शाश्वत विकासासाठी सोबत

विवेक मराठी    18-Feb-2021
Total Views |
@कपिल सहस्रबुद्धे 
krushi_5  H x W

2015मध्ये शाश्वत विकास उद्दिष्टांना मान्यता दिल्यावर त्यासाठीच्या व्यवस्था, निकष, कार्यक्रम ठरविण्यात गेली 5 वर्षे गेली. पूर्वीच्या कार्यक्रमांचा अनुभव आणि काही नवीन व्यवस्था यातून उद्दिष्टपूर्ती कशी होते आहे, त्यासाठी काय करायला हवे, आर्थिक स्रोत कोणते, कोणाला अधिक मदतीची गरज आहे अशा अनेक बाबी आता स्पष्ट झाल्या आहेत. या सगळ्याच्या आधारावर आता वेळ आली आहे झेप घेण्याची.


krushi_4  H x W

येणारे दशक कृतीचे

यासाठी 2020 साली संयुक्त राष्ट्रांच्या सभेने 2021 ते 2030 हे दशकशाश्वत कृतीचे दशकम्हणून जाहीर केले आहे. शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करावे यासाठी एक विशेष गतिमानता कार्यक्रम आणि त्याला मदत करण्यासाठीची SDG acceleration actions ही विशेष व्यवस्था उभारली गेली आहे. जगभरात चाललेल्या चांगल्या इतर ठिकाणी उपयोगी पडतील अशा उपक्रमाची माहिती सगळ्यांना व्हावी, यासाठी SDG Good Practices हा वेब प्लॅटफॉर्म तयार केला आहे. SDG HelpDesk ही साइट जगातील महत्त्वाच्या प्रयत्नांना एका जागी उपलब्ध करून देत आहे. कार्यक्रमांच्या मूल्यमापनाची एक व्यवस्थासुद्धा तयार केली आहे. Eval4-ction campaignच्या माध्यमातून तुम्हीसुद्धा याच्याशी जोडले जाऊ शकता.

पण हे सगळे आंतरराष्ट्रीय स्तरावर झाले. विविध लेखांत बघितल्याप्रमाणे देशपातळीवरही बरेच प्रयत्न सुरू आहेत. विविध कंपन्यांनीसुद्धा आपल्या रचना, उत्पादने, उत्पादन पद्धती यामध्ये बदल करत शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. सरकार आणि कंपन्या त्यांना जमेल तितक्या गोष्टी करणार आहेत. पण सरतेशेवटी हे सगळे तुमच्या-माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे. आपण व्यक्ती आणि समाज म्हणून या सगळ्याकडे कसे बघतो आणि आपल्या जीवनशैलीत काय बदल करतो, यावर बर्याच गोष्टी अवलंबून ठरणार आहेत. मग आपण प्रदूषण थांबविण्यासाठी फक्त सणवार आले की घोषणाबाजी करणार की वर्षभर आपल्या कृतीतून प्रदूषण थांबविण्यासाठी प्रयत्न करणार, हे जास्त महत्त्वाचे ठरते. येत्या काळात यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. काय असतील या पद्धती?

 

बंगळुरूच्या शाश्वत पाण्यासाठी 10 लाख विहिरी

बंगळुरू महानगरात पाणी प्रश्न उग्र होत चालला आहे. बोरिंगच्या पाण्यावर शहराचा मोठा भाग अवलंबून आहे. विकासाच्या लाटेत पारंपरिक तळी एकतर बुजविली आहेत किंवा प्रदूषित झाली आहेत. त्यामुळे पुढील काही दशकात बंगळुरूचे केप टाउन होईल का? अशी भीती तयार झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन शहराला शून्य पाणी उपलब्धता शहर म्हटले जातेय. तिथे सगळ्यांना पुरेल इतके पाणीच उपलब्ध नाहीये.

