एकोऽहं बहु:स्याम: ‘तलासरी गाथा’

विवेक मराठी    17-Mar-2021   
Total Views |


RSS_1  H x W: 0

जव्हार तालुक्यातील विक्रमगड वसतिगृहावर मी काही काळ काम करत होते. त्या दरम्यान घडलेली घटना. काही कॉलेज विद्यार्थ्यांचा समूह आदिवासी भागातील सेवा प्रकल्प बघण्यासाठी आला होता. त्या वेळी वसतिगृहावरचे काम बघायला ते लोक आले होते. सोबतच्या कार्यकर्त्याला एका मुलाने विचारले, “तुम्ही आदिवासी मुलांना धार्मिक शिक्षण का देत आहात? जय जगदीश हरे प्रार्थना आणि दररोज गणपतीला नमस्कार करणे असे का शिकवत आहात?” त्या वेळी वनवासी कल्याण केंद्राचे एक कार्यकर्ते होते, त्यांनी उत्तरादाखल एक प्रतिप्रश्न विचारला. ते म्हणाले, “तुम्ही आता टेटवाळ्याचा प्रकल्प बघून आलात. तिथे विचारलं का ख्रिस्ती प्रार्थना का घेता, चर्च वसतिगृहापेक्षाही मोठे सुसज्ज का आहे?” कॉलेज विद्यार्थ्यांचा समूह एकदम शांत झाला. तरीही पुन्हा एकाने सुरुवात केलीच. तो म्हणाला, “धार्मिक शिक्षण दोन्हीकडचे चूकच आहे. त्याबद्दल आम्ही त्यांच्याशीही बोलूच. अहवालात नमूद करू. पण तुम्ही तर राजकीय विचारही घेऊन निघता. तुमच्या तलासरी वसतिगृहाचे माजी विद्यार्थी बीजेपीचे काम करताना दिसतात.त्यावर कल्याण केंद्राचे कार्यकर्ते मंद हसून म्हणाले, “गोदाताई परुळेकर यांच्या कामाच्या आधारे सीपीएमचा राजकीय विचार घेऊन चालणार्‍यांना तुम्ही हा प्रश्न विचारला का कधी?”


तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी

* तलासरी, बारीपाडा आणि यमगरवाडी या संघविचाराच्या तीन महत्त्वाच्या प्रयोगशाळा.

६00/- रुपयांचा संच मिळवा केवळ ४९९/- रुपयात.

https://www.vivekprakashan.in/books/talasari-baripada-and-yamagarwadi/

 

नेहमी संघाच्या प्रकल्पांना धारेवर धरले जाते. इतरांनी प्रकल्प चालवताना, शाळा चालवताना, वसतिगृहे चालवताना धार्मिक शिक्षण दिले, धर्मांतर करून घेतले, राजकीय विचारांनी चालणारे कार्यकर्ते वसतिगृहामधून उभे केले तर तितकेसे आक्षेप घेतले जात नाहीत. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या माध्यमातून चालणार्‍या प्रकल्पांना मात्र कायम हे निकष लावले जातात. खरे तर या प्रकल्पांमुळे अनेक कुटुंबे शिक्षणाच्या, प्रगतीच्या मार्गावर गेलेली असतात. धर्मांतर वगैरे गोष्टी तर अजिबात केल्या जात नाहीत. आमिष वगैरे न दाखवता या देशाच्या मातीला सुसंगत असा मानवता धर्म हाच अधिकतर सांगितला जातो, ज्यामध्ये सदाचरण, अतिथी सेवा, मातृ-पितृ आदरभाव या गोष्टींचाच अधिक प्रमाणात अंतर्भाव असतो. श्रद्धास्थान म्हणून गणपतीची, भारतमातेची प्रतिमा असते. पण विखार शिकवला जात नाही.

असे असतानाही संघाच्या/विहिंपच्या प्रकल्पांवर मात्र नेहमी बोट ठेवले जाते. अनेकदा हे वादच नकोत म्हणून संघाचे कार्यकर्ते प्रसिद्धिपराङ्मुख राहून त्या-त्या क्षेत्रात आपले काम चालवत असतात. मात्र कधीतरी हा मुद्दा नीट लक्षात घेतला पाहिजे, हे खरे.


तलासरी गाथालिहिताना लेखक अरुण करमरकर यांनी इतर कार्ये आणि विश्व हिंदू परिषदेमार्फत चालणारे काम यातील मुख्य फरक अनेक ठिकाणी बोलून दाखवला आहे. संघर्ष, विद्रोह याऐवजी माणसे जोडणे हाच तलासरी प्रकल्पाचा स्थायिभाव राहिला आहे. म्हणूनच असे एखादे एकाच वेळी स्थिर आणि चल कार्य, जे पाच-सहा विद्यार्थ्यांना घेऊन सुरू झाले होते, ते आज दिमाखात पन्नास वर्षे पूर्ण करून अनेकानेक प्रकल्पांचे प्रेरणास्थान आणि आजूबाजूच्या पाड्यापाड्यावर श्रद्धेचे व आशेचे केंद्र बनून राहिले आहे.

