त्रिपुरात भाजपाचा दणदणीत विजय

विवेक मराठी    03-Dec-2021
Total Views |
त्रिपुरातील जनता भ्रष्टाचारमुक्त राज्यकारभाराचा अनुभव प्रथमच घेत आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा जमिनीवरचा कार्यकर्ता समूह जितका सक्षम आणि मजबूत असतो, तितका तो पक्ष अधिकाधिक उत्तमोत्तम कामगिरी करू शकतो, हे जागतिक सत्य आहे. काही वर्षांपूर्वी अस्तित्वही नसलेला भाजपा आता तळागाळात पोहोचला आहे. भाजपाची संस्कृती जनमानसांत मोठ्या आनंदाने स्वीकारली जाते आहे. 333 जागांपैकी 329 जागांवर भाजपाने मिळवलेला विजय ही त्याचीच पावती आहे.
त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या निकालांनी देशातील अनेकांवर अक्षरश: डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. कारण या निवडणुकीत भाजपाने 333 जागांपैकी 329 जागांवर विजय मिळवला आहे. सीपीआय (एम)ला केवळ 3 जागा, तर ममतादीदींच्या टीएमसीला केवळ 1 जागा पदरी पडली आहे. एक जागा टीआयपीआरए मोथा या स्थानिक पक्षाने जिंकली आहे आणि काँग्रेस तर खाते उघडण्यातही अपयशी ठरली आहे.


bjp_2  H x W: 0

भारतीय जनता पक्षाने न भूतो न भविष्यती असे मिळवलेले हे यश, हा निकाल अनपेक्षित असाच सुखकारक धक्का आहे. 2018 साली भाजपाला मिळालेल्या सत्तेनंतर गेली साडेतीन वर्षे ज्या प्रकारे राज्यकारभार केला जातो आहे, त्याची ही पोचपावतीच जनतेने दिली आहे. हे निकाल असे न लागता काही वेगळे झाले असते, तर राष्ट्रीय पत्रकारितेने ओरडून ओरडून भाजपाचे आणि मुख्यमंत्री बिप्लव कुमार देव यांचे वाभाडे काढावयास सुरुवात केली असती. पण इतक्या देदीप्यमान यशाबाबत मात्र त्यांची तोंडे शिवलेलीच राहणार आहेत. असो.

साडेतीन वर्षांपूर्वी जी विधानसभा निवडणूक झाली, त्यात माणिक सरकारचा दणदणीत पराभव करून भाजपा सत्तेत आली. डाव्या आघाडीचे सरकार जनतेने अशा प्रकारे उलथवून टाकल्यावर त्रिपुराच्या विकासाची गाडी मार्गक्रमण करू लागली. एखाद्या राज्याचा विकास स्थिर अशा राज्य सरकारमुळे होत असतो हे तर खरेच. पण केंद्र सरकारच्या बर्‍याच विकासात्मक योजना राज्य सरकार आपल्या राज्यात कसे राबवते, यावरही त्या राज्याची प्रगती मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या विकास, सुरक्षा, आरोग्य, जीवनस्तर उंचावणार्‍या अशा अनेक प्रकारच्या योजना राज्य सरकारांना राबवायच्या असतात. त्यासाठी मिळालेला निधी योग्य प्रकारे वापरायचा असतो. भाजपाच्या आधी केंद्रात काँग्रेस आणि राज्यात डावे माणिक सरकार होते. कम्युनिस्ट सरकार भ्रष्टाचारात लिप्त होते. लोकांच्या सुखदु:खाशी या दोघांनाही काही घेणेदेणे नसल्याने विकासाची गाडी सुरूच होऊ शकली नाही. केंद्रात भाजपा आल्यावरही लोकांपर्यंत योजना पोहोचू दिल्या जात नव्हत्या. हा इतिहास तर आपण जाणतोच.
 
राज्यात भाजपा सरकार आल्यावर केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार अशी - ज्याला डबल इंजीन सरकार म्हणतात, तशी परिस्थिती निर्माण झाली. काँग्रेसचे आणि डाव्यांचे पैसा-पॉवर-परिवार या त्रिसूत्रीत अडकलेले साटेलोटे विकासाच्या बाबतीत एकदम कुचकामी होते. भाजपाने मात्र साडेतीन वर्षांत राष्ट्रवाद-विकास-अंत्योदय या त्रिसूत्रीच्या माध्यमातून उत्तम कामगिरी बजावली आहे.

