आयुर्वेदातील क्षय विचार

विवेक मराठी    22-Feb-2021
Total Views |
@वैद्य सुचित्रा कुलकर्णी
आयुर्वेदात आजाराची कारणं जाणून घेण्याला फार महत्त्व आहे. कारण ती कारणं दूर केल्याशिवाय चिकित्सा पूर्णच होत नाही. प्रत्येक आजार कुठल्यातरी सूक्ष्म जिवामुळे होतो असं म्हणून त्या जिवाला नष्ट करण्याचा उपक्रम करणं अशी आयुर्वेदाची पद्धत नाही. क्षयासारख्या भयंकर आजारात आपल्याच शास्त्राची मदत घेतली, तर रुग्णाची औषधं कमी होऊ शकतात, रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.
 

tb_1  H x W: 0  
 क्षय किंवा राजयक्ष्मा या आजाराबद्दलचं पूर्वीच्या काळी असलेलं भय आज थोड्याफार प्रमाणात कमी झालं आहे. आयुर्वेदशास्त्रात या आजाराचा (इथे या आजाराचं राजयक्ष्मा/क्षय या आजाराशी साम्य असल्याने ही नावं समानार्थी वापरली आहेत) आणि त्याच्या चिकित्सेचा विस्तृत उल्लेख असूनदेखील सईबाई, माधवराव पेशवे अशा काही मान्यवर व्यक्तींचं क्षयरोगाने अकाली निधन झाल्याचा इतिहास आढळत असल्याने आयुर्वेदाच्या या आजारावरील उपयुक्ततेविषयी सतत प्रश्नचिन्हं निर्माण केली जातात. वास्तविकर आयुर्वेदात या आजाराची कारणं, उपचार, आहार, साध्य/असाध्य अवस्था (म्हणजे आजार बरा होणार किंवा नाही याची लक्षणं) या सर्वांचं विस्तृत वर्णन आहे.
 
 
मुगलांच्या आक्रमणात आयुर्वेदाचे अनेक संहिता ग्रंथ नष्ट झाले. सतत युद्धपरिस्थिती असल्याने, हिंदू राजांच्या आश्रयाने चालणार्या पुण्यशाला (रुग्णालयं) आणि आयुर्वेदाच्या पाठशाळा (गुरुकुलं) कमी होऊ लागल्या. इंग्रजांनी तर या आधारभूत व्यवस्था पूर्णतः बंद करून टाकल्या. त्यानंतर सुमारे तीस वर्षं आपल्याकडे कोणतीच राजमान्य वैद्यक व्यवस्था नव्हती. त्या काळात वैद्यक सेवा न मिळाल्यानेदेखील अनेक मृत्यू झाल्याचा इतिहास आहे. (सईबाई आणि माधवराव यांची मूळची नाजूक प्रकृती, ताण, आजाराकडे केलेलं दुर्लक्ष हे नजरेआड करून चालणार नाही. याच चिंतेपायी, अगदी आधुनिक चिकित्सा घेऊनदेखील डॉ. आनंदीबाई जोशी दगावल्या. क्षय बरा न होण्यात या कारणांचा महत्त्वाचा वाटा आहे याचे आजही अनुभव येतात. दुर्दैवाने आजदेखील आयुर्वेदकाळातील फक्त अपयश आणि आत्ताच्या वैद्यकातील केवळ यश यांचीच चर्चा होते.) तत्पश्चात इंग्रजांनी त्यांचं वैद्यक इथे लादलं आणि वर ‘तुमच्याकडे वैद्यक नव्हतं, ते आम्ही आणलं’ हा देखावादेखील केला. मध्ये तीन दशकं गेल्याने आयुर्वेदाचा कर्मानुभाव किंवा व्यवहार बघितलेली, त्यातून चिकित्सेचा आत्मविश्वास असलेली पिढी निर्माण होणं थांबलं.
 
