सेवा - एक चिंतन

विवेक मराठी    23-Dec-2021
Total Views |
@डॉ. प्रकाश सिगेदार 9423457010
‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या समाजातील दीनदुबळे, वंचित, दलित, तसेच गरजू लोकांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामध्ये कुठलीही उपकाराची भावना असता कामा नये.

yog_1
 
 
सेवा हा मानवी स्वभावाचा एक अविभाज्य अंगभूत गुण आहे. प्रत्येक जण आपल्या परीने समाजाची, तसेच देशाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. सेवा करताना त्यामध्ये सेवाभाव आणि समाजाप्रती संवेदना (sensitivity), तसेच सहभावना आणि सहवेदना (empathy) असणे अत्यंत गरजेचे असते.
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेला प्रत्येक कार्यकर्ता (स्वयंसेवक) हा आपण समाजाचे तसेच राष्ट्राचे काही देणे लागतो, या भावनेतून सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो. संघाचे मूलभूत सेवा कार्याचे साधारण दीड लाखाच्यावर प्रकल्प देशभरात सुरू आहेत, त्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा कार्यांचा समावेश आहे.
 
 
निष्काम सेवा करून त्यापोटी कोणतीही अपेक्षा न ठेवणे हा भाव सेवा कार्यात अपेक्षित असतो. आरोग्य, कृषी, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, स्वावलंबन अशा विविध आयामांअंतर्गत संघसेवा अविरत सुरू आहे. जनकल्याण समिती, आरोग्य भारती, सहकार भारती, वनवासी कल्याण आश्रम इत्यादींच्या माध्यमातून अशी अनेक सेवा कार्ये संघाच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू आहेत.
 
‘कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन’ या उक्तीप्रमाणे काम करत राहणे हाच सेवा कार्याचा गाभा आहे. सेवा करताना ‘कमी तिथे आम्ही’ हा भाव असणे अत्यंत गरजेचे आहे. सेवा ही छोटी किंवा मोठी असू शकत नाही. सेवा ही सेवा असते, ती करण्यामागे भाव काय आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
 
आपण सेवा करत असताना ज्या घटकांची सेवा करत आहोत, त्या घटकाला आपल्या सेवेमुळे त्रास होता कामा नये, तसेच त्याबद्दल उपकाराची भावनासुद्धा असता कामा नये.

प्रत्येक जण देशसेवेसाठी सीमेवर जाऊ शकत नाही, तसेच प्रत्येक जण मोठ्या स्वरूपातील सेवाही करू शकत नाही. पण आपल्या आजूबाजूला असणार्‍या गरजा लक्षात घेऊन छोट्या प्रमाणात का होईना, आपण सेवा देण्याचा प्रयत्न सतत करत राहणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या भागात ज्या गोष्टींची कमतरता आहे, त्या गोष्टी समाजाला पुरवणे, त्यामधून समाजातील घटकांशी संवाद साधणे, त्यांच्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण करणे म्हणजेच एकमेकांशी जोडले जाणे हे सेवेमधून अपेक्षित आहे (योग).

‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीप्रमाणे आपल्या समाजातील दीनदुबळे, वंचित, दलित, तसेच गरजू लोकांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यामध्ये कुठलीही उपकाराची भावना असता कामा नये.

‘सेवा है यज्ञ कुंड, समिधा सम हम जले’ या उक्तीप्रमाणे आपण समाजासाठी सेवा कार्य करत असताना समाजासाठी झिजणे महत्त्वाचे आहे, तसेच या सेवा कार्यामधून समाजाचे हित जोपासणे हेही अत्यंत गरजेचे आहे. जशी भाषा दहा मैलावर बदलते असे म्हणतात, तसेच सेवेची गरजही क्षेत्राप्रमाणे बदलत असते.

 
वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या सेवा कार्याची गरज असते. ती गरज ओळखून त्याप्रमाणे कार्य करणे, तसेच सर्वांना सोबत घेऊन काम करणे आणि प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाची सेवा करणे हे संघकार्यामध्ये अपेक्षित आहे.

सेवा हा मानवी स्वभाव असून आपल्या समाजबांधवांना मदत करणे हा प्रत्येकाचा स्थायिभाव असतो. ती मदत करताना समोरच्याचा स्वाभिमानही आपण सांभाळला पाहिजे, तसेच त्याला अपमानित किंवा उपकाराखाली दबल्याची भावना होऊ नये याची दखल घेणेही गरजेचे आहे, म्हणून सेवा करताना ‘कमी तिथे आम्ही’ ही उक्ती अत्यंत उपयुक्त ठरते.

(लेखक अस्थिरोगतज्ज्ञ व आरोग्य भारतीचे देवगिरी प्रांताचे प्रांत सदस्य आहेत.)