क्षयरोगाला हरवणं सामूहिक प्रयत्नाने शक्य

विवेक मराठी    22-Feb-2021
Total Views |
@डॉ. नितीन गादेवाड

मनुष्यजातीला मागील शेकडो वर्षांपासून भेडसावणारा, काहीसा दुर्लक्षित राहिलेला, परंतु दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत चाललेला आजार म्हणजे संसर्गजन्य जीवाणूपासून होणारा ‘क्षयरोग’. या रोगावरचे निदान करू शकतील व तो पूर्णपणे बरा करू शकतील अशी साधने उपलब्ध असतानाही दिवसेंदिवस टीबीचे प्रमाण वाढून अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे टीबी समजून घेणे व त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य बनले आहे. या लेखातून हेच समजून घेण्याचा प्रयत्न.

tb_1  H x W: 0

2020 हे वर्ष कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे उद्भवलेल्या संकटाच्या सावटाखाली गेले. भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला, त्यालाही आता एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आपण आजही पूर्णपणे या संकटातून बाहेर पडलोय अशी स्थिती नाही.
कोरोनामुळे आपले संपूर्ण जनजीवन ढवळून निघाले आहे. मागील वर्षभरामध्ये आमच्या आचारविचारामध्ये, व्यवहारामध्ये आपण आमूलाग्र बदल अनुभवतो आहोत. कोरोनाने आम्हाला काय शिकवले.. इथपासून ते कोरोनानंतरचे जग कसे असेल अशा विषयांवर समाजमाध्यमांमध्ये, विविध सामाजिक व्यासपीठांवर चर्चा होताना आपण बघतो आहोत. स्वातंत्र्यानंतर कधी नव्हे ते आरोग्य हा विषय आपल्या शासनव्यवस्थेच्या प्राधान्यक्रमामध्ये आला आहे. नुकत्याच सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पामध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले.
 
 
अनपेक्षितरित्या समोर आलेल्या कोरोनाच्या संकटाला योग्य वेळी योग्य निर्णय घेत ज्या धीरोदात्तपणे आपण सामोरे गेलो, ते कौतुकास्पद आहे. जगभरातील अनेक नावाजलेल्या संस्था/संघटना या कोरोना भारतामध्ये कसे थैमान घालेल, लाखो लोक कसे मृत्युमुखी पडतील याचे अंदाज बांधत असताना, एवढी प्रचंड लोकसंख्या, आरोग्य सुविधांचा अभाव, मर्यादित साधने उपलब्ध असताना ज्या पद्धतीने आपण या संकटाला सामोरे गेलो ते उल्लेखनीय आहे. आपले राजकीय नेतृत्व, प्रशासन, डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा व सामान्य नागरिक हे सर्व जण कौतुकास पात्र आहेत.

 
एकही पीपीई किट न बनवणारा देश ते पीपीई किट निर्यात करणारा देश अशी ओळख निर्माण करणे, मास्क, सॅनिटायझर यांचे विक्रमी उत्पादन करणे, व्हेन्टिलेटर्स, आय.सी.यू. बेड्स, ऑक्सिजन, आयसोलेशन बेड्स यांची व्यवस्था करणे, कोरोनाचे निदान करण्यासाठी लॅबॉरेटरींची व्यवस्था देशभर उभी करणे अशा अनेक गोष्टी करत आपण या कोरोनाशी लढण्यास सज्ज झालो. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी, इच्छाशक्तीने हे सर्व शक्य झाले आहे. त्यामुळेच प्रचंड लोकसंख्या, अपुरी साधने अशा अनेक अडचणी असूनसुद्धा जगाच्या तुलनेत संसर्गाचे प्रमाण, मृत्युदर कमी ठेवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आहोत.
 
 
आज आपल्याला अशाच सामूहिक प्रयत्नांची, इच्छाशक्तीची गरज आहे ती मनुष्यजातीला मागील शेकडो वर्षांपासून भेडसावणार्‍या, काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या परंतु दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करत चाललेल्या आरोग्यविषयक समस्येशी लढण्यासाठी, ती समस्या/आजार म्हणजे संसर्गजन्य जीवाणूपासून होणारा ‘क्षयरोग’ - सामान्यपणे आपण त्याला ‘टीबी’ म्हणून ओळखतो.
 
