देवगिरी बँक फिटनेस क्लबची ‘कळसूबाई शिखर मोहीम’

विवेक मराठी    01-Mar-2021
Total Views |

@किशोर शितोळे

आपल्या खातेदारांच्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी देवगिरी बँक आपल्या कर्मचार्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबतही तितकीच दक्ष आहे. नुकतेच देवगिरी बँक फिटनेस क्लबच्या सदस्यांनी कळसूबाई शिखर सर करण्याची मोहीम फत्ते केली. या विलक्षण अनुभवाविषयी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे यांचं अनुभवकथन.
 
devgiri bank_1  

सह्याद्री पर्वतरांगांतील, महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, अबब... उंची तब्बल 5400 फूट. पण देवगिरी बँक फिटनेस क्लबच्या 62 सदस्यांनी बघता बघता सर केलं. या टीममध्ये होत्या महिलाही, मुलीही.. काही अनुभवी गडी आणि पहिल्यांदा डोंगर चढणारे नवखेही. हो, खरोखर उंच सरळ चढाई असलेलं हे शिखर एकदा सर करायचंच, असाच फिटनेस क्लब सदस्यांचा मनोदय होता.



सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

आणि मोहीम ठरली. बसमधून धमाल गाणी, भेंड्या, कोडी असे खेळ खेळत सकाळी 5 वाजताच अंधारात कळसूबाईच्या पायथ्याशी बारी गावाच्या बाहेर पोहोचलो. गावातून चालत जात असताना स्वर्ग पाहिला. होय, ते छोटंसं गावं म्हणजे स्वर्गच होता.


devgiri bank_2  

सर्वत्र हिरवीगार वनराई, सह्याद्रीवर कोसळणार्या तुफान पावसाला तोंड देणार्या छान कौलारू घराचं ते बारी गाव, घरासमोर बसायला दगडी किंवा मातीचे ओटे, आपल्या आधुनिक सिरॅमिक टाइल्सना लाजवणारे ते अगदी सपाट आणि सुंदर शेणाने सारवलेलं आंगण. त्या अंगणात आंघोळीचं पाणी तापवायला ठेवलेला तो तांब्याचा बंब, त्यात लाकडाच्या काड्या टाकणारी ती परकर-झबल्यातली छोटीशी ताई, काड्याच्या पेटीची गाडी-गाडी करीत फिरणारा चिमुकला बबल्या, प्रत्येक अंगणात सुबकसं तुळशीवृंदावन, त्याभोवतीची सुंदर रांगोळी, तर कुठे अंगणात सोप्याला (ओट्याला सोपा म्हणतात) बांधलेल्या गायी, सकाळी सकाळी त्यांच्या गळ्यातला घंटांचा तो मंजुळ नाद. गुरांचा शेणसारा करून, चकचकीत बादलीतसर सरआवाज करीत दूध काढणारे बबल्याचे वडील आणि त्या सकाळच्या लगबगीने डोक्यावरचा पदर सावरत आवराआवर करणारी ती माउली. अंगणातल्या चुलीवर मडक्यात शिजणारी ती डाळ. मडक्यावर झाकण ठेवलेल्या ताटलीच्या बाजूने उतू जाणार्या पिवळ्या फेसाबरोबर बाहेर पसरणारा मंदधुंद सुगंध. चुलीवरची डाळ आणि त्या विस्तवात शेकलेली कुरकुरीत, टम्म फुगलेली पापुद्य्राची भाकरी. अहाहा... चवच न्यारी.

हातात चिपळ्या वाजवीतकर जोडोनी विनवितो तुम्हां। तुम्ही वासुदेव म्हणा हो वासुदेव म्हणा॥असं गोड भजन गाणारा तो वासुदेव आणि नातवाच्या हाताने त्याला पसाभर धान्य वाढतानालई दिसांनी आलास रं वासुदेवाअसं मायेने म्हणणारी आजी.... महाराष्ट्राच्या गावाचं ते प्रतिबिंब मला लहानपणीच्या आठवणीत घेऊन गेलं.

