वाझेचा बोलविता धनी कोण?

विवेक मराठी    27-Mar-2021
Total Views |

@भगवान दातार

आपण आयुष्यात एकदाही खोटं बोललो नाहीअसं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना खोटं पाडणारे सत्यवानाचे अवतार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाझे स्फोटक प्रकरणात किती सत्य बोलतात याकडे सार्याच देशाचे डोळे लागले आहेत. दिवंगत ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर याच्यादंबद्वीपचा मुकाबलाया नाटकातलं विडंबन खूपच धारदार आहे. योगायोग असा की सध्याच्या राजकीय स्थितीला हे वर्णन अगदी शब्दशः लागू पडतं.


shivsena_2  H x

डोंगराला आग लागली, पळा, पळा, पळा...’ असा खेळ पूर्वी खेळत असत. खेळणारे त्या खेळातल्या काल्पनिक आगीलाही घाबरत असत. गेले काही दिवस खून-खंडणीच्या आणि लाचखोरीच्या बातम्यांनी सारा महाराष्ट्र पेटला आहे. पण राज्याचे धुरीण म्हणवणारे गणंग मात्र मूग गिळून गप्प आहेत. वाझे, परमबीर ही माणसं आम्हाला माहीतच नाहीत असंच राज्यातल्या सत्ताधार्यांना वाटत असावं.

कारण विचारलं, तर सगळ्यांचं एकच उत्तर - “चूप बसा, कोणी विचारायचं नाही!”

स्फोटकामागे कोण? सूत्रधार कोण? रोख कुणावर?

चूप बसा, कुणी बोलायचं नाही!”

रणरागिण्यागप्प. राजकन्या गप्प. राजपुत्र-राजपुतणेही गप्प.

कारण? ‘रणझुंजारांचा कोप होण्याची भीती!

खिशात राजीनामे बाळगत सदैव प्रत्यंचा ताणणारे गप्प,

कारण त्यांचे सारे बाणच बोथट झालेले!

अविचारी, आक्रस्ताळेही अंगावर शेकण्याच्या कल्पनेने गप्प! राजकीय चाल म्हणून त्यांनी सगळी आग ओकली ती पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात.

तिसरी पार्टी तर केवळ कपडे सांभाळणारी. तेवढ्यातच खूश!

राज्याच्या गृहमंत्र्यांनी याचं उत्तर द्यायला हवं होतं. पण ते सभागृहातले चुकलेले संदर्भ आणि बाहेरच्या चुकलेल्या तारखा यांचा मेळ घालण्यात गुंतलेले. केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट पत्र लिहून जाब मागणारे हे शूर गृहमंत्री या प्रकरणी मात्र गप्पच.

महाबळेश्वरचं विचारा, नाहीतर पालघरचं. रुग्णालयात होरपळलेल्या अर्भकांविषयी विचारा किंवा इमारतीवरून उडी मारणार्या पूजाविषयी. हे कायम गप्पच. “चौकशी चालू आहेएवढंच उत्तर. कारण बोलायला तोंड आहेच कुठे? सुशांत आणि अर्णब प्रकरणात ज्याला डोक्यावर घेऊन मिरवलं, त्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी खंडणीचे थेट आरोप केले, तरी हे गप्पच.