 
आपल्या देशाला साथीच्या रोगांचा एक मोठा इतिहास आहे. साथीच्या अनेक रोगांवर - उदा. प्लेग, देवी, पोलिओ यांच्यावर विजय मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. अपवाद आहे तो फक्त टीबीचा! टीबी पूर्णपणे बरा करणारी उपचारपद्धती उपलब्ध असताना, 100% अचूक निदान करू शकतील अशी साधने उपलब्ध असतानाही दिवसेंदिवस टीबीचे प्रमाण वाढते आहे, किंबहुना अधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. त्यामुळे टीबी समजून घेणे व त्याच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करणे अनिवार्य बनले आहे. विशेषतः भारतासारख्या देशाला तर युद्धपातळीवर प्रयत्न करावे लागतील अशी स्थिती आहे. जागतिक आरोग्य
 
संघटनेच्या (2018) अहवालानुसार -
 
* जगभरामध्ये दर वर्षी टीबीच्या एक कोटी नवीन रुग्णांची भर पडते, त्यातील 27 लाख रुग्ण एकट्या भारतातील आहेत, जे जगाच्या एकूण केसेसच्या 27% एवढे आहे.
 
* यापैकी 12 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातील 4,40,000 मृत्यू एकट्या भारतात झाले. याचा अर्थ प्रत्येक मिनिटाला 2 व्यक्ती या टीबीमुळे मृत्यूच्या खाईत लोटल्या जात आहेत.
 
* एका अहवालानुसार असे मानले जाते की, प्रत्येक तीन व्यक्तींमागे एक व्यक्ती टीबीच्या जीवाणूने संक्रमित झालेली असते. अर्थात, यापैकी प्रत्येकालाच टीबी होतो असे नाही; परंतु 5-15% व्यक्तींना त्यांच्या जीवनकाळात कधी ना कधी टीबी होतो, हे प्रमाणही प्रचंड आहे.
 
 
* टीबीमुळे होणारे नुकसान हे केवळ आरोग्यविषयकच नाही, तर आर्थिक व सामाजिकसुद्धा आहे.
 
* 2006च्या एका सर्वेक्षणानुसार केवळ भारतामध्ये टीबीमुळे होणारे आर्थिक ओझे (loss of economic well being) 23 अब्ज 70 कोटी डॉलर्स इतके प्रचंड आहे.
 
 
* याचे मुख्य कारण म्हणजे ऐन उमेदीच्या वयात टीबीमुळे होणारे मृत्यू.
 
* टीबीचे 70% रुग्ण 15 ते 54 या वयोगटातील असतात. त्यातील दोन तृतीयांश पुरुष असतात.
 
* टीबी मुख्यत्वेकरून आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांमध्ये जास्त प्रमाणात होतो, त्यामुळे स्वाभाविकच परिवाराच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होतो.
 
* 50% महिलांमध्ये टीबी 34 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयात होतो. त्यामुळे त्यांना अनेक सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो.
 
* पालकांना टीबी झाला म्हणून तीन लाखांपेक्षा जास्त मुलांना शाळा सोडावी लागते.
 
 
अशा प्रकारे भारतासारख्या विकसनशील देशाला समाजाच्या शारीरिक, सामाजिक, आर्थिक आरोग्यावर आघात करणार्‍या या आजाराबरोबर राहणे परवडणारे नाही. टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी युद्धपातळीवर योजना, प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी आपल्याला टीबी समजून घ्यावा लागेल. उत्तम निदानपद्धती, उपचारपद्धती उपलब्ध असूनसुद्धा आपण कुठे कमी पडतोय हे समजून घ्यावे लागेल.
 
