श्रीरामप्रभूंच्या पदभ्रमणाचा महाराष्ट्रातला मागोवा

विवेक मराठी    18-Feb-2021   
Total Views |

अयोध्या ते रामेश्वर हा जो भारताचा सलग भूभाग आहे, त्यावर एकंदर 249 ठिकाणं अशी आहेत, ज्या ठिकाणी वनवासात असताना राम-लक्ष्मण-सीता किंवा नंतर फक्त राम-लक्ष्मण आले होते, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे किंवा शतकानुशतकं स्थानिक लोकांशी तशी श्रद्धा आहे. प्रस्तुत लेखात आपल्याला या 249 ठिकाणांपैकी शासकीयदृष्ट्या महाराष्ट्र प्रांतात असलेल्या ठिकाणांचाच विचार करायचा आहे.
jay shree ram_1 &nbs 

आपल्या पित्याच्या आज्ञेनुसार अयोध्येचा राजपुत्र राम वनवासाला निघाला. वास्तविक वनात जायचं म्हटल्यावर तो कोणत्याही वनात जाऊ शकला असता, पण त्याने थेट दक्षिणेची वाट धरली. विंध्य पर्वत आणि त्यातून उगम पावणारी नर्मदा नदी यांनी आपल्या भारत देशाचे दोन स्वाभाविक विभाग केले आहेत. विंध्याच्या उत्तरेचा मुख्यत: गंगा-यमुनांच्या मैदानी प्रदेशाने बनलेला तो उत्तर भारत किंवा उत्तरापथ आणि विंध्याच्या दक्षिणेकडचा, उत्तर भारतापेक्षा उंच पातळीवर असणारा तो दक्षिण भारत किंवा दक्षिणापथ म्हणजेच दख्खन किंवा डेक्कन. हे दख्खनचं खडकाळ पठार पश्चिमेकडून पूर्व समुद्राकडे उतरतं होत जातं. एखादी मोठी परात उपडी आणि एका बाजूला कलती करून ठेवावी, तसं ते भासतं.

राम अयोध्येतून बाहेर पडून उत्तरेकडच्या हिमालय पर्वताच्या पायथ्याशी असणार्या एखाद्या रमणीय वनातही चौदा वर्षं राहू शकला असता. पण रामाने वनवास पत्करणं हे साधं प्रकरण नव्हतंच मुळी. राम आणि त्याच्यासोबत लक्ष्मण आणि सीता हे दक्षिणापथाच्या रोखाने निघाले. अयोध्या हे ठिकाण आधुनिक भौगोलिक परिभाषेत आपल्या उत्तर प्रदेश या राज्यात येतं. तिथून बाहेर पडून राम-लक्ष्मण-सीता आजची बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड ही राज्यं ओलांडत दक्षिणापथात उतरले. दक्षिणापथात आजची थोडा मध्य प्रदेश, थोडा छत्तीसगड, थोडा ओदिशा, संपूर्ण महाराष्ट्र, आंध्र, तेलंगण, कर्नाटक आणि तामिळनाडू एवढी राज्यं येतात. हे तिथे महाराष्ट्रात नाशिक-पंचवटीत असताना रावणाने सीताहरण केलं. मग राम-लक्ष्मण आणखी दक्षिणेकडे जात, वानरराज सुग्रीवाच्या सेनेसह अखेर रामेश्वर या पूर्ण समुद्राच्या काठावरच्या ठिकाणी पोहोचले. हे ठिकाण आजच्या तामिळनाडू राज्यात येतं. इथून पुढे समुद्रावर सेतुबंधन करून लंकेवर स्वारी झाली.

