बैलगाडी शर्यत बंदी ते परवानगी

25 Dec 2021 18:06:06
@डॉ. व्यंकटराव घोरपडे  942204219516
डिसेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिली आणि राज्यातील बैलगाडी शर्यतप्रेमींसह चालक-मालक यांच्यामध्ये एक आनंदाची लाट पसरली. बंदी उठविण्यासाठी गेली सात वर्षे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवले. न्यायालय, राज्य सरकार, बैलगाडी शर्यतप्रेमी, माध्यमे, पशुसंवर्धन विभाग, राजकीय नेते मंडळींनी आपापल्या पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदविला. प्रत्येकाचे योगदान खूप मोठे आहे. सामूहिक प्रयत्नातून यश मिळाले आहे, हे निर्विवाद सत्य आहे.
 
Bullock cart race Ban it
बैलगाडी शर्यतीचा इतिहास तसा फार जुना आहे. स्पेनमधील बैल पळविण्याची स्पर्धा खूप जुनी समजली जाते. आपल्या देशातदेखील शेतीचा हंगाम संपल्यानंतर पशुपालक शेतकरी वेगवेगळ्या ग्रामदैवतांच्या यात्रा, जत्रा, उरूस यामधून आपल्या कौशल्याचे - उदा., वजन उचलणे, तलवार फिरविणे, कुस्त्या अशा प्रकारच्या कौशल्याचे प्रदर्शन करतात, मनोरंजन करतात व आनंद लुटतात. त्याचप्रमाणे बैलगाडी शर्यतसुद्धा पारंपरिक खेळ म्हणून सादर केला जातो.

देशातील वेगवेगळ्या भागांत हा खेळ वेगवेगळ्या पद्धतीने खेळत आनंद लुटला जातो. विशेषत: शेतातील हंगाम संपल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या ठिकाणी धार्मिक यात्रा, जत्रा, उरूस येथे, निरनिराळ्या नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त याचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, गुजरात, पंजाब, हरियाणा या राज्यांत मोठ्या प्रमाणात शर्यतींचे आयोजन केले जाते.

बैलगाडी शर्यती वळूंचे अथवा बैलांचे सामर्थ्य व आरोग्य प्रदर्शित करतात. महाराष्ट्रातील स्थानिक प्रजातीचे जतन करणे, वळूंच्या प्रजातींची शुद्धता अबाधित राखणे, तसेच त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणे यात बैलगाडी शर्यतीची मोलाची भूमिका आहे. बैलगाडी शर्यतींना महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये ‘बैलगाडा शर्यत’, ‘छकडी’ अथवा ‘शंकरपट’ असेही संबोधले जाते.

पशुपालक शेतकर्‍यांसह समाजातील सर्व स्तरांतील लोकांना या बैलगाड्या शर्यती आकर्षित करीत आल्या आहेत. बैलांच्या काळजीपूर्वक संगोपनातून त्याचा वापर केला जातो. वेग आणि अंतर कापण्याचा कालावधी यावर बैलगाडी शर्यत बेतलेली असते. पशुपालकासह सर्वांनी एकत्र येऊन आनंद उपभोगावा, हा हेतू असतो. त्यातून मग स्पर्धेमुळे एक चुरस वाढते. त्यामुळे हा खेळ लोकप्रिय ठरला आहे. उच्चभ्रूंच्या घोड्यांच्या शर्यतीसारखाच असणारा हा प्रकार म्हणजे ग्रामीण भागातील लोकांसाठीसुद्धा प्रतिष्ठेचा आणि नावलौकिक वाढविणारा असतो. खूप वेगवेगळ्या पद्धतीने या स्पर्धेत भाग घेणारे पशुपालक असतात. एकूणच उत्साही वातावरणात हे सर्व होत असल्यामुळे ग्रामीण भारताचा एक वेगळा पैलू समोर येत असतो. पारंपरिक स्पर्धेमध्ये पशुपालक स्पर्धक आपले जोपासलेले बैल, खोंड या स्पर्धेत उतरवतात. जो जिंकतो, त्याला रोख बक्षिसाबरोबर मानसन्मान मिळतो. त्या संबंधित पशुपालकाच्या गावासाठीदेखील ही गोष्ट अभिमानास्पद असते. गावातील अशा स्पर्धेत भाग घेणार्‍या बैलांच्या संख्येवरून त्या गावांची श्रीमंती मोजतात. आपल्या गावातील बैलगाडीला प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेच्या ठिकाणी एकत्र येतात. त्यामुळे एकोपा वाढतो, वेगवेगळ्या गावांतील बैल एकत्र करून, जोडी करून या स्पर्धेमध्ये उतरवली जाते. त्यामुळेदेखील अशा रितीने एकत्र येतात व आनंद लुटतात.
 
