द्राविडी प्राणायामाची सांगता? तामिळनाडू निवडणुका

विवेक मराठी    17-Apr-2021   
Total Views |

@प्रसाद देशपांडे

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणूक निकालांकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. कारण गेल्या 53 वर्षांपासून तामिळनाडूचं राजकारण द्रविड अस्मितेभोवती आणि डीएमके एआयडीएमके ह्या दोन राजकीय पक्षांभोवती फिरतं आहे. करुणानिधी आणि जयललिता ह्यांच्या पश्चात होणार्या विधानसभा निवडणुकीचा मागोवा आणि द्रविड अस्मितेचं भविष्य याविषयी या लेखात आपण आढावा घेणार आहोत. 2 मेनंतर चित्र स्पष्ट होईलच. पण जयललितांच्याच शब्दांत सांगायचं, तर हे सत्यात उतरवणारा जो मतदार आहे, तो सध्या शांतपणेतामारईलै तन्नीरभूमिकेत आहे!!

2021 Tamil Nadu Legislati

 

भारतात राजकीय अस्मितेची कुठलीही कमतरता नाही. पावसाळ्यात वाढणार्या काँग्रेस गवताप्रमाणे ‘अस्मिता’ नावाचं गवत भारताच्या राजकीय पटलावर ‘सदाहरित’ श्रेणीत मोडणारं असतं. ह्या अस्मितेला कशाचंही वावडं नसतं.. भाषा, प्रांत, जात, धर्म, वर्ण, पैसा अगदी कशाचंही म्हणून नाही. त्यात सगळ्यात टोकदार अस्मिता असेल ती भाषेची!! ह्या भाषेच्या अस्मितेला थोडा संस्कृती-मूलनिवासी-आर्य-अनार्य असा झणझणीत तडका दिला की जी मसालेदार डिश आपल्या समोर सर्व्ह होते, त्याला म्हणतात ‘द्रविड अस्मिता’! कदाचित भारतातील सगळ्यात जुनी, तितकीच कट्टर आणि तितकीच हिंसकसुद्धा!! द्रविड अस्मिता तशी बरीच जुनी आहे. बरीच म्हणजे किती? तर पार 96 वर्षं जुनी!! त्याचे अध्वर्यू होते इरोड व्यंकटप्पा रामासमी अर्थात पेरियार. पेरियार ह्यांना द्रविड अस्मितेचा गाभा म्हटलं, तर त्या वैचारिक गाभ्याचा दृश्याविष्कार म्हणजे कुंजीवरम नटराजन अण्णादुराई, मुथुवेल्ली करुणानिधी म्हणजेच कलाईग्नार, मरूथुर गोपालन रामचंद्रन अर्थात एमजीआर, आणि एमजीआर ह्यांची शिष्या जयराम जयललिता अर्थात अम्मा!! पेरियार ह्यांच्या अत्यंत जहाल राष्ट्रद्रोही द्रविड अस्मितेला डायल्यूटेड सामाजिक राजकीय चळवळीमध्ये रूपांतरित करण्याचं श्रेय वरील चार महाभागांना जातं. आता द्रविड अस्मिता कशी फुलली, राजकीयदृष्ट्या कशी बहरत गेली, द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) ह्यांची स्थापना हा इतिहास कितीही उत्कंठावर्धक असला, तरीही ह्यात मी पडणार नाही, कारण तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. आपल्या लेखाचा विषय करुणानिधी आणि जयललिता ह्यांच्या पश्चात होणार्या विधानसभा निवडणुकीचा मागोवा आणि द्रविड अस्मितेचं भविष्य हा आहे.

 