 
बदलत्या परिस्थितीत आयुर्वेदाची भूमिका काय?
 
आज परिस्थिती अशी आहे की बर्याच दुर्धर आजारांचे उपाय पाश्चात्त्य वैद्यकाच्या आधारेच केले जातात. (कोविडच्या काळात आपण याचा अनुभव घेतला. कोविड नवीन असल्याने त्याचं ठोस औषध कोणाकडेच नव्हतं. तरी रुग्णांवर थेट प्रयोग करायची संमती सर्वांना मिळाली नाही. ज्या औषधांचे theraputic मात्रेतदेखील side effects दिसतात, त्या औषधांच्या वापराला संमती होती; परंतु अत्यंत कमीside effectsअसलेल्या आयुर्वेदाच्या औषधांना मात्र परवानगी नाकारण्यात आली.) राजयक्ष्मा हादेखील याला अपवाद नाही. इतकी आधुनिक औषध उपलब्ध असताना अशा या जीवघेण्या आजारावर आयुर्वेदाचे उपाय कोण आणि का घेईल?
 
 
परंतु आपल्याला हेदेखील ढळढळीतपणे दिसतंय की आजच्या इतक्या प्रगत काळातदेखील हा आजार त्याचं ‘राजयक्ष्मा’ (यक्ष्मांचा म्हणजे रोगांचा राजा, रोगराट) हे नाव सार्थ करतोय. आजही जगात, भारतात तर निश्चितच.. सर्वात जास्त मृत्यू याच आजाराने होतात. भारतात गेली कित्येक वर्षं या आजारासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू असूनदेखील हा रोग आटोक्यात आलेला नाही. म्हणूनच आरोग्य विभागाच्या गंभीर रोगांच्या यादीत आजही या आजाराचं स्थान वरचं आहे. एकीकडे सतत नवीन नवीन औषधांचा शोध लागत असला, तरी दुसरीकडे त्या औषधांना प्रतिसाद न देणार्या (drug resistant) रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. शिवाय या आजारासाठी दीर्घकाळ उपचार घ्यावे लागतात. तितका काळ सगळ्याच रुग्णांचं धैर्य टिकून राहत नाही. हे उपचार खर्चीक असल्याने, ते दीर्घकाळ करण्याची लोकांची क्षमता नसते. अशा अनेक अडचणींमुळे हा आजार अजून ठाण मांडून बसला आहे.
 

tb_1  H x W: 0
 
जिथं कमी तिथं आम्ही (आयुर्वेद)
 
 
1) रोग होऊ नये यासाठी या रोगाची आयुर्वेदात सांगितलेली कारणं (पुढे येतीलच) टाळण्याबाबत जनजागृती करता येऊ शकते.
 
2) पाश्चात्त्य पद्धतीने चिकित्सा करताना drug resistance म्हणजे रुग्णाच्या शरीराने औषधांना प्रतिसाद न देण्याची वेळ
कित्येक वेळा येते. अशा वेळी त्या रुग्णाला आयुर्वेदाची औषधं दिल्यास रुग्णाला फायदा होईल आणि आयुर्वेदाच्या औषधांचे परिणामही अनुभवायला मिळतील.
 
3) पाश्चात्त्य उपचार चालू असताना जोडीला आयुर्वेदातील उपचार केल्यास सध्या आवश्यक असलेला उपचारांचा कालावधी कमी करता येऊ शकतो किंवा पाश्चात्त्य औषधांचं प्रमाणही कमी करता येऊ शकतं. या आजारासाठी देण्यात येणार्या पाश्चात्त्य औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. ते टाळण्यासाठी आयुर्वेदाच्या औषधांचा उपयोग करता येऊ शकतो.
 
 
4) ग्रंथात सांगितलेला आयुर्वेदाचा चिकित्सोपक्रम करणारी शासकीय रुग्णालयं तयार करायला हवीत. विविध लसींच्या प्रयोगासाठी जसे लोक स्वेच्छेने तयार होतात, तसे आयुर्वेदाच्या चिकित्सेसाठीदेखील तयार होऊ शकतात.
 