 
गेली दोन वर्षे तर कोरोनाचा मुकाबला करण्यातच निघून गेली. या लढतीतही त्रिपुरा सरकारची कामगिरी उल्लेखनीय आहे. चाचण्या आणि लसीकरण या दोन्ही बाबतीत त्रिपुरा ईशान्य भारतामधील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्राच्या सर्व योजना राज्य सरकारने लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवल्या. कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ दिला नाही. गरिबांच्या खात्यात पैसे पोहोचवणे, अन्नधान्य योजनेअंतर्गत योग्य वाटप करणे, स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नांमध्ये व्यवस्थित लक्ष घालून सर्व समस्या सोडवणे इत्यादी धोरणांच्या अंमलबजावणीत सरकारने उत्तम कामगिरी बजावली.
 
राज्यातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने ‘अटल जलधारा योजना’ सुरू केली आहे. या योजनेची प्रगती समाधानकारक आहे. इतक्यातच हाती आलेल्या या निवडणूक निकालातून हेच लक्षात येते की राज्य सरकारच्या कारभारावर जनता खूश आहे. मुख्यमंत्री बिप्लव देव, उपमुख्यमंत्री जिष्णू देबबर्मा आणि त्यांचे सहकारी यांच्या कामगिरीवर या निकालांद्वारेच लोकमान्यतेची मोहोर उमटली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर लोकांचा पूर्ण विश्वास आहे आणि जेव्हा हा विकास घराघरांत परावर्तित होऊ लागला, तेव्हा लोकांनी आपणहोऊन या धोरणाचा जोरदार पुरस्कार केला.
 

bjp_1  H x W: 0
 
ईशान्य भारत आणि मोदीजी यांचा एक सखोल, मजबूत तरीही नाजूक असा एक ऋणानुबंध आहे. स्वाभाविकपणे गेल्या सात वर्षांत ईशान्येतील विकासकामांवर खूप भर दिला गेला आहे. अर्थात भाजपाच्या आधी तिथे काहीच काम झाले नसल्याने तिथल्या राज्यांना इतर राज्यांच्या बरोबरीत आणण्यासाठीच या वेगवान आणि परिणामकारक योजना राबवण्याची फारच आवश्यकता आहे. या सर्व राज्यांत कोणी ना कोणी केंद्रीय पातळीवरून नियमितपणे भेट देत राहील याची व्यवथा यासाठीच केली गेली आहे. त्रिपुराच्या जनतेचे भविष्य बदलून टाकणार्‍या केंद्र सरकारच्या काही महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा या निमित्ताने घेऊ.

 
• सैनी नदीवर पुलाचे बांधकाम पूर्ण केल्यामुळे चित्तगाव बंदर अगदी जवळ आले आहे. त्यामुळे जलद मालवाहतूक होईल आणि व्यापारउदीम वेगाने वाढेल.

• महत्त्वाची विविध शहरे, तालुका ठिकाणे जोडणारे, 10500 कोटी रुपयांचे महामार्ग प्रकल्प सुरू झाले आहेत. या योजना पूर्णतेच्या विविध टप्प्यांवर आहेत.
 
• स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत आगरताळा येथे वेगाने विकास होत आहे. आगरताळा येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून पूर्ण झाला असून लवकरच त्याचे उद्घाटन होईल. त्रिपुरातील पहिला एसईझेड प्रकल्प सबरूम जिल्ह्यामध्ये आकार घेत आहे.
 
त्रिपुरातील जनता भ्रष्टाचारमुक्त राज्यकारभाराचा अनुभव प्रथमच घेत आहे. परंतु एखाद्या राजकीय पक्षाचा जमिनीवरचा कार्यकर्ता समूह जितका सक्षम आणि मजबूत असतो, तितका तो पक्ष अधिकाधिक उत्तमोत्तम कामगिरी करू शकतो, हे जागतिक सत्य आहे. त्यामुळे वरील गोष्टींच्या जोडीला गेल्या काही वर्षांत झालेली पक्ष संघटनेची मजबूत बांधणी खूप महत्त्वाची आहे. काही वर्षांपूर्वी अस्तित्वही नसलेला भाजपा आता तळागाळात पोहोचला आहे. भाजपाची संस्कृती जनमानसांत मोठ्या आनंदाने स्वीकारली जाते आहे. बूथप्रमुख, पन्नाप्रमुख अशा जबाबदार्‍या वाटून देण्यात आल्या आहेत. कार्यकर्ते जनतेची कामे नियमितपणे करत असतात. सर्व योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पक्षाविषयी जनतेमध्ये कायम सकारात्मकता निर्माण होईल यासाठी अथक प्रयत्न करत असतात. निवडणुकीत त्याचा फायदा होतोच होतो आणि तसा तो झाल्याचे जाणवले आहे.
 
