नर्मदालयातलं प्रश्नोपनिषद

विवेक मराठी    06-Dec-2021
Total Views |
@भारती ठाकूर 9575756141
आपला उपनयन संस्कार होणार या गोष्टीचं मुलांना फार अप्रूप होतं. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. मी मात्र संभ्रमावस्थेत होते. मी मुलांना ‘हो’ तर म्हणून बसले होते. पण असे काही कार्यक्रम वा कर्मकांड करणं हा माझा पिंड नाही. त्याची मला काही माहिती नाही. पण घडलं वेगळंच. अनेक मित्र-मैत्रिणींनी आणि काही परिचितांनी आम्हीच हा कार्यक्रम करतो असं म्हणत ही कल्पना प्रत्यक्षात साकारली. मुलंच या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होती. खास त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता. इतरांपेक्षा आम्ही वेगळे नाही ही भावना आता त्यांच्यात रुजली आहे.
 
RSS_1  H x W: 0
सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. नर्मदा किनार्‍यावरील लोकांसाठी काम करणार्‍या ‘नर्मदा समग्र’ संस्थेचा एक कार्यकर्ता आमच्या नर्मदालयाच्या वसतिगृहात ठेवण्यासाठी मध्य प्रदेशातील अलिराजपूर आणि बडवानी जिल्ह्यांल्या अतिदुर्गम प्रदेशातली नऊ वनवासी मुलांना घेऊन आला. सोबत मुलांचे पालकदेखील होते. मुलांपैकी कुणी अगदीच पाच-सहा वर्षांचे, तर कुणी आठ-नऊ वर्षांचे. भिल्ल, भिलाला आणि अथवा बारेलाया बोली भाषा बोलणारी ही मुलं हिंदी भाषेच्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ होती. भांबावलेल्या नजरेने आजूबाजूला पाहत होती. त्यांना न समजणार्‍या हिंदी भाषेत मी त्या कार्यकर्त्याशी अर्धा-पाऊण तास बोलत होते. इतका वेळ शांत बसायची सवय नसलेल्या त्या मुलांनी कंटाळून एकमेकांच्या वाढलेल्या केसांतील उवा काढायला सुरुवात केली. मुलांकडे निरखून पाहता लक्षात आलं की यांना अंगभर खरूजदेखील आहे. आता परीक्षेची वेळ माझी होती. मनाशीच हसत मी स्वत:ला म्हणाले, स्वीकार हे चॅलेंज.

ही मुलं नर्मदालयात कधी आणि कशी रुळली, स्वच्छ राहायला लागली, त्यांनी हिंदी भाषा कधी आत्मसात केली.. समजलंच नाही. अलिराजपूर आणि बडवानी जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागातील ऐंशी वनवासी मुलं सध्या नर्मदालयाच्या वसतिगृहात राहतात. ही मुलं आता मोठी झालीत. नर्मदालयात राहायला आली, तेव्हापासून आजवर भगवद्गीतेतील आठ अध्याय, आदिशंकराचार्यांची आणि स्वामी वासुदेवानंद सरस्वतींची अनेक स्तोत्रं मुखोद्गत झालीत. गेल्या पाच वर्षांपासून ते शास्त्रीय संगीतही शिकत आहेत. हार्मोनियम, तबला, ढोलकी, ड्रम यासारखी वाद्यं ते लीलया वाजवतात. त्यांना संस्कृत भाषेचीही विशेष आवड आहे. खूप काही अवांतरही ते वाचत असतात. सवड असेल तेव्हा मी त्या स्तोत्रांचा आणि भगवद्गीतेतल्या श्लोकांचा अर्थ मुलांना सांगते. शुद्ध, स्पष्ट उच्चार आणि खणखणीत आवाज यामुळे नर्मदालय बघायला येणार्‍या अनेकांकडून त्यांचं कौतुक होत असतं. कधीकधी मात्र या विद्यार्थ्यांना अगदी ‘सुशिक्षित’ लोकांचंही कुजकं बोलणं आणि टोमणे ऐकावे लागतात. “शूद्रांना संस्कृत शिकण्याचा अधिकार नाही. तुम्ही ताबडतोब हे भगवद्गीता वगैरे शिकवणं बंद करा” अशी मला या मुलांसमोरच तंबीदेखील मिळते. ही मुलं माझ्याकडे राहतात, स्वयंपाकघरात वावरतात, जेवण वाढतात म्हणून आमच्याकडे न जेवणारेही काही महाभाग आहेत. खरं तर या मुलांचं राहणीमान, आत्मविश्वास आणि सुशील वागणं पाहून कुणालाही त्यांची जात कळायचं कारण नाही. पण आडनाव सांगितलं की लगेच जात कळते. माझा लढा अथवा विरोध कुठल्याही जातिधर्माच्या लोकांशी नाही. फक्त आमच्या वसतिगृहातील या मुलांचा - किंबहुना कुणीही कुणाचाच हीन भावनेने जातिवाचक उल्लेख करू नये, एवढीच माफक अपेक्षा आहे.