 
राजयक्ष्म्याची कारणं
 
आयुर्वेदात आजाराची कारणं जाणून घेण्याला फार महत्त्व आहे. कारण ती कारणं दूर केल्याशिवाय चिकित्सा पूर्णच होत नाही. प्रत्येक आजार कुठल्यातरी सूक्ष्म जीवामुळे होतो असं म्हणून त्या जिवाला नष्ट करण्याचा उपक्रम करणं अशी आयुर्वेदाची पद्धत नाही. सूक्ष्म जीव तर सतत आणि सर्वत्र असतात. पण आजार सगळ्यांना होत नाहीत. कारण आपल्या आहारविहारातील चुका त्या सूक्ष्म जीवांना शरीरात वाढायला अनुकूल वातावरण निर्माण करतात. आपण कुठल्या चुका करतो यावर शरीरात कुठे वैगुण्य तयार होणार, तिथे कुठले सूक्ष्म जीव जाणार हे ठरतं.
 
 
राजयक्ष्मा या आजाराची आयुर्वेदात चार कारणं सांगितली आहेत.
 
1) अतिसाहस - म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा/बलापेक्षा/ शक्तीपेक्षा मोठी काम करणं. जेव्हा मनुष्य दुर्बल असूनही बलवान व्यक्तीशी मल्लयुद्ध करतो, वजनदार वस्तू अधिक बलाने उचलतो, जोरजोराने आरडाओरडा करतो (टीव्हीवरील वाद), फार मोठं ओझं वाहतो (हमाल/गावाकडे लांबून पाणी भरणार्या महिला), पाण्यात दूरपर्यंत पोहतो, अत्यंत बलपूर्वक (रगडून रगडून) सुगंधी पदार्थयुक्त पीठ अंगाला चोळतो किंवा पाय देऊन अंग रगडतो, अत्यंत कठोर तपाचरण करतो, खूप दूरपर्यंत वेगाने धावतो (सध्याचं मॅरेथॉनचं फॅड), मार खातो, विषम किंवा अतिव्यायामासारखं कार्य करतो, तेव्हा त्याच्या शरीरातील वाताचा कोप होऊन त्याच्या धातूंचा (मांस, रक्त, मेद यांचा) क्षय होतो आणि त्याला क्षय व्याधी होतो.
 
2) संधारण - म्हणजे मल, मूत्र, उलटी, तहान, भूक, झोप इ. शारीरिक वेग र्(urge) थोपवून धरणं. जेव्हा मनुष्य सभेत असताना, मालकाजवळ असताना, गुरुचरणी, सज्जनांच्या सभेत, सार्वजनिक ठिकाणी, कार्यालयात, उंच-सखल रस्त्यांवर वाहनांनी प्रवास करत असताना, भयाच्या प्रसंगामुळे किंवा लाजेखातर अपानवायू, मल, मूत्र यांचे वेग धारण करतो, तेव्हा वायू प्रकूपित होऊन तो शरीरात वाकडातिकडा फिरू लागतो. त्यामुळे शरीररूपी यंत्राचं काम बाधित होऊन त्या मनुष्यास क्षय होतो.
 
 
3) अतिमैथुन - जेव्हा पुरुष अत्यंत आनंदात कामासक्त होऊन स्त्रियांशी अति संभोग करतो, तेव्हा त्याच्या अति संभोगामुळे त्याच्या शुक्राचा क्षय होतो. शुक्राचा क्षय होऊनही त्याचं मन संगापासून दूर झालं नाही, तर त्या अतिसंभोग करणार्या पुरुषाचा (यात अति प्रमाणात हस्तमैथुन करणार्या तरुणांचा समावेश होतो), मैथुन करताना अधिक प्रमाणात शुक्रक्षय होऊन वातप्रकोप होतो आणि प्रतिलोम गतीने अन्य धातूंचा (क्रमाने मज्जा, अस्थी, मेद, मांस, रक्त यांचा) क्षय होऊन राजयक्ष्मा व्याधी उत्पन्न होतो.
 