क्षयरोगाचा इतिहास
 
मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस (Mycobacterium Tuberculosis) नावाच्या जीवाणूचा संसर्ग झाल्यामुळे टीबी हा आजार होतो. टीबी हा सर्वात जुन्या आजारांपैकी एक आजार आहे. असे म्हटले जाते की, मानवी संस्कृतीचा इतिहास जेवढा जुना आहे, तेवढाच टीबी हा आजार जुना आहे.
 
टीबीचा उल्लेख वेदकाळातील साहित्यातही आढळतो. कृष्ण यजुर्वेद संहितेमध्ये याविषयी एका कथेचा संदर्भ येतो, त्यात टीबीसदृश आजाराला ‘राजयक्ष्मा’ म्हटले आहे. क्षय म्हणजे झीज होणे. टीबीच्या रुग्णांमध्ये शरीराची झीज होत असल्यामुळे त्याला क्षयरोग हे नाव पडले, असे मानले जाते.
 
 
ग्रीक साहित्यातही टीबीसदृश आजारांचाच उल्लेख आढळतो. हिपोक्रेटसने टीबीसदृश लक्षणे असणार्‍या आजारासाठी Pthisis या ग्रीक शब्दाचा उपयोग केल्याचा उल्लेख आढळतो. (Pthists - To consume, to spit & to waste away.) अ‍ॅरिस्टॉटल, प्लेटो, गॅलेन यांच्या साहित्यातही याविषयीचा उल्लेख आढळतो. इंग्लिश साहित्यामध्ये, बायबल इ. ग्रंथांमध्ये टीबीच्या लक्षणांशी साम्य असणार्‍या आजारांचा उल्लेख आढळतो.
 
 
टीबी नेमका कशामुळे होतो, याविषयी मात्र जग अनेक दशके अनभिज्ञ होते. त्यात मैलाचा दगड ठरले ते रॉबर्ट कोच (Robert Coch ) यांचे संशोधन.
 
‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’ या जंतूच्या संसर्गामुळे टीबी हा रोग होतो, हे रॉबर्ट कोच यांनी पहिल्यांदा समप्रमाण सिद्ध केले. या संशोधनानंतर टीबीचे निदान व उपचार यामध्ये आमूलाग्र बदल झाला. रॉबर्ट कोच यांनी प्रबंध सादर केला, तो दिवस होता 24 मार्च! म्हणून दर वर्षी हा दिवस ‘टीबी डे’ म्हणून साजरा करतात.
 
 
tb_2  H x W: 0
 
टीबीचा प्रसार का व कसा होतो?
 
Mycobacterium Tuberculosis नावाच्या जीवाणूचा संसर्ग झाल्यामुळे टीबी हा रोग होतो. हे जीवाणू मुख्यत: हवेतून पसरतात. रुग्णाच्या थुंकीशी, शरीरातील स्रावाशी संबंध आल्यामुळे संसर्ग होऊ शकतो.
 
 
टीबीचा रुग्ण जेव्हा खोकतो किंवा शिंकतो, तेव्हा हे जीवाणू हवेत पसरतात व ते बराच वेळ जिवंत राहू शकतात. श्वासावाटे जेव्हा हे जीवाणू निरोगी व्यक्तींच्या शरीरात जातात, तेव्हा त्या व्यक्तीला टीबीचा संसर्ग होतो.
 
 
 
टीबीचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत.
 
1) फुप्फुसाचा टीबी.
 
2) फुप्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांचा टीबी.
 
साधारणपणे 70% रुग्ण फुप्फुसांच्या टीबीचे असतात. फुप्फुसाचा टीबी असणार्‍या रुग्णाने जर उपचार घेतले नाहीत, तर साधारणपणे तो वर्षभरामध्ये 10-15 नवीन व्यक्तींना संसर्ग पोहोचवतो.
 
 
टीबीचा संसर्ग होणार्‍या प्रत्येक व्यक्तीला टीबी होतोच असे नाही. मुख्यत्वेकरून त्यांची शरीराची प्रतिकारक्षमता कमी आहे, अशा व्यक्तींना टीबी होण्याचा धोका संभावतो.
 