 
महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळ्या पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन केले जाते, पण एकंदर या ठिकाणचे वातावरण सगळीकडे सारखेच असते.
बैलगाडी शर्यतीच्या आयोजनामागे ग्रामीण अर्थकारणाचादेखील एक महत्त्वाचा पैलू आहे. ज्या गावात शर्यत आयोजित केली जाते, त्या गावाच्या अर्थकारणावर याचा मोठा प्रभाव पडतो. शर्यतीच्या आयोजनाच्या निमित्ताने लावण्यात आलेली विविध दुकाने - बैलांना सजविण्याच्या वस्तू विकणारे, शेतीसाठी उपयोगी वस्तू विकणारे, चहा-पाण्याची हॉटेल्स चालविणारे, बैलांच्या धावण्याचा पट्टा तयार करणारे, बैलांची वाहतूक करणारे, वाजंत्रीवाले, भोंगेवाले, छपाई करणारे, चारा विकणारे अशा अत्यंत छोटेखानी व्यवसाय चालविणार्‍यांचा उदरनिर्वाह होत असतो. हा अत्यंत लहान व्यवसाय चालविणारा वर्ग आहे, परंतु या प्रसंगी मोठ्या शेतकर्‍यांकडे असलेला आर्थिक प्रवाह या गरीब कामकरी लोकांकडे पोहोचतो. या निमित्ताने गावातील बर्‍याच तरुणांना रोजगारदेखील उपलब्ध होत असतो.शर्यतीच्या बैलांची खरेदी साधारण नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होत असते. खरेदी पावसाळ्यात कमी, पण दिवाळीच्या दरम्यान त्यामध्ये वाढ होते. सदर पशुबाजारात या पशुधनासह त्यासाठी लागणारे दोर, दोरखंड, पायातील, गळ्यातील, डोक्यावरील शोभेचे अलंकार, शर्यतीच्या बैलगाड्यांचे सुट्टे भाग विक्रीसाठी उपलब्ध असतात. विशिष्ट समाजातील मंडळी याचे उत्पादन करतात. ते सर्व अशा बाजारातून विक्री करत असतात. आपल्या राज्यातील काही बाजार विशिष्ट जनावराच्या खरेदी-विक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. उदाहरण द्यायचे झाले, तर सोनखेडा, सारंगखेडा (धुळे) अकलूज (सोलापूर) हे घोड्यांच्या व्यापारासाठी, जेजुरी (पुणे) आणि मढी (अहमदनगर) हे गाढवांच्या खरेदी-विक्रीसाठी, महूद, सांगोला, पंढरपूर, (सोलापूर) खरसुंडी, कवठेमहांकाळ (सांगली), माळेगाव (नांदेड) हे शर्यतींच्या बैलांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषत: पंढरपूर आणि खरसुंडी या ठिकाणी पुष्कळ पशुपालक आपल्याकडील दहा ते बारा महिने वयाची खोंडे खरेदी-विक्रीसाठी घेऊन येतात.

खोंड, बैल विक्री करणारे पैदासकार हे खरे तर गरीब पशुपालक. स्थानिक देशी जनावरांचे संगोपन करून त्यांची वासरे स्थानिक बाजारात विकत असतात. त्यातून आपला उदरनिर्वाह चालवीत असतात, गुजराण करत असतात. ही मंडळी बाजारातील एकूणच मागणीचा विचार करून त्या पद्धतीच्या गायी, खोंडे सांभाळून बाजारातील मागणीप्रमाणे पैदास घेतात व त्याची विक्री करतात. पैदासकारांच्या उत्पादनांची, खोंडांची विक्री जर झाली नाही, तर ते पोसत बसण्याचा खर्च या गरीब पशुपालक पैदासकारांना भोगावा लागतो.
 