तामिळनाडूचं राजकारण गेल्या 53 वर्षांपासून द्रविड अस्मिता ह्या विषयाभोवती आणि डीएमके एआयडीएमके ह्या दोन राजकीय पक्षांभोवती फिरतं आहे. राष्ट्रीय पक्षांना ह्यात कुठेच स्थान नाही, अगदी कवडीचं स्थान नाही, बरं का!! तिथल्या लोकांवर द्रविड अस्मितेची झिंग इतकी जबरदस्त आहे की माझ्या माहितीतले उच्चशिक्षित, मल्टिनॅशनल कंपन्यांवर मोठ्या हुद्द्यावर काम करणारे काही लोक तर मोदी नॉन द्रविड आहेत आणि तरीही तामिळनाडूच्या राजकारणात ढवळाढवळ करतायत म्हणून मोदींचा राजीव गांधी व्हावा असं उघडपणे बोलतात!! त्यात त्यांना जराही शरम नाही. द्रविड अस्मिता त्यांच्यासाठी सर्वतोपरी आहे. तसं बघितलं तर तामिळी जनतेने दोन्ही द्रविड पक्षांना बर्यापैकी आलटून पालटून सत्ता दिली आहे. अपवाद एमजीआर आणि जयललिता ह्यांचा. ह्या दोघांनाही तामिळ जनतेने सलग दोनदा मुख्यमंत्रिपदावर बसवलं. हे भाग्य तर कलाईग्नारच्याही नशिबात नव्हतं!! पण इतकं होऊनही दोन द्रविड पक्षांमधील रस्सीखेच कधीही संपली नाही. 2021च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष रिंगणात आहेत, पण त्यांच्या त्यांच्या राजकीय गॉडफादरशिवाय!! त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी आणि त्यांच्या सध्याच्या राजकीय नेतृत्वासाठी ही लढाई लिटमस्ट टेस्ट आहे. एक मात्र नक्की - निकाल काहीही लागो, हरणारा राजकीय पक्ष फुटणार हे नक्की!! त्याचमुळे मुथुवेल करुणानिधी स्टॅलिन (एम.के. स्टॅलिन) असो वा दुसर्या टोकावरील एडप्पडी के. पळनीस्वामी (इकेपी) आणि ओट्टाकरथेवर पनीरसेल्वम (ओकेपी) ह्यांचं राजकीय भविष्य ह्या निकालावर अवलंबून असेल. जो हरेल त्याची त्यांच्या त्यांच्या पक्षावरील पकड सुटणार, हे नक्की. पण हे सगळं खरोखर इतकं सोपं आहे? तामिळनाडूच्या निवडणुकीतले मुद्दे तरी नक्की काय आहेत? त्यांचा राजकीय अर्थ नेमका काय? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील, तर तामिळ जनभावना नेमकी कशी विचार करते हे लक्षात घेतलं तर गोष्टी अधिक सोप्या होतील.


2021 Tamil Nadu Legislati

तामिळ लोकांवर दोन गोष्टींचा सगळ्यात मोठा प्रभाव आहे, आणि गंमत म्हणजे दोन्ही एकमेकांशी संबंधित आहेत.