मध्य प्रदेशातील निमाड क्षेत्रात अस्पृश्यता प्रचंड आहे. आजही हरिजन समाजाच्या लोकांना गावातल्या अनेक मंदिरांत प्रवेश नाही. त्यांना सार्वजनिक समारंभात वेगळं जेवायला बसवलं जातं. त्यांच्या घरच्या गौरींचं विसर्जन वेगळ्या ठिकाणी केलं जातं. अनेक गावांत न्हावी त्यांचे केसही कापत नाहीत. हे सगळं बघताना-अनुभवताना अनेकदा मन उद्विग्न होऊन जातं.

आजकाल आमच्या वसतिगृहातील विद्यार्थी भगवद्गीतेमधील एक श्लोक आणि त्याचा अर्थ रोज फळ्यावर लिहीत असतात. एके दिवशी गीतेच्या चौथ्या अध्यायातील ‘चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:।’ हा श्लोक लिहिला होता. चार-पाच मुलं दुपारी आणखी एक श्लोक घेऊन माझ्याकडे आली. तो श्लोक होता -
जन्मना जायते शूद्र: संस्कारात् भवेत् द्विज:।
वेद-पाठात् भवेत् विप्र: ब्रह्म जानातीति ब्राह्मण:।
 
 
मुलांनी मला त्याचा अर्थ विचारला. त्यांना अनेक प्रश्न होते. शूद्र म्हणजे काय? द्विज म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे काय? वगैरे. ‘संस्कारात् द्विज उच्यते’ असं जर आहे, तर आपल्याकडे येणारे काही लोक आम्हाला शूद्र का म्हणतात? आमचा उपनयन संस्कार झाला, तर आम्ही ब्राह्मण होऊ का? भगवद्गीता हा फक्त हिंदूंचा धर्मग्रंथ आहे का? त्यांच्या या प्रश्नोपनिषदाने मला भंडावून सोडलं होतं. एरवी आपापल्या कामात व्यग्र असणार्‍या या मुलांच्या मनात असं काही वादळ चालू असेल, अशी मला पुसटशीदेखील कल्पना नव्हती. खरं तर त्यांच्या या प्रश्नांना मी चांगलीच घाबरले होते.
 
बाळांनो, माझ्या बौद्धिक कुवतीनुसार तुमच्या एकेक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करते.
भगवद्गीता हा हिंदूंचा धर्म ग्रंथ आहे का?
 
मुळात धर्म म्हणजे religion नाही. धर्म म्हणजे जीवन जगण्याची पद्धती असं आपण म्हणू या. भगवद्गीतेत ‘हिंदू’ हा शब्द कुठेही नाही. ती सर्व मानवजातीसाठी आहे. धर्मग्रंथापेक्षाही ते मानसशास्त्रावरचं उत्कृष्ट पुस्तक आहे, असं मी मानते. हताश-हतबल झालेल्या अर्जुनाला अन्यायाच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त करणारं, कर्मयोग तसंच ज्ञानयोग, ध्यानयोग, भक्तियोग शिकवणारं ते पुस्तक आहे. अत्यंत छोटेखानी पुस्तक असूनही जीवनाचं सगळं सार त्यात आहे.

RSS_2  H x W: 0
शूद्र म्हणजे काय?
 
वर्णव्यवस्थेत ज्ञानदानाचं काम ब्राह्मणांकडे होतं, संरक्षणाचं काम क्षत्रियांकडे, व्यापार वैश्यांकडे तर स्वच्छता शूद्रांकडे होती. समाजाचे व्यवहार सुचारू पद्धतीने चालावे, म्हणून ती व्यवस्था होती. यात कुणालाही कमी लेखायचा उद्देश नसायचा. श्रमाला प्रतिष्ठा असेल तर शूद्र म्हणण्यात काही गैर नाही. एक लक्षात ठेवा - शूद्र आणि क्षुद्र यात फरक आहे.
द्विज म्हणजे काय? ब्राह्मणाला द्विज का म्हणतात?
 
 
द्विज म्हणजे ज्याचा दोनदा जन्म झाला आहे तो. ज्याचा उपनयन संस्कार होतो, म्हणजे मुंज होते त्याचा एकदा आईच्या उदरातून आणि दुसर्‍यांदा या उपनयन संस्कारानंतर जन्म झाला आहे असं लोक मानतात. म्हणून तो द्विज.

