आपल्या नकळत आपल्यापर्यंत पोहोचत असतात.
दुधाचे म्हणाल, तर गाई-म्हशीचे दूध भरपूर प्रमाणात मिळावे आणि जास्त काळ व विनासायास मिळावे, यासाठी दुभत्या जनावरांना हार्मोन्सचे इंजेक्शन देणे सररास घडते. ती हार्मोन्स दुधाद्वारे आपल्या पोटात जातात. आधीच्या पिढ्यांपेक्षा आता मुलींमध्ये कमी वयामध्येच पाळीची सुरुवात होते, याचे एक कारण हेदेखील आहे.
आधीच्या पिढ्यांमध्ये कर्करोग दुर्मीळ होता, पण आता विविध कर्करोगांचे प्रमाण खूप वाढत आहे. याची मुख्य कारणे म्हणजे पर्यावरणातील वाढते प्रदूषण आणि अन्नाद्वारे व हवेद्वारे काही कर्करोगप्रवण (carcinogenic) पदार्थ आपल्या शरीरात जाणे हे आहे. हे घडू नये, म्हणून संपूर्ण समाजामध्ये बदल व्हायला हवे. असे असले, तरी काही कर्करोग मात्र आपण आपल्या स्वत:च्या जीवनशैलीमुळे आमंत्रित करतो. गुटखा खाल्याने तोंडाचा कर्करोग, सिगरेट-बिडी ओढल्याने फुप्फुसाचा कर्करोग, स्तनपान न दिल्याने/कमी दिल्याने स्तनाचा कर्करोग, दारूमुळे मोठ्या आतड्याचा कर्करोग असे विविध कर्करोग होतात.

पूर्वी दुर्मीळ असणारे आजार आता सररास आढळून येतात.
मानव प्रगत झाल्यावर जीवनशैलीतील बदलांमुळे नवीन आजारांचा गट तयार झाला, ज्यांना ‘जीवनशैलीजन्य आजार’ (Lifestyle diseases) असेही म्हटले जाते. यामध्ये स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार आहेत. यांच्यापासून बचाव करण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली आचरावी लागते आणि यांचे नियंत्रण करण्यासाठी जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करावे लागतात. व्यायाम करणे हा सर्वात मुख्य बदल असला, तरी त्याबरोबर आहारातील व दैनंदिन वेळापत्रकातील बदलही महत्त्वाचे आहेत. केवळ 7-8 तास झोप घेतल्यानेदेखील विविध आजार कमी होऊ शकतात. या आजारांना ऋराळश्रळरश्र वळीशरीशी असेही म्हणतात, कारण सर्व कुटुंबाची जीवनशैली सारखीच असू शकते व म्हणून कुटुंबातील सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक असते.
या जीवनशैलीजन्य आजारांचीदेखील जागतिक साथ सुरू आहे. होय, केवळ हे आजार एकमेकांपासून संसर्गाने होत नाहीत आणि रुग्णसंख्या अचानक वाढत नाही, म्हणून ही साथ लक्षात येत नाही. अशा साथींना ‘आधुनिक साथी’ (Familial diseases) असे म्हणतात. याचेच एक उदाहरण म्हणजे लहान मुलांमधील लठ्ठपणा. सध्या जगातील मुलांचा एक गट कुपोषणाने ग्रस्त आहे, तर एक गट अतिवजनाने! लहान मुलांमधील व्यायामाचा अभाव व जंक फूडचे वाढते सेवन ही याची मुख्य कारणे. अशा मुलांना त्यांच्या भावी जीवनामध्ये विविध जीवनशैलीजन्य आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यांना आरोग्यपूर्ण आयुष्य मिळावे, म्हणून पालकांनी आणि शाळांनी मुलांचे शारीरिक खेळ बंद होणार नाहीत याची काळजी लहानपणापासूनच घ्यायला हवी. दहावीपर्यंत खेळाचा तास हा वेळापत्रकामध्येच राहतो की मुलांना खेळायला मिळतो, हा खरा प्रश्न आहे!

वेगवान आयुष्य, सतत होणारे बदल, शिक्षणाच्या आणि नोकरीच्या ठिकाणी तीव्र स्पर्धा या सर्वांचा परिणाम सर्व लहान- थोरांच्या मानसिक आरोग्यावर होतोय. त्यात भर म्हणून मोबाइलचे व गेम्सचे वाढते व्यसन आहे. यातून कोणताही वयोगट सुटलेला नाही. हे ताणतणाव व तीव्र चिंताधीनता या सर्वांच्या आयुष्यावर दूरान्वेशी परिणाम करतात. वाढत्या आत्महत्यादेखील या सर्व घटनांचा परिपाक आहेत.
वाढती बेरोजगारी, महागाई, गरिबी, कर्जबाजारीपणा यांचा परिणाम जसा मानसिक आरोग्यावर होतो, तसेच त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत जाते. मुले आणि स्त्रिया अधिक कुपोषित असतात आणि त्यामुळे पुढील पिढीदेखील कुपोषित जन्मते. म्हणजे त्यांचा जन्म होण्यापूर्वीच त्यांचे आरोग्य बाधित झालेले असते.