1. अस्वच्छ व गर्दीच्या ठिकाणी राहणार्‍या व्यक्ती. 2. लहान मुले, वृृद्ध व्यक्ती. 3. कखत, मधुमेह, कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने पीडित रुग्ण. 4. धूम्रपान व मद्यपान अशा व्यसनांच्या गेलेल्या व्यक्तीमध्ये टीबी होण्याचा धोका अधिक असतो.
 
 
tb_1  H x W: 0  
 
टीबीची लक्षणे व निदान
 
टीबीचे बहुतांश रुग्ण फुप्फुसाच्या टीबीचे असतात.
 
1. दोन आठवडे किंवा जास्त दिवस असणारा खोकला. 2. हलकासा परंतु संध्याकाळी वाटणारा ताप. 3. श्वास घेण्यास त्रास होणे.

4. भूक मंदावणे. 5. वजन कमी होणे. 6. छातीत दुखणे. 7. रात्री खूप घाम येणे. 8. बेडक्यातून रक्त पडणे. 9. थकवा जाणवणे.
 
शरीरातील कुठल्याही अवयवाला टीबी होऊ शकतो. अर्थात, त्याचे प्रमाण तुलनेने कमी असते. वरील लक्षणांखेरीज ज्या
 
अवयवाचा टीबी असेल त्याप्रमाणे लक्षणे दिसून येतात.
 
संशयित व्यक्तीची थुंकी सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासून या आजाराचे निदान करता येते. काही रुग्णांमध्ये क्ष-किरण तपासणी, प्रयोगशाळेत कल्चर तपासणी व इतर आधुनिक चाचण्यांद्वारे निदान करता येते.
टीबीचा उपचार
 
रॉबर्ट कोच यांच्या संशोधनानंतर टीबीवरील उपचार व निदान या विषयावरील संशोधनाला अधिक चालना मिळाली. 19व्या शतकाच्या सुरुवातीला मात्र यावर कुठलेही औषध उपलब्ध नव्हते, तर आराम करणे व हवेशीर वातावरणाचा सहवास हेच उपचाराचे मुख्य भाग होते. त्यामुळे जगभर टीबीच्या रुग्णांसाठी सॅनेटोरियम (Sanatorium) उघडायला सुरुवात झाली.
 
 
भारतामध्येही 1906मध्ये राजस्थानातील तिलोनिया येथे पहिले सॅनेटोरियम सुरू झाले. पुढे मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या ठिकाणीसुद्धा सॅनेटोरियम सुरू झाली. आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे 1915मध्ये Union Mission Tuberculosis Sanatorium (UMTS) ची सुरुवात झाली. पुढे 1950पर्यंत UMTS हे टीबी विषयातील संशोधनाचे मुख्य केंद्र राहिले. पुढे भारताने 1962मध्ये जेव्हा नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्रामला सुरुवात केली, तेव्हा ही सॅनेटोरिअम जनरल हॉस्पिटलमध्ये रूपांतरित झाली.
 
 
टीबी हा दीर्घकाळ टिकणारा आजार आहे. टीबीचे उपचार दीर्घकाळ चालतात. सुरुवातीला प्रत्येक रुग्णाला रुग्णालयात भरती करून उपचार केले जात; परंतु जसजसे रुग्ण वाढत गेले, तसे सर्वांना दीर्घकाळ भरती करणे शक्य नाही, हे लक्षात यायला लागले. त्यातून ‘ट्युबरक्युलोसिस केमोथेरपी सेंटर चेन्नई’ची सुरुवात झाली. त्यांच्या संशोधनातून रुग्णांवर घरी उपचार करणे शक्य झाले. हेच संशोधन पुढे आजच्या काळातील DOTS (Directly Observed Treatment Short course) या संकल्पनेचे आधार बनले. 1962मध्ये भारताने पहिल्यांदा राष्ट्रीय स्तरावर टीबी नियंत्रणासाठी कार्यक्रम (National Tuberculsis Control Programme) स्वीकारला.
 
