गोव्यात भाजपाचा विजयरथ सुसाट

विवेक मराठी    25-Mar-2021
Total Views |

@सागर अग्नी

गोव्यातील जिल्हा पंचायतीची असो की ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक किंवा पालिका निवडणूक, भाजपाला मतदारांनी भरभरून प्रेम अन् आशीर्वाद दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची विधानसभा निवडणुकीशी तशी तुलना करता येत नसली, तरी विधानसभेला सामोरे जाण्यासाठी भाजपाची पूर्वतयारी या निकालांनी अधोरेखित केली आहे, हे विशेष. शिवाय भारतीय जनता पक्षाने आपल्या विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी केल्याचे यंदाच्या पालिका निकालातून जाणवत असून काँग्रेस मात्र अजूनही या शर्यतीत कोसो दूर राहिली आहे.


bjp_1  H x W: 0

गोव्यात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने नेत्रदीपक कामगिरी केली. राज्यातील एकमेव पणजी महापालिकेसह सातपैकी सहा पालिकांवर भाजपाचा भगवा फडकला, तर एकच पालिका काँग्रेसच्या वाट्याला आली. त्यामुळे गोव्यातील भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. 2022मध्ये गोव्यात विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्याची सेमिफायनल म्हणून पालिका निवडणुकीकडे पाहिले जात होते.सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

 

विशेष म्हणजे कोणत्याही निवडणुका असल्या, तरी राज्यात नेहमीच प्रस्थापितांविरोधात मतप्रवाह असतो. त्याही परिस्थितीत राज्यात विरोधी काँग्रेस पक्षाचे अस्तित्वही तसे गायबच आहे. सध्या जेमतेम पाच आमदार काँग्रेसच्या कळपात असताना हा पक्ष फार काही मोठी कामगिरी करेल अशी कुणाची अपेक्षाही नव्हती. तरीदेखील निवडणूक झालेल्या सातपैकी दक्षिण गोव्यातील एकमेव कुंकळ्ळी नगरपालिकेवर वर्चस्व राखण्यात काँग्रेसला यश आल्याने केवळ लाज राखली गेली.


पेडणे
, डिचोली, वाळपई या उत्तर गोव्यातील, तर काणकोण कुडचडे काकोडा या दक्षिण गोव्यातील पालिकांवर भाजपाने आपले वर्चस्व राखले. राज्यातील एकमेव पणजी महानगरपालिकेवर तीसपैकी 25 नगरसेवक भाजपा समर्थक असल्याने येथेही काँग्रेसचे पानिपत घडले.


जवळपास
बहुतेक पालिकांवर भाजपा पुरस्कृत उमेदवार दोन तृतीयांशपेक्षा अधिक असल्यामुळे राज्यातील भाजपाची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट झाले. प्रस्थापितांविरोधात मतप्रवाह हा गोव्यात तसा काही नवा नाही. दर निवडणुकीच्या वेळी तसा हा मतप्रवाह असतो. विरोधी पक्ष त्याचा कसा लाभ उठवितो, यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतात. मात्र सध्या गोव्यातील पालिका निवडणुकीत लागलेल्या निकालांवरून काँग्रेसला प्रस्थापितांविरुद्धचा मतप्रवाह बदलण्यात अपयश आल्याचेच सिद्ध होते.


अलीकडेच
राज्यात जिल्हा पंचायत निवडणुकाही झाल्या होत्या. त्यातही काँग्रेसला फारशी समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. राज्यातील दक्षिण उत्तर गोवा जिल्हा पंचायतींवरही भाजपाचा भगवा फडकला होता. पालिका निवडणुकीबरोबरच झालेल्या ग्रामपंचायतीच्या 22 प्रभागांचे निकालही तसे भाजपाच्या बाजूनेच झुकले. त्यामुळे एकेकाळी राज्यावर सत्ता गाजविलेला काँग्रेस पक्ष आता गलितगात्र झाल्याचेच संकेत या निकालांनी दिले, असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.


पणजी
महानगरपालिकेवर निवडून आलेले नगरसवेक हे भाजपाचे 25 तर चार काँग्रेस एकमेव अपक्ष असल्यामुळे पणजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आतानासियो मोन्सेरात यांची पर्यायाने पणजीसह सांताक्रूझ ताळगाव या मतदारसंघांवरील भारतीय जनता पक्षाची पकड मजबूत झाली आहे.


