व्होकल फॉर लोकल या संकल्पनेचे खर्या अर्थाने सोने करणार्या अनेक महिला आज पाहायला मिळतात. आपल्यातील कल्पकतेला व्यवसायाचे रूप देऊन त्यातून अर्थार्जन आणि रोजगारनिर्मिती करणार्या काही उद्योगिनींची माहिती जागतिक महिला दिनानिमित्त देत आहोत. त्यांपैकी एक म्हणजे तनुजा कुलकर्णी. ‘शतजा क्रिएशन्स’ या नावाने तनुजा कुलकर्णी डिझायनर बेडशीट्स, पॅचवर्कची दुपटी, अॅप्रन्स, स्लिंग बॅग, गोधडी, टेबल मॅट्स, उशांची खोळ, खणाची तोरणे, विविध पर्सेस असे वैविध्य असलेल्या वस्तू तयार करतात.

विजिगीषा
निराशेची गर्ता,
असूदेत,
उदास,
खोल,
काळोखाची...
कठीण काँक्रिटच्या भेगेतून,
खडक वाळूच्या जागेतून,
मी भिजेन पुन्हा...
मी रुजेन पुन्हा...
मी उठेन पुन्हा...
मी उमटेन पुन्हा...
खडकातून जिद्दीने उगवून आलेल्या एका तेजस्वी रूपाविषयी या ओळी आठवल्या, जेव्हा तनुजा कुलकर्णींना भेटले. आयुष्यात कधीतरी संकटे येतातच, पण संकटांच्या येणार्या रांगेतून आयुष्य शोधण्यासाठी लागते ती जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि मेहनतीची अपूर्व तयारी.
आज नाशिककर असल्या, तरी तनुजा मूळच्या ठाणेकर. “माझ्या मनातून, माझ्या असण्यातून ठाणे शहर कधीही गेलं नाही” असं त्या आवर्जून सांगतात. लग्नानंतर आयुष्यात आनंद यावा असे प्रत्येकीचे स्वप्न असते, मात्र ते साकार होईलच असे नाही. तनुजांच्या पतीला नोकरी करण्यात फारसा रस नव्हता आणि त्यातून उद्भवलेल्या काही अपरिहार्य कारणांमुळे ठाण्यातील वास्तव्य संपवून त्यांना नाशिकला येऊन पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करावे लागले. घर चालविण्याची, दोन्ही मुलांना वाढविण्याची जबाबदारी तनुजा यांच्यावर येऊन पडली, तसा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. सतरा वर्षांच्या संसारात त्यांना अर्थार्जनात जेमतेम सात वर्षे पतीची मदत मिळाली.
पहाटे तीन-साडेतीनपासून सुरू होणारा दिवस मग विभागला गेला तो मुलांची वाढ व शिक्षण याचा विचार करण्यात आणि या सगळ्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ कसे उभे करता येईल या विवंचनेत, विचारात आणि त्यासाठी लागणार्या प्रयत्नात. “सुरुवातीला मी जेवणाचे डबे करून दिले, शाळेचं कॅन्टीन चालवलं, केटरिंगच्या व्यवसायात काही करता येईल का यासाठी धडपड केली, मोदक करून दिले.. माझ्या हाताला असणारी चव आणि या व्यवसायामुळे घरामध्ये किराणा उभा राहील हा अगदी मूलभूत विचार” असे त्या सांगतात आणि त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली.
मूळच्या इतिहासात एम.ए. असणार्या तनुजांनी पुढे कलेविषयीचे शिक्षणदेखील घेतले आणि एकीकडे लहान मुलांच्या शिकवण्या घेत, आर्ट व क्राफ्टचे क्लासेसदेखील सुरू केले. कष्ट, जिद्द याचा प्रवाह सुरूच असला तरी काहीतरी सुटून जाते आहे ही भावना त्यांच्या मनात कुठेतरी घर करत होती. येणार्या पैशातून घर सुरू होते, मुलांचे शिक्षणदेखील एकीकडे सुरू होते. माहेरहून मिळत असलेली खंबीर साथ, मात्र संसाराच्या दुसर्या चाकाकडून कुठलेही पाठबळ नाही, किंबहुना ते चाकदेखील स्वतःच्याच खांद्यावर उचलून चालण्याची आलेली वेळ, अथक शारीरिक कष्ट ह्या सगळ्यातून एकीकडे त्यांचे मन कुठेतरी उदास, निराश होऊ लागलेले होते. तरीही त्या नेटाने येईल तो दिवस पार पाडत होत्या.
सारे काही जरा कुठे सुरळीत होत आहे असे वाटू लागतानाच पतीचे आजारपण वाट्याला आले. सुरू असलेले सारे व्यवसाय बंद करावे लागले. मग सुरू झाली पुन्हा एका पोकळीतून जगण्याच्या जिद्दीची, पुढे जाण्याची कहाणी. त्या मग घरातूनच पर्सेस तयार करून देऊ लागल्या आणि तिथूनच त्यांच्या सद्य व्यवसायाचा श्रीगणेशा झाला.
तनुजांचे आई-वडील ऐकू-बोलू न शकणारे, मात्र आईच्या बोटांमध्ये कलाकुसर दडलेली होती. उत्कृष्ट कलाकार असलेल्या त्यांच्या वडिलांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून, तर आईने चित्रकला महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले आहे. प्राप्त परिस्थितीविषयी कोणाकडून सहानुभूती न मिळविता स्वकष्टाने उभे राहण्याचा वारसा आपल्याला आपल्या पालकांकडून मिळाल्याचे तनुजा सांगतात. टाइल्सवर पेंटिंग करण्यातून अर्थार्जन करून त्यांनी आपली मुले मोठी केली. अगदी आत्तापर्यंत त्यांचे आई-वडील ड्रॉइंगचे क्लासेस घेत असत. त्यांच्या नातेवाइकांमध्ये, परिचितांमध्ये येणार्या प्रत्येक बाळाचे स्वागत त्यांच्या आईने केलेल्या दुपट्यांनी होत असे. एका कापडाला दुसरे कापड जोडत त्यातून एक कलाकृती घडवायची, तसेच आयुष्यातही येईल त्या प्रसंगाला दुसरा प्रसंग जोडत आयुष्याच सुंदर वस्त्र विणायचे, ही ऊर्मी आपल्याला आपल्या आईकडून मिळाल्याचे त्या अभिमानाने सांगतात. इथूनच पुढे सुरू झाला ‘शतजा क्रिएशन्स’चा प्रवास...

स्त्रीत्व म्हणजे सहनशक्ती, सोशिकता, धैर्य, लढण्याची, परिस्थितीशी झगडण्याची चिकाटी आणि इच्छा, रडत बसून उपयोग नसतो तर परिस्थितीवर मात करावी लागते. “आनुवंशिकतेने माझ्या ऐकण्याच्या क्षमतांवर परिणाम झालेला होता, घराबाहेर पडताना अडचणी येत होत्या, पण न डगमगता धीराने तोंड दिले. पुढे जात राहिले.” तनुजा सांगतात.
चाचपडत सुरू झालेला एक व्यवसाय आपली ओळख बनेल याची तनुजांना कल्पना नसावी. मात्र शतजा क्रिएशन्समधून त्यांनी तयार केलेल्या वस्तू अल्पावधीतच मार्केटमध्ये आपले स्थान मिळवू लागल्या व लोकांच्या पसंतीस उतरू लागल्या. वेगवेगळी दुपटी, पर्सेस, टेबल मॅट्स, बेडशीट बनवत असताना त्यांच्यातल्या सुप्त कलागुणांना वाव मिळत गेला. आत्तापर्यंत आयुष्याने अनेकदा धक्का देऊन त्यांना मागे ढकलले होते. दर वेळेस पुन्हा जोमाने उभे राहताना, स्थिरस्थावर होताना आयुष्य नवाच प्रश्न घेऊन सामोरे येत होते. त्यामुळे या नव्या व्यवसायाची रुजवात होताना जरी त्यांना अध्येमध्ये धास्तावल्यासारखे होत असले, तरीही त्यांच्या कष्टाची जाणीव एव्हाना आयुष्याला झाली असावी आणि सकारात्मकतेने त्यांच्या आयुष्यात पाऊल ठेवायला सुरुवात केली. नवनव्या ऑर्डर्स येऊ लागल्या, तेव्हा एकट्या तनुजांचे बळ त्या पूर्ण करण्यासाठी अपुरे पडू लागले व मदतीला तीन जणींना घेऊन त्यांनी पुढला प्रवास सुरू केला.