पण बंगळुरूमधील बायोम संस्थेने यावर एक चांगला उपाय काढला आहे. जर आपण बोरिंगवरच अवलंबून राहणार असू, तर त्याला बोल लावता जमिनीत पाणी कसे मुरेल यासाठी एका साध्या उपायावर त्यांनी 15 वर्षांपूर्वी काम सुरू केले. तो होता छोट्या पुनर्भरण विहिरी खोदायचा. गेल्या 15 वर्षांत त्यांनी 20 फूट खोलीच्या 1 लाखाहून जास्त विहिरी खोदल्या. आणि त्यांना खोदायच्या आहेत 10 लाख विहिरी. विशेष म्हणजे या विहिरी खोदण्यासाठी त्यांनी मदत घेतलीयमनु वडारया पारंपरिक विहिरी, तळी खोदणार्या समाजाची. बोरिंगमुळे याची पारंपरिक कला लोप पावत चालली होती. बायोमच्या प्रयत्नामुळे ही कलाही पुनरुज्जीवित झालीय आणि पाणी पुनर्भरणाचे कामही झालेय.

हे सगळे काम समाजाच्या पाठबळावर सुरू आहे. पण शहराची गरज आणि कामाची गती याचा मेळ घालायचा असेल, तर याची चळवळ होण्याची गरज आहे.


krushi_6  H x W 
 
 
 सामाजिक प्रयत्नावर अधिक भर

लोकशाही व्यवस्थेत सर्व प्रकारचे गट आणि हितसंबंध सतत कार्यरत असतात. त्यांचा धोरणकर्त्यांवर किती प्रभाव पडतो, यावर बरेचदा निर्णय ठरत असतात. त्याच वेळी लोकशाहीमुळे आपल्याला एकत्रित प्रयत्न करून धोरणकर्त्यांवर प्रभाव टाकण्याची संधीसुद्धा मिळते. त्यामुळे आपण सगळ्यांना एकत्र आणत एखाद्या उपयोगी गोष्टीसाठी जनमत तयार करू शकलो, तर नक्कीच त्याचे चांगले प्रभाव पडतात. नर्मदा आंदोलनाच्या रेट्यामुळे विस्थापन आणि पुनर्वसनासंबंधीचे धोरण आणि कायदा तयार झाला. त्यामुळे जे लोक विस्थापित होत आहेत त्यांना योग्य भरपाई मिळायला मदत झाली. असाच दुसरा प्रयत्न म्हणजे झिरो बजेट फार्मिंग. शेतीच्या परवडणार्या खर्चातून सुटण्याचा मार्ग सुभाष पाळेकरांनी दाखविला. आज 10 लाखाहून अधिक शेतकरी याचा उपयोग करतात. यांच्या रेट्याने आंध्र प्रदेशसारख्या राज्याने याचा विशेष कार्यक्रम सुरू केला, धोरणात समावेश केला. केंद्र सरकारनेही नुकताच यासाठी स्वतंत्र कार्यक्रम सुरू केला आहे.

 नव्या भागीदार्या

समाज कसा चालावा, याच्या आपल्या धारणा आहेत. त्यानुसार गोष्टी घडत असतात. पण शाश्वत विकासासाठी याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. शेतीचेच उदाहरण घेऊ या. शेतकरी पिकवितो, ते व्यापारी शहरी किंवा ग्रामीण भागातील इतरांपर्यंत पोहोचवितात. यामध्ये आज ना शेतकर्याला फायदा होतोय, ना ग्राहकाला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण काय खातोय याची आपल्याला काहीच कल्पना नाहीये. आंधळ्या विश्वासावर सगळे काही चालू आहे. शेतकरी बाजार, शेतातून तुमच्या दारात वगैरे कल्पना सुरू आहेत. पण त्यांच्या मर्यादा दिसत आहेत.

हैदराबादमधील 65 कुटुंबांनी याला छेद देण्यासाठी एक नवीन व्यवस्था सुरू केली. त्यांनी अन्नधान्ये पिकविणार्या शेतकर्याबरोबर भागीदारीच केलीय. 206 एकर शेतीमध्ये त्यांनी प्रतिएकर प्रतिवर्ष 10000 रुपये गुंतवायचे ठरविले आहे. दोन वर्षांपासून हा प्रयोग सुरू आहे. तेवढ्या रकमेचे अन्नधान्य या कुटुंबांना मिळते. या कुटुंबांना जमेल तेव्हा तेसुद्धा शेतात जाऊन काम करतात. शुद्ध हवेत जगण्याचा आनंदसुद्धा घेतात.