अयोध्या ते रामेश्वर हा जो भारताचा सलग भूभाग आहे, त्यावर एकंदर 249 ठिकाणं अशी आहेत, ज्या ठिकाणी वनवासात असताना राम-लक्ष्मण-सीता किंवा नंतर फक्त राम-लक्ष्मण आले होते, असा वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे किंवा शतकानुशतकं स्थानिक लोकांशी तशी श्रद्धा आहे. प्रस्तुत लेखात आपल्याला या 249 ठिकाणांपैकी शासकीयदृष्ट्या महाराष्ट्र प्रांतात असलेल्या ठिकाणांचाच विचार करायचा आहे. अशी ठिकाणंदेखील एकंदर 51 आहेत. त्यांची उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने यादी अशी - 1) रामटेक, 2) रामगिरी, 3) सालबर्डी, 4) सुतीक्ष्ण आश्रम, 5) सप्तशृंगी, 6) टेकाडी, 7) राळेगाव, 8) उनकेश्वर, 9) जमदग्नी आश्रम, 10) माहूर, 11) रिठद, 12) लोणार, 13) शिंदखेड राजा, 14) नांगरतास, 15) सावरगाव, 16) जालना, 17) सीता न्हाणी, 18) जालना, 19) राक्षस भुवन, 20) अंकाई, 21) पाटोदा, 22) पिंपळनेर, 23) पंचवटी, 24) जनस्थान, 25) सीताकुंड, 26) रामसेज, 27) कुशावर्त, 28) रामकुंड, 29) प्रवरा संगम, 30) ठाण, 31) खाडगाव, 32) नांदूर, 33) नांदूर मधमेश्वर, 34) मध्यमेश्वर, 35) खांडगाव, 36) कायगाव, 37) टोका, 38) कायगाव टोक, 39) टाकेद, 40) वालुकेश्वर, 41) भाजे, 42) शिरूर, 43) सौताडा 44) भूम, 45) कुंथलगिरी, 46) येरमळा, 47) येडशी, 48) रामवरदायिनी, तुळजापूर, 49) घाटशिळा, तुळजापूर, 50) नळदुर्ग आणि 51) किनगाव.

आता आपण महाराष्ट्र प्रांताचा नकाशा घेऊन पाहू लागलो, तर असं दिसेल की हा मार्ग अगदी क्रमाने उत्तर-दक्षिण असा आहेच असं नव्हे, खूप इकडे-तिकडे झालेलं आहे, असं का बरं आहे?

याचं कारण शोधू गेल्यास आपण पुन्हा प्रभू राम वनवासाकरिता दक्षिणापथातच का उतरला, या प्रश्नाकडे येऊन पोहोचतो. कुलगुरू वसिष्ठांकडूनच पारंपरिक शस्त्र-अस्त्रविद्या प्राप्त केलेल्या कुमारवयीन रामाला विश्वामित्र ऋषी त्यांच्याकडची विशेष शस्त्र-अस्त्रविद्या देऊन प्रशिक्षित करतात ते उगीच नव्हे. इथेच याच टप्प्यावर राम त्याच्या समकालीन सर्व योद्ध्यांच्या वरच्या पातळीवर गेला आहे. यानंतर घडलेल्या दोन घटना - विश्वामित्रांच्या यज्ञरक्षणासाठी मारीच आणि सुबाहू या दोन बलाढ्य राक्षसांचा निकाल आणि साक्षात भगवान शंकराचं धनुष्य सहजतेने हाताळणं, यातून त्याचं इतर योद्ध्यांपेक्षा सरस असणं सिद्ध होतं.

आणि असा हा महाधनुर्धर राम आता दक्षिणेकडून आक्रमण करून दंडकारण्यात जनस्थानापर्यंत पोहोचलेल्या राक्षसांचा निकाल लावण्यासाठी निघालेला आहे. हे राक्षस स्त्रीला भोग्यवस्तूमानतात. हे राक्षस नरभक्षक आहेत. ते सद्धर्माचे आणि संस्कृतीचे शत्रू आहेत. अनिर्बंध भोग हीच त्यांची संस्कृती आहे. मात्र विज्ञान, तंत्रज्ञान, तंत्र, मंत्र, अस्त्र यांत ते अत्यंत निपुण आहेत. त्यांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा उच्छेद करणं हे सामान्य योद्ध्याचं काम नाही. त्यासाठी रामाने रिंगणात उतरावं, ही योजना महान राष्ट्रनिर्मात्या ऋषिमुनींनी बनवलेली आहे. सर्व भौतिक सुखसोईंचा आणि उपभोग साधनांचा त्याग करून हे ऋषिमुनी दंडकारण्यात ठिकठिकाणी आश्रम करून वसले आहेत.

राम-लक्ष्मण-सीता अयोध्येतून बाहेर पडून गंगापार झाल्यावर त्यांची पहिली भेट झालीय ती गंगा-यमुनांच्या संगमावरच्या प्रयाग क्षेत्री असणार्या भरद्वाज ऋषींशी. आज अलाहाबाद किंवा आता प्रयागराज या शहरात त्रिवेणी संगमापासून जवळच एका उंचवट्यावर, अगदी भर वस्तीत हा भरद्वाज आश्रम दाखवला जातो.

इथून पुढे भरद्वाजांच्याच सल्ल्याने रामप्रभूू प्रथम मंदाकिनी नदीच्या तिरावरील चित्रकूट इथे गेले. तिथून पुढचा सगळा प्रवासही वेगवेगळ्या नद्यांच्या किनार्याकिनार्याने, त्या नद्यांच्या काठी असलेल्या विविध महान ऋषींची दर्शनं घेत, त्यांच्याशी सल्लामसलत करत, असा झालेला दिसतो.