नावेली
या दक्षिण गोव्यातील जिल्हा पंचायत मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने केलेले मतविभाजन काँग्रेसला महागात पडले. तेथे अपक्ष उमेदवाराने बाजी मारल्यामुळे भविष्यात काँग्रेसला आपचा उपद्रव होणार याचे स्पष्ट संकेत मिळाले. गेली दोन वर्षे गोव्यात आपचा वावर वाढू लागला आहे हे खरे असले, तरी त्या पक्षाला विधानसभेत वा इतर स्था.स्व. संस्थांमध्ये खाते खोलता आले नव्हते.

उत्तर गोव्यातील पेडणे पालिकेत दहापैकी सहा जागांवर भाजपा समर्थक पॅनलची सरशी झाली असून डिचोली पालिकेत भाजपा समर्थक 9 उमेदवार विजयी झाले. या पालिकेत चौदा प्रभाग आहेत. उत्तर गोव्यातील तिसर्या वाळपई पालिकेवर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे वर्चस्व असून त्यांनी ते राखले आहे. येथे नऊपैकी आठ जागा भाजपा समर्थक उमेदवारांनी जिंकल्या असून तेथे भाजपाने एकतर्फी विजय मिळविला आहे.

साखळी पालिकेत केवळ एका प्रभागासाठी पोटनिवडणूक झाली होती. तेथे मात्र खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या समर्थक उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला भाजपासाठी हा एकमेव धक्का होता. अलीकडेच ही पालिका भाजपाच्या ताब्यात आली होती. तेरापैकी सात नगरसेवक त्या वेळी भाजपाचे होते. तथापि या पालिकेच्या एका प्रभागाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने यश मिळविल्याने काँग्रेसच्या गटात आता सात, तर भाजपाकडे सहा नगरसेवक आहेत. त्यामुळे सत्तापालट होईल असे वाटत असले, तरी पालिकेवरील सत्ता टिकविण्यासाठी भाजपाही आपली चाल खेळणार हे निश्चित आहे.


bjp_2  H x W: 0
दक्षिण
गोव्यात काणकोण कुडचडे काकोडा या पालिकांच्या निवडणुकीतही भाजपाच वरचढ ठरला. काणकोण पालिकेत बारा प्रभाग असून तेथे बाराच्या बारा प्रभागांत भाजपा समर्थक उमेदवारांनी बाजी मारली. या पालिकेत अनेक प्रस्थापित नगरसेवकांना मतदारांनी घरी बसविले असले, तरी कौल भाजपाच्याच पारड्यात टाकला. दक्षिण गोव्यातील दुसर्या कुडचडे काकोडा पालिकेतही अनेक प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले. पंधरा प्रभागांत सात नवीन चेहर्यांना मतदारांनी संधी दिली असून आठ माजी नगरसेवक पुन्हा निवडून आले आहेत. येथेही भाजपानेच बाजी मारली आहे. एकमेव कुंकळ्ळी पालिकेवर वर्चस्व राखलेल्या काँग्रेसने त्या यशातून आपली लाज राखण्यात यश मिळविले.


विधानसभा
निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेस काही आक्रमक चाली खेळून आपला दबदबा दाखवेल, अशी अपेक्षा होती. परंतु भाजपाच्या प्रभावासमोर काँग्रेसने युद्धाआधीच रणांगणातून पळ काढल्यासारखे चित्र सध्याच्या निवडणूक निकालांनी दर्शविले आहे.

 

कुंकळ्ळी पालिकेच्या 14पैकी नऊ प्रभागांत काँग्रेसने बाजी मारली, 3 जागा भाजपाच्या वाट्याला आल्या, तर एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. सासष्टी हा ख्रिस्तीबहुल मतदारांचा तालुका असून कुंकळ्ळी पालिका सासष्टी तालुक्यात येते. सासष्टी तालुक्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ असून या मतदारसंघामध्ये तसे गेली कित्येक वर्षे काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे कुंकळ्ळी पालिकेचा निकाल फार धक्कादायक मानला जात नाही. किंबहुना तो तसा अपेक्षितच होता.