 
4) विषम भोजन - अवेळी (भुकेच्या आधी किंवा भूक लागून गेल्यावर) आणि अयोग्य प्रमाणात (कमी किंवा जास्त) घेतलेला आहार म्हणजे विषम भोजन. जेव्हा मनुष्य जलपान, भोजन, खाद्य इत्यादी सेवन करताना प्रकृती, करण, संयोग, राशी, देश, काल, उपयोगसंस्था यांचा विचार करत नाही आणि शास्त्रात सांगितलेले आहाराचे नियम पालन न करता भोजन करतो, तेव्हा त्या माणसाचं घेतलेलं भोजन नीट पचत नाही. त्याचा अग्नी मंद होतो आणि आहार द्रव्यापासून अधिक प्रमाणात मलमूत्राची उत्पत्ती होते. त्यामुळे धातूंचं योग्य पोषण होत नाही. अशा व्यक्तीला राजयक्ष्मा व्याधी होतो.
 
 
या कारणांचा विचार करता रुग्ण जेव्हा क्षयाची चिकित्सा घेत असतो, तेव्हा त्याला खालील सूचना देणं महत्त्वाचं आहे -
 
1) रुग्णाने आपल्या बलापेक्षा अधिक साहस करणं टाळावं. 2) ‘सर्वमेव परित्यज्य शरीरमनुपालयेत्’। - अन्य सर्व सांसारिक गोष्टी सोडून शरीराचं पालन करावं. (वेगांचं धारण करू नये.) 3) शुक्र हे आहाराचं उत्तम सार आहे. म्हणून शुक्राचं रक्षण करावं. 4) हितकर, मोजकं आणि वेळेवर जेवावं.
 
 
राजयक्ष्मा आजाराचं साध्यासाध्यत्व
 
ज्या माणसाच्या शरीरात बल, मांस आणि रक्त क्षीण झालेले नसतील, जो बलवान असेल, अशा मनुष्याचा क्षय बरा होऊ शकतो. याउलट रोगी दुर्बल असेल, त्याचे मांस आणि रक्त अत्यंत क्षीण झालेले असतील, तर अशा रोग्याचा क्षय बरा होत नाही.
राजयक्ष्मा आजारात सांगितलेले, चिकित्सेव्यतिरिक्त
 
अन्य महत्त्वाचे ग्रंथोक्त आणि वेगळे उपाय
 
1) सुरुवातीला रुग्णाची भूक, रुची आणि पचनशक्ती वाढेल असे उपचार करावे.
 
2) भूक आणि पचन वाढलं आहे असं बघून मांसप्रयोग करावा. लावा पक्षी, तित्तीर पक्षी, कोंबडा यांचा मांसरस तूप घालून, शिजवून, मीठ-आंबट-तिखट पदार्थ घालून गरम गरम पिण्यास द्यावा.
 
 
3) बकर्याच्या मांसाचा रस पिंपळी, जव, कुळीथ, सुंठ, डाळिंबाचा रस, आवळा यासह तुपाने संस्कारित करून द्यावा.
 
4) मुळा आणि कुळीथ यांच्या कढणासह यव, गहू किंवा तांदळाचा भात द्यावा.
 
 
5) विविध औषधांनी सिद्ध वातशामक, मांसवर्धक आणि बलवर्धक तुपांचा आहारात समावेश करावा.
 
 
6) खजूर आणि मनुका यांच्या कल्कात पिंपळीचं चूर्ण, खडीसाखर, मध आणि तूप घालून चाटण द्यावं.
 