आता या घटनाक्रमात आजच्या महाराष्ट्र प्रांतातला पहिला टप्पा म्हणजे नाशिकजवळच्या सप्तशृंग गडाजवळ सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम. सुतीक्ष्ण ऋषी या परिसरात नेमके कुठे वास्तव्य करून होते, हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही. सुतीक्ष्णांच्या सल्ल्याने रामप्रभू पुढची तब्बल दहा वर्षं दंडकारण्यात वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत होते. तिथल्या तपस्वी जनांना भेटत होते. विविध नद्यांच्या काठी अगोदरपासूनच प्रसिद्ध असलेल्या तीर्थांवर पितृतर्पण करत होते, शिवपूजन करत होते. दहा वर्षांची ही भ्रमंती पूर्ण करून रामप्रभू पुन्हा सुतीक्ष्ण आश्रमात आले. मग त्यांच्याच सल्ल्याने ते गोदावरी काठावर जनस्थानाजवळ पंचवटी या ठिकाणी राहिले. आता योजनेचा अंतिम टप्पा जवळ आला होता. जनस्थानापासूनच राक्षसराज रावणाचे दंडकारण्यातले सेनाधिकारी खर आणि दूषण यांची हद्द सुरू होत होती.

पंचवटीत सीतेचं हरण झाल्यावर मात्र राम-लक्ष्मणांचा प्रवास सरळ दक्षिणेकडे झालेला दिसतो. महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे आजच्या कर्नाटक राज्यात असलेली अनेगुंदी-हंपी इत्यादी तुंगभद्रा नदीच्या खोर्यातला प्रदेश म्हणजे वानरराज वाली-सुग्रीव यांची किष्किंधानगरी. हा सगळा प्रदेश आज महाराष्ट्राबाहेर असल्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला त्याची चर्चा करण्याचं प्रयोजन नाही. फक्त कल्पना यावी म्हणून ही माहिती दिली.

आपल्या देशात तीर्थयात्रा करणं, हे फार प्राचीन काळापासून सुरू आहे. स्वत: रामप्रभूंनी नंतरच्या काळात आपल्या बंधूंसह अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याचा उल्लेख रामायणात आहे. महाभारतातली अर्जुनाची तीर्थयात्रा प्रसिद्धच आहे. शंकराचार्यांनी देशाच्या चार दिशांना चार मठ स्थापून चार धाम यात्रा सुरू केली. अलीकडच्या काळात ज्ञानदेव-नामदेव यांची उत्तरेतली तीर्थयात्रा, गुरू नानकदेवांची भारतासह पार मक्का-मदिनेपर्यंतची यात्रा, एकनाथ महाराजांची काशीची कावड रामेश्वरला आणि रामेश्वरची वाळू काशीला नेणारी यात्रा, समर्थ रामदासांचं तब्बल बारा वर्षांचं भारतभ्रमण आणि स्वामी विवेकानंदांचं भारतभ्रमण प्रसिद्ध आहे. यापैकी कुणीही आपल्या भ्रमणाच्या नोंदी वगैरे ठेवलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी रामप्रभूच्या पदभ्रमण मार्गाने अयोध्या ते रामेश्वर प्रवास केला होता का, हे आज आपल्याला कळायला मार्ग नाही.

अगदी अलीकडे - म्हणजे 1991-92 साली पुण्यातले एक प्रसिद्ध सर्जन डॉ. सुरेश विश्वनाथ भावे यांनी प्रथम असा प्रवास करून त्यांच्या नोंदी केल्या. डॉ. भावे स्वत: हौशी वैमानिक होते. त्यांनी स्वत:च्या खाजगी बीचक्राफ्ट बोनान्झा या फोर सीटर विमानातून लंका ते अयोध्या असा प्रवास केला. रावणवधानंतर रामप्रभू पुष्पक विमानातून लंकेहून अयोध्येला आले. वाटेत ते आकाशातून जमिनीवर दिसणार्या अनेक ठिकाणांची माहिती सीतामाईला देत होते. ती सर्व ठिकाणं पडताळून पाहणं, त्यांची छायाचित्रं काढणं हा डॉ. भाव्यांचा उद्देश होता. त्यांनी ही ठिकाणं जशी आकाशातून पाहिली, तशीच जमिनीवरूनही पाहिली. त्यांनी याकरिता प्रमाण म्हणून वाल्मिकी रामायण आणि महाकवी कालिदासाचं रघुवंश हे काव्य समोर घेतलं. डॉ. भाव्यांना असा सुखद धक्कादायक अनुभव आला की, वाल्मिकी आणि कालिदास यांनी वर्णन केलेली जवळपास सगळी ठिकाणं थोड्याफार फरकाने आजही शाबूत आहेत. त्यातही कालिदासाची वर्णनं आकाशातून केल्याप्रमाणे तंतोतंत जुळतात, तर वाल्मिकींची वर्णनं पदभ्रमण केल्याप्रमाणे जुळतात. डॉ. भाव्यांनी आपली ही निरीक्षणं नोंदवून प्रसिद्ध केली आणि वर्षा-दोन वर्षांतच त्यांचं अचानक निधन झालं. त्यांनी त्या वेळी स्वत: प्रकाशित केलेल्या, ‘रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरलेया शास्त्रीय पुस्तकाची नवी आवृत्तीभारतीय विचार साधना, पुणेयांनी हल्लीच प्रकाशित केली आहे. प्रत्येक रामभक्ताने हे पुस्तक अवश्य वाचावं.