shivsena_1  H x
मुख्यमंत्रिपदासाठी
जीव टाकणारे चाचपडेश्वर तर तसेही महाविकास आघाडीच्या हायकमांडपुढे नांगी टाकणारे. त्यांचा राणा भीमदेवी थाट सगळा मातोश्रीच्या कुंपणाच्या आत. आघाडीचेचाणक्यम्हणून मिरवणार्यांच्या कृपाप्रसादावरच पोटाची खळगी भरणारे बोलणार तरी कसं? त्यांनी तर बेताल बडबडीचं लायसन्स फक्त सिल्व्हर ओकवर हुजरेगिरी करणार्याला दिलेलं. त्यामुळे उत्तर द्यायची जबाबदारी फक्त पावसात भिजलेल्या रणझुंजारांवर. कारण खर्याचं खोटं अन् खोट्याचं खरं करण्यात ते तरबेज. त्यातच तर त्यांची सगळी हयात गेलेली. सुरुवातीला त्यांनी हा स्थानिक प्रश्न म्हणून झटकायचा प्रयत्न केला. पण प्रकरण तापलं, तेव्हा लागोपाठ दोन दिवस पत्रकार परिषद घ्यावी लागली. राष्ट्रीय प्रेसचा जाळ कसा असतो तेही त्यांच्या लक्षात आलं असेल. 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पत्रकार परिषदेत एवढी फटफजिती कधी झाली नव्हती. एका क्षणी तर तेइनफ इज इनफअसं रागाने म्हणाले. पण समोरची प्रेस राष्ट्रीय होती. नेहमीचेचाय बिस्कुटवालेअसते तर गोष्ट वेगळी होती. त्यामुळे तूर्त तरी बाजारातले मूग संपले आहेत हेच खरं. कारण सगळेच मूग गिळून गप्प बसले आहेत. थोरले साहेब सोडून कुणीच बोलायचं नाही अशी गॅग (की गँग?) ऑर्डरच जणू काढली असावी.

राज्याची आजची स्थिती पाहिली की आठवतं ते विख्यात नाटककार विजय तेंडुलकर यांचंदंबद्वीपचा मुकाबलाहे नाटक. त्यातलं वर्णन सध्याच्या महाआघाडीला तंतोतंत लागू. तोदंबद्वीपाचा मुकाबलाहोता. इथं आहे तोदंभद्वीपाचा मुकाबला’. तेंडुलकरांचे शब्द खूपच बोचरे आहेत. आजही शब्दशः लागू पडणारे. त्या राज्यातल्या राज्यकर्त्यांचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय -

चार ज्येष्ठ, पाच श्रेष्ठ,

कोणी व्रात्य, कोणी धूर्त

एक मख्ख, एक कोपिष्ट

निवड भारी आहे क्लिष्ट.

याचे पारडे थोडे जड,

तोही तसा वरचढ

हा वाटते जोर करील

पण तो त्याला छेद देईल

याचे घोडे वाटते येईल

तो बाराच्या भावात जाईल!

महत्त्व त्या त्याला आहे,

तो तिकडे बसलाच आहे.

ज्याला बराच चान्स वाटतो

तो त्याला परस्पर काटतो.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून घडणार्या घटनांच्या संदर्भात हे वर्णन जरा तपासून पाहा.

पालघरची साधूंची हत्या, अर्भकांचा जळून मृत्यू, दिशा सॅलियान-सुशांत यांचा संशयास्पद मृत्यू या घटना जुन्या म्हणून सोडून देता येणार नाहीत. त्या पाठोपाठ कायदा धाब्यावर बसवणार्या बीडच्या उद्दाम मंत्र्याच्या अनेक लग्नांची गोष्ट, असाहाय्य पूजाच्या मृत्यूचं गूढ, संशयाच्या भोवर्यात सापडलेल्या मंत्र्याला वाचवण्याचा दयाघन मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न, निलंबित पोलीस अधिकार्याला पुन्हा सेवेत घेण्याचं त्यांचं औदार्य, दिशाच्या आत्महत्येमागचं कारण शोधण्यातली ढिलाई, क्रौर्य आणि लाचारी यांची प्रतीकं बनलेल्या पोलीस अधिकार्यांच्या जोडगोळीकडून अर्णब गोस्वामीला जीवनातून उठवण्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी काय सांगतात?

