पाकिस्तान पुन्हा अस्थिरतेकडे?

विवेक मराठी    04-Dec-2021   
Total Views |
 
 पाकिस्तानच्या निर्मितीला 70 वर्षे लोटली असली, तरी तेथे अद्यापही लोकशाही नावापुरतीच आहे. तेथे आजही पाकिस्तानी लष्कराच्याच हाती मुख्य सत्तासूत्रे आहेत. तेथे पंतप्रधानही लष्कराच्या मर्जीतलाच बसवला जातो. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांनाही लष्करानेच बसवले होते. परंतु गेल्या काही आठवड्यांत इम्रान खान आणि लष्कर यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे इम्रान यांची खुर्ची अस्थिर बनली आहे. त्यांना पदावरून हटवून पुन्हा नवाझ शरीफ यांना बसवण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत.

Pakistan_1  H x
पाकिस्तानची सत्तासूत्रे सांभाळल्यापासून पंतप्रधान इम्रान खान हे सातत्याने समस्येच्या गर्तेत आहेत. त्यांच्यावरील असुरक्षिततेचे सावट दिवसेंदिवस गडद होत जाताना दिसून आले आहे. वास्तविक पाहता, इम्रान खान यांना पाकिस्तानच्या लष्करानेच कठपुतळी बनवून पंतप्रधानपदाच्या खुर्चीत बसवले होते. त्या काळामध्ये नवाझ शरीफ निवडून येण्याची शक्यता खूप अधिक होती. पण त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली दोषी ठरवून तुरुंगात पाठवण्यात आले आणि इम्रान खान यांचा मार्ग मोकळा करण्यात आला होता. पंतप्रधान बनल्यानंतर इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यातील संबंध बराच काळ सुरळीत होते. परंतु इम्रान खान यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक समस्यांचा सामना करावाच लागला, कारण पाकिस्तानची आर्थिक स्थिती कमालीची ढासळली होती. आजघडीला पाकिस्तानात गरिबीचा आणि बेरोजगारीचा आकडा न भूतो न भविष्यती इतका प्रचंड वाढला आहे. हा देश आज आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अर्थात, यापूर्वीदेखील पाकिस्तान अशा प्रकारे भिकेकंगाल झालेला होता. पण ज्याला ‘बेलाउट पॅकेज’ म्हटले जाते, तशा प्रकारची आर्थिक मदत देण्यासाठी कोणी ना कोणी मोठा देश अथवा जागतिक पातळीवरील वित्तीय संस्था पुढे यायच्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांनी अनेकदा आर्थिक मदत देऊन पाकिस्तानला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढले आहे. परंतु या वेळी परिस्थिती फार भीषण आहे.


सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, इम्रान खान यांच्या कार्यकाळात पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंध कमालीचे ताणले गेले. परिणामी, आजवर सौदी अरेबियाकडून दिली जाणारी भरीव आर्थिक मदत मिळणे दुरापास्त झाले. दुसरीकडे, डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनल्यापासून अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानबाबत अत्यंत कडक धोरण स्वीकारले होते. आज जो बायडेन यांचीही भूमिका ट्रम्प यांच्याप्रमाणेच पाकिस्तानविषयी पूर्वीइतके ममत्व नसणारी आहे. त्यामुळे इम्रान खान यांना अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवताना अडचणी येत गेल्या. तशातच फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमध्ये पाकिस्तानचा समावेश झाला. या ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी इम्रान खान यांनी कोणतेही ठोस प्रयत्न केले नाहीत. दहशतवादाबाबत पाकिस्तानची भूमिका तशीच कायम राहिली. त्यामुळे पाकिस्तानचा समावेश आता ब्लॅक लिस्टमध्ये होतो की काय, अशा शक्यता निर्माण झाल्या. ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट झाल्याने पाकिस्तानमध्ये येणारी विदेशी गुंतवणूक कमालीची कमी होत गेली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या पाकिस्तानात गुंतवणूक करण्यास, व्यवसाय करण्यास तयार नाहीयेत. या सर्वांचा प्रतिकूल परिणाम पाकिस्तानी नागरिकांच्या जीवनस्तरावर झालेला आहे. प्रदीर्घ काळ लोकांना बेरोजगारीचा, गरिबीचा सामना करावा लागल्याने आंदोलनाच्या रूपाने याचे तीव्र पडसाद समोर येऊ लागले. या आंदोलनांमधील असंतोष, नागरिकांमधील संताप, चीड इतकी होती की इम्रान खान आता पळून जातात की काय असे वाटू लागले होते. पण पाकिस्तानचा सदासर्वकाळ मित्र असलेल्या चीन इम्रान खान यांना सातत्याने वाचवत गेला. चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीनने सुमारे 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आहे. या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. चीनची ही गुंतवणूक कर्जाऊरूपी आहे. आज ना उद्या हा पैसा पाकिस्तानला चीनला परत करावा लागणार आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्यावर त्यांनी पाकिस्तान चीनला अक्षरश: विकला असल्याचे, पाकिस्तान हा चीनचा गुलाम झाल्याचेही आरोप झाले. चीन हा वसाहतवादी देश असून पाकिस्तान हा चीनची वसाहत बनल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने इम्रान खान यांना त्याचाही रोष पत्करावा लागत आहे.

