युद्धभेरी गर्जती, दुंदुभी निनादती

विवेक मराठी    19-Mar-2021   
Total Views |

दुसर्या महायुद्धाला आता पंचाहत्तर वर्षे उलटून गेल्यावरही त्याविषयी सतत अभ्यास सुरू आहे, ही स्थिती लक्षात घेऊन लेखक किरण गोखले यांनी ठरवले की, आपणही दुसर्या महायुद्धावर अद्ययावत ग्रंथरचना करायची. लेखक स्वत: व्यवस्थापन क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यामुळे या ग्रंथात दुसर्या महायुद्धाची कथा तर आहेच, त्याचबरोबर त्या कथेतल्या घटनांचा, पात्रांचा व्यवस्थापकीयदृष्ट्या विचार, विश्लेषण आहे.


book_1  H x W:

1914 ते 1918 या काळात जगाने एक अत्यंत संहारक, अत्यंत भीषण असे युद्ध अनुभवले. यात एका बाजूला ब्रिटन, फ्रान्स, रशिया, अमेरिका ही मित्रराष्ट्रे, तर विरुद्ध बाजूला जर्मनी आणि ऑस्ट्रो-हंगेरियन साम्राज्य असे प्रतिद्वंद्वी होते. म्हणजेच हे युद्ध मुख्यत: युरोपीय राष्ट्रांचे होते. परंतु या राष्ट्रांची साम्राज्ये जगभर पसरलेली होती. त्यामुळे युद्धाच्या ज्वाळा सर्वत्र भडकत गेल्या. अत्याधुनिक मानवजातीने इतके विनाशकारी युद्ध यापूर्वी अनुभवले नव्हते. म्हणून त्याला अगोदर नाव मिळालेग्रेट वॉरआणि मग म्हणू लागलेवर्ल्ड वॉर’.


या
महायुद्धात ब्रिटनला विजयी करणारा पंतप्रधान लॉइड जॉर्ज हा मोठा द्रष्टा पुरुष होता. युद्धातल्या भीषण विध्वंसाबद्दल बोलताना तो नंतर एकदा म्हणाला, “कदाचित आगामी काळात तुम्ही आणखी एक युद्ध पाहाल. ते इतके भीषण असेल की, त्यासमोर तुम्हाला हे महायुद्ध किरकोळ भासेल.”

लॉइड जॉर्जच्या मुखाने जणू नियतीच बोलत होती. कारण 1939 साली पुन्हा एकदा एक महायुद्ध सुरू झाले. ते इतके भीषण, सर्वंकष आणि सर्वव्यापी ठरले की, तब्बल सहा वर्षे - म्हणजे 1945 सालापर्यंत त्याने संपूर्ण जगाला होरपळून सोडले. तेव्हापासून 1914 ते 1918च्या युद्धालापहिले महायुद्धआणि 1939 ते 1945च्या युद्धालादुसरे महायुद्धअसे म्हटले जाऊ लागले.

मॅजेस्टिक बुक स्टॉलचे संस्थापक केशवराव कोठावळे हे मोठे विचक्षण, साक्षेपी असे संपादक आणि प्रकाशक होते. साहित्यातील सौंदर्याची आणि त्याचबरोबर व्यवसायाची - म्हणजेच बाजारात काय चालू शकते, याची त्यांना नेमकी जाण होती. त्यामुळेच 1 जानेवारी 1975 या दिवशी त्यांनी एकाच वेळी युद्धविषयक तीन पुस्तके प्रकाशित केली. ‘माओचे लष्करी आव्हान’, ‘पहिले महायुद्धआणिदुसरे महायुद्ध’. यापैकी पहिल्या दोन पुस्तकांचे लेखक होते दि.वि. गोखले आणि तिसर्या पुस्तकाचे लेखक होते वि.. वाळिंबे. दोघेही ख्यातनाम पत्रकार, शैलीदार लेखक आणि मुख्य म्हणजे युद्ध अभ्यासक. केशवराव कोठावळ्यांचा होरा अचूक ठरला. तिन्ही पुस्तकांचे वाचकांनी उत्तम स्वागत केले. इतकेच नव्हे, तर तिन्ही पुस्तके त्या त्या विषयातली मानदंड ठरली आणि आजही आहेत.

आता 2014 साली जेव्हा पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभाला शंभर वर्षे पूर्ण झाली तेव्हा केशवराव, दि.वि. गोखले आणि वि.. वाळिंबे ही तिन्ही कर्तबगार व्यक्तिमत्त्वे कालवश झालेली होती. मॅजेस्टिक प्रकाशनाचे धनी केशवरावांचे सुपुत्र अशोकराव कोठावळे यांनीपहिले महायुद्धची नवी आवृत्ती काढायची ठरवली. त्यांनी दि.वि. गोखले यांचे सुपुत्र किरण गोखले यांच्यावर त्याचे एकंदर काम सोपवले.

