उपचारपद्धतीचा इतिहास आणि वर्तमान

विवेक मराठी    23-Feb-2021
Total Views |
@डॉ. व्यंकटेश देशपांडे

tb_2  H x W: 0

कोरोना महामारीपेक्षा अतिशय भयंकर, पण मानवजातीवर सावकाश आघात करणार्‍या क्षयरोगाची उपचारपद्धती आपण समजून घेऊ.

कुठल्याही रोगाच्या उपचारपद्धती माहीत करून घेण्याआधी त्याचा इतिहास माहीत असल्यास त्याविरुद्ध दिलेला लढा समजण्यास सोपे जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या, ऋग्वेदामध्ये नोंद असलेल्या या आजाराला ‘राजयक्ष्मा’ व नंतर क्षयरोग असे म्हटले गेले. इतरही देशांच्या प्राचीन ग्रंथांमध्ये विविध नावांनी या आजाराचा उल्लेख आढळतो.
 
 
ख्रिस्तपूर्व 400 ते 1400 या काळामध्ये या आजाराबद्दल जी थोडीफार माहिती होती, तीसुद्धा समाज पूर्ण विसरून गेला. असा आजार झालेल्या रुग्णाने राजाचे चरणस्पर्श करणे/आजारातून बरे होण्यासाठी आशीर्वाद घेणे, तसेच शुद्ध हवेत राहणे आणि ताज्या दुधाचे सेवन करणे, तसेच विविध पानाफुलांच्या रसामध्ये कापराचे सेवन करणे अशा प्रकारच्या उपचारपद्धती होत्या.
 
इ.स. 1400-1800 या नंतरच्या काळामध्ये या आजाराच्या वैज्ञानिक माहितीमध्ये वाढ होत गेली. एकोणिसाव्या शतकामध्ये स्टेथोस्कोपचा शोध लागल्यानंतर या आजाराची विस्तृत माहिती मिळाली. याच काळामध्ये रॉबर्ट कॉक यांनी आजारास कारणीभूत असणारा जंतू ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस’चा शोध लावला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एक्स-रेचा शोध लागला. त्यामुळे आजाराचे निदान सोपे झाले आणि विस्तृत माहिती मिळाली.
 
दुर्दैवाने या काळामध्ये बरीचशी महत्त्वाची मंडळी - उदाहरणार्थ डॉक्टर्स, वैज्ञानिक, सामाजिक नेते आणि काही राज्यकर्ते या आजाराने सहज बळी गेले. कारण या आजाराला विशेष असे कुठलेच औषध उपलब्ध नव्हते. एकदा हा आजार झाला की त्या माणसाला घरापासून दूर/डोंगरावर ठेवले जाई. आणि त्याचे दर्शन/दखलही कोणी घेत नसे.
 
 
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात किंवा एकोणिसाव्या शतकात ‘सॅनेटोरियम मोमेंट’ उपचार करण्यास सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये सॅनेटोरियम (म्हणजे वस्तीपासून दूर बांधलेली इमारत जिथे क्षयरोगाचे उपचार करता येईल) ट्रीटमेंट - शुद्ध हवा, सकस जेवण, नियमित व्यायाम, नियमित अंघोळ देण्यास सुरुवात झाली. विविध देशांमध्ये अशा प्रकारची सॅनेटोरियम उघडण्यात आली. 1906मध्ये अजमेरजवळ ख्रिश्चन मिशनर्‍यांनी भारतामध्ये अशा प्रकारचे पहिले सॅनेटोरियम चालू केले. त्यानंतर दोन वर्षांनी चेन्नईजवळील मदनपल्ली येथे दुसरे सॅनेटोरियम सुरू झाले. महाराष्ट्रात डॉ. बिलिमोरियांच्या पुढाकाराने 1912मध्ये पुण्यात सॅनेटोरियम सुरू झाले. नंतर ते पाचगणीला स्थलांतरित झाले. त्यानंतर काही वर्षांतच मुंबई, देवळाली अशा ठिकाणीसुद्धा सॅनेटोरियमची स्थापना झाली. या काळात उपचारपद्धती म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणे, शरीराची स्वच्छता ठेवणे, वास्तव्य मोकळ्या हवेत ठेवणे अशा प्रकारची होती.