या सर्व बिकट परिस्थितीतून इम्रान खान कसे बाहेर पडणार, कोणता मार्ग काढणार याकडे सर्वांचे लक्ष असताना हे संकट आता आणखी गहिरे झाले आहे. याचे कारण म्हणजे इम्रान खान यांना ज्यांनी सत्तेवर बसवले आणि जनतेच्या क्षोभापासून ज्यांनी सदैव पाठीशी घालत त्यांचा बचाव केला, त्या पाकिस्तानी लष्कराबरोबरच इम्रान यांचा संघर्ष सुरू झाला आहे. हा वाद इतका पराकोटीला गेला आहे की, नुकतेच पाकिस्तानी लष्कराने थेट माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी चर्चा सुरू केली आहे! शरीफ यांना पुन्हा पाकिस्तानात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. थोडक्यात, इम्रान खान यांना पर्याय म्हणून पाकिस्तानी लष्कर आता शरीफांकडे पाहत आहे. अर्थातच ही इम्रान खान यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे.


Pakistan_1  H x
वाद का निर्माण झाला?
 
आता प्रश्न उरतो तो इम्रान खान आणि लष्कर यांच्यात वितुष्ट का निर्माण झाले? काही दिवसांपूर्वी आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संचालकपदावर कोणाची नियुक्ती करायची, यावरून इम्रान विरुद्ध लष्कर असा संघर्ष उद्भवला आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत आयएसआयच्या प्रमुखपदी फईज अहमद हे कार्यरत होते. त्यांचे इम्रान खान यांच्याशी सलोख्याचे संबंध राहिले आहेत. याच फईज यांना आयएसआयच्या प्रमुखपदी काही काळ ठेवावे, असे इम्रान खान यांचे म्हणणे होते. परंतु पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचा त्याला विरोध आहे, कारण फईज यांनी गेल्या काही दिवसांत दिलेल्या उघड मुलाखतीतून तालिबान, हक्कानी यांना उघडपणे समर्थन दर्शवले होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे अफगाणिस्तानात तालिबानचे शासन प्रस्थापित होण्यामध्ये फईज यांची मोलाची भूमिका राहिली आहे. या काळात फईज अफगाणिस्तानात तळ ठोकून होते. तालिबानचे मंत्रीमंडळ निवडण्यामध्येही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. परंतु या मंत्रीमंडळात 17 जण आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहेत. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा संंबंध उघडपणे जगापुढे आला. तालिबान हे पाकिस्ताननेच जन्माला घातलेले, वाढवलेले अपत्य असले, तरी आजवर पाकिस्तान छुप्या मार्गाने तालिबानला मदत करत होता. सार्वजनिकरित्या बोलताना पाकिस्तान नेहमीच तालिबानशी असणारे संबंध नाकारत राहिला आहे. परंतु फईज यांनी दिलेल्या उघड मुलाखतींमधून पाकिस्तान तालिबानला कशा पद्धतीने मदत करत आहे, हेदेखील स्पष्ट करण्यात आले. परिणामी, आयएसआयवर आणि पाकिस्तानी लष्करावर पुन्हा एकदा जगभरात टीका होऊ लागली. त्यामुळेच बाजवा यांना फईज नकोसे झाले होते. त्यांच्याऐवजी दुसर्‍या व्यक्तीची वर्णी लावण्याचा बाजवांचा विचार होता. यातून इम्रान खान आणि पाकिस्तानी लष्कर यांच्यात ठिणगी पडली. हा संघर्ष आता येणार्‍या काळात कोणत्या वळणावर जातो, हे पाहावे लागेल.
 
आजमितीला पाकिस्तानमध्ये लोकशाही आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तानने प्रदीर्घ काळ लष्करी हुकूमशाहीमध्ये घालवला आहे. आजही तेथे लोकशाही केवळ नावाला आहे. सत्तेची मुख्य सूत्रे तेथील लष्कराच्या हातातच असतात. अंतिम निर्णय लष्कराचाच असल्याने तेथे पंतप्रधानपदी लष्कराच्या मर्जीतल्या व्यक्तीचीच निवड केली जाते. त्यातूनही जर कोणी लष्कराच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केल्यास त्याला तुरुंगात जावे लागले आहे, देश सोडून जावे लागले आहे. नवाझ शरीफ यांच्याबाबत हेच घडले होते. लष्कराशी असणारा संघर्ष शरीफ यांना महागात पडला होता. त्यांना देश सोडून जावे लागले होते. पण आता पुन्हा एकदा लष्कराकडून त्यांंना पाकिस्तानात आणण्याचा डाव रचला जात आहे. थोडक्यात, नवाझ शरीफ असोत किंवा इम्रान खान, हे सर्व लष्कराच्या हातातील बाहुले आहेत.

अशा परिस्थितीत आता इम्रान खान यांनी पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपला पारंपरिक मित्र असलेल्या सौदी अरेबियापुढे गुडघे टेकले आहेत. त्यांनी 3 अब्ज डॉलर्सची मदत सौदीकडे मागितली आहे. ती न मिळाल्यास पाकिस्तान दिवाळखोर होण्याची शक्यता आहे. या दिवाळखोर परिस्थितीमुळे इम्रान खान यांची खुर्ची सध्या धोक्यात आली आहे.
लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत.