83 ऐतिहासिक विजयाची कहाणी

विवेक मराठी    31-Dec-2021
Total Views |
 @प्रज्ञा जांभेकर
1983मध्ये भारतानं विश्वचषक मिळवत क्रिकेटच्या मैदानावर जे केलं, त्यामुळे पॉवर मॅट्रिक्समध्ये खेळाची समीकरणं पूर्णपणे बदलली. कबीर खान यांच्या ‘83’ या चित्रपटात जगज्जेत्या भारतीय संघाचा हाच प्रवास समाविष्ट आहे, ज्या प्रवासानं देशाला विश्वास ठेवायला शिकवलं. या क्रिकेटपटूंनी आपल्या अनोख्या प्रतिभेनं देशाच्या आत्मविश्वासाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.

83

ऑलिम्पिकमध्ये 1948 ते 1980 या कालावधीत हॉकीत मिळवलेल्या पाच सुवर्णपदकांमुळे भारत हे एक हॉकीप्रेमी राष्ट्र असल्याची प्रतिमा जगभरात तयार झाली होती. मात्र 25 जून 1983 रोजी क्रिकेटची पंढरी असलेल्या लंडनच्या लॉर्डस् मैदानावर, कपिल देवच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघानं, दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या वेस्ट इंडिजला हरवलं आणि भारताला क्रिकेटमधला पहिला विश्वचषक मिळवून दिला. 1983च्या आपल्या संघाचा अंतिम सामना त्या काळातला जवळजवळ अपराजित क्रिकेट संघ असलेल्या वेस्ट इंडीजच्या संघाशी झाला. त्यामुळे 1983मध्ये टीम इंडियाकडून काही अपेक्षाच नव्हत्या किंवा त्यांच्याकडून फारच कमी अपेक्षा होत्या. त्यामुळे विश्वचषक जिंकल्यानंतर भारताच्या क्रीडा जगतानं वेगळ्या अर्थानं कात टाकली. हे क्षण क्रीडा जगात अजरामर तर झालेच मात्र त्यानंतर भारताला क्रिकेटनं वेड लावलं आणि कदाचित भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा कायमचा बदलला.
 
 
1983मध्ये भारतानं विश्वचषक मिळवत क्रिकेटच्या मैदानावर जे केलं, त्यामुळे पॉवर मॅट्रिक्समध्ये खेळाची समीकरणं पूर्णपणे बदलली. अचानक भारत क्रिकेटमधला दिग्गज देश बनला. क्रिकेटमधला भारताचा सहभाग अधिकाधिक मोठा होत गेला. भारत क्रिकेटची सर्वात मोठी बाजारपेठ झाला. इतकंच नव्हे तर सरते शेवटी बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ जगातलं सर्वात श्रीमंत आणि सर्वात शक्तिशाली क्रिकेट बोर्ड बनलं.
 
 
पहिलं प्रेम विसरता येत नाही, अशा उत्कट भावना या विजयाबद्दल प्रत्येकाच्या मनात होत्या. या विजयाची अपेक्षा कोणी केली नव्हती, त्याचमुळे अनपेक्षित आनंदाचं वेगळेपण देशानं अनुभवलं होतं. 1983च्या विश्वचषक विजयामुळेच आपल्याला खेळण्याची प्रेरणा मिळाली, असं खुद्द सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज क्रिकेटपटूनं अनेकदा मान्य केलं आणि याबाबतीत तो लाखो लोकांपैकी एक आहे. जेव्हा कपिल देव आणि संघानं ही किमया करून दाखवली तेव्ही भारतीय क्रिकेटमधे ना पैसा होता, ना प्रसिद्धी, ना आतासारखी लोकप्रियता. त्यामुळेच आज 38 वर्षांनंतरही हा विजय आणि त्याविषयीच्या भावना ताज्या आहेत, त्याची ही कारणं आहेत. कबीर खान यांच्या ‘83’ या चित्रपटात जगज्जेत्या भारतीय संघाचा हाच प्रवास समाविष्ट आहे, ज्या प्रवासानं देशाला विश्वास ठेवायला शिकवलं. या क्रिकेटपटूंनी आपल्या अनोख्या प्रतिभेनं देशाच्या आत्मविश्वासाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलं.
 
