नाठाळ नारायण भंडारी

06 Mar 2021 14:45:59
@देविदास देशपांडे

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरू झाले. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी असंबद्ध प्रश्नांची एक मालिकाच उभी केली. देंवेद्र फडणवीस यांनी नारायण भंडारी या इसमाची गोष्ट सांगितली, ही गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या फार जिव्हारी लागली. फडणवीस यांनी केलेले नारायण भंडारीचे वर्णन अचूक होते. पण हा नारायण भंडारी नाठाळ आहे. तसा तो नसता, तर ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्याचसह संग करायला गेला नसता. त्या नाठाळपणाचेच नाना आविष्कार पाहण्याचे भोग राज्याच्या जनतेच्या नशिबी आले आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्देव.

 bjp_1  H x W: 0

आता हे नेहमीचेच झालेय. राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपले अपयश झाकण्यासाठी तोंडदेखले अधिवेशन बोलावते, राज्यघटनेतील तरतुदींची कागदोपत्री पूर्तता करते आणि विरोधी पक्ष त्याचे वाभाडे काढून आपली चुणूक दाखवून देते. मग चिडचिड झालेले मुख्यमंत्री नळावर भांडणार्‍या बायकांप्रमाणे इकडचे-तिकडचे मुद्दे उकरून काढून काही तरी बोलतात. त्यांचे गुलाम नंतर मुख्यमंत्र्यांनी कशी विरोधकांची जिरवली याचे गुणगान गात फिरतात.


याही
वेळेस तेच झाले. गेल्या वेळेस अगदी दोन दिवसांचे अधिवेशन बोलावून या सरकारने कसाबसा वेळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातसुद्धा विरोधकांनी सरकारच्या नाकी नऊ आणले. या वेळेस अंदाजपत्रकी अधिवेशन असल्यामुळे त्याची मुदत थोडीशी वाढवून दहा दिवसांची करण्यात आली. मात्र याही वेळेस विरोधकांनी बाजी मारली. कथा तीच राहिली, फक्त तपशील वेगळे होते.


विधिमंडळाचे
अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून सुरू झाले. अधिवेशनकाळातच नव्हे, तर अन्य वेळेतही विधानसभा अध्यक्ष हे महत्त्वाचे घटनात्मक पद असते. निवडणुकांच्या आधी सरकार बरखास्त होते, परंतु विधानसभा अध्यक्षांचे पद कायम असते. त्यामुळे अधिवेशन होणार म्हटल्यावर विधानसभेचे अध्यक्ष असणे महत्त्वाचे असते. परंतु या सरकारचा कारभार असा की या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षच नव्हते. त्यामुळे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन अध्यक्षांविनाच होत आहे.

 
bjp_1  H x W: 0

नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली. अधिवेशनापूर्वी नवा अध्यक्ष निवडला जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. मात्र या निवडीवेळी सरकारला मताधिक्य सिद्ध करावे लागणार असल्याने ती हिम्मत दाखवायला सरकार तयार नाही. शिवाय तीन पक्षांची आपापली वेगळी गणिते! म्हणून मतदान न घेता व अध्यक्ष न निवडता इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्पीय अधिवेशन अध्यक्षांविना रेटण्यात येत आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखालीच कामकाज पूर्ण करण्यात येत आहे.

 

हा मुद्दा तापला तो चौथ्या दिवशी. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून भाजपाने सरकारला धारेवर धरले. मात्र विषयाला मुद्देसूद उत्तर देण्याऐवजी सरकारी सदस्यांनी कुचाळक्या करण्यात धन्यता मानली. ज्यांच्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला, त्या नाना पटोले यांनीच त्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षपदासाठी या घटनात्मक पदाला लाथ मारणार्‍या नाना पटोले यांनी कशात काही नसताना राममंदिर निधीसंकलनावरून भाजपावर टीकास्त्र सोडले. विषय होता सभागृहाचे अध्यक्षपद रिक्त असल्याचा. पण पटोले बोलले काय? तर राममंदिर निधीसंकलन कोणत्या चॅरिटी कायद्याच्या अंतर्गत होत आहे? भगवान श्रीरामांनी निधीसंकलनाचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे का? महाराष्ट्रात भगवान श्रीरामांच्या नावाने पैसे गोळा करणारे कोण, याची माहिती सरकारने द्यावी वगैरे.

