दर वर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची आणि त्याच तोलाच्या अन्य पुरस्कारांची घोषणा केली. पुरस्कार घोषित झालेल्यांपैकी काही व्यक्ती तर प्रसिद्धीपासून कैक योजने लांब राहून, अबोलपणे हाती घेतलेले कार्य करण्यात मग्न आहेत. त्यांचे काम या पुरस्कारामुळे सर्वांसमोर यायला मदत झाली. यंदाच्या सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन आणि त्यांच्या कामाविषयी आदर व्यक्त करताना, त्यांच्यापैकी काही जणांची दखल थोडी विस्ताराने...
2014 ते 2019 या काळात लोकसभाध्यक्ष म्हणून अतिशय उत्तम कामगिरी करणार्या आणि सर्वाधिक वेळा लोकसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या सुमित्राताई महाजन यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मूळच्या महाराष्ट्रातील कोकणातल्या असलेल्या सुमित्राताई विवाहानंतर इंदूर इथे गेल्या. 1984मध्ये इंदूर महापालिकेत उपमहापौरपदापासून सक्रिय राजकीय सहभागाला सुरुवात झाली. 1989पासून सलग 8 वेळा एकाच मतदारसंघातून लोकसभेवर खासदार म्हणून त्या निवडून गेल्या, हाही एक विक्रमच आहे. सर्वाधिक काळ लोकसभेत असलेल्या त्या महिला राजकारणी आहेत, हे आवर्जून नोंदवण्याजोगे. विरोधी पक्षात असतानाही लोकसभेत विविध विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी करणे, एखादा विषय लावून धरणे हे सुमित्राताईंचे वैशिष्ट्य. 6 जून 2014 रोजी लोकसभाध्यक्ष म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाली. या अतिशय संवेदनशील, जबाबदारीच्या पदावर काम करताना त्यांनी स्वत:तल्या तटस्थ वृत्तीचे आणि कणखरपणाचे दर्शन घडवले. पद्मभूषण पुरस्कार हा त्यांच्या कार्याचा उचित गौरव आहे. विवेक समूहाकडून त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!
भटके आणि विमुक्तांच्या उत्थानासाठी अवघे आयुष्य समर्पित करणारे गिरीश प्रभुणे हे विवेक परिवारातील. सामाजिक समरसता मंचाचे संघटनमंत्री म्हणून काम करत असताना भटके-विमुक्तांच्या जगण्याचे त्यांना जवळून दर्शन झाले आणि मग त्यांच्यासाठी काम हा त्यांचा एकमेव ध्यास झाला. यमगरवाडी इथे भटके-विमुक्त विकास परिषदेच्या पारधी आणि अन्य भटके जमातीतील मुलांसाठी आकाराला आलेल्या शैक्षणिक प्रकल्पात त्यांचे मोठे योगदान आहे. त्याचबरोबर चिंचवड येथे भटके-विमुक्तांच्या मुलांसाठी त्यांनी उभारलेला ‘समरसता गुरुकुलम’ शैक्षणिक प्रकल्प हा त्यांच्यातल्या द्रष्टेपणाची साक्ष देणारा आहे. या मुलांना औपचारिक शिक्षण देतानाच त्यांच्या वाडवडिलांकडून वारशाने मिळालेल्या कलाकौशल्याला आकार देण्याचे, प्रशिक्षित करण्याचे काम गुरुकुलम्मध्ये होते. सामाजिक कामाबरोबरच गिरीश प्रभुणे यांनी या विषयासंदर्भात केलेल्या सातत्यपूर्ण, दर्जेदार लेखनामुळे ते लेखक म्हणूनही महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्या या लेखनाची सुरुवात साप्ताहिक विवेकपासून झाली, हे आवर्जून नोंदण्याजोगे. रसाळ लेखनशैलीमुळे भटके-विमुक्तांचे प्रश्न, त्याची व्याप्ती वाचकांपर्यंत पोहोचली. सामाजिक समरसता शब्दश: जगत असलेल्या गिरीश प्रभुणेंचा पद्मश्री पुरस्काराने गौरव होणे ही विवेकसाठी आनंदाची, अभिमानाची बाब आहे.
गावकुबाहेरच्या स्त्रीची वेदना साहित्यातून मांडणारे सुप्रसिद्ध साहित्यिक नामदेव कांबळे यांना जाहीर झालेला पुरस्कार हा समरसतेच्या चळवळीतल्या सच्च्या कार्यकर्त्याचा झालेला सन्मान आहे. आपल्या साहित्यातून वंचितांचे प्रश्न मांडताना त्यांचे विचार कधी एकांगी नव्हते, हे विशेष नमूद करण्याजोगे. दलित साहित्याला वेगळे परिमाण आणि उंची देणार्या नामदेव कांबळे यांचा गांधी-आंबेडकर यांच्यावरील वैचारिक ग्रंथही प्रकाशित झाला आहे. हे लेखन त्यांच्या समन्वयवादी दृष्टीकोनाची साक्ष आहे. याआधी ‘राघववेळ’ कादंबरीसाठी मिळालेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या नामदेव कांबळे यांनी समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होतेे. तसेच आयुष्यभर शिक्षकी पेशात असलेल्या कांबळे यांनी फडणवीस सरकारच्या काळात बालभारतीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. प्रगल्भ सामाजिक जाणिवेच्या या साहित्यिकाला मिळालेला पुरस्कार निश्चितच अभिनंदनीय आहे.
महाराष्ट्रातच नव्हे, तर या राज्याच्या सीमा ओलांडून ज्यांची कीर्ती ‘अनाथांची माउली’ म्हणून पसरली आहे, अशा सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. अतिशय खडतर आयुष्य वाट्याला आलेल्या सिंधुताईंचा प्रवास आणि वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करत त्यांनी अनाथ मुलांसाठी केलेले भरीव कार्य विलक्षण प्रेरणादायक आहे. पुरस्काराच्या रूपाने केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली, असे म्हणता येईल. सिंधुताईंचे या पुरस्काराबद्दल अभिनंदन.
मूळचे नागपूरचे आणि गेली अनेक वर्षे केरळच्या वायनाड येथील निबिड जंगलात वनवासींसाठी रुग्णालय चालवणारे डॉ. धनंजय सगदेव यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. बालपणापासून संघस्वयंसेवक असलेले डॉ. सगदेव स्वामी विवेकानंद मेडिकल मिशनच्या माध्यमातून गेली 40 वर्षे वायनाडमध्ये वनवासींच्या आरोग्य सुधारणेसाठी काम करत आहेत. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या निरपेक्ष, निरलस आरोग्य सेवेची सरकारने घेतलेली दखल आहे. या निमित्ताने डॉ. सगदेव यांचं काम अनेकापर्यंत पोहोचेल, असा विश्वास वाटतो. त्यांच्या कार्याला विवेक समूहाच्या वतीने प्रणाम आणि पुरस्काराबद्दल अभिनंदन.
गलवान खोर्यात चिनी आगळिकीचा सामना करताना हौतात्म्य पत्करलेले कर्नल संतोष बाबू यांना महावीर चक्र सन्मान जाहीर झाला आहे. या वेळेस चिनी आगळिकीला सडेतोड उत्तर देताना चीनचे 30हून अधिक सैनिक ठार झाले. मात्र संतोष बाबू यांच्यासारखा मोहरा गमवावा लागला. त्यांच्या बलिदानाची उचित दखल सरकारने घेतली, याचे समाधान आहे.