क्षयरोग्यांसाठी पूरक योगोपचार

विवेक मराठी    24-Feb-2021
Total Views |

@मनोज पटवर्धन

योग हे एक preventive शास्त्र आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं हा भाग या आजारांमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या औषधोपचारांच्या जोडीने योगाभ्यास करण्यात कोणताही धोका तर नाहीच, उलट औषधांचा शरीरावर होणारा परिणाम अधिक प्रभावी व्हायला मदतच होते.

 
yoga_2  H x W:

 

24 मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस म्हणून ओळखला जातो. क्षयरोग किंवा टीबी हा संपूर्ण विश्वात पसरलेला सर्वात जुना संसर्गजन्य रोग आहे. आपल्याला हे वाचून आश्चर्य वाटेल, की जगातील जवळजवळ एक तृतीयांश लोकांना टीबीचा संसर्ग झालेला आहे. सुदैवाने यातल्या फक्त 5% लोकांमध्येच या संसर्गाचं आजारात रूपांतर होतं. यामुळे तब्बल तीस लाख लोक दर वर्षी मत्यू पावतात. उरलेल्या 95% लोकांमध्येे ही लागण सुप्तावस्थेत असते. त्यामुळे या व्यक्तींना कोणतीही लक्षणं, त्रास होत नाही.

क्षयरोग एका विशिष्ट जीवाणूमुळे (बॅक्टेरियममुळे किंवा बॅसिलसमुळे) होतो. हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीमध्येे फार झपाट्यानं संक्रमित होतो. या ठिकाणी एक गोष्ट मात्र फारच महत्त्वाची आहे, ती म्हणजे संक्रमित होत असलेल्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती. इथेच खरं तर योगाची भूमिका सुरू होते. गेल्या वर्षभरात, कोरोनाशी लढताना संपूर्ण जगाने हे मान्य केलं आहे की नियमित, सातत्यपूर्ण योगसाधनेमुळेच ही प्रतिकारक्षमता (इम्यूनिटी) निर्माण होते आणि सर्वोच्च पातळीवर टिकून राहते.

क्षयरोगाच्या जीवाणूंचा सगळ्यात प्रखर आणि जोरदार हल्ला होतो तो आपल्या श्वसनसंस्थेवर. त्यामुळे आपली श्वसनसंस्था अत्यंत बळकट असणं आवश्यक आहे. प्राणायामाचा निरंतर अभ्यास करत राहिल्यास श्वसनसंस्थेची ही मजबुती टिकते.

 

क्षय या रोगात फुप्फुसांची कार्यक्षमता खूपच कमी होते. ही क्षमता मोजण्याच्या अनेक पद्धती आहेत. यात Forced Vital Capacity - FVC आणि  Forced Expiratory Volume - FEV या दोन क्षमता कमी होतात. प्राणायाम करताना फुप्फुसं हवेने पूर्ण भरतात आणि पूर्णपणे रिकामी होतात. यामुळे ऋतउ आणि ऋएत या दोन्ही गोष्टींमध्येे सुधारणा होते, हे लक्षात आलं. हा फायदा लक्षात घेऊन काही योगसंस्थांनी क्षयरोगाच्या रुग्णांना योगाचं प्रशिक्षण दिलं. यातून समोर आलेले परिणाम अतिशय सकारात्मक आहेत. योगाभ्यास हा पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस रुग्णांचा आजार बरा करण्यात फार मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावतो, हे एका संशोधनातून सिद्ध झालं आहे.

  

खरं तर कुठल्याही व्याधीवर उपचार करताना, ती लवकर बरी व्हायची असेल तर प्राणायाम हा हमखास मार्ग आहे. क्षयरोगाच्या रुग्णांनी हा प्राणायाम कसा करायचा, किती करायचा, याविषयी माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

 

या उपचारांचे दोन प्रकार आहेत - क्षयरोग किंवा श्वसनाशी संबंधित कोणताही आजार होऊ नये म्हणून काय करायचं, हा एक भाग आहे. विशेषतः सध्या ज्या परिस्थितीतून आपण गेले वर्षभर जात आहोत, तशी उद्भवू नये, किंवा आलीच, तर तो संसर्ग आपल्याला होणार नाही, यासाठी काय करायचं.

 

दुसरा भाग म्हणजे, असे आजार, संसर्ग दुर्दैवाने आपल्याला झालाच, तर वैद्यकीय उपचारांच्या जोडीने योग, प्राणायाम साधना करून अगदी खात्रीने आणि लवकर त्यातून बरं कसं व्हायचं.

 

योग्य असं पथ्यपाणी, नेमके उपचार आणि नियमित योगाभ्यास यांनी क्षय जिंकता येतो.

क्षयरोग होऊ नये म्हणून, तसंच त्यावर उपचार करताना प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी औषधोपचारांच्या जोडीला योग्य पौष्टिक आहार, योग, चालणं, मोकळ्या हवेत फिरणं, मन आनंदी ठेवणं या गोष्टींची तितकीच आवश्यकता असते. शरीरात असलेल्या इम्यून सेल्स - रोगप्रतिकार करणार्या पेशी - कमकुवत झाल्या, तर रोगाची लागण पटकन होते, विशेषतः फुप्फुसांमध्ये क्षयाची लागण पटकन होते.