7) सितोपलादि चूर्ण, वासा घृत, शतावरी घृत, दशमूळ घृत, दुरालभादि घृत, जिवंत्यादी घृत यांचा योग्य वापर करावा.
 
8) बकरीचं दूध, जंगलातील पशुपक्ष्यांचा मांसरस, मूग, चणे, गाईचं तूप आहारात असावं.
 
9) जव, गहू, मधाचं मद्य, अरिष्ट, सुरा, आसव, जंगली पशुपक्ष्यांचं ‘शुल्य’ - म्हणजे सळईवर पक्व केलेलं मांस (barbecue) खावं.
 
10) क्षयाच्या रुग्णांमध्ये धातुक्षय मोठ्या प्रमाणात झालेला असल्याने, त्याच्या मलावरच त्याचं बळ टिकून असतं. त्यामुळे मलप्रवृत्ती झाल्यावर किंवा अतिसार झाल्यास या रुग्णाचं बल कमी होतं. म्हणून त्याच्या मलाचं संरक्षण करणं आवश्यक आहे. यासाठी आंबट चुका, चिंच, दुधी यांच्या साहाय्याने बनवलेल्या डाळीच्या कढणात दह्याची साय, तूप आणि डाळिंबाचा रस घालून प्यायला द्यावं. मलसंग्राहक द्रव्यांच्या रसात किंवा काढ्यात मांस शिजवून ते तांबड्या तांदळाच्या भाताबरोबर खायला द्यावं.
 
 
11) मांस न खाणार्या किंवा ते न आवडणार्या क्षयी रुग्णाला फसवून विविध प्रकारचं मांस खायला घालावं, असं शास्त्रकार सांगतात.
 
 
12) क्षय रोगात पानार्थ द्रव्य - स्थिरादि पंचमूलांनी सिद्ध केलेलं पाणी/ताक/सुरा, चुका + डाळिंबाचा रस हे तहान लागल्यावर पिण्यास उत्तम.
 
 
13) क्षय विकारात अनुपान म्हणून मद्य, आसवं, अरिष्ट यांचा वापर करायला सांगितला आहे.
 
14) खिचडी, पोळी, उडीद, कुळीथ, जव, खीर अशा द्रव्यांनी वेदना असलेल्या जागी किंवा छाती/पोट/पाठ या ठिकाणी शेक घ्यावा. मांसरसाचा नाडीस्वेद घ्यावा.
 
15) बडीशेप, मोह, तगर, रक्तचंदन हे सारं पाण्यात वाटून दुखर्या जागी लेप द्यावा.
 
16) गूळ, देवदार, रक्तचंदन, नागकेशर यात तूप मिसळून लेप करावा.
 
17) अन्य उपचार - योग्य तेलाचं मालिश, सुगंधी उटणं, आवडीचे नवीन कपडे, ऋतूनुसार सुखकर आणि सुगंधी स्नान, अवगाह र्(tub bath), स्वच्छता, बस्ती, आवडीचे सुगंध, प्रिय मित्र, सुमधुर गायन-वादन, संतोष, आश्वासन, ब्रह्मचर्य, दान, तप, देवतांची पूजा, सदाचार, वैद्यांच्या सल्ल्याचं पालन या सर्व गोष्टी क्षयरोग नष्ट करण्यासाठी उपयोगी ठरतात.
 
एकुणात क्षयासारख्या भयंकर आजारात आपल्याच शास्त्राची मदत घेतली, तर रुग्णाची औषधं कमी होऊ शकतात, रुग्ण लवकर बरा होऊ शकतो, चिकित्सा चालू असतानाच त्याच्या धातूंचं बल वाढल्याने त्याची कार्यक्षमतादेखील वाढू शकते.
 
 
क्षयाच्या औषधी चिकित्सेचा ऊहापोह (तो शास्त्रीय आणि रुग्णानुसार बदलणारा भाग असल्याने) या लेखात केलेला नाही.