 

आताच्या ताज्या अँटिलिया स्फोटक प्रकरणात तर महाविकास आघाडीच्या सरकारची पुरती बेअब्रू झाली आहे. वाझे प्रकरणाची लक्तरं विरोधी पक्षनेते सभागृहाच्या वेशीवर टांगत असताना केविलवाणे मुख्यमंत्री वाझेंचं केविलवाणं समर्थन करत होते. सभागृहात अमित शहांच्या संदर्भातनिर्लज्जअसा शब्द वापरणारे मुख्यमंत्री सभागृहाबाहेर बोलतानावाझे म्हणजे काय ओसामा बिन लादेन आहे का?” असा प्रतिप्रश्न करून निर्लज्जतेलाही लाजवत होते. वाझे कोण हे मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हतं, का तो त्यांचाच पिट्टू असल्याने त्यांना त्याचेकारनामेउघड होऊ द्यायचे नव्हते?

सगळ्यात आश्चर्य म्हणजे सरकारच्या इज्जतीचा राज्यातच नव्हे, तर देशपातळीवर रोजच्या रोज पंचनामा होत असताना मुख्यमंत्री मात्र गप्प होते. हा मुद्दा इतका खटकणारा होता कीमुख्यमंत्र्यांना बोलतं कराअशी विनवणी विरोधी पक्षनेत्यांना राज्यापालांना करावी लागली. जगातल्यासर्वात बेष्टसी.एम.ची ही अवस्था कमालीची केविलवाणी होती. मंत्रीमंडळाच्या बैठकीतही सगळं मंत्रीमंडळ मंत्रालयात जमलेलं असतांना मुख्यमंत्री मात्र घरातून बोलत होते. गृहमंत्र्यांनी कोरोनाचे नियम सररास पायदळी तुडवल्याबद्दल, कोरोनाच्या नियमाआड दडणार्या मुख्यमंत्रांची एक शब्दही बोलण्याची हिंमत झाली नाही. सभागृहात बोलताना अकारण शेंडी-जानव्याचा उल्लेख करून फडणवीसांना हिणवण्यात भूषण मानणार्या उद्धवजींचे ओठ पवारांनीच शिवले असावेत असं खात्रीने वाटण्याइतकं त्यांचं मौन बोलकं होतं. वकूब, पाठीचा कणा आणि किमान बुद्धिमत्ता नसलेला एखादा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग बांधून अट्टाहासाने घोड्यावर बसला तर त्याची आणि लगाम हातात धरून त्याला चालवणार्यांचीही कशी फरफट होते, तेच गेल्या काही दिवसांतल्या घटनांनी दाखवून दिलं आहे.

 

हे दोन किंवा फार फार तर तीन अंकी नाटक असेल असं सुरुवातीला वाटलं होतं. पण या नाटकाचे किती अंक आहेत आणि त्यात किती नाट्यमय प्रसंग असतील याचा अंदाज कुणालाच करता येणार नाही. त्याच्या क्लायमॅक्सचा तर अंदाजही लावता येत नाही.

वाझे आणि परमबीर ही या प्रकरणातली प्यादी आहेत. ते कोणत्या हेतूने आणि कुणासाठी काम करत होते? तपास वाझेपर्यंतच थांबवण्याचा डाव तर नव्हता ना? अर्णबला छळल्यामुळे सत्ताधार्यांच्या आणि विशेषतः शिवसेनेच्या गळ्यातला ताईत बनलेल्या वाझेला शिवसेनेने वार्यावर का सोडलं? राज्याच्या गृहमंत्र्यावर खंडणीचे थेट लेखी आरोप करण्याची कल्पना परमबीर यांना अशीच सुचली की कोणी त्यांना ती सुचवली? एवढं होऊनही राज्य सरकारने परमबीर यांना साधं निलंबितही केलं नाही. वाझे परमबीर यांनाच रिपोर्टिंग करत असताना परमबीर यांना वाचवण्याचा कोण प्रयत्न करत आहे? या प्रश्नांची उत्तरं एन.आय..ने आणि केंद्रीय गृहखात्याने खणून काढली पाहिजेत. ‘अकेला फडणवीस और कितना करेगा?’ असं म्हणायची वेळ सर्वसामान्यांवर येऊ नये.