दुर्दैवाने, फक्त योगसाधनेने टीबी बरा होतो असा दावा काही योगसंस्था करताना दिसतात. हे चुकीचं आहे. योग हे एक preventive शास्त्र आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं घेणं हा भाग या आजारामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. या औषधोपचारांच्या जोडीने योगाभ्यास करण्यात कोणताही धोका तर नाहीच, उलट औषधांचा शरीरावर होणारा परिणाम अधिक प्रभावी व्हायला मदतच होते. योगाभ्यासामुळे आजारी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, वैचारिक अशा सर्वच स्तरांवर सामर्थ्य वाढतं, खंबीरता येते.

 

ही व्याधी असणार्या व्यक्तींनी एकतर योगक्षेत्रातील दीर्घ अनुभव असलेल्या तज्ज्ञाचाच सल्ला घ्यायला हवा. हा सल्ला घेतल्यावर, प्रत्यक्ष अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांना भेटून त्यांना याविषयी कल्पना देणं गरजेचं आहे. तसंच, योगसराव सुरू केल्यानंतरही अधूनमधूून डॉक्टरांशी त्याबद्दल बोलत राहायला हवं. योगतज्ज्ञ कितीही ज्येष्ठ असला, तरी क्षयरोगासारख्या गंभीर स्वरूपाच्या आजारात त्यांचा आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा एकमेकांत समन्वय ठेवणं नितांत आवश्यक असतं.

 

योगप्रक्रिया या आपल्या श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाची शुद्धी राखायला मदत करतात. क्षयरोगी व्यक्तींना योगाभ्यास कशा प्रकारे करता येईल, ते आता आपण पाहू या.

श्वसनावर आधारित संचलन

अशा प्रकारच्या संचलनामुळे फुप्फुसाच्या सर्व भागांत हालचाली होऊन ते कार्यान्वित होतात. श्वसनामध्येे एक प्रकारची लयबद्धता, सातत्य येतं. श्वसनाचा वेग कमी-जास्त असा होता समान राहतो.

 

हस्तसंचलनाचे प्रकार - (यालाच हँड स्ट्रेच ब्रीदिंग असं म्हणतात).

 

हस्तप्रसारण -

सरळ उभं राहावं. दोन्ही हातांचे तळवे जुळलेल्या स्थितीत आपल्यासमोर खांद्याच्या रेषेत ठेवावेत.

सावकाश श्वास घेत घेत हात खांद्याच्या रेषेतूनच बाजूला न्यावे.

सावकाश श्वास सोडत सोडत हात परत जुळलेल्या स्थितीत आणावेत.

असं दहा वेळा करावं.



yoga_4  H x W:  

हस्त ताण

याही क्रियेत सरळ उभं राहावं.

हातांची बोटं एकमेकात गुंफावी.

हातांचे तळवे छातीवर टेकवावे.

श्वास घेत घेत दोन्ही हातांचे तळवे समोर ताणावे.

ताणलेल्या स्थितीतच हळूहळू डोक्यावर न्यावे.

असं दहा वेळा करावं.

 

yoga_1  H x W:

मार्जारासन

पाठ जमिनीला समांतर ठेवून हातांचे तळवे आणि गुडघे जमिनीवर टेकवावे.

श्वास घेत घेत कंबर, पाठ खाली दाबत वर आकाशाकडे पाहावं.

नंतर श्वास सोडत सोडत कंबर, पाठ वर नेत डोकं खाली न्यावं.

 

yoga_3  H x W:
 

भस्त्रिका प्राणायाम -

भस्त्रिका प्राणायाम म्हणजे भाता श्वसन. (लोहाराचा भाता जसा फास् फुस् असा आवाज करत वर-खाली होतो, तशी क्रिया).

सुखकर अशा स्थितीत बसावं.

फुप्फुसं पूर्ण भरून घेत जलद गतीने श्वास आत घ्यावा. लगेच जलद गतीने पूर्ण श्वास सोडावा.

असं दहा वेळा करावं.

मग सावकाश श्वास पूर्ण भरून घ्यावा. सहज शक्य वाटेल तोपर्यंत रोखावा. नंतर अगदी सावकाश सोडावा.

 

 
भ्रामरी -

नाकाने पूर्ण श्वास भरून घ्यावा.

श्वास सोडताना भुंग्याच्या गुणगुणण्यासारखा आवाज करत सोडावा. या आवाजामुळे निर्माण झालेली कंपनं शरीरभर - विशेषतः मस्तकाच्या भागात अनुभवावी.

ओम्कार उच्चारण दहा वेळा करावं.

 

सखोल विश्रांतीचं आसन

पाठीवर झोपावं. झोपताना छातीचा पिंजरा ताणला जाईल अशा पद्धतीने उशीवर पाठ टेकवावी. डोकं मागे जमिनीवर टेकवावं. हात शरीराच्या बाजूला जमिनीवर ढिले सोडावेत. म्हणजेच पर्यायाने फुप्फुसं पूर्ण क्षमतेनं आकुंचन पावतात आणि प्रसरणही पावतात, अशा या आसनस्थितीत दहा मिनिटं पडून राहावं.


9881495483