हे पैदासकार पशुपालक शक्यतो गाईंची विक्री करत नाहीत, पण खोंडांची मात्र विक्री करतात. या व्यवसायात महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील पुष्कळ कुटुंबे आहेत, विशेषत: माण, खटाव (सातारा), आटपाडी, जत, खरसुंडी, (सांगली), सांगोला, पंढरपूर (सोलापूर) या भागात 20 ते 30 जनावरांचे कळप सांभाळून हा व्यवसाय करत असतात. आता या मूळ पशुधनाची संख्या 4-5वर येऊन ठेपली आहे, हे वास्तव आहे. एकूणच नैसर्गिक आपत्तीसह, बैलगाडी शर्यतीवरील बंदी हे मोठे कारण आहे. बैलगाडी शर्यतीवरील बंदीमुळे 40 ते 70 हजारात विक्री होणार्‍या खोंडाची विक्री आता आठ ते दहा हजारापर्यंत होत आहे. जर विकली गेली नाहीत तर मात्र त्यांचा सांभाळ करणे अवघड होते आणि मग नाइलाजाने वेगळ्याच कारणासाठी त्यांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
शर्यतीचा शौक असणारी मंडळी पैदासकार मंडळींकडून अकरा ते बारा महिन्याचे खोंड विकत घेतात. त्यांना विशिष्ट खाद्य आणि प्रशिक्षण देण्यास सुरुवात करतात. पौष्टिक हिरवी वैरण वाळलेल्या वैरणीसह, उडीद चुनी, शेंगदाणा पेंड, मका भरड, गहू, मोहरीचे तेल, दूध, अंडी अशा गोष्टींचा आहारात समावेश करतात. त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी नदीत व तलावात पोहणे, जंगलातून पळविणे, वाळूतून चालविणे असे व्यायाम प्रकार करून घेतले जातात. संपूर्ण काळजी घेऊन त्यांना चांगल्या वातावरणात ठेवतात. जी खोंडे पळणार्‍या खोंडांसारखे, बैलासारखे गुण दाखवतात, त्याप्रमाणे शरीराची ठेवण दिसून येते, त्या खोंडांना वेगळे काढले जाते आणि त्यांना विशिष्ट प्रशिक्षणासाठी निवडले जाते. खिलार, हल्लीकार, अमृतमहल या आणि त्यांच्या उपप्रकारातून अशा खोंडांची निवड केली जाते.
 
बैलगाड्या शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे निवडलेल्या गाय व खोंडापासून तयार झालेल्या खोंडांना निवडून त्यांना प्रशिक्षित केले जाते व शर्यतीसाठी त्यांचा वापर केला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या जोड्यांच्या माध्यमातून या शर्यतीसाठीच्या खोंडांचे संवर्धन केले जाते. त्याला प्रशिक्षित करताना विशिष्ट प्रकारचा आहार देऊन शर्यतीसाठी तयार केले जाते. या ठिकाणी नैसर्गिक संयोगाद्वारेच त्यांचे उत्पादन घेतले जाते. अशा खोंडांना सहा महिन्यांपासून अत्यंत काळजीपूर्वक व प्रेमाने प्रशिक्षण दिले जाते. त्याला घरातीलच एक प्रतिनिधी समजून वागणूक दिली जाते.

पूर्ण वाढ झालेला खोंड - सरळ उंच मान, विशिष्ट पद्धतीची शिंगे, तुकतुकीत कांती असणारा हा खिलार खोंड विविध यात्रा, जत्रा, उरूस या ठिकाणी पशुप्रदर्शनात सादर केला जातो. अशा प्रकारच्या संवर्धन करणार्‍या पशुपालकांच्या नजरेतून अशा विशिष्ट गुणाच्या आधारावर अशा खोंडांची निवड केली जाते. शर्यतीसारख्या संस्कृतिक व पारंपरिक खेळाद्वारे मनोरंजनासाठी त्याचा वापर केला जातो.