 
bjp_3  H x W: 0

मग भाजपानेही नाना पटोले यांना उत्तर देताना राममंदिर या विषयावर स्वतंत्र चर्चा लावावी अशी मागणी केली. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांना खंडणी वसूल करण्याची सवय आहे, त्यांना समर्पण कळू शकत नाही” असे सणसणीत उत्तर दिले. “रामजन्मभूमी अयोध्येमध्ये रामलल्लाचं भव्य मंदिर उभं राहतंय. मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टने जगभरातील रामभक्तांकडून देणगी स्वरूपात मदत गोळा करण्यासाठी मोठी मोहीम राबवली. 15 जानेवारीपासून सुरू झालेल्या या मोहिमेला प्रचंड मोठं यश मिळाल्याचं दिसतंय. समाजाच्या सर्व वर्गांतले, सर्व जाती-धर्मांचे रामभक्त भरभरून देणगी देत आहेत, हे या राज्यातील नेत्यांना दिसत नाही. त्यांना खंडणी गोळा करण्याची सवय आहे, त्यामुळे निधीसमर्पण काय असतं हे त्यांना कळणार नाही” असं ते म्हणाले.

 

या वेळी भाजपाने जय श्रीरामच्या घोषणाही सभागृहात दिल्या. खंडणी आणि गुलामी या संस्कृतीत वाढलेल्या नेत्यांना हा टोला जिव्हारी लागणार होता. तसा तो लागला. यानंतर गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले.

 

खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अशाच कुचाळक्या केल्या. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी असंबद्ध प्रश्नांची एक मालिकाच उभी केली. गेल्या वर्षभरात फेसबुक लाइव्हशिवाय राज्यातील जनतेला तोंड न दाखविणार्‍या मुख्यमंत्र्यांनी नको ते मुद्दे उपस्थित करून आक्रमकतेचा अभिनिवेश आणला. त्यांच्या बगलबच्च्यांनी अर्थातच त्याची तारीफ केली. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता की नाही या पूर्णपणे गैरलागू मुद्द्यापासून हिंदुत्वासारख्या विषयापर्यंत ते अनेक विषयावर बोलले. परंतु कामाचे काही बोलले नाही. कारण बोलण्यासाठी काम होते कुठे?

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला, ही गोष्ट ऐतिहासिक पुराव्यांनिशी सिद्ध झालेली आहे. त्यामुळेच संघाचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग होता की नाही यावर उद्धव ठाकरे यांनी बोलण्याची गरज नाही. परंतु देशाचा दुसरा स्वातंत्र्यलढा असे ज्या पर्वाचे वर्णन करण्यात येते, त्या आणीबाणीचा इतिहास काय सांगतो? आणीबाणीच्या विरोधात कोण लढले? त्या वेळी मुकाट ताटाखालच्या मांजरासारखे इंदिरा गांधींना पाठिंबा देणारे कोण होते? असे प्रश्न विचारले की एक तर पळून जायचे किंवा महाराष्ट्रद्रोही म्हणून संभावना करायची, हा यांचा खाक्या!

 

अघोषित आणीबाणी आणली म्हणून विधानसभेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने खडे फोडत होते. परंतु सरकारवर टीका केली म्हणून मंत्र्याच्या बंगल्यावर घेऊन एखाद्याला मारहाण करणे, एखाद्या ज्येष्ठ नागरिकाचे मुंडन करणे किंवा विरोधकाचे घर पाडणे असले प्रकार मोदींनी किंवा त्यांच्या सरकारने केलेले नाहीत, हे मुख्यमंत्री विसरले.


bjp_1  H x W: 0


अधिवेशनाच्या
दुसर्‍या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देंवेद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, वीजदरातील वाढ, मराठा आरक्षण, महिला सुरक्षा आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास अशा अनेक मुद्द्यांवरून फडणवीस यांनी सभागृह दणाणून सोडले. तिसर्‍या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणावर चर्चा होणार होती. या वेळी विरोधक शेतकरी नुकसानभरपाई मुद्द्यावरून आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले.

 

पहिल्या दिवशी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारी पक्षाला जेरीस आणले. वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेबद्दल त्यांनी सरकार पक्षाची भंबेरी उडविली. अतिशय अभ्यासू आणि कळकळीचे भाषण करून त्यांनी फड जिंकला. फडणवीस यांनीही त्यांना दमदार साथ दिली. विरोधकांचा हा मारा सरकारसाठी अनपेक्षित होता. संजय राठोड आणि तत्सम प्रकरणावरून आपण कात्रीत पकडले जाऊ, हा सरकारचा होरा होता. तो विरोधकांनी सपशेल खोटा ठरविला. त्यांनी लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. या मुद्द्यावर सरकार एवढे गाफील होते की काय उत्तर द्यावे हेच मंत्र्यांना कळत नव्हते. त्यामुळे अजितदादा पवार यांच्या तोंडून अभावितपणे सरकारची खदखद बाहेर पडली. जोपर्यंत राज्यपाल बारा आमदारांच्या नियुक्तीला मान्यता देतात नाहीत, तोपर्यंत वैधानिक विकास महामंडळ स्थापन होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यावरून सरकारचे समर्थन असलेल्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला.