आपण सर्व कनेक्टेड आहोत याचे उदाहरण तर या कोरोनाच्या जागतिक साथीचे आहे. 1918मधील फ्लूची साथ दोन वर्षांमध्ये संपली होती. पण कोरोनाचा उदय होऊन दोन वर्षे झाली, मात्र आता ओमायक्रोन हा नवा उत्परिवर्तित उपप्रकार निर्माण झाल्याने पुन्हा जोखीम वाढली आहे. संपूर्ण जग हे एक खेडे झाले आहे असे म्हणतात. विमानप्रवासामुळे जवळ आलेले जग भविष्यामध्ये अशा अनेक जागतिक साथींना तोंड देणार आहे. ओमायक्रोन निर्माण झाला असे म्हणेपर्यंत जगभरातील 60हून अधिक देशांमध्ये पोहोचलायदेखील. आफ्रिकेमधील देशांमध्ये लसीकरण कमी आहे आणि विविध देशांमधील लसविरोधी जनता लसीकरण नाकारत असल्याने विषाणू उत्परिवर्तित होऊन नवनवे रूप धारण करणार आणि तुम्ही व मी नियम पाळूनदेखील आपली सुरक्षा कमी होणार, रुग्णसंख्या वाढणार व पर्यायाने निर्बंध वाढणार.
पर्यावरणावर अपरिवर्तनीय बदल होत आहेत आणि काही काळात आपण फक्त परिणाम भोगणार आहोत. नांदी सुरू झालीये - हिवाळ्यातील पावसाला हिवसाळा म्हणणे सोपे आहे, मात्र त्यामुळे आजारांचे प्रमाण वाढणे, शेतीचे नुकसान होऊन अन्नधान्याचा तुटवडा होऊन त्याने कुपोषण वाढणे आणि पर्यायाने विविध संसर्ग वाढणे किंवा अचानक होणारी ढगफुटी, वारंवार येणारे पूर व त्यानंतर येणारे आजार या सर्वांचा मुळातून विचार होणे आवश्यक आहे. प्लास्टिकसारख्या कचर्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले नसेल, तर साधा पाऊसदेखील खूप नुकसान करून जातो हे आपण वारंवार बघितले आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारे प्रदूषित पाणी व धूर याविषयी सरकार काय कायदे करते हा आपला आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असतो.
जागतिक साथ सुरू असताना सर्व देशांना समान प्रमाणामध्ये लस मिळणे हा साथ थांबवण्याचा एक महत्त्वाचा उपाय होता. सोपा होता. जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) वारंवार सांगितलेला होता. मात्र ही साधी कृतीदेखील जगाला शक्य झाली नाही. पृथ्वी आणि मानवजात वाचवायची असेल, तर केवळ तुम्ही आणि मी इलेक्ट्रिक कार वापरून किंवा विजेचा वापर कमी करून खूप फरक पडणार नाहीये. आपल्या आणि आपल्या पुढील पिढ्यांच्या भविष्यासाठी प्रत्येक देशाला जिथे आहे तिथे थांबून पर्यावरणस्नेही नवे आयुष्य स्वीकारावे लागणार आहे. काही देशांनी गाड्या वापरणे बंद करून सायकलचा वापर वाढवला आहे. हे छान आहे, प्रश्नच नाही. मात्र आपल्या सर्वांची पृथ्वी एक असल्याने आणि आपण सर्व एकमेकांशी जोडलेले असल्याने जोपर्यंत सर्व देशांमध्ये सकारात्मक बदल येत नाहीत, तोपर्यंत हानी थांबणार नाही.
जागतिक तापमानवाढ झाली की प्रत्येक सजीवाच्या शरीरावर त्याचे परिणाम होणार आहेत. सुरुवात होईल डासजन्य आजार वाढण्यापासून. आत्ताही अचानक होणार्या पावसामुळे डेंग्यूच्या स्थानिक साथी येतच असतात. तुम्ही केवळ तुमच्या घरामध्ये व आसपास पाणी साठू दिले नाही म्हणून प्रश्न संपत नाही.
डेंग्यूचा डास शेजारच्या घरात उत्पन्न होऊन तुम्हाला चावू शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी जशी तुम्ही घेता, तसेच संपूर्ण समाजाने आणि सरकारनेदेखील घ्यायला हवी. तसेच तुम्ही करता ती एखादी चुकीची कृती जशी तुमचे आरोग्य धोक्यात आणू शकते, तशीच संपूर्ण समाजाच्यादेखील आरोग्यावर परिणाम करू शकते.
हे एकमेकांशी जोडलेले असण्याची जाणीव आपल्याला असणे आणि आरोग्य जसे वैयक्तिक व कौटुंबिक असते तसेच सामुदायिक व सामाजिकदेखील असते याची आपण जाण ठेवणे, ही काळाची गरज आहे.
पुढील पिढीला एकत्रितपणे खूप मोठ्या कल्पनातीत बदलांशी व परिणामांशी लढायचेय. त्यांचे आयुष्य सोपे आणि आरोग्यपूर्ण करणे केवळ आपल्या पिढीच्या हातात आहे. सध्याचे प्रत्येक संकट हे एका मोठ्या कोड्यातील एक लहान तुकडा आहे. त्यांच्याकडे एकेकटे न बघता त्यांचा एकत्रित विचार करून एकजुटीने एकत्रित कृती करण्याची हीच वेळ आहे. तुमच्या हातामध्ये फक्त तुमच्याच नाही, तर जागतिक आरोग्याची दोरी आहे. गरज आहे याची जाणीव होण्याची आणि पुढील पिढीच्या आरोग्यासाठी मोठे बदल करण्याची व स्वीकारण्याची!
जबाबदारीने वागू या! सामुदायिक आरोग्य वाढवू या!
drprabhugmcm@gmail.com
(लेखिका मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जनऔषध वैद्यकशास्त्र विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आहेत.)