या निकालांच्या बाबतीत आणखी एक विषय फार महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. त्रिपुराची 856 कि.मी.ची म्हणजे - 86% सीमा बांगला देशला लागून आहे. दोन देश म्हणून सीमा विभाजित असल्या, तरी समाज म्हणून यांचे जीवनमान एकाच स्वरूपाचे आहे. बांगला देशमधील अनेक हिंदू कुटुंबांचे नातेवाईक त्रिपुरामध्ये स्थायिक आहेत. बांगला देशातील हिंदूंच्या हत्या झाल्या, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले, मंदिरे तोडण्यात आली, दुर्गापूजेचे मंडप उद्ध्वस्त करण्यात आले. त्रिपुरातील त्यांच्या नातेवाइकांच्या मनात याबद्दल प्रचंड राग होता. तो राग या निकालांतून व्यक्त होणे अगदी स्वाभाविक होते. या दंगलींचा करताकरविता कोण, हिंदूंचा भक्षक कोण आणि रक्षक कोण, हे आता जनता चांगलेच जाणू लागली आहे.

बांगला देशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ मोर्चे निघाल्यानंतर विरोधकांनी खोट्यानाट्या बातम्या पसरवायला सुरुवात केली. वारंवार खुलासा होऊनसुद्धा हिंदूंची अवहेलना केली गेली, हिंदू समाजाला गुन्हेगार ठरवण्यासाठी भरपूर प्रयत्न झाले. महाराष्ट्रात मोठे राजकारण करण्यात आले. अमरावती, नांदेड, मालेगाव येथे हिंसक दंगली घडवल्या गेल्या.

मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, आपल्याबद्दल खोटा प्रचार करण्यात आला याचा जनतेच्या मनात दबलेला सारा राग, असंतोष मतदानाच्या दिवशी बाहेर आला आणि निकालातून देशाला कळला. बंगालमध्ये ममता सरकार आल्यानंतर जो काही हलकल्लोळ माजला, त्यात दोनशेहून अधिक भाजपा कार्यकर्त्यांच्या अमानुषपणे हत्या झाल्या आहेत, शेकडोंना मारहाण झाली आहे, कार्यालयांची जाळपोळ करण्यात आली आहे, महिला कार्यकर्त्यांवर बलात्कार करण्यात आले आहेत. त्रिपुरातील नागरिक हे सगळे जाणून आहेत. तृणमूल काँग्रेसच्या लाजिरवाण्या पराभवात याचेच रूपांतर झाले. असो.
अनेक मुस्लीमबहुल जागांवरसुद्धा भाजपा विजयी झाला आहे. या निवडणुकांसाठी भाजपाने अव्वल दर्जाची रणनीती वापरली, हे सिद्ध झाले असले तरी ज्या गावातील मशीद तोडली असा खोटा प्रचार करण्यात आला, ती जागाही भाजपाने जिंकली आहे. बोगस प्रोपागंडा करणार्‍यांना खरमरीत उत्तर मिळाले आहे.

अल्पसंख्याक समुदायाच्या जोरदार समर्थनाच्या जोरावर मुस्लीमबहुल वॉर्ड्समधूनदेखील भाजपाने मिळवलेल्या लक्षणीय यशाची ठळक उदाहरणे -

कैला शहरामधून मुस्लीमबहुल जनसंख्या असलेल्या अनेक वॉर्ड्सपैकी क्रमांक 3मधून भाजपाच्या रूआमन अली, तसेच 9 आणि 17मधूनदेखील भाजपाच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. कैला शहरामधून 17पैकी तब्बल 16 जागा भाजपाच्याच उमेदवारांनी पटकावल्या.
सोनामुरा नगर पंचायतीमधील सर्वच वॉर्ड्स मुस्लीमबहुल असून यातील सगळ्या (13) जागी भाजपाच्या उमेदवारांनी विरोधी पक्षातील उमेदवारांना पराभूत करून 100% निर्विवाद यश संपादन केले. यापैकी वॉर्ड क्रमांक 3मधून भाजपाच्या मुकसेदा बेगम, क्रमांक 9मधून रेणुआरा बेगम आणि क्रमांक 12मधून शाहजहां मियां यांसारख्या अल्पसंख्याक समुदायातील उमेदवारांनी विजय प्राप्त केला आहे.

आगरतळा नगर निगम (पंचायतीमधील) 51 जागांपैकी वॉर्ड क्रमांक 13, 26, 36 आणि 41 मुस्लीमबहुल असून त्यांच्या जोडीने सर्वच्या सर्व 51 जागांवर भाजपाच्या उमेदवारांनी निर्भेळ यश संपादन केले आहे. त्रिपुरात निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घटना आणि माध्यमांनी त्यांना दिलेले वळण यांच्या पार्श्वभूमीवर हे सर्वच निकाल बोलके आहेत.