या कामात त्यांची लेकदेखील आता आईच्या बरोबरीने उभी राहिली होती. मुलाचे शिक्षणही एकीकडे सुरूच होते. वाट पुढे जात होती, वस्तूंच्या मागण्या आता वाढत्या होत्या. लेकीने फर्निचर डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला व ती आपल्या आयुष्यात यश मिळवू शकली. आपल्या कष्टातून, जिद्दीतून तिच्या आयुष्याला आपण मनाजोगता आकार देऊ शकलो, याचे समाधान तनुजांना मनापासून वाटते. “आमच्या ताई आम्हाला बॉस वाटतच नाहीत. अगदी घरगुती वातावरणात खेळीमेळीने आलेल्या ऑर्डर्स आम्ही पूर्ण करतो. मनातलं सगळं त्या आमच्याकडे बोलतात आणि आमच्या ही मनातल्या विचारांना इथे स्थान असतं. त्या आमचं कौतुक करतात, काही चुकलं तर समजावून सांगतात...” असे त्यांच्याकडे त्यांच्या मदतीला येणार्या तिघी जणी आवर्जून सांगतात.
व्यवसाय सुरू झाला, वाढू लागला तसे काही भले व काही बुरे अनुभवदेखील गाठीशी जमा होऊ लागले. लागणार्या कच्च्या मालाचे दर सतत बदलते असणे, त्यातून तयार केलेल्या वस्तूंना योग्य मोल न मिळणे, केलेल्या कलाकुसरीचे चीज न होणे वगैरे अनुभव दर व्यवसायाप्रमाणे त्यांनाही येऊ लागले. परंतु त्याच वेळी एखाद्या प्रदर्शनात वस्तू मांडल्यानंतर भराभर त्या पसंतीस उतरणे, अनपेक्षित यश मिळणे, महाराष्ट्रातल्या विविध शहरांतूनच नाही, तर अगदी अमेरिकेतूनही वस्तूंना मागणी येणे असेही अनुभव एकीकडे जमा होऊ लागले. सचोटी, एकाग्रता आणि पडेल ते काम करणे आणि येईल त्या परिस्थितीला सामोरे जाणे हे त्यांचे भांडवल होते आणि त्यातून मार्ग मोकळा होत गेला. “माझ्या घरातून कापडाची अगदी चिंधीही बाहेर जात नाही, त्याचादेखील आम्ही कलात्मकतेने वापर करतो” हे त्या अभिमानाने सांगतात. “माझ्याकडे तयार होणार्या वस्तूंची डिझाइन्स खूप विचारपूर्वक, ग्राहकांच्या मागणीचा विचार करत केलेली असतात, त्यामुळे ती महत्त्वाची व वेगळी ठरतात” हेही त्या सांगतात.
माझे काम हीच माझी ओळख असावी. जसे बाकरवडी, आंबा बर्फी म्हणजे चितळे असे समीकरण आपल्याकडे आहे, तसेच एखादी पर्स, एखादा अॅप्रन जेव्हा समोर येईल, तेव्हा हे शतजा क्रिएशन्सचे आहे हे समीकरण रुजावे, अशी त्यांची इच्छा आहे. स्वतःचे एक युनिट असावे, व्यवसायाचा व्याप वाढत जावा आणि आपल्या बरोबरीने अनेकींना रोजगार मिळावा असे आपले स्वप्न आहे, हे त्या आवर्जून सांगतात. येणार्या, भविष्यात आपल्याला भरपूर काम करायचे आहे व आपल्या क्षेत्रातील नवनवी क्षितिजे गाठायची आहेत, असा संकल्पही त्या बोलून दाखवतात तेव्हा दृढनिश्चय ही जिची ओळख, अशी ही स्त्री हे स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकेल, असा विश्वास वाटतो.
‘हँडमेड विथ हार्ट’ असे घोषवाक्य घेत त्या पुढे जात नवनव्या वस्तू बनवत आहेत. ‘वस्त्रांमधली कलाकुसर’ असा अर्थ असलेले शतजा हे नाव नक्कीच मोठे होणार आहे. एक स्त्री म्हणून आपल्यात उपजत अनेक क्षमता असतात, कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उभे राहण्याची आपल्यात हिम्मत असते, होईल ती झीज सोसण्याचा खंबीरपणा असतो आणि कुठलेही स्वप्न आपल्या इच्छेपुढे लहान असते, हे त्या नव्याने व्यवसाय करू पाहणार्या प्रत्येक स्त्रीला सांगतात.
तनुजांना भेटून निघाले, तेव्हा कवितेच्या पुढच्या ओळी मग मला आठवत गेल्या...
नसेनही मी उंच वृक्ष,
पण नाहीच मी नाजूक वेलही...
चिमूटभर मनात माझ्या,
दुर्दम्य आहे आशा...
नकार भेदून काढणारी,
कणखर माझी विजिगीषा...
अशाच एका विजिगीषेला तिच्या व्यवसायासाठी आणि स्वप्नांच्या पूर्ततेसाठी अनेक अनेक शुभेच्छा !!

तन्वी अमित
7769882999