यमगरवाडीच्या मातीचे आत्मकथन

विवेक मराठी    23-Mar-2021   
Total Views |

विवेक प्रकाशनने नुकताच प्रकाशित केलेलापुस्तक त्रिवेणीसंच हा यमगरवाडी, तलासरी बारीपाडा या तीन सामाजिक प्रकल्पाची गाथा मांडणार्या पुस्तकांचा संच आहे. डॉ. रमा गर्गे यांनी या तिन्ही पुस्तकांचा स्वतंत्रपणे परिचय करून दिला आहे.

 yamgarwadi_1  H

 
आपण बोलीभाषेमध्ये सहज म्हणून जातो - ‘कोणत्या मातीचा बनला आहे कोण जाणे हा माणूस?, मनुष्य त्या त्या ठिकाणच्या मातीचा बनला आहे हे आपण स्वीकारलेले असते. पण एखादी माती ज्या माणसांना अंगावर वाहते, त्या सगळ्यांची हृदये एकाकार करून आपल्याला काही सांगू लागली तर!! इतिहास हा असाच मातीकडून सांगितला जातो!

  जसे माणसांचे नशीब वेगवेगळे असते, तसे पंचमहाभूतांचेही दैवयोग ठरलेले असतात. एखाद्या नदीच्या काठाला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळते, तर एखादे स्थान पवित्र देवालय होऊन जाते. असाच यमगरवाडीच्या जमिनीला एक अद्भुत सेवा प्रकल्प आपल्या अंगावर रुजवून घेण्याचा योग प्राप्त झाला. त्या मातीने सांगितलेली ही कहाणी आहे.

पुस्तक online खरेदी करण्यासाठी


लेखक रवींद्र गोळे स्वतः सामाजिक कार्यकर्ते आणि कवी आहेत. या दोन्ही गोष्टींचा उत्तम मिलाफ या कहाणीच्या पुस्तकामध्ये पदोपदी जाणवतो. मात्र सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून स्वतःबद्दल भरभरून लिहिले आहे असे नाही आणि कवी आहेत म्हणून भावनेच्या पुरात वाहून गेले आहेत असेही नाही. हा समतोल साधला गेल्यामुळे हे पुस्तक खर्या अर्थाने यमगरवाडीचे पुस्तक होते. अगदी ते रवींद्र गोळ्यांचेदेखील राहत नाही. जसे एखादा भक्त एखादी आरती रचतो, शेवटी त्याचे नावही असते; परंतु गाणारा भक्तिभावाने गातो, तेव्हा ती आरती तो आणि देव यांच्यातला संवाद होऊन राहते, त्यामध्ये त्या रचनाकाराचे थोडेसे विस्मरण होते आणि हीच त्या आरतीची ताकद असते! शब्दरचनेची ताकद असते! अगदी तसेच काहीसे या पुस्तकाला हातात धरल्यापासून शेवटच्या पानापर्यंत वाचताना जाणवून जाते. ती माती, ती जागा, ती जमीन थेट वाचकांशी संवाद करते. लेखक तेथील सर्व गोष्टींशी समरस होऊन गेलेला आपल्या लक्षात येतो.

 अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये एक धोका नेहमी असतो आणि तो म्हणजे गोष्टी वाढवून सांगणे. कारण भावनेच्या रसाने जेव्हा कहाणी लिहिली जाते, तेव्हा तिच्या कोणत्याही प्रकारच्या विस्ताराला बंधन घालणे तसे गरजेचे राहत नाही. परंतु लेखक येथे अतिशय समतोलपणे घडलेल्या घटना जशाच्या तशा सांगतो. सांगताना त्यामध्ये भावनेची पेरणी करत जातो. हे एका अर्थाने करुण रसाने भरलेले असे काव्य आहे, त्याचप्रमाणे वीररसाने भारलेल्या कार्यकर्त्यांची सेवागाथा आहे.

 म्हणूनच यमगरवाडी कौतुकाने म्हणते, ‘आंदोलने, मेळावे, मोर्चे यातून भटके-विमुक्त परिषद सर्वत्र पोहोचत होती आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझा - म्हणजे यमगरवाडी प्रकल्पाचा डांगोरा पिटला जात होता. एका अर्थाने मला केंद्र मानूनच व्याप विस्तार वाढत होता. बर्याच वेळा विविध समस्यांवर उत्तरे शोधणार्या बैठका यमगरवाडीत झाल्या. काही नवे करायचे आहे, मग ती संघटनात्मक रचना असू दे किंवा समाजघटक जोडणे असू दे, सारे सारे पहिल्यांदा येथेच ठरले. याच भूमीत स्वप्नांच्या बिया पेरल्या आणि त्यांची तयार केलेली रोपे महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावून त्यांची वाढ केली गेली. यमगरवाडी प्रकल्पातून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात शेकडो नवे विषय हाती घेतले गेले आणि तडीस नेले गेले.’

 
yamgarwadi_2  H

यमगरवाडीच्या मातीमध्ये रमेश चाटुफळे यांच्या ओसाड माळरानावर फक्त जनावरे चरायची आणि आजूबाजूच्या गावातली माणसे येणे-जाणे करायची. पण जसे जसे येथे पारधी येऊन राहू लागले, तसे तसे या मातीने कधी अनुभवलेले, अंगावर शहारा आणणारे, मनाला शतशः विदीर्ण करणारे असे अनेक अनुभव ऐकले. एखादी ओली बाळंतीण आपले नुकतेच जन्मलेले बाळ स्वतः नेसूचा एक पदर फाडून त्यात कसे गुंडाळते हे तिने पाहिले. पोलिसांना बघून आक्रोश करणार्या बाईच्या आक्रोशामागे कंसाच्या निर्दयतेने आपटून मारलेल्या बाळाची कहाणी तिने ऐकली. ज्यांना गुन्हेगार, चोर, दरोडेखोर असेच समजले जाते, अशांच्या लहानग्या निरागस लेकरांना तिनेच शाळेत शिकताना पाहिले, स्नेहमेळाव्यात कार्यक्रम सादर करताना पाहिले आणि आत्मविश्वासाने मोठे होताना पाहिले.

 एक-दोन कार्यकर्त्यांची ही गाथा नाही. संघाच्या प्रकल्पाचे हे वैशिष्ट्य सांगता येईल की, प्रकल्प व्यक्तिकेंद्रित नसतो. विशिष्ट कुटुंबाच्या नावाने तो ओळखला जात नाही. या मातीने हे नेमकेपणाने हेरले, म्हणूनच गिरीश प्रभुणे, दादा इदाते, रमेश पतंगे यांच्याविषयी यमगरवाडी जितकी बोलते, त्यांच्यावर जीव टाकते, तितकीच अभिमानाने ती रेखाबद्दल बोलते, सुवर्णाताईचे नाव घेते, सुजातादीदीबद्दल, खंडू काळेबद्दल बोलते.

 ही माती अभिमानाने म्हणते, ‘आमची मुले ज्या क्षेत्रात गेली, त्या क्षेत्रात त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली. ‘मेड इन यमगरवाडीनावाचा ब्रँड त्यांनी तयार केला.’

 रवींद्र गोळे यांना वारंवार आपल्याकडे बोलावून या मातीने हे सारे त्यांच्याकडून लिहून घेतले, असेच ही कथा वाचताना लक्षात येते. एका ओसाड माळरानाचे पुण्यक्षेत्र कसे झाले, त्या कायापालटाची ही कथा. एखाद्या पवित्र पारायण ग्रंथासारखी.

 

डॉ. रमा दत्तात्रेय गर्गे
9922902552