 
83
1983च्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातल्या सामन्यात भारतानं पाच गडी गमावत फक्त 17 धावा केल्या होत्या. त्या दारूण परिस्थितीतून कर्णधार कपिल देव यांनी संघाला बाहेर काढलं. त्यानं ट्यूनब्रिज वेल्स इथं 138 चेंडूत 16 चौकार आणि सहा षटकार ठोकले. त्यांनी त्यांच्या मुंगूस बॅटनं नाबाद 175 धावा करत इतिहास रचला. दुर्दैवानं या सामन्याचं रेकॉर्डिंग उपलब्ध नाही. कारण बीबीसी या त्यावेळच्या एकमेव ब्रॉडकास्टरनं केलेला देशव्यापी संप. त्यामुळे लॉर्डस्वर झालेला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यातला सामनादेखील कॅमेर्‍यात रेकॉर्ड झालेला नाही, पत्रकारांनीही भारताच्या सामन्यापेक्षा या सामन्याला जाणं पसंत केलं होतं.
 
 
कपिल देव यांच्या या खेळीनं भारताचा केवळ दिवसच वाचवला नाही, तर संघाला गुणतालिकेत स्थान मिळवून दिलं. जगाच्या कानाकोपर्‍यातून त्यांचं कौतुक झालं. या संघाला मोठ्या प्रमाणात आदर मिळाला. क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रेसमधून आणि ज्यांनी आधीच या खेळामध्ये ठसा उमटवला आहे त्यांच्याकडून कपिल देव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. विश्वचषक जिंकण्याचा कर्णधाराचा हेतू मात्र तोपर्यंत तरी कोणीही गांभीर्यानं घेतला नाही ही वस्तुस्थिती चित्रपटातही वेगवेगळ्या टप्प्यावर दिसली. थोडक्यात छोटे-छोटे सुखाचे क्षण, लहान वाटणारं पण बोचरं दु:ख, शानदार विजय, वेदनादायक पराभव, प्रत्येक खेळाडूनं अनुभवलेली अंतर्गत उलथापालथ, त्यांचा वैयक्तिक प्रवास आणि बलाढ्य संघाला पराभूत करण्यासाठी स्वत:वर विश्वास ठेवू शकेल असा संघ बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, खेळाडूंना झालेली आत्मसन्मानाची जाणीव हेच ‘83’च्या यशाचं गमक आहे.
 
 
83
चित्रपटात पहिली काही मिनिटं कबीर खान चित्रपटातील पात्रांशी प्रेक्षकांची ओळख करून देतात. त्यासाठी त्यांनी हुशारीनं तयार केलेला पासपोर्ट क्रम वापरला आहे. चित्रपटाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी खर्‍या खेळाडूंच्या प्रतिमांसोबत चित्रपट कलाकारांच्या प्रतिमा जोडल्या आहेत. वस्तुस्थिती सांगण्यासाठी त्यांनी संवाद आणि हलक्याफुलक्या संभाषणांचादेखील वापर केला आहे. संशोधन अचूक असल्यानं चित्रपटातली दृश्यं मैदानावरील वास्तविक घटनांप्रमाणेच प्रभावी दिसतात.
 
 
रणवीर सिंगनं कपिल देव यांच्या बोलण्याची शैली अचूक उचलली आहे. कपिल देव यांचा नटराज शॉट रणवीर सिंग अचूकपणे खेळला आहे. त्यांची गोलंदाजी अ‍ॅक्शन आणि त्यांची देहबोलीही त्यानं लीलया पेलली आहे. कपिल देव यांच्या हातात विश्वचषक असल्याचा फोटो आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. या फोटोत दिसलेल्या भावना या चित्रपटातही पदोपदी जाणवतात हे या चित्रपटाचं यश आहे. कबीर खान यांनी पुन्हा एकदा स्वत:साठी एक उच्च मापदंड तयार केला आहे हे निश्चित.
 
 
संघाच्या विजयाबद्दलचा हा चित्रपट आहे. जसजसे तुम्ही खोलात शिरता तसतसं प्रत्येक अभिनेत्यानं स्वत:ला किती सहजतेनं प्रतिष्ठित क्रिकेटपटू म्हणून सादर केलं आहे याची प्रचीती तुम्हाला येत जाते. कुशलतेनं लिहिलेल्या पटकथेत याचं मूळ दडलेलं दिसतं. नाट्यमयता आणि भावना यांच्या सुंदर मिलाफाचं श्रेय चित्रपटाच्या लेखनसंघाला द्यायलाच हवं. त्यांनी अखंडपणे कथानक विणलं आहे. सूक्ष्म आणि समर्थ तांत्रिक कौशल्य हे आणखी एक वैशिष्ट्य. रणवीरच्या अभिनयाबरोबरच साकिब सलीम, ताहिर राज भसीन, अम्मी विर्क, हार्डी संधू, जतिन सरना, पंकज त्रिपाठी आणि बोमन इराणी यांनी चित्रपटाला चमक आणली आहे. हा चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित आहे आणि सिनेमॅटिक स्वातंत्र्य घ्यायला त्यात फारसा वाव नव्हता. तरीही एकुणात पैसा वसूल चित्रपट आहे यात शंका नाही.