Bullock cart race Ban it
पशुवैद्य नियमितपणे अशा पाळीव जनावरांवर उपचाराबरोबर जनावरांचा स्वभाव, अनुवंशशास्त्र, पुनरुत्पादन, जीवरसायनशास्त्र, शरीरशास्त्र याचा अभ्यास करीत असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी बैलावर अत्याचार होणार नाही त्या ठिकाणी पशुवैद्य कोणता बैल शर्यतीत भाग घेऊ शकतो व कोणता नाही, त्याचबरोबर अंतर याबाबत निर्णय घेऊन मार्गदर्शन करू शकतो. आता शेतीचे यांत्रिकीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे पळू शकणार्‍या अशा प्रजाती - खिलार, गवळाऊ, हल्लीकार, डांगी, लाल कंधारी या प्रजाती आपण वापरात ठेवल्या नाहीत, तर नामशेष होण्याची भीती आहे. यामुळे ज्यांना पूर्वीपासून प्रशिक्षित करून शर्यतीसाठी वापर केला आहे, त्यांचा जर आपण कायदेशीरदृष्ट्या शर्यतीसाठी वापर केला, तर या प्रजाती टिकून राहतील. जीवविविधतासुद्धा टिकून राहील. एका अभ्यासानुसार प्रशिक्षित बैल, खोंड ज्या कारणासाठी प्रशिक्षित केले आहेत, ते काम करताना त्यांना त्रास होत नाही. त्यामुळे निश्चितच अशा प्रकारची कायदेशीर परवानगी मिळाल्यास एकूणच या प्रजाती टिकून राहतील.

गुरुवार, दि. 16 डिसेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी दिली आणि राज्यातील बैलगाडी शर्यतप्रेमींसह चालक-मालक यांच्यामध्ये एक आनंदाची लाट पसरली. माध्यमांनी रकानेच्या रकाने भरून त्याला प्रसिद्धी दिली. इतकेच काय, श्रेयासाठी राजकीय मंडळींची खूप धडपडही आपण पाहिली. एकंदरच हा विषयच असा होता आणि आहे. मागील सात वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून हा लढा सुरू आहे. प्रत्येकाचे योगदान खूप मोठे आहे. सामूहिक प्रयत्नातून यश मिळाले आहे, हे निर्विवाद सत्य आहे.

मधल्या काळात काही चुका निश्चितच झाल्या आहेत, हे सर्व जण मान्य करतील. स्पर्धा म्हटल्या की गैरप्रकार घडतात, त्यामुळे त्यांना शिक्षा होणे अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. या ठिकाणी शिक्षा ही सर्वांनाच धडा शिकविणारी ठरली. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा, प्राणिप्रेमींचा आग्रह आणि त्यामध्ये पीपल्स फॉर एथिकल ट्रीटमेंट टु अ‍ॅनिमल्स म्हणजे ‘पेटा’ या संस्थेचा सक्रिय सहभाग यामुळे न्यायालयातून बंदी आणली गेली. बंदी उठविण्यासाठी गेली सात वर्षे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रयत्न सुरू ठेवले. न्यायालय, राज्य सरकार, बैलगाडी शर्यतप्रेमी, माध्यमे, पशुसंवर्धन विभाग, राजकीय नेते मंडळींनी आपापल्या पद्धतीने यामध्ये सहभाग नोंदविला. मे 2014मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यावर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. प्रत्येक राज्याने आपापल्या पद्धतीने प्रयत्न सुरू केले. जलीकट्टू या खेळाबाबत तामिळनाडू राज्याने सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना राज्याच्या विधानसभेत कायदा संमत करून या घटनेला छेद देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कर्नाटक, महाराष्ट्र विधानसभेतदेखील एप्रिल 2017मध्ये कायदा संमत केला. राष्ट्रपतींची मंजुरी घेतली. परंतु पेटाने उच्च न्यायालयात पुन्हा आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान हा विषय सर्वोच्च न्यायालयात गेला. त्या ठिकाणी प्रलंबित तामिळनाडू व कर्नाटक राज्यांच्या याचिका एकत्र करून फेब्रुवारी 2018मध्ये त्या घटनापीठाकडे पाठविल्या. पुढे दि. 16 डिसेंबर 2021 रोजी निकाल लागून त्यावरील बंदी उठविण्याचा हंगामी आदेश दिला. हा तात्पुरता दिलासा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायला हवे.

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर पुन्हा सुनावणी होणार आहे. तामिळनाडू, कर्नाटक यांनी सर्वसमावेशक नियम, नियमावली करून तिथल्या राज्य सरकारने परवानगी दिली आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील 10 नोव्हेंबर 2017 रोजी नवीन नियमावलीची अधिसूचना जाहीर केली. त्याअंतर्गत बैलगाडी शर्यतीला मुभा मागितली आणि न्यायालयाने ‘एक देश एक शर्यत’ या मुद्द्यावर परवानगी दिली आहे, जी हंगामी व तात्पुरता दिलासा देणारी आहे. त्यामुळे हा न्यायालयीन निर्णय अबाधित ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे, अन्यथा कायमची बंदीदेखील येऊ शकेल.