 
devgiri bank_4  

गावाच्या मागच्या भागात, अगदी शिखराच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. एका शेतकर्याच्याच अंगणात व्यवस्था केलेली होती. छान गुलाबी थंडीत गरम गरम न्याहरी केली. ब्रीफिंग झालं. “थोडी थंडी असली, तरी कोणीही स्वेटर, जॅकेट, शाल, मोठं सामान, काहीच सोबत घेऊ नकाअशा सूचना केल्या आणि तिथवर आणलेलं सामान, बॅगा अनेकांनी तिथेच सोडण्याचाशहाणपणादाखवला (आणि वर चढताना कळलं की सोबत घेतलेली 200 मि.ली.ची पाण्याची बाटलीसुद्धा किती त्रासदायक होती ते. आणिहे लागेल, तेही लागेलअसा माणसाचा हावरट, असुरक्षित स्वभाव नको तितकं बरोबर घेत राहायला लावतो आणि एक क्षण असा येतो की आपला जीव सांभाळता सांभाळता हे जिवासाठीचं आणलेलं ओझंच जिवाला नकोसं वाटायला लागतं; मग नाइलाजाने एक एक वस्तू रस्त्यात सोडून पुढे जावं लागतं आणि शेवटी रिकामे हातच स्वर्गसुख देऊन जातात. पण कळायला खूप काळ जातो. काहींना लवकर कळतं - सुज्ञच ते.)

 

बोला बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “वंदे मातरम”, “भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि चढाईला सुरुवात केली. समोर कळसूबाईचं उंचच उंच शिखर आव्हान देत होतं. आमच्या फिटनेस क्लबने ते आव्हान स्वीकारलेलं होतं. कधी एकदा त्या सुळक्यावर पोहोचतो, यासाठी प्रत्येक जण आतुर झाला होता. 62 जणांची रांग त्या शेताच्या बांधांवरून पदक्रमण करीत निघाली. जबरदस्त उत्साह होता. ते मनोहर दृश्य मोबाइलमध्ये बंद करण्यासाठी अनेकांची धडपड सुरू होती.


devgiri bank_5  

पहिला छोटासा टप्पा संपला. सगळे मस्त उत्साहात. त्या टप्प्यावरही कळसूबाईचं एक कौलारू सुंदर मंदिर होतं. दर्शन घेतलं, फोटो काढले. कोवळा सूर्य नुकताच सह्याद्रीच्या मागून आणि निलगिरीच्या झाडांतून डोकं वर काढीत जणू आमच्या स्वागताला आला होता.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

 

आमच्या टीम लिडरने सांगितलं, “आता पुढे गेलं की एक धबधबा पॉइंट येईल, तिथपर्यंत थोडी धाप लागेल, थकल्यासारखं वाटेल; पण तिथे एक जुनी विहीर आहे, तिचं पाणी प्यायचं आणि निघायचं की पुढे सगळे आपोआप auto modeवर चालतील आणि आपण सगळे सहज शिखरावर पोहोचू.” (कित्तीच सोप्पं ना!)


devgiri bank_1   

मग काय, पुन्हा जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की जय घोषणा झाल्या आणि सैन्य पुढे निघालं. जरा चढण वाढली. उंच टप्पे लागायला लागले. जंगल घनदाट होतं. लाल माती पाय घसरू देत नव्हती. तरुण तुर्क उत्साहात पुढे जात होते, नवखे मागे रेंगाळायला सुरुवात व्हायला लागली.

डोंगर चढतानाच एक सूत्र असतं - वर किती राहिलंय हे बघायचं नाही, फक्त समोरचं एक एक पाऊल टाकीत जायचं. कारण वर पाहिलं कीबापरे, आणखी किती राहिलं?’ यानेच जीव गळाठून जातो. अगदी आयुष्यासारखं. ‘आणखी किती वर्षे जगायचंय??’ याचा विचार करीत बसण्यापेक्षाआजच्या प्रत्येक क्षणाचा आनंद कसा लुटता येईलहे एकदा शिकलं की जीवन कसं चैतन्याने भारावून जातं. जीवनाचा प्रवास मजेशीर होऊन जातो.

आता जरा मांड्या, पाय भरून यायला लागले. हातातल्या पाण्याच्या बाटल्या संपायला लागल्या. (बाटलीचं ओझं नको, म्हणूनअनेकांचा मित्रा, पाणी पाहिजे का?”चा बंधुभाव जागा व्हायला लागला होता.)

अनेक जण सहपरिवार होते. सुरुवातीला एकमेकांना हाताचा आधार देऊन काळजी, प्रेम व्यक्त करणारीप्रेमळ जोडपीआता एकमेकांचा ओझ्याचा हात झटकायला लागले होते. (माकडिणीची गोष्ट आठवली.) प्रमुख म्हणून असणारी मंडळी मागे राहणार्यांनाचला, चला, लवकर, पुढे जाऊन थांबूम्हणत उत्साह वाढवीत होती, मागच्यांची काळजी घेत होती.