 

दुसर्‍या दिवशी वीजबिलावरून विरोधकांनी सरकारला घेरले. सरकारने पाहिजे तर चार-पाच हजार कोटी रुपये कर्ज काढावे, पण शेतकर्‍यांची वीजबिले माफ करावीत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सक्तीच्या वीजबिलवसुलीस स्थगिती दिली. किंबहुना त्यांना ती द्यावी लागली. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा विषय ऊर्जा खात्याचा आहे, त्यावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक व शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, अशी ग्वाही सभागृहाला दिली. हा विरोधकांचा मोठा विजय होता.

">


 

नारायण भंडारीची गंमत

 खरी गंमत आणली ती फडणवीस यांनी. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी फडणवीस यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये सरकारला अभ्यासू प्रश्न विचारले. वीज कनेक्शनचा मुद्दा, राज्यातील कोरोनाची परिस्थिती, मंदिरांमध्ये लागू असलेले नियम अशा अनेक मुद्द्यांवर बोलतानाच देवेंद्र फडणवीसांनी दारूबंदी आणि वरळीतील नाइट क्लबमधून मनसेने केलेल्या फेसबुक लाइव्हच्या मुद्द्यावरूनदेखील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. ‘नारायण भंडारी’ची गोष्ट सांगून फडणवीसांनी धमाल उडविली.


मुंबईच्या
कमला मिलमध्ये एका नाइट क्लबमधून मनसे कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह केले होते. त्याबद्दल फडणवीस म्हणाले, “मनसेच्या कार्यकर्त्यांनी नाइट क्लबमध्ये जाऊन तिथून फेसबुक लाइव्ह केले. 11 वाजल्यानंतर बंद वगैरे नियम इतरांकरता आहेत. कमला मिलमध्ये यो क्लब, प्रिन्स बारमधून फेसबुक लाइव्ह झाले. तिथे असलेल्या लोकांनी कुणीही मास्क लावला नव्हता. तिथे कोविड होत नाही. कोविड मंदिरात आणि शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये होतो. हे बार कुणाच्या आशीर्वादाने चालतायत?”

 

याच वेळी फडणवीसांनी नारायण भंडारी या पात्राचा किस्सा सांगितला! फडणवीस म्हणाले, “हे सरकार मला नारायण भंडारीसारखं वाटतंय. एकदा शाळेचा मॉनिटर निवडण्यासाठी मास्तरांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिल्याला विचारलं, शाळा सुटल्यावर काय करतो? तर तो म्हणाला, नारायण भंडारीच्या घरी जातो आणि वडिलांसाठी भांगेची गोळी नेतो. दुसरा विद्यार्थी म्हणाला, शाळा सुटल्यावर नारायण भंडारीकडे जाऊन वडिलांसाठी हातभट्टीची दारू नेतो. तिसरा विद्यार्थी म्हणाला, नारायण भंडारीकडे जाऊन चिलीम घेऊन जातो. चौथा विद्यार्थी म्हणाला मी घरी जाऊन हातपाय धुतो, देवपूजा करतो, प्रार्थना करतो आणि अभ्यासाला बसतो. गुरुजी म्हणाले, यालाच मॉनिटर करायचं. गुरुजींनी विचारलं काय नाव तुझं? तर तो विद्यार्थी म्हणाला, मी नारायण भंडारी!”

 

हा टोला मुख्यमंत्र्यांच्या एवढा जिव्हारी लागला की त्यांनी त्या कथेचा विस्तार करून एक वेगळी कथा सांगितली. अर्थात नेहमीच या पद्धतीनुसार त्यात नारायण भंडारी आणि माधव भंडारी अशी सांगड घालून कोटी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सभागृहात बोलताना त्या सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीवर अशा पद्धतीने टीका करायची नसते, हेही त्यांच्या गावी नव्हते. अर्थात ज्यांचे आयुष्य लोकशाहीऐवजी ठोकशाहीवर श्रद्धा ठेवण्यात गेलेले आहे, त्यांना ते कुठून ठाऊक असणार? म्हणूनच फडणवीसांनी नंतर “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण जुने वाल्यासारखे होते” ही जी संभावना केली, ती अगदी बरोबर होती.

 

खरी गोष्ट अशी की फडणवीस यांनी केलेले नारायण भंडारीचे वर्णन अचूक होते. पण हा नारायण भंडारी नाठाळ आहे. तसा तो नसता, तर ज्यांच्या विरोधात लढलो, त्यांच्याचसह संग करायला गेला नसता. त्या नाठाळपणाचेच नाना आविष्कार पाहण्याचे भोग राज्याच्या जनतेच्या नशिबी आले आहेत.
Powered By Sangraha 9.0