अशा नव्या भागीदार्यांचा विचार आपण करायला हवा आहे. प्रत्येक वेळी हाच मार्ग असेल असे नाही. पण आहे त्या चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार केला, तर नवीन मार्ग दिसतील, व्यवस्था तयार होतील. विचार करा - आज देशात 6 लाख खेडी आहेत आणि देशातील शहरी भागात लाखो सहकारी गृहरचना सोसायट्या आहेत. यातली प्रत्येक सोसायटीचे किमान एका खेड्याबरोबरटाय अपझाले, तर?


krushi_3  H x W
 

वैयक्तिक सामाजिक जबाबदारी

सामूहिक प्रयत्नाबरोबरच वैयक्तिक प्रयत्नाची जोडसुद्धा महत्त्वाची आहे. पूर्वी समाज ठरवायचा तसे लोक वागायचे. पण आता बदल झालेत. सगळीकडे व्यक्तिकेंद्रित व्यवस्था आणि जगण्याच्या पद्धती रुजल्या आहेत. त्यामुळे आपण आपले घर यांचे राहणेशाश्वत मूल्यआधारित आहे का? त्यासाठी जगण्याच्या पद्धतीत, वस्तू वापराच्या पद्धतीत, खरेदीच्या पद्धतीत आपण काही बदल केले आहेत का? सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपली विचारपद्धतीशाश्वततेचाविचार करेल अशा रितीने आपण बनवतो आहोत का? या गोष्टींचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरी भागात तर आपण याकडे तातडीने पाहायची गरज आहे.

पुण्यात 'sustainable living’ या नावाने एक गट कार्यरत आहे. त्याचे सभासद आपले जगणे पर्यावरणपूरक कसे बनविता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आमचा मित्र कुलदीप आणि अलोलिका पुरंदरे यांनी आपला पर्यावरणीय भार कमी व्हावा, म्हणून खूप साधे सोपे प्रयत्न केले आहेत. सर्वसंगपरित्याग करून जगणे असा याचा अर्थ मुळीच नाहीये. पण जगण्याचा विचार आणि आपण जगत असताना इतर कोणाचा जगण्याचा हक्क तर हिरावला जात नाहीये ना, एवढ्याने सुरुवात नक्की करू शकतो. जीवित नदीच्या माध्यमातून आदिती देवधरांनी मुळा-मुठा नद्यांना परतनदीबनवायची कंबर कसली आहे. व्यक्ती ते समष्टीचे चांगले उदाहरण लोकांसमोर ठेवत स्वत:पासून सुरू केलेला प्रयत्न आता एका चळवळीत रूपांतरित झालेत.

krushi_1  H x W 

हे जगण्यासाठी मदत व्हावी म्हणून नव्या व्यवस्था तयार होत आहेत. ऊर्जाबॉक्सच्या माध्यमातूनसोलर कुकिंगचा प्रचार-प्रसार त्यातून आरोग्यदायक खाणे, पर्यावरणपूरक शिजविणे असा दुहेरी फायदा करून द्यायचा प्रयत्न विशाखा चांदेरे करत आहेत. पूर्णम इकोव्हिजनच्या माध्यमातून जुन्या कपड्यांपासून उपयोगी ट्रेंडी वस्तू बनवून लोकप्रिय करायचे प्रयत्न राजेश मणेरीकर करत आहेत. ‘मृद्गंधया नावाने स्वतःचे अन्न शाश्वत पद्धतीने स्वतःच उत्पादन करण्यासाठी शेती प्लॉट भाड्याने देण्याचा सोशल एंटरप्राइज सुरू झालाय. या आणि अशा प्रकारच्या नव्या प्रयत्नांना आपण किती साथ देतो, यावर येणार्या काळात आपलेजगणेशाश्वत होणार का? हे ठरणार आहे.

ही वैयक्तिक सामाजिक जबाबदारी जेवढी बहरेल, तेवढा आपल्या येणार्या पिढ्यांवर याचा परिणाम होईल. 8-10 वर्षांपूर्वी पुण्यातील औंधमधल्या एका दगडखाणींतील कासवांचे संरक्षण करायला आजूबाजूच्या सोसायटीतील मुलांनी सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षे ती खाण बुजविण्यापासून वाचली गेली. जेवढे हे प्रयत्न मुलांचे आहेत, तेवढेच त्यांना प्रोत्साहन, मदत करणार्या पालकांचेही आहेत. त्यामुळे योग्य विचारांचा परिणाम मुलांच्या वागण्यावर निश्चितच होतो. तेच पुढे जाऊन शिक्षक, मोठ्या कंपन्यांचे अधिकारी, सरकारी अधिकारी, धोरणकर्ते, राजकारणी बनणार आहेत. आजोबा झाडे लावतील तर नातवंड फळे खातील ही म्हण आजही तेवढीच खरी आहे.