tb_1  H x W: 0
 
स्ट्रेप्टोमायसीन औषधाने क्षयरोगाचा जंतू मरतो, हे साधारणतः विसाव्या शतकाच्या मध्यात (1944मध्ये) सिद्ध झाले आणि आधुनिक उपचारपद्धतीस (Chemotherapy) सुरुवात झाली. नंतरच्या काळामध्ये आयसोनियाझाइड, पास, रिफामायसिन या व इतर काही औषधांचे शोध लागले. औषधांमध्ये क्षयरोगाचे जंतू मारण्याची चांगलीच क्षमता होती. 1944-1972 या काळामध्ये विविध प्रकारच्या औषधोपचारपद्धती विकसित होत गेल्या. त्यामध्ये दैनिक औषधे किंवा साप्ताहिक औषधे याचे प्रयोग केले गेले.
 
 
स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये क्षयरोगाच्या नियंत्रणासाठी पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बीसीजी लसीकरणावर भर देण्यात आला. दुसर्‍या पंचवार्षिक योजनेमध्ये रुग्ण शोधणे व त्यांचे लसीकरण करणे व त्यांना सकस आहार देणे, निरोगी लोकांपासून दूर ठेवणे यावर भर देण्यात आला, तसेच सॅनिटोरियमच्या माध्यमातून औषधे देणे सुरू झाले. रोगासाठी लागणारे दीर्घकाळ औषधोपचार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णसंख्या, त्यामुळे होणारे सामाजिक, आर्थिक, शारीरिक नुकसान पाहता पहिल्या राष्ट्रीय नियंत्रण कार्यक्रमास 1965 साली सुरुवात झाली.
 
भारतामध्ये चेन्नईस्थित सेंटर आणि बंगळुरूस्थित राष्ट्रीय क्षयरोग संस्थान (नॅशनल ट्युबरक्युलोसिस इन्स्टिट्यूट) यांनी विविध औषधांचे कॉम्बिनेशन वापरून क्षयरोगावर मात कशी करता येईल हे पाहिले.


tb_2  H x W: 0

या राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत उपलब्ध झालेल्या प्रभावी औषधोपचाराने सुरुवातीला रोग्यांची संख्या झपाट्याने कमी झाली. परंतु या कार्यक्रमातील विविध त्रुटींमुळे व रुग्णांमधील बेजबाबदार स्वभावामुळे हा कार्यक्रम अयशस्वी होत असल्याचे दिसले. औषधोपचारास प्रतिसाद न देणार्‍या - म्हणजेच ड्रग रेझिस्टंट क्षयरोगाचे प्रमाण वाढते आहे असे लक्षात आले, म्हणून त्याच्या पुढचा प्रोग्राम विसाव्या शतकाच्या शेवटी, म्हणजे शेवटच्या दशकात ‘सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम’ (Revised National Tuberculosis Control Programme - RNTCP) या नावाने 1992 साली चालू झाला.
 
या कार्यक्रमांतर्गत रुग्णास प्रत्यक्ष क्लिनिकला येऊन (Directly observed Short Course chemotherapy) आठवड्यात तीन वेळा औषधे घ्यावी लागायची, जेणेकरून या औषधांचे सेवन झाल्याची खात्री केली जायची. परंतु आर्थिक/वैचारिक मागासलेपण, सरकारी यंत्रणेची कमी पडलेली इच्छाशक्ती आणि विशेष आस्था नसलेली राजकीय इच्छाशक्ती यामुळे या कार्यक्रमास विशेष यश मिळाले नाही आणि नवी समस्या उभी राहिली, ती म्हणजे प्राथमिक औषधांना प्रतिसाद न देणारी क्षयरोगाची लक्षणे - ड्रग रेझिस्टंट टीबी, MDR TB, XDR TB इ.
 