ब्राह्मणांना द्विज म्हणतात, कारण त्यांची मुंज झालेली असते. आमची मुंज झाली तर आम्ही द्विज अर्थात जातीने ब्राह्मण होऊ का?
मुलांच्या या प्रश्नाने मला हसू आलं. मी म्हणाले, “दोनदा जन्मले म्हणून कदाचित द्विज म्हणता येईल. पण जातीने ब्राह्मण नाही. फक्त जातीने ब्राह्मण बनून काय होणार? तुम्ही अर्थ विचारला आहे, त्या श्लोकातच याचं उत्तर आहे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. त्या दृष्टीने ब्राह्मण होण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता.

पण दीदी, ब्रह्म म्हणजे काय?
 
मला पुन्हा हसू आलं. थोडी भीतीही वाटली. इतके अवघड प्रश्न मला आजवर कुठल्याही मुलाखतीत विचारले नव्हते. उत्तर देणं तर आवश्यक होतं. तेही मुलांना समजेल असं.
 
बाळांनो, ब्रह्म ही भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. ‘ब्रह्म’ हा शब्द ऋग्वेदात अनेक वेळा आला आहे. ‘विश्वाच्या उत्पत्तीचं आद्यकारण’ असाही त्याचा अर्थ होतो.संस्कृत भाषेत ‘बृह’ म्हणजे वाढणं, मोठं होणं या धातूपासून ‘ब्रह्म’ शब्दाची व्युत्पत्ती दिली जाते. जे सतत वाढतच राहतं, ज्याला मर्यादा नाही, जे या विश्वाला व्यापून आहे ते ब्रह्म. असं ते परमतत्त्व. ते तत्त्व माझ्यात जसं आहे, तसंच चराचरातदेखील व्यापून राहिलं आहे. म्हणून आपल्या ऋषि-मुनींनी ‘अहम् ब्रह्मास्मि’ आणि ‘तत् त्वम् असि’ (मी तर ब्रह्म आहेच, पण तूही तेच आहेस) असं म्हटलं. ते ब्रह्म जाणणारा तो ब्राह्मण. त्याला फक्त ‘जात’ समजू नका. कुणी तुम्हाला कुत्सितपणे शूद्र म्हटलं तर गौतम बुद्धाची एक गोष्ट लक्षात ठेवा. एकदा गौतम बुद्धांना कुणीतरी खूप वाईट शिव्या दिल्या. गौतम बुद्ध मात्र शांत होते. त्यांच्या शिष्याने विचारलं, “तो माणूस कारण नसता तुम्हाला इतकं वाईट बोलतोय, तरी तुम्ही एवढे शांत कसे?” गौतम बुद्ध शांतपणे हसत म्हणाले, “त्यांनी भलेही शिव्या दिल्या असतील, पण मी त्या घेतल्या कुठे? मग मला रागवायचं काय कारण?”

मला वाटलं, आमचं प्रश्नोपनिषद संपलं. पण मांगीलालने पुन्हा एक प्रश्न विचारला -

जन्मना जायते शूद्र: संस्कारात् भवेत् द्विज:।
वेद-पाठात् भवेत् विप्र: ब्रह्म जानातीति ब्राह्मण:॥

असं जर असेल तर शूद्र, द्विज, विप्र आणि ब्राह्मण या ‘ब्रह्म’ जाणण्यासाठीच्या पायर्‍या आहेत का ?
 
मांगीलाल, ‘वेद’ शब्द संस्कृत भाषेच्या ‘विद्’ धातूपासून बनला आहे. विद् म्हणजे जाणणं. या दृष्टीने ‘वेद’ शब्दाचा अर्थ होतो ‘ज्ञान’. मग ते ज्ञान फक्त वेदांचंच असेल असं नाही. आजकाल विज्ञान इतकं प्रगती करतं आहे. नवनवीन शोध लागताहेत. अशा प्रकारचं ज्ञान संपादन करणारादेखील सध्याच्या युगात ‘विप्र’च गणला जाईल. ‘विप्र’चा अर्थ बुद्धिमान असाही होतो. तू म्हणतोस त्याप्रमाणे शूद्र, द्विज आणि विप्र या ‘ब्रह्म’ जाणण्याच्या दृष्टीने पायर्‍या असू शकतात.

या सार्‍या प्रश्नांची उत्तरं देताना मला खरं तर घाम फुटला होता. आमची दहावी-अकरावीतली मुलं असे काही प्रश्न विचारतील असं कधी वाटलं नव्हतं. मला अकरावीतच काय, पण आजवर असे प्रश्न कधी पडले नाहीत. पंख्याची गती वाढवलेली होती, तरी घाम पुसत मी उठले. मुलांनी आणखी काही अवघड प्रश्न विचारायच्या आत स्वत:ची सुटका करून घेण्याचा माझा उद्देश होता. पण पुन्हा एक सामूहिक प्रश्न आला -
आमचा उपनयन संस्कार होऊ शकतो का?
 