त्यानुसारपहिले महायुद्धची नवी आवृत्ती निघाली. वाचक तिच्या जणू प्रतीक्षेतच होते. हे काम करत असतानाच किरण गोखले यांनी पहिल्या आणि दुसर्या महायुद्धाशी संबंधित अनेक ग्रंथांचे आपोआपच वाचन केले. त्यातून त्यांना असे जाणवले की, दुसर्या महायुद्धाबाबत एका नव्या पुस्तकाची, ज्याला टीकात्मक विवेचन - क्रिटिकल स्टडी म्हणता येईल अशा पुस्तकाची गरज आहे. आतापर्यंत मराठीमध्ये दुसर्या महायुद्धाची प्रारंभापासून अंतापर्यंत सलग कथा सांगणारे एकमेव पुस्तक म्हणजे वि.. वाळिंब्यांचेवॉर्सा ते हिरोशिमाहेच फक्त आहे. वर उल्लेख केलेले वाळिंब्यांचेचदुसरे महायुद्धहे पुस्तक म्हणजे यावॉर्सा ते हिरोशिमाचेच संक्षिप्तीकरण आहे. शिवाय वाळिंब्याचेचहिटलर’, वि.. कानिटकर यांचीनाझी भस्मासुराचा उदयास्तआणिचर्चिल’, तर दि.वि. गोखल्यांचेचयुद्धनेतृत्वही पुस्तकेही दुसर्या महायुद्धाशी संबंधितच आहेत; परंतु दुसरे महायुद्ध हा विषयच इतका व्यापक आहे की, त्याबद्दल लिहावे तितके कमीच. महायुद्धाच्या त्या सहा वर्षांच्या कालखंडात प्रत्यक्ष रणांगणावर आणि त्याहीपेक्षा रणांगणाबाहेरच्या जगात इतक्या घटना घडल्या, इतक्या वेगाने घडल्या की, त्यांचा नुसता आढावा घेण्यासाठीसुद्धा साठ वर्षे लागावीत आणि खरोखरच पाश्चिमात्य जगात आजही, महायुद्धाला आता पंचाहत्तर वर्षे उलटून गेल्यावरही, त्याविषयी सतत अभ्यास सुरू आहे. नवनवीन विद्वान अभ्यासक त्या जुन्या युद्धाचे नवे, आतापर्यंत उजेडात आलेले पैलू अभ्यासून त्यावर ग्रंथरचना करत असतात. त्या ग्रंथांना वाचकांचाही प्रतिसाद मिळत असतो. नवनवे लेखक-दिग्दर्शक त्या महायुद्धावर चित्रपट किंवा दूरदर्शन मालिका बनवत असतात.

 

अशी सगळी स्थिती लक्षात घेऊन लेखक किरण गोखले यांनी ठरवले की, आपणही दुसर्या महायुद्धावर अद्ययावत ग्रंथरचना करायची. त्यांच्या या संकल्पाला प्रकाशक अशोक कोठावळे यांनी उचलून धरले. लेखक स्वत: व्यवस्थापन क्षेत्रातले तज्ज्ञ असल्यामुळे त्या ग्रंथात दुसर्या महायुद्धाची कथा तर आहेच, त्याचबरोबर त्या कथेतल्या घटनांचा, पात्रांचा व्यवस्थापकीयदृष्ट्या विचार, विश्लेषण आहे.

 

या कथेत चर्चिल, हिटलर, स्टॅलिन आणि रुझवेल्ट हे आपापल्या देशांचे सर्वोच्च नेते ही प्रमुख पात्रे होती. त्यांच्याभोवती वावरणारे त्यांचे मंत्रीमंडळातले सहकारी, त्यांच्या सेनादलांमधले असंख्य कर्तबगार सेनापती, त्यांच्या युद्धसामग्रीचे उत्पादन करणार्या प्रयोगशाळांमधले शास्त्रज्ञ अशा अक्षरश: हजारो मानवी पात्रांच्या हालचालींमधून ही वेगवान कथा घडत गेलेली आहे. ही सर्व माणसे कसा विचार करत होती? त्यांच्या गुणदोषांमधून त्यांचे वागणे कसे घडत होते? एकमेकांच्या डाव-प्रतिडावांना ते कशा प्रतिक्रिया देत होते? याचे व्यवस्थापन विश्लेषण समजून घेणे, हे लेखकाने अत्यंत वाचनीय केले आहे.

त्याचप्रमाणे या महायुद्धातला यंत्रांचा सहभागही फार मोठा होता. लक्षावधी मानवांप्रमाणेच त्यात, त्याच मानवाने निर्माण केलेली लक्षावधी यंत्रेही सामील होती. प्रत्येक युद्धमान राष्ट्राने रणगाडे, तोफा, विमाने, पाणबुड्या, युद्धनौका, चिलखती वाहने अशी अद्ययावत यंत्रे लाखोंच्या संख्येने रणांगणावर उतरवली होती. त्यांचा तौलानिक विचार, तक्ते मांडून इथे प्रथमच करण्यात आला आहे.

 

शिवाय उत्तम नकाशे, संदर्भग्रंथांची यादी, प्रमुख घटनांचा कालक्रम आणि विस्तृत अशी व्यक्ती सूची यांच्या अंतर्भावामुळे एक उत्कृष्ट असा संदर्भग्रंथ निर्माण झाला आहे. युद्ध या विषयाचे अभ्यासक, लेखक, पत्रकार, वक्ते, व्याख्याते यांना चटकन संदर्भासाठी हाताशी असावे, असे उत्तम पुस्तक. उणीवच काढायची तर ती म्हणजे यात एकही छायाचित्र नाही. युद्धविषयक ग्रंथात नकाशाइतकीच छायाचित्रेही महत्त्वाची.
 

सतीश भावसार यांचे देखणे मुखपृष्ठ, अनंत चितळे यांचे नकाशे, आनंद लाटकर यांचे नेत्रसुखद मुद्रण यांसह अतिशय सुबक असे बाह्यरंग.