जे जरा चढायला तरबेज असतात, रोजची सवय असते, त्यांनी टीममध्ये चालताना एक सूत्र पाळायचं असतं, ते म्हणजे एकट्यानेच पुढे जाऊन पराक्रमाचा झेंडा लावण्यापेक्षा नवख्यांच्या, लिंबूटिंबूंच्या सोबत राहून, “चला लवकर, छान वाटतंय, आलंच आता, खूप सोप्पं आहेअसा उत्साह वाढवत, धीर देत ओढत वर न्यायचं असतं, त्यांना वर चढण्याचा विश्वास द्यायचा असतो. नाहीतर, आपण पुढे निघून गेलो की ही काठावरची, नवखी मंडळी आधीच मी चढू शकत नाही अशा मनोभूमिकेत असतात आणि बाबा, आता ते expert गेले पुढे निघून, आपण मागे पडलो या असुरक्षितेत एकतर मागेच थांबून दम सोडून देतात, नाहीतर पुढे गेलेल्याला गाठण्याच्या घाईगडबडीत धडपडतात, कुठेतरी पडतात आणि मग काय, आता तर मी नाहीच वर येणार करून गलितगात्र होऊन मैदान सोडून देतात. पण देवगिरी बँक टीमचं कौतुक करावं तेवढं कमीच. मागे रेंगाळणारे अनेक जण होते, पण त्यांना ओढत घेऊन, साथ देत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत वर खेचणारे, तू करू शकतोस हे सांगणारे अनेक टीम लीडर होते. त्यामुळे ते स्वत:चा लवकर पोहोचण्याचा विक्रम करू शकले नाहीत, पण त्यांच्या चेहर्यावर माझी पूर्ण टीम वर आलीच हा आनंद जास्त होता. (आणि आपण एकटेच पुढे गेलो, पराक्रम गाजवला, पण आपलं कौतुक करणारी माणसंच सोबत नाहीत, तीच मागे राहिली, तर आपल्या त्या पराक्रमाला अर्थ तो काय? तुमच्यासाठी टाळ्या कोण वाजवणार?? मराठीत त्यालावांजोठाविजय म्हणतात.)

शिखर चढताना 40-50 वर्षे वयोगटातल्या, घर सांभाळणार्या महिला पुढे होत्या, पण 20-30 वर्ष वयाच्या बँकेत काम करणार्या युवती मागे पडत होत्या. त्यांच्याकडे निमित्त होतंआम्ही बैठे काम करून असे झालोय.’ पण त्या दिवशी त्यांनीही ठरवलं की आता घरी गेल्यावर व्यायाम सुरू करायचा, स्टॅमिना वाढवायचाच.

 
devgiri bank_1  
 

पण शिखर काही दिसत नव्हतं आणि विहीर काही येत नव्हती.

विहीर किती दूर आहे?” असं वरून येणार्यांना विचारलं की उत्तर येत होतं, “आली आता जवळच.” ‘वजनदारमंडळींचे आता हाल सुरू झाले होते. त्या गुलाबी थंडीत घामाच्या धारा वाहत होत्या. आता परत गेल्यावर दहा किलो वजन नक्की कमी करायचंच, रोज चालायला जायचं.. असेपण मनात करीतअसल्याचे आवाज बाहेरही ऐकायला येत होते.

कधी एकदाची विहीर येते असं झालं होतं.

मध्येच त्या जंगलात टपरीवजा हॉटेलं लागायची. लिंबूपाण्याचं सरबत एक नवी ऊर्जा देऊन जायचं. पुढचा टप्पा आला की टरबुजाची एक पातळ फोड अमृतासम वाटायची, तर कुठे गोड काकडी शरीरातलं आटलेली पाणी पातळी पुन्हा जागेवर आणायची. आम्ही सगळ्यांनीच ठरवलं होतं की या छोट्या हॉटेलवाल्यांशी भाव करायचा नाही, कारण आम्ही जिथे आमचंच (कमावलेलं) शरीर घेऊन चढू शकत नव्हतो, तिथे ही साधी, गरीब माणसं हे सगळं सामान, ओझं किती कष्टाने घेऊन चढून येत असतील.. त्यांच्याशी हो कसली 5-10 रुपयांची घासाघीस करायची!