सेवाभावातून व्यवस्था

नंदुरबारला गेल्या 10 वर्षांपासून काही गावात जलदूत हा उपक्रम सुरू आहे. आपल्या गावातील पाऊस आपणच मोजायचा या विचारातून हे सुरू झाले. पण हे करताना हे काम मोबदला घेता, गावासाठी करायचे हा विचारही पुढे आला. याला लोकांचा पाठिंबाही मिळाला. गेले 8-10 वर्ष वेगवेगळे जलदूत गावासाठी ही मोजणी करत आहेत.

अशा सेवाभावी व्यवस्था ही भारतीय समाजाची विशेष परंपरा आहे. पूर्वी गावात पाऊसपाण्याचा अंदाज सांगणारे लोक असायचे. बाळंतिणीला सोडविणार्या दाया असायच्या, झाडपाल्याची औषधे देणारे वैदू असायचे. यांनी कधी पैसे घेतलेले ऐकलेय? कोणी आज्याने सांगितले, कोणी देवाचे काम, कुणी धर्माचे काम म्हणूनच हे करायचे. यामागे होतासेवाभाव’. आपण समाजाच्या उपयोगाचे काहीतरी करतोय आणि त्यासाठी मोबदला घेणे गैर आहे, ही वृत्ती. बदललेल्या जगात हे होऊ शकते का? तर होऊ शकते. शहरातही होऊ शकते. ट्रॅफिक कंट्रोल करणारे स्वयंसेवक शहरात असतात. ते आपला वेळ या कामासाठी विनामोबदला देत असतात. अशा व्यवस्थांचा विचार नव्याने करण्याची गरज आहे. जे लोक आज हे करत आहेत, त्यांना समाजात मानसन्मान देण्याची गरज आहे. शेवटी पाठीवर हात फक्त संकटातच का ठेवायचा, चांगल्या कामासाठीसुद्धा कौतुकाची थाप पडावी की!


krushi_1  H x W 

शुभस्य शीघ्रम

काही बाबतीत जेवढी लवकर कृती करू, तेवढी गरजेची असते. शाश्वत विकासाबाबत जाणून घेणे, आपल्या जीवनाशी त्याचा काय संबंध आहे याचा विचार करणे, आपले शासन त्यानुसार काही करत आहे का, आपल्या गावात-शहरात या दृष्टीने काही सुरू आहे का यावर लक्ष ठेवणे, अयोग्य काही सुरू असेल तर त्याविरुद्ध आवाज उठविणे हे सगळे आपल्यालाच करावे लागणार आहे. विकास आपला होत असतो, समाजाचा होत असतो. सरकारचा, राजकारण्यांचा, अधिकार्यांचा होत नसतो. त्यामुळे विकासाची पद्धत बदलली नाही, तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगायचे आहेत आणि बदलली तर त्याची फळेसुद्धा आपणच चाखणार आहोत. त्यामुळे निर्णय आपल्या हाती आहे.

हा विषय म्हटले तर अगदी आपल्या जवळचा, नाहीतर कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय परिषदांत अडकून पडलेला आहे. शाश्वत विकासासाठी जगभर आणि भारतात जे सुरू आहे, ते सोप्या प्रकारे समजावून सांगायचा प्रयत्न या लेखमालेत केला आहे. आचार्य अत्रे म्हणायचे की तुम्ही लिहिलेले लोकांना समजले नसेल, तर चूक तुमची असते, लोकांची नाही. या विषयाचेही असेच आहे. यातले जे समजले नसेल, त्याची जबाबदारी सर्वस्वी माझी आहे. एकूण लेखमाला, हा विषय, त्यातील लिखाण याबद्दल अनेकांनी वैयक्तिक संपर्क साधून मते कळविली, उत्साह वाढविला. लेखमालेचा प्रत्येक लेख वाचून त्याला वाचकाभिमुख बनविण्यासाठी प्राजक्ता बर्वे यांनी मदत केली. तुम्हा सगळ्यांचे आभार. त्या मानानेहॉटनसलेला विषय गेले 6 महिने लावून धरून तो योग्य स्वरूपात मांडल्याबद्दल सा. विवेकचे विशेष आभार.

इत्यल्पम

9822882011