राऊतांचे स्वप्नरंजन

विवेक मराठी    26-Mar-2021
Total Views |


raut_1  H x W:

पवारसाहेबांना यूपीए अध्यक्ष कराअशी आवई सध्या एक सामनावीर खासदार उठवत आहेत. खरेच त्यांच्या कुशाग्र बुद्धीतून निघालेली ही स्वप्नरंजन कल्पना खरी होईल का? की, स्वप्न भंजन होईल हे येणारा काळ ठरवेल? पण राऊत यांचे वक्तव्य हे पवारांचे एक अनुमान तंत्र तर नसेल ना? त्यासाठी राऊत यांच्यासारख्या माध्यमप्रेमी पोपटाकडून बोलून घेऊन एक अंदाज तर पवार घेत नसतील ना? असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

 शरदचंद्र पवार म्हणजे देशातील राजकारणातील एक धूर्त ज्येष्ठ राजकारणी! आपले राजकीय मित्र व शत्रू यांच्यात नेहमीच संयशयास्पद प्रतिमा असलेले हे व्यक्तिमत्त्व आहे. देशाच्या राजकारणाचा ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले कदाचित एकमेव सक्रिय राजकारणी असतील. चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, लोकसभा विरोधी पक्षनेते, केंद्रीय कृषी मंत्री व विविध खाती त्यांनी सांभाळली आहेत. त्यामुळे एवढा दांडगा अनुभव असलेले पवारसाहेब यूपीए अध्यक्ष काय, पंतप्रधान व्हायला हवे होते. पण असे असतानाही त्यांना उपपंतप्रधानसुद्धा होता आले नाही. यावर कोणी म्हणेल की, गांधी परिवाराशी नसलेली निष्ठा ही त्याला कारणीभूत आहे. पण याहून खरे कारण असेल तर ते म्हणजे राजकारणात नेहमीच संशयी प्रतिमा ठेवणे. याचमुळे ते देशातील सर्वोच पदावर जाण्यापासून दूर राहिले आहेत. आज देशात विशेषत: महाराष्ट्रात काही घडले तरी ते पवारांचे कारस्थान असेल अशी सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा प्रतिक्रिया देते, यावरून जनमानसात त्यांची काय प्रतिमा असेल याचा अंदाज येतो. याच कारणामुळे ते अजूनही महाराष्ट्रात बहुमताने राष्ट्रवादीचे सरकार आणू शकले नाहीत. आज देशात अनेक प्रादेशिक पक्षांनी आपापल्या राज्यांत आपली एकहाती सत्ता आणली आहे. मायावती, मुलायमसिंग यादव, ममता बॅनर्जी, जयललिता, करुणानिधी, नितीशकुमार आदी नेत्यांनी आपापल्या राज्यात आपले वर्चस्व राखले आहे. पण पवारांना हे अजूनही शक्य झाले नाही. पुढे शक्य होईल अशी स्थिती आता तरी महाराष्ट्रात दिसत नाही. असो. अशा पवारसाहेबांना ८० वर्षांत यूपीएचे अध्यक्ष करण्याचे स्वप्न संजय राऊत बघत आहेत, तेही यूपीएचा घटक नसलेले शिवसेना प्रवक्ते.. काही महिन्यांपूर्वीसुद्धा त्यांनी आपली इच्छा माध्यमांसमोर प्रकट केली होती. पण राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी डोळे वटारल्यानंतर ते शांत राहिले. आता पुन्हा तीच री ओढली आहे. खरे तर यूपीए अध्यक्ष बनवण्यासाठी काँग्रेसमध्ये डझनभर निष्ठावान नेते आहेत. त्यांना सोडून पवारसाहेबांना का अध्यक्ष बनवतील? दुसरे - काँग्रेसबाहेरची व्यक्ती असावी अशी वेळ आलीच, तर पवारसाहेबांपेक्षा काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले इतर पक्षातील अनेक नेते आहेत. त्यात पवारसाहेबांच्या पक्षाचा जीव महाराष्ट्रापुरता. केंद्रात फक्त ५ खासदार आणि महाराष्ट्र व देशभर मिळून 55 आमदार एवढा फौजफाटा असलेला नेता.. या व्यक्तीला यूपीए अध्यक्ष बनवण्यापेक्षा ममता बॅनर्जी, फारुख अब्दुला आदींचा विचार होईल, पण पवारांसारख्या उपद्रवी नेत्याला अध्यक्ष बनवून काँग्रेस व मित्रपक्ष आपल्या पायावर धोंडा मारून घेण्याइतपत तरी मूर्ख नाहीत.

 सध्या सोनिया गांधी यूपीएच्या अध्यक्ष आहेत. त्यांची प्रकृती चांगली नसल्याने या पदी राहुल गांधी यांचे नाव घेण्यात येत होते. पण राहुल गांधी हे सक्षम विरोधी पॅनलचे नेतृत्व करू शकत नाहीत, हे सिद्ध झाले आहे. त्याला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत. पण गांधी घराण्यांची कृपादृष्टी असलेलाच नेता तेथे निवडला जाणार आहे, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. त्यामुळे राऊत यांनी उगाच नसत्या वावटळ्या उठवून प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करू नये. राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी चांगलेच उत्तर दिले आहे, हे लक्षात घेऊन तरी आपले विधान मागे घेतील का? आपल्या वाचाळखोर वृत्तीने मागील महायुतीच्या सरकरामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम राऊत अगदी छान करत होते. कदाचित आता महाविकास सरकारचे शिल्पकार असल्याने ते शांत असतील, पण आपला मूळ स्वभाव शांत बसून देत नसेल, त्यातूनच ते असे वक्तव्य करीत आहेत असे म्हणायला हरकत नाही.

 खा. राऊत यांनी पवारांना यूपीए अध्यक्ष करण्यापेक्षा शिवसेनेला यूपीएमध्ये घटक पक्ष करून उद्धव ठाकरे यांना अध्यक्ष करण्याची मागणी करावी... कारण तसेही शिवसेना आता सेक्युलर झाली आहे. आपल्या मतानुसार देशातील बेस्ट सीएम आहेत. मग बेस्ट यूपीए अध्यक्षही होतील..

- अभय पालवणकर