मोरोपंत पिंगळे, दामूअण्णा टोकेकर, माधवराव काणे आणि अंधेर गुरुजी या चौघांनी या कार्याची मुहूर्तमेढ रोवली. पुढे आप्पा जोशी आणि त्यांच्या पत्नी वसुधाताई यांनी या कामात उडी घेतली. लेखकाने तलासरी गाथेमध्ये लिहिताना माजी विद्यार्थी, हितचिंतक, कार्यकर्ते अशा सर्वांचेच यथायोग्य दर्शन आपल्याला घडवले आहे. तलासरी हे खर्‍या अर्थाने केंद्र आहे, हे लेखक अनेक वेळा सांगून जातो. या केंद्राचा परीघ हळूहळू विक्रमगड, चालतवड, बेरिस्ते, दाडदा, रांधा, जव्हार, देवबांध येथील वसतिगृह प्रकल्पांच्या रूपाने वाढत राहिला. हे केंद्र कितीतरी संस्थांचे प्रेरणास्थान ठरले. प्रगती प्रतिष्ठान, हिंदू सेवा संघ, सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ, उद्योजकता विकास अशा वेगवेगळ्या प्रकल्पांमधून विविधांगी विकासाचे प्रयोग या भागात सुरू झाले.लेखक लिहितात - प्रकल्पामुळे आणि प्रकल्पाच्या माध्यमातून काय काय साध्य झाले आहे! परिसरात ठीकठिकाणी पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांची निर्मिती करण्यामध्ये प्रकल्पाची भूमिका मोठी राहिली आहे. शिक्षणाच्या प्रसाराला गती देण्यासाठी तर प्रकल्प अग्रभागी राहिला आहे. औद्योगिकीकरण वाढीला लागावे, या दृष्टीने असलेल्या सरकारी योजनेनुसार येथील काही इंडस्ट्रियल झोन म्हणून जाहीर करण्याचा आराखडा सरकारने आखला. त्या वेळी गिरगाव भागातील अनेक आदिवासी बांधवांच्या जमिनी जाण्याची वेळ आली. तेव्हा प्रकल्पाने केलेल्या हस्तक्षेपामुळे जमिनी अधिग्रहणाच्या कचाट्यातून वाचल्या. कितीक माजी विद्यार्थी हे सरपंच, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य अशा वेगवेगळ्या कामांमध्ये आहेत आणि ते त्या त्या ठिकाणी समाजभान जपून आपले कार्य करीत आहेत. अशा कितीतरी कथा आपल्याला या पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. माधवराव काण्यांबरोबर, रामाच्या मागे लक्ष्मण असावा तसे अप्पा जोशी या प्रकल्पाला लाभले. अगदी मरणान्त हल्ला होऊनही ते पुन्हा एकदा प्रकल्पाच्या कामात रुजू झाले.

या प्रकल्पाच्या कामाचे वर्णन किती आणि कसे करावे! सामुदायिक विवाह, विद्यार्थ्यांचे शिक्षण, गोशाळा, तंत्रज्ञान कौशल्ये शिकवणे, वृक्षारोपण, आरोग्य प्रकल्प, गणेशोत्सवासारखे श्रद्धाजागृतीचे प्रकल्प, क्रीडेमध्ये नैपुण्य मिळवावे म्हणून क्रीडा महोत्सवाचे आयोजन, मूर्ती केंद्र, लोहारकाम सुतारकाम यासारख्या तंत्रकौशल्य प्रशिक्षणाचे आयोजन, महिला सबलीकरण असे कितीतरी विषय - मग ते सामाजिक वनीकरण असो, कृषिविकास व उद्योजकता विकास असो, फिरते दवाखाने व फिरत्या प्रयोगशाळा असोत, समाजातील त्या त्या घटकांना जोडून घेत जनजाती समूहापर्यंत हे सारे बदल पोहोचवायचे, हा वसा तलासरी केंद्राने घेतलेला आहे आणि तो आजही तसाच अविरतपणे चालू आहे.

अशा एखाद्या प्रकल्पाची विजयगाथा सूत्रबद्ध पद्धतीने लिहिणे हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच कठीण आहे. परंतु अरुण करमरकर यांनी अत्यंत श्रद्धेने हे लेखन पूर्ण केले आहे. त्वदीय वस्तू गोविंदम् तुभ्यमेव समर्पयेत.. या भावनेने लिहिलेली ही गाथा. तलासरी प्रकल्पाच्या प्रारंभापासून आजपर्यंतच्या वाटचालीची समग्र माहिती देणारी.


संघकार्यकर्ता कसा असतो
, हे एका हृद्य प्रसंगातून लेखक सांगतात. गोदूताई परुळेकर निधन पावल्यानंतर, माधवराव काणे प्रकृती ठीक नसतानाही अंत्यदर्शन घ्यायला गेले आणि ढसाढसा रडले. गोदाताईने जे काम केले, त्याचे मोल कशातच करता येणार नाहीअसे त्यांनी सांगितले. खरोखर, विरोधी विचारांच्या व्यक्तीसाठी असे रडणार्‍या या कार्यकर्त्याचे खरे प्रेम हे ईश्वरी आहे, हे लक्षात येते. अशाच कार्यकर्त्यांच्या प्रेरणेतून तलासरीसारखी दीपस्तंभ केंद्रे उभी राहतात.