रस्त्यात माकडं भेटायला लागली, तीही घाबरणारी. काही अगदी मित्रासारखी जवळ यायला लागली. हातातलं, खिशातलं ओढायची तयारी दाखवणारी. तर काही अंगावर धावून येणारीसुद्धा होती. पण त्या वेळी विवेकानंदांची गोष्ट आठवली. ‘त्या माकडानेअरेकेलं की आपणही हातात दगड घेऊनकारेकरायचं’. खरंच तसंच केलं, तर ती धोकादायक वाटणारी माकडंही मग मागे सरकायला लागली.

जीवनात अशी प्रत्येक वळणांवर छोटी-मोठी संकटं येत राहतात, आपण पाय रोवून त्यांच्याकडे पाहिलं की सहज जातात हो पळून. सगळीकडे सूत्रं तीच लागू पडतात, फक्त तीवेळेवर सुचावीलागतात.

आता जंगल संपलं, उघडा बोडखा डोंगर सुरू झाला होता. कोवळा सूर्य आता चटका द्यायला लागला होता. केलेला मेकअप उतरायला लागला होता. सपाट जमिनीच्या ठिकाणी गुडघ्याएवढ्या पायर्या परीक्षा पाहायला लागल्या होत्या. पण विहीर काही येत नव्हती. वरून उतरणार्यांना विचारलं कीअहो, विहीर किती दूर आहे?” सगळ्याचं उत्तर एकच - “ही काय आलीच की, जवळच आहे पुढे.”

पुढे उंच काळ्या कातळ पाषाणात कापून काढल्यासारखा सह्याद्रीचा उभा कडा लागला. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची आठवण झाली. पण तिथे लोखंडी शिडीची व्यवस्था होती. शिडीवर चढलं की आजूबाजूला खोल खोल दरीचं दर्शन, डोळे फिरणारं. ईश्वराची आठवण करून देत होतं. ‘शिडीवर पुढे तरबेज चढणारा, मागे दोघे-तिघे सांभाळणारे आणि मध्ये नवखेअशी रचना केली. मग मधल्यांना आधार वाटला. त्यांना पुढचं-मागचं दिसू द्यायचं नाही. पण सगळे चढलेच. पुन्हा घोषणा झाल्या - सिंहासनाधीश्वर....जय


devgiri bank_3   

बघा, जीवनात जोपर्यंत आपण एखादं काम करीत नाही, तोपर्यंतच ते काम अवघड असतं. एकदा का ते केलं की सगळं सोप्प वाटायला लागतं आणि सगळे करतात, मग मीच का कचरतो??

मध्येच फोनला रेंज आली. सगळे नवशिकेही घरी फोन लावूनअरे, मी सहज चढले, खूप अवघड आहे, पण मज्जा येतेयआणि ही मोहीम आखण्याचा आमचाही अट्टहासच फक्त होता एवढ्याचसाठी कीमी करू शकते, मी करू शकतोहा आत्मविश्वास देण्यासाठीच आणि तो सार्थ झाला होता.

शेवटी एकदाची विहीर आलीच. एवढ्या उंच, खडकात फक्त 10-12 फूट खोलीची ती विहीर, पण जिवंत पाण्याचे झरे होते. बादलीने पाणी काढलं, धूळ-घामाने माखलेल्या चेहर्यावर त्या पाण्याच्या शिबक्यांनी रौनक आणली. ओंजळीने ते गढूळ दिसणारं पाणी प्यायलो. ग्रेट! अरे काय चवदार होतं ते, किती पिऊ किती नाही, असं झालं होतं. जणू अमृतच ते. निसर्गाची किमयाच भारी.

मग विचारलं, “अरे, आणखी किती चढायचं?”

उत्तरं आलं, “हे काय, समोरचा कडा फक्त...”

ते ऐकून टीम लीडरचा राग कमी अन हसू जास्त आलं, त्याचं कौतुकही वाटलं. सुरुवातीलाच तो म्हणाला होता कीविहीर आल्यावर auto modeमध्ये चढतील सगळे.” पण विहीर अगदी शेवटी आहे, हे त्याने खुबीने लपवलं होतं आणि विहीर आली की सोप्प होणार, या आशेने आम्ही शेवटापर्यंत पोहोचलो होतो.

वडीलही असंच लहानपणीवेडं बनवायचे.’ एखाद्या ठिकाणी जाताना चालून थकायचो, रिक्षा करा म्हणायचो कीअरे आलंच, कशाला रिक्षा आता?” असं करत ठरलेल्या ठिकाणी चालतच घेऊन जायचे. हेही तसंच होतं.

