आसाममध्ये येऊ घातलेल्या निवडणुका म्हणजे ‘असमिया संस्कृती विरुद्ध मियाँ संस्कृती’ असा एक सरळसरळ लढा आहे. विविध प्रयत्नांनी वंशविस्तार आणि सत्ता मिळवणे, इतकेच उद्दिष्ट असल्यामुळे या वंशाला रोखणे किंवा त्यांचा प्रभाव कमी करणे, केवळ आणि केवळ आसामी समाजाच्या एकीकृत प्रयत्नांनीच शक्य आहे. 2014च्या सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रीय विचारधारेचे सरकार केंद्रात व त्यापाठोपाठ राज्यात आल्यावर घडू लागलेल्या बदलांमुळे समाजात नवचैतन्य पसरू लागले आहे. निवडणुकांनंतर हे चित्र स्पष्ट होऊ शकते.
2016 साली सर्वानंद सोनोवाल यांना मुख्यमंत्रिपद बहाल करून भाजपाने आपले सरकार आसामात प्रस्थापित केले. आता 27 मार्च, 1 आणि 6 एप्रिल रोजी होणार्या तीन टप्प्यांतील विधानसभा निवडणुकांची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. सर्वानंद सोनोवाल, हिमंता बिस्वा सरमा, विधानसभेचे सभापती हितेंद्रनाथ गोस्वामी, राज्यमंत्री (असोम गण परिषदेचे अध्यक्ष) अतुल बोरा, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांच्यासह अनेक महत्त्वपूर्ण उमेदवार रिंगणात आहेत. राज्य काँग्रेसचे अध्यक्ष रिपुन बोरा, असम राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष लुरिनज्योती गोगोई, रायजोर दल प्रमुख अखिल गोगोई इ. नेत्यांचे भविष्य या निवडणुकीत ठरणार आहे.
सामाजिक परिस्थितीचे सामान्य विश्लेषण
ही निवडणूक केवळ नेतेमंडळींचे किंवा त्यांच्या पक्षांचेच भविष्य सुनिश्चित करणार नाही, तर सगळ्या ईशान्य भारताचे आणि पर्यायाने भारत देशाचे भवितव्य कुठे ना कुठे या निवडणुकींशी जोडले गेलेले आहे. इतर ईशान्य भारतीय राज्यांसाठी आसाम केवळ भौगोलिकदृष्ट्याच महत्त्वाचे राज्य नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा अनेक अंगांनी त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.
आपल्याला माहीतच आहे की स्वातंत्र्यपूर्व काळापासून आसाममध्ये आणि आजूबाजूच्या प्रदेशांत बांगला देशातील मुस्लीम समाज प्रचंड संख्येने पद्धतशीरपणे येऊन वस्ती करू लागला. साहजिकच आसामच्या विविध जमातींच्या समाजजीवनावर त्याचा विपरीत परिणाम भयंकर स्वरूपात होऊ लागला. त्यांचे रोजगार त्यांच्यापासून हिसकावून घेतले जाऊ लागले. त्यांची सामाजिक, धार्मिक ओळख, प्रतिष्ठा पणाला लागली. प्रचंड वेगाने धर्मांतरे होऊ लागली. जनजातीय मुलींशी लग्न करून त्यांची वडिलोपार्जित जमीन बळकावण्याचा नवाच व्यवसाय या ‘मियाँ संस्कृती’ने उदयास आणला. विविध धर्मांध संस्थांच्या, राजकीय पक्षांच्या मदतीने आज आसाममध्ये आणि आजूबाजूच्या क्षेत्रात तो फार मोठ्या प्रमाणात फोफावतो आहे. ईशान्य भारताला बांगला देशाशी जोडण्याचा आंतरराष्ट्रीय शक्तींचा गेली 100हूनही अधिक वर्षे प्रयत्न चालू आहे. त्यामुळे हा भाग अस्वस्थ राहील, इथे अराजकाचे राज्य असेल असे प्रयत्न सातत्याने जाणीवपूर्वक केले गेले. राष्ट्रीय विचारांचे सरकार सर्वच राज्यांमध्ये आणि केंद्रात आल्यापासून या प्रयत्नांना चांगलीच खीळ बसली आहे.
इतिहास
या विषयाचा थोडा इतिहास समजून घेतला की या निवडणुकांची व्याप्ती आपल्या अधिक चांगल्या प्रकारे ध्यानात येऊ लागेल.