दि. 10 नोव्हेंबर 2017च्या अधिसूचनेत प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा 1960मध्ये ‘बैलगाडी शर्यतीचे आयोजन नियम 2017’ या नावाने समाविष्ट केले आहेत. या अंतर्गत विहित नमुन्यात 15 दिवस आधी आयोजक व्यक्ती, संघटना किंवा संस्था यांनी पन्नास हजार रुपयांच्या बँक हमीसह परवानगीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे, शर्यतीत सहभागी होणार्‍या गाडीवानानेदेखील ओळखीच्या पुराव्यासह, बैलांच्या फोटोसह आयोजकांकडे विहित नमुन्यात अर्ज करणे, सहभागी वळू बैल यांची नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकाकडून तपासणी करून प्रमाणपत्र सादर करणे, 1000 मीटरपेक्षा जास्त अंतर न ठेवणे, धावपट्टी योग्य असणे, एका दिवसात तीनपेक्षा जास्त शर्यतीत भाग न घेणे, गाडीत एकच गाडीवान असणे, गाडीवानाकडे काठी, चाबूक, पिंजरी अशा बैलांना, वळूंना दुखापत किंवा इजा करू शकतील अशी साधने न बाळगणे, स्पर्धेच्या ठिकाणी सावली, निवारा, खाद्य, चारा, पाणी उपलब्ध करणे, नोंदणीकृत पदवीधर पशुवैद्यकांची पशुवैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका याची सुविधा उपलब्ध करणे, प्रेक्षकांच्या सुरक्षेचीदेखील व्यवस्था असावी. आयोजकांनी संपूर्ण शर्यतीचा अहवाल चित्रीकरणानंतर पंधरा दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक केले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी तदनंतर नियमांचे उल्लंघन झाले आहे किंवा कसे हे पाहून प्रतिभूती ठेव 50,000 रुपये आयोजकांना परत करतील. या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. उल्लंघन केल्यास पाच लाख रुपये दंड व तीन वर्षे कारावासाच्या शिक्षेची तरतूददेखील करण्यात आली आहे.

 
एकंदरच सुरुवातीला हे नियम खूप जाचक ठरतील, पण आपल्याला पाळावेच लागतील. त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घ्यायला हवा. विशेषत: आयोजकांनी या सर्व अटींचा व नियमांचा अभ्यास करून त्याप्रमाणे निर्णय अंमलबजावणीसाठी पुढे यावे लागेल. नियम व अटी तोडण्याच्या परिणामांची जाणीव संबंधितांना करून द्यावी लागेल. पोलीस, महसूल, पशुसंवर्धन विभागातील अधिकार्‍यांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत अवैध हस्तक्षेप आणि कायद्याचे उल्लंघन फार दूरगामी परिणाम करणारे ठरतील, हे लक्षात घ्यावे. आज प्रत्येकाच्या मोबाइलवर चित्रीकरण करण्याची सोय आहे. प्राणिमित्र, गावातील स्पर्धक यांचे खूप बारीक लक्ष राहणार आहे. मागील सात वर्षांची बंदीदेखील या चित्रफितीमुळेच आली, त्यामुळे आपण सर्वांनी या बाबतीत कुठेही तडजोड न करता नियमाचे पालन करावे लागेल. जिल्हास्तरीय सर्वसमावेशक समिती स्थापन करून समितीच्या मार्गदर्शनाखालीच या स्पर्धेचे आयोजन केल्यास चुका होणार नाहीत. सर्वांना न्याय मिळेल. उपस्थित शर्यतप्रेमी हा एक समूह असतो, तो नियंत्रित करण्यासाठी स्थानिक नेतेमंडळींनी पुढाकार घ्यावा आणि राज्यातील सर्व शर्यतींच्या माध्यमातून एक आदर्श निर्माण करावा, अन्यथा आपण या शर्यतीला कायमचे मुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
जाता जाता - या सर्व प्रक्रियेत पशुसंवर्धन विभागाची भूमिका खूप मोठी आहे. न्यायिक प्रक्रिया, सरकारी वकिलांना तांत्रिक माहिती पुरविणे, बैल आणि घोडा यांचा तुलनात्मक अभ्यास करून 200 पानांचा सादर केलेला अहवाल हा निर्णय होण्यास कारणीभूत ठरला आहे, हेही तितकेच खरे आहे.
 
 
सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त - पशुसंवर्धन, सांगली.
Powered By Sangraha 9.0