 
2012पासून क्षयरोगांची नोंद करणे अनिवार्य झाले आहे, जेणेकरून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, ट्रीटमेंट फॉलोअप या गोष्टी सरकारी यंत्रणेला सोपे जात आहे.
 
 
नवीन आलेल्या सरकारने या आजाराचे महत्त्व लक्षात घेऊन, यात देशाचे होणारे सामाजिक, आर्थिक आणि आरोग्याचे नुकसान पाहतात व आपल्या देशातून हा आजार संपूर्णतः गेला पाहिजे यासाठी नवीन योजना व तसेच सर्व अंगांनी पाठबळ देण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (नॅशनल ट्युबरक्युलोसिस एलिमिनेशन प्रोग्राम) माध्यमातून ‘नॅशनल स्ट्रॅटेजिक प्लॅन टू एंड ट्युबरक्युलोसिस - 2017 ते 2025’ हा अतिशय धाडसी आणि महत्त्वाकांक्षी निर्णय आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी निदानपद्धतीत नवनवे संशोधन, मोफत (उत्तम प्रकारचा) औषधोपचार, कमी काळ चालणारी पण अति उपयोगी उपचारपद्धती, आजारी माणसाला लागणारे बाकीचे सहकार्य (उदा., पोषण) या सगळ्या अंगांचा यात विचार केला आहे. पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे सध्याच्या भारत सरकारने या योजनेमध्ये औषधोपचारास प्रतिसाद देणार्‍या क्षयरोगासाठी - म्हणजेच ड्रग रेझिस्टंट टीबी - DRTसुद्धा विविध प्रकारच्या व नवीन औषधांची मोफत सोय केली आहे. तसेच रोग्याची कौटुंबिक स्थिती जाणून कुटुंबातील आवश्यक त्या लोकांना प्रतिबंधात्मक (Prophylactic) औषध देणे या योजनेचा एक भाग आहेत. एकूण काय, तर एखाद्या माणसाचे रोगनिदान झाल्यानंतर येणार्‍या सगळ्या समस्यांचे निराकरण कसे होईल, तसेच तो घरातील व परिसरातील इतरांना त्या रोगाचा प्रसार कसा टाळेल, औषधी ठरविलेल्या पद्धतीप्रमाणे वेळोवेळी घेईल, याची सरकारी यंत्रणेमार्फत सहजतेने आणि सुलभतेने खात्री होण्याचाही या योजनेत विचार केला आहे.
 
क्षयरोगामध्ये शस्त्रक्रिया
 
 
साधारणतः क्षयरोगी व्यक्तींमध्ये शस्त्रक्रियेची कमी वेळा गरज भासते. पण औषधोपचाराचा प्रतिसाद न देणार्‍या प्रकारांमध्ये किंवा वारंवार गुंतागुंत करणार्‍या प्रकारांमध्ये शस्त्रक्रियेने व सोबत औषधोपचाराच्या जोडीने आजाराचे उच्चाटन करता येऊ शकते. सध्याच्या काळात अशा शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे.


tb_1  H x W: 0
 
प्रतिबंध (Prophylaxis)
 
क्षयरोग्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींसाठी - विशेषतः घरातली बालक आणि वृद्ध मंडळी, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांयासाठी आधुनिक उपचारपद्धतीमध्ये विविध औषधांनी क्षयरोग टाळता येतो. आता सांगितलेल्या नवीन शासकीय कार्यक्रमांमध्ये याचासुद्धा अंतर्भाव केलेला आहे.

 
चला तर, आपल्या या राष्ट्रीय कार्यक्रमास आपण शक्य त्या पद्धतीने हातभार लावून ह्या रोगाचे उच्चाटन करू या आणि आपला देश निरोगी व आनंदी बनवू या.