 
माझा कानांवर विश्वास बसला नाही. नकार द्यावा असं क्षणभर मनात आलं. या कर्मकांडाच्या भानगडीत आपण कशाला पडायचं? पण या मुलांनी गेल्या सहा वर्षांत माझ्याकडे काहीच मागितलं नाही. वयाने लहान असूनही कसला हट्ट केला नाही. त्यामुळे नकार देण्याचं धाडस झालं नाही. माझे डोळे भरून आले होते आणि कंठ दाटून आला होता. स्वत:ला सावरत मी “हो, करू या आपण तुमचा उपनयन संस्कार” एवढंच म्हणाले.

आमच्या या वनवासी मुलांचा ‘उपनयन संस्कार’ करण्याची कल्पना प्रसिद्ध कीर्तनकार आणि भागवत कथाकार श्रेयस बडवे यांनी उचलून धरली. 23 नोव्हेंबर 2021पासून नर्मदालयाच्या सभागृहात त्यांची भागवत कथा होती.

आपला उपनयन संस्कार होणार या गोष्टीचं मुलांना फार अप्रूप होतं. त्यांच्या उत्साहाला उधाण आलं. मी मात्र संभ्रमावस्थेत होते. मी मुलांना ‘हो’ तर म्हणून बसले होते. पण असे काही कार्यक्रम वा कर्मकांड करणं हा माझा पिंड नाही. त्याची मला काही माहिती नाही. आमच्या संस्थेच्या माध्यमातून असे कार्यक्रम करू शकतो का, हे माहीत नाही. खर्च झेपेल का? माहीत नाही. पण घडलं वेगळंच. अनेक मित्र-मैत्रिणींनी आणि काही परिचितांनी आम्हीच हा कार्यक्रम करतो असं म्हणत ही कल्पना प्रत्यक्षात साकारली. ताम्हण, पळी, पंचपात्र, तांब्ये ते मुंडावळ्या, निरांजन, फूलवाती, सोवळे-उपरणं आणि कुर्ते-पायजमे, नारळ-सुपार्‍या, जानवी इत्यादी सर्व वस्तू महाराष्ट्रातून आमच्यापर्यंत पोहोचल्या. कुणी मांडवाची आणि अन्नखर्चाची जबाबदारी उचलली, तर कुणी गुरुजींच्या दक्षिणेची.

एकूण 53 मुलं या उपनयन संस्कारासाठी तयार झाली. मुलांच्या आई-वडलांनी त्यासाठी संमती दिली. 24 नोव्हेंबर रोजी या मुलांचे आई-वडील नर्मदालयात पोहोचले. रात्री ढोल-ताश्यांच्या तालावर मुलं आणि त्यांचे आईवडीलच नाही, तर श्रेयसबुवा बडवे यांची भागवत कथा ऐकायला आलेले श्रोतेही मनसोक्त नाचले. एरवी त्यांचं वनवासी नृत्य या शहरी लोकांना कधी बघायला मिळालं असतं?

25 नोव्हेंबर 2021 रोजी लेपा येथील नर्मदालयात हा सोहळा पार पडला. स्वामी गोविंददेवगिरी महाराज यांचा आशीर्वादपर संदेशही मुलांसाठी आला. त्यांच्याच वेद पाठशाळेत शिकून आलेल्या शुभम् पंचभाई आणि त्यांच्या दोन सहकार्‍यांनी पौरोहित्य केलं. मुलांना कधी ऑनलाइन तर कधी प्रत्यक्ष येऊन संस्कृत शिकवणारी मुलांची खूप लाडकी ताई धनश्री लेले ठाण्याहून खास या सोहळ्यासाठी आली होती. उपनयन संस्काराच्या सोहळ्यानिमित्त एक आनंदोत्सव नर्मदालयात साजरा झाला. मुलांचे आईवडील आनंदून परत गेले.

नर्मदालयात दर वर्षी अनेक कार्यक्रम साजरे होत असतात. मग या कार्यक्रमाचं वेगळेपण काय होतं? गेले चार-पाच दिवस मी याचा विचार करत होते. नेहमीच्या कार्यक्रमांपेक्षा मुलं जास्त आनंदी का वाटताहेत? तर ही मुलंच या कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होती. खास त्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता. इतरांपेक्षा आम्ही वेगळे नाही ही भावना आता त्यांच्यात रुजली आहे.

हा उपनयन सोहळा आवश्यक होता की नाही, यावर अनेक मतमतांतरं असू शकतात. मीही संभ्रमावस्थेत होते. पण आज त्यांच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि सकाळ-संध्याकाळ त्यांना ‘संध्या’ करताना पाहून भरून पावल्याचं समाधान मात्र नक्कीच आहे.
 
 
 
-संस्थापक, नर्मदालय