दुसरे अधिक सर्वंकष अभ्यास करणारे विद्वान म्हणजे दिल्लीचे डॉ. राम अवतार शर्मा. भारत सरकारच्या आयकर खात्यात अधिकारी असणार्या डॉ. शर्मांनी ध्यास घेतला की, अयोध्या ते रामेश्वर हा रामप्रभूच्या पदभ्रमणाचा मार्ग स्वत: शोधून काढायचा. हा माणूस सायकल, स्कूटर, रिक्षा, मोटार.. मिळेल त्या वाहनाने पुढे सरकत राहिला. त्यांनी शेकडो किलोमीटर अंतर पायीसुद्धा काटलं. या प्रवासासाठी त्यांनी वाल्मिकी रामायण आणि संत तुलसीदास यांचं रामचरितमानस प्रमाण धरलं होतं. जवळपास अर्धा भारत देश ओलांडणार्या या प्रवासात डॉ. शर्मांना साधू, संत, सज्जन, भाविक यांच्याबरोबरच स्थानिक गुंड आणि नक्षलवादीसुद्धा भेटले. वाल्मिकी आणि तुलसीदास यांनी उल्लेख केलेली बहुतेक ठिकाणं त्यांना सापडली, शिवाय उल्लेख नसलेली, पण प्रभू राम इथे आले होते, राहिले होते अशी स्थानिक जनतेची परंपरागत श्रद्धा असलेली ठिकाणंसुद्धा त्यांना सापडली. काही ठिकाणं सापडली नाहीतसुद्धा. उदा. सप्तशृंग गडाजवळ सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम होता, असा उल्लेख आहे. नाशिकजवळ वणीची सप्तशृंगीदेवी प्रसिद्ध आहेच, पण त्या परिसरात सुतीक्ष्ण ॠषींच्या आश्रमाचं नेमकं ठिकाण आज कुणालाच माहीत नाही.

डॉ. राम अवतार शर्मा यांच्या या पदभ्रमण नोंदी आणि चित्रं यांचं सुंदरकॉफी टेबलआकाराचं पुस्तकच दिल्लीच्याश्रीराम सांस्कृतिक शोध संस्थान न्यासया संस्थेने काढलं आहे. संस्थेने या विषयाला धरून नकाशा, भव्य चित्रप्रदर्शन, सी.डी. इत्यादी प्रकाशित केलं आहे. यात स्वारस्य असेल तर ीहीळीर्राींरपूरीींर.लेा या वेबसाइटवर जाऊन पाहा.

हा पदभ्रमण मार्ग शोधताना डॉ. शर्मांना आलेले अनुभव विलक्षण आहेत. त्यांना रामायणाचा अभ्यास करणारे एक मुस्लीम विद्वान भेटले. त्यांचं नाव आहे हयातुल्लाह चतुर्वेदी. किती वैशिष्ट्यपूर्ण नाव आहे! तर या हयातुल्लाह यांच्या मते रामायण ही घटना या देशात आजपासून 23 लाख वर्षांपूर्वी घडून गेली आहे.

ते कसंही असो. मराठी रामभक्तांसमोर असं एक कार्य आहे की, मराठी भाषेत संत एकनाथ, समर्थ रामदास, कवी मोरोपंत यांनीही आपापली रामायणं लिहिलेली आहेत, त्या सगळ्यांमधून भौगोलिक स्थळांचा अभ्यास करून, आजच्या महाराष्ट्र प्रांतात त्यातील काही स्थळनिश्चिती करता येते का, हे पाहणं. यात साहित्य अभ्यासक, भूगोल अभ्यासक, पदभ्रमण करणारे समूह, हौशी वैमानिक आणि धर्म-अध्यात्म साधक अशा सर्वांचाच सहभाग असावा. आपल्या रामभक्तीला अशा रितीने एक नवा आयाम जोडता येईल.