बांगला देशी मुस्लिमांच्या घुसखोरीला आळा घालण्याच्या उद्देशाने 80च्या दशकात आसाम आंदोलन भडकले. परिणामी तत्कालीन काँग्रेस सरकारने आसाम करारावर स्वाक्षरी केली, पण त्याचबरोबर ‘बांगला देशी घुसखोरांच्या सुरक्षेसाठी’ कठोर आयएमडीटी कायदा लागू केला. सामान्य आसामी समाजाची घनघोर फसवणूक करणार्या या कायद्याच्या विरोधात आत्ताचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढले आणि त्यांनी तो कायदा रद्द करवला. याच काळात एका अब्जाधीश मौलानांनी - म्हणजेच बदरुद्दीन अजमल यानी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून एक मुस्लीम पक्ष स्थापन केला. तसेच अजमल फाउंडेशन आणि मार्काझ उल मारीफ या स्वतःच्या स्वयंसेवी संस्था एफसीआरएच्या अंतर्गत नोंदणीकृत करून घेतल्या. आंतरराष्ट्रीय दहशतवादी अर्थपुरवठा संबंधित संस्थांकडून मौलानाच्या या स्वयंसेवी संस्था कोट्यवधी रुपये मिळवतात. या पैशाचा विनियोग बदरुद्दीनला शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी व्यक्ती अशी प्रतिमा तयार करण्यासाठी केला जातोच, पण अनेक समाजविघातक, राष्ट्रविरोधी गोष्टीही या पैशाद्वारे केल्या जातात. लीगल राइट्स ऑब्झरर्व्हेटरी या संस्थेने यातील सत्य उघडायला सुरुवात केली आहे. परंतु तरीही हा राजकीय पक्ष आसामच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू लागला आहे, ही बाब नाकारता येत नाही.
आसामच्या राजकारणात एजीपी, युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल), जीएसपी इत्यादी पक्षांशी भाजपाची युती आहे, तर काँग्रेसने ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (एआययूडीएफ), बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ), माकप, सीपीआय, सीपीआय (एमएल), आंचालिक गण मोर्चा इत्यादींचा समावेश असलेल्या महायुतीत प्रवेश केला आहे. यातील एआययूडीएफ पार्टी म्हणजेच मौलाना बदरुद्दीन अजमलची पार्टी.
स्वअस्मितेचा संघर्ष, गटबाजी या केवळ दिशाभूल करणार्या अफूच्या गोळ्या आहेत, याची ज्वलंत जाणीव समाजात निर्माण होताना दिसू लागली आहे.
पण काँग्रेसला याच्याशी काही देणेघेणे नाही. राष्ट्रीय काँग्रेस इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करण्यात आणि आत्ममग्नतेत मश्गूल आहे, हेच पदोपदी जाणवत राहते. बदरुद्दीन अजमलची पार्टी आणि पूर्वीची मुस्लीम लीग यांच्यामध्ये अर्थाअर्थी काही फारसा फरक नाही. बदरुद्दीनही आज एका छोट्याशा राज्यात सीमित आहे असे वाटत असले, तरी अजमल ही केवळ एक व्यक्ती किंवा एक राजकीय विरोधी पक्ष असा याचा विचार न करता ही एक भारतीय घटनेला आव्हान देणारी असांविधानिक प्रक्रिया आहे, अशा दृष्टीकोनातून या घटनाक्रमाकडे व व्यक्तिमत्त्वांकडे पाहावे लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की जे आसामात घडू शकते, ते भारतात कुठेही घडू शकते. आणि म्हणूनच आपण भारतीय म्हणून असामी जनतेच्या पाठी उभे राहायला हवे. कारण धार्मिक निकषांवर बदलणारा लोकसंख्येचा हा विस्तार नैसर्गिक नाही आणि ही असामी जनतेसाठी धोक्याची घंटा आहे. असमिया समाजाला या गोष्टींची तीव्र जाणीव होऊ लागली आहे, असेच निवडणूक प्रचारातील राष्ट्रीय विचारांच्या नेत्यांच्या भाषणांतून लक्षात येते. आसामी तरुणांना विकास, शिक्षण, रोजगार या गोष्टीबरोबरच ‘बांगला देशी घुसखोरांचा कायमचा बंदोबस्त’ हे भाजपाचे आश्वासनही आकर्षित करते आहे.
भाजपा सरकारने जागोजागी घुसखोरीला आळा घालण्याचे काम गेल्या काही वर्षांत केले आहे. छठउसारखे महत्त्वाचे बिलही प्रतीक्षेत आहे. आजपर्यंत न घडलेल्या सुखद धक्के देणार्या अशा कितीतरी गोष्टी भाजपाचे निवडणुकीतील पारडे जड करते.
निवडणुकीच्या रणभूमीवरून
आसाम विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मोठ्या प्रमाणात प्रचारमोहिमेला सुरुवात केली आहे. 27 मार्च रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानात एकूण 126 जागांपैकी 47 जागांसाठी 255 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
पहिल्या फेरीतील बहुतांश जागा पूर्व आसाममधील मतदारसंघ आहेत.
अनेक वजनदार नेतेमंडळी भाजपाच्या प्रचारासाठी मैदानात उतरू लागली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 आणि 20 मार्च रोजी बराक व्हॅली येथे, तसेच आणखीही काही प्रचारसभांना संबोधित करण्यासाठी राज्यात आले होते. पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही प्रवास आसामात लागलेले आहेत. 14 तारखेला मार्गारिटा येथे झालेले अमित शाह यांचे भाषण खूपच गाजले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही दौरा असाच वादळी आणि प्रचंड जनसमुदाय खेचणारा ठरला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान इत्यादी बिस्नाथ, गोहपूर, देरगाव, मारियानी, शिवसागर, चामगुरी, नहारकटिया, दुलियाजन, दिब्रुगड इत्यादी ठिकाणी असणार्या विविध प्रचारसभांसाठी आसाम दौर्यावर आहेत.
9987883873