निवडणूक
निकालानंतर भारतीय जनता पक्षाने समाधान व्यक्त केले आहे. जेथे कमी पडलो त्याचे आत्मचिंतन करू पुन्हा जोमाने कामाला लागू, असा भाजपाने संकल्प सोडला आहे. निवडणूक निकालांनी भाजपाच्या कर्तृत्वावर आपली मोहोर उमटविली असून सरकारचे कार्य उत्तम रितीने होत असल्याचा हा संकेत असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी म्हटले आहे.

 

या एकंदर निकालाचे विश्लेषण केल्यास असे लक्षात येते की, भारतीय जनता पक्षाने शहरी भागातील जनतेलाही आपल्याकडे ओढण्यात यश मिळविले आहे, ज्याचा त्यांना विधानसभा निवडणुकीत निश्चितच लाभ मिळेल. भाजपाच्या भविष्यातील घवघवीत यशाचे स्पष्ट संकेतच या निकालांनी दिले असून काँग्रेस मात्र त्यामुळे कावरीबावरी झाली आहे.

 


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

राज्यातील पालिका निवडणुका या सरकारने केलेल्या प्रभागांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरुवातीलाच गाजल्या होत्या. न्यायालयापर्यंत प्रकरण गेले होते. अजून पाच पालिकांच्या निवडणुका बाकी आहेत. मडगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत करत असून या मडगाव पालिकेवर त्यांचे वर्चस्व आहे. ते मोडून काढण्यास भाजपा कंबर कसेल हे नक्की. कारण भाजपा हा संघटनकौशल्याच्या बळावर निवडणुकीस सामोरा जात असल्याने कामत यांच्या वर्चस्वाला तोडीस तोड टक्कर देण्याची ताकद त्या पक्षात आहे. गोव्यात हळूहळू काँग्रेसची ताकद घटत चालल्यामुळे त्याचाही अनपेक्षित लाभ भाजपाला मिळाल्यास मडगाव पालिकेतही धक्कादायक निकालाची नोंद घडू शकते. उर्वरित चार पालिकांत भाजपाची सरशी होण्याची शक्यताच सध्याचे चित्र दर्शविते.


bjp_1  H x W: 0

भारतीय जनता पक्षाने आपल्या विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी केल्याचे सध्याच्या पालिका निकालांतून जाणवत असून काँग्रेस मात्र अजूनही या शर्यतीत कोसो दूर राहिली आहे. महत्त्वाचे म्हणजे गोव्यात आपला मिळत असलेला प्रतिसाद हा काँग्रेस पक्षासाठी मृत्युघंटा ठरेल की काय असे वाटू लागले आहे. कारण आपचे उमेदवार मतविभाजनातून काँग्रेसचा विजय रोखण्यात यशस्वी ठरू लागले आहेत आणि नेमके हेच त्या पक्षासाठी अत्यंत धोक्याचे ठरेल, यात तीळमात्रही शंका दिसत नाही.


जिल्हा
पंचायत असो की ग्रामपंचायतीची पोटनिवडणूक किंवा पालिका निवडणूक, भाजपाला मतदारांनी भरभरून प्रेम अन् आशीर्वाद दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची विधानसभा निवडणुकीशी तशी तुलना करता येत नसली, तरी विधानसभेला सामोरे जाण्यासाठी भाजपाची पूर्वतयारी या निकालांनी अधोरेखित केली आहे, हे विशेष.


केंद्रातील
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा दबदबादेखील भाजपाच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या यशामागे अप्रत्यक्षपणे आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळात घोटाळ्यांची मालिकाच सुरू होती. भारताच्या अर्थव्यवस्थेला लागलेली ती कीड मोदी सरकारच्या सत्ताकाळात मारली गेल्यामुळेदेखील बरेच मतदार भाजपाकडे आकर्षित झाले. त्यामुळे राज्याराज्यात भाजपाची ताकद वाढत असून गोव्याच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निकालांनी काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आत्मचिंतन करण्यात व्यग्र ठेवले आहे.

ज्येष्ठ पत्रकार, पणजी, गोवा

सागर अग्नी

8888870791