 

त्यानेखूप उंच आहे, दूर आहे, अवघड आहेअसं खरं खरं सांगितलं असतं, तर निम्म्याहून जास्त जण खालीच थांबले असते ना. त्यामुळे अनेक वेळा आपल्या कॅप्टनवर (फार चिकित्सा करता) विश्वास टाकून मार्गक्रमण करीत राहावं, यश मिळतंच. जसं आपण ड्रायव्हिंग करताना शेजारी बसलेलीकोपायलट बायकोसूचना देत असते, तिचं ऐकण्यातच भलाई असते राव. तिच्या चुकीला माफी असते. आपल्या चुकीला...

 

आणि शेवटचं शिखर दिसलं. काळ्याकभिन्न पाषाणाचा तो खडक होता, अगदी उभा कापून काढल्यासारखा आणि त्यावर चढाई करून टोक गाठायचं होतं. आता हुरूप वाढला. शेवटची एकच लोखंडी शिडी होती. सगळे सर सर करीत वर पोहोचले अन जग जिंकल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्यावरून ओसंडून वाहत होता.

 

महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर देवगिरी बँकेने सर केलं होतं...GREAT!

 

मध्येच दरीतून येणार्या थंड वार्याची झुळूक सगळा थकवा विसरून टाकीत होती. आई कळसूबाईचं दर्शन घेतलं. कळसूबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, “मी केर काढणे भांडी घासणे सोडून इतर कामे करीन.” एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे रुसून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय.

 

मला आपली घरची कळसू आठवली. कधी रुसायचं सोडा, आम्ही भांडी नाही घासली तर, आम्हाला शिखरावर बसवायला तयार असती राव... पण खरंच, एक तास शिखरावर होतो. सगळे मागे राहिलेले हळूहळू एकत्र जमा होत होते. प्रत्येकाच्या चेहर्यावरमी करू शकलोयाचा खूप आनंद होता. इतकं उंच शिखर आयुष्यात पहिल्यांदाच चढणारे आम्ही सगळे, आमचा आनंद हा तुम्ही स्वतः अनुभव घेतल्यावरच कळणारा होता. आपण करू शकतो हा आत्मविश्वास माणसाच्या आयुष्याची कमाई असते म्हणतात, तशी आम्ही ही अनुभवाची खूप मोठी संपत्ती आज मिळवली होती.

 

आता कुठल्याही गप्पांमध्ये, बैठकांमध्ये आम्ही अतिशय अभिमानाने कळसूबाई शिखर सर करून आलोय हे सांगणारे झालोय आणि तेही बायको-मुलांसह आणि बँकेच्या सख्यासोबत्यांसह.

 

वाटलं, चढाई अवघड आहे. पण उतरताना जास्त जड जायला लागलं होतं. घसरंडीची उतरण पायाच्या पिंडर्यांना ताण देत होती. खोल पायर्या उतरताना पाय थरथरायला लागले होते आणि त्यामुळे 2-3 जण जरा किरकोळ घसरले, पण... पण थोडंच.

 
उतरताना गुडघा मोकळा राहतो आणि पाय आपटला जातो, ते अवघड चाललं होतं. पण कसेतरी पुन्हा त्या शेतकरीदादाच्या घरी पोहोचलो. मस्त हातपाय धुतले. सगळं अंग थरथर कापत होतं. थकण्याच्या अत्युच्च सीमेवर होते सगळे. जसे जसे पायथ्याला पोहोचतील, तसे तसे जेवायला बसत होते. काय खाल्लं, किती खाल्लं, कसं खाल्लं काहीच कळलं नाही. फक्त खात होतो. चुलीवरचं जेवण होतं. लई भारी मज्जा आली राव.... आणि हो, हे सगळं खाताना आपली नखरेल शहरी लेकरंही थकल्यामुळे गुमान आणि मस्त झालंय म्हणून जिभल्या चाटत तुटून पडली होती. शेवटी जीवनाचा आनंद घ्यायला आधी थकावंच लागतं. स्वतः कष्ट केल्यावरच जीवनाची मजा येते, हेच सत्य.
 

खरंच, हे निसर्गातले अनुभव खूप शिकवून जातात. तुम्हीही असं धाडस नक्की करा आणि निसर्गाशी नातं जोडा. आम्ही आता दोन महिन्यांनी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात रात्रीच्या डोंगरचढाईचं नियोजन करतोय... तुम्हीही येऊ शकता आमच्या देवगिरी बँक फिटनेस क्लबसहमवेत.

 

अध्यक्ष - देवगिरी नागरी सहकारी बँक .

औरंगाबाद