1972मध्ये या कार्यक्रमाचा पुनर्विचार करून आवश्यक ते बदल करून Revised National Tuberculosis Control Programme (RNTCP) ला सुरुवात झाली. यामध्ये जगभरात मान्यता पावलेल्या ऊजढडचा अंतर्भाव करण्यात आला, ज्याद्वारे मागील दोन दशकांपासून आपण टीबीच्या नियंत्रणाखाली प्रयत्न करतोय.
 
आव्हाने
 
1. टीबीचा उपचार 6-8 महिने चालतो. यामध्ये चार किंवा जास्त औषधे एकत्र घ्यावी लागतात. सरकारी यंत्रणेकडून आठवड्यातून तीन वेळा ही औषधे घ्यावी लागायची.
 
 
2. बहुतांशी टीबी रुग्ण आर्थिकदृष्ट्या मागासलेले, हातावर पोट असलेले असल्यामुळे उपचार मध्येच सोडण्याचे प्रमाण अधिक झाले.
 
 
3. उपचारादरम्यान औषधांमुळे दुष्पपरिणाम झाल्यास रुग्ण उपचार बंद करत असत.
 
 
4. खाजगी क्षेत्रातील व्यक्तीकडून अपुर्‍या किंवा चुकीच्या पद्धतीने होत असलेल्या उपचारामुळेही टीबी नियंत्रणात अडचण होत गेली.
 
5. उपचार अर्धवट सोडल्यामुळे एकतर तो रुग्ण संसर्ग वाढवत जातो, त्याचबरोबर चऊठ MDR (Multi drug resistant) टीबीचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढते आहे. (ड्रग्ज रेझिस्टंट टीबी म्हणजे सामान्य औषधांना दाद न देणारा टीबी.)
 
6. मागील काही दशकांमध्ये आपल्या देशात मधुमेह व एच.आय.व्ही. या रोगांचे रुग्ण वाढल्यामुळे या रुग्णांमध्ये टीबीचे प्रमाण वाढत आहे.
 
या सर्व आव्हानांमध्ये विद्यमान भारत सरकारने काही सकारात्मक पावले उचलायला सुरुवात केली आहे. 2025पर्यंत टीबीचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प केला आहे. टीबी नियंत्रणापासून ते उच्चाटन करण्याचा तो दृष्टीकोनातून झालेला बदल अतिशय महत्त्वाचा आहे. त्यासाठी National strategic Plan for Tuberculosis Ellminationची रचना करण्यात आली आहे.

 
- 7 मे 2012पासून, आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाला टीबी रुग्णाची नोंद करणे (Notify) अनिवार्य केले आहे.
 
- ही नोटीफिकेशन सिस्टिम प्रभावी होण्यासाठी NIKSHAY या  based प्लॅटफॉर्मची योजना केली आहे. रुग्णाचा फॉलोअप ठेवण्यासाठी, कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी याचा उपयोग होतो आहे.
 
- - Rapid Molecular Diagnosticचा उपयोग करणे, नवीन औषधांचा (Bedaquiline, delamunid) उपयोग करणे.
 
- लहान मुलांमधील टीबी, एचआयव्ही, मधुमेह या आजाराच्या रुग्णांची विशेष काळजी.

- निक्षय पोषण योजनेअंतर्गत रुग्णाला पोषक आहार मिळावा यासाठी आर्थिक साहाय्य करणे.
 
 
अशा अनेक बदलांसह प्रशासकीय व्यवस्था, शासन टीबीच्या समूळ उच्चाटनासाठी प्रयत्न करते आहे. परंतु केवळ सरकारी यंत्रणेच्या भरवशावर ही समस्या सुटणारी नाही. आपल्यालाही टीबी आजाराविषयी जागरूकता करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे लागेल, तरच आपण टीबीला हरवू शकू. 21व्या शतकामध्ये विकसित आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला टीबीला हरवावेच लागेल. आपल्या सामूहिक प्रयत्नाने, इच्छाशक्तीने ते शक्य आहे, असे वाटते.
 
 
7588089348