1. चित्रपटसृष्टी

2. राजकारण

मी
पहिल्यांदा चित्रपटसृष्टी लिहिण्याचं कारण म्हणजे, एक वेळ सामान्य तामिळ माणसाला जेवायला नाही मिळालं तर चालेल, पण त्याला बघायला चित्रपट नाही मिळाला तर तो ठार वेडा होईल! तामिळ चित्रपटसृष्टी आणि तामिळ राजकारण हे दोन्ही एकमेकांपासून विलग करता येत नाही इतके एकजीव आहेत. द्रविड विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य तामिळ चित्रपटसृष्टीमुळे खूप सोपं गेलं. त्यातल्या त्यात करुणानिधींसारखे भाषाप्रभू स्क्रिप्ट रायटर तामिळ चित्रपटसृष्टीला लाभल्याने ते अधिक जलद गतीने झालं. तामिळनाडूमध्ये ह्या दोन राजकीय पक्षांच्या युद्धात एक प्रथा खूप अलगद रुजली, जी खर्या अर्थाने पुढारलेली होती - राजकीय पक्ष समर्थकांमध्ये वाढलेला रोटी-बेटी व्यवहार!! हा व्यवहार फक्त शहरी भागातच सीमित होता असं नाही, ग्रामीण भागातही तो बर्यापैकी रुळला होता. नोकरीच्या निमित्ताने तामिळनाडूत बर्यापैकी वास्तव्य झालं. चेन्नई, मदुरै, सालेम, रामेश्वरम, नागरकोईल, कन्याकुमारी, कोईम्बतूर भागात बर्याच वेळा फिरणं झालं. त्या भागातली एक मजेशीर प्रथा सांगतो - तुमच्या घरात लग्न असेल आणि तुम्ही अण्णाद्रमुक समर्थक असाल, तर लग्नकार्यात अम्मांचे (जयललिता) मोठ्ठाले पोस्टर, कमानी लागत; इतक्यावरच ते थांबायचं नाही, तर अम्मा स्वतः बर्याच लग्नात हजेरी लावायची.. किमान तीन लग्नांत तर मी स्वतः बघितलंय. नुसती हजेरीच लावायची नाही, तर संसाराला सुरुवात करता येईल इतपत आर्थिक मदत करायची!! हेच चित्र द्रमुक समर्थकांमध्येही होतं. अर्थात संख्या अण्णाद्रमुकपेक्षा कमी होती, पण फक्त लग्नात पोस्टर, कमानी कलाईग्नारची लागायची, हाच काय तो फरक. ह्या प्रथेचा फायदा पक्षवाढीस व्हायचा आणि सायलेंटली जातव्यवस्था मोडण्यासदेखील व्हायचा. थेवर आणि वन्नीयार ह्या दोन वेगळ्या जातींचे वधुवर असणार्या एका लग्नात मी स्वतः हजेरी लावली होती. अम्मा त्या लग्नात आल्या होता. तो ऑरा आणि एकूण राजकारणाचं सामाजीकरण फार जवळून बघता आलं. अम्मांसाठी ती फार छोटी गोष्ट होती, पण कर्ज काढून लग्नमंडप उभारलेल्या त्या वधुपित्यासाठी ती फार मोठी गोष्ट होती! त्याचा सामाजिक प्रभावदेखील मोठा होता. एमजीआर असो वा जयललिता, दोघांचंही राजकारण ह्याच पठडीतलं होतं. कदाचित हेच कारण असावंअय्यंगार ब्राह्मणकुटुंबातून येऊनही जयललितांनाब्राह्मणद्वेषआधार असलेल्या द्रविड चळवळीतली कदाचित एकमेव, कदाचित सगळ्यात सशक्त नेता म्हणून मान्यता मिळाली. इतकंच नव्हे, तर अठरापगड जातींतूनही राजमान्यता मिळाली. करुणानिधी हे द्रविड चळवळीतल्या दुसर्या फळीचे नेते होतेच, पण त्यांच्या राजकारणाची एकूण दिशा आणि अम्मांच्या राजकारणाच्या दिशेत एक छोटा फरक होता - अम्मा पिंच सॉफ्ट हिंदू इन्क्लाइन्ड होत्या, तर करुणानिधी विरोधक!! ह्या इन्क्लिनेशनमुळे आणि एकूणच जयाअम्मांचा एक सेल्फ मेड रॉबिनहूड अवतार तामिळ लोकांना गेल्या दोन निवडणुकीत अधिक स्पष्टरित्या भावल्यामुळे अम्मांना सलग दोन वेळा निवडून द्यायचा विक्रम तामिळ जनतेने केला. एमजीआर ह्यांच्याशिवाय हे कुणालाच साध्य झालं नव्हतं!!मग ह्या 2021 निवडणुकीत नेमके काय मुद्दे आहेत?? मुद्दे आहेत कोण द्रविड अस्मितेचा नवीन तारणहार होणार? तसं बघायला गेलं, तर सुपरस्टार कमला हासन मक्कल निधी मैय्यम (एमएनएम) जो मोठा राजकीय शून्य तयार झालाय, त्यात पुन्हा द्रविड अस्मिता फुंकून ती जागा व्यापण्याचा प्रयत्न करतोय खरा, पण एकूण कमला हासनची शैली आणि अम्मांची शैली खूप वेगळी आहे. कमलाची शैली थोडीबहुत जुन्या कलाईग्नारसारखी आहे आणि अर्थात स्टॅलिन हा कलाईग्नारचा राजकीय वारसदार आधीपासून आहे. त्यामुळे खरी लढत कलाईग्नारचा राजकीय वारसदार आणि अम्मांचे राजकीय वारसदार ह्यांतच आहे. हां, पण थलईवा रजनीकांत ह्या रणांगणात असता, तर बात कुछ और होती!! एकूण काय, निधन होऊन वर्षं लोटली, तरी 2021 विधानसभेचे खरे भांडवली विषय कलाईग्नार आणि जयाअम्माच आहेत!! आहे की नाही गंमत? सत्तेत आल्यास राजगादीवर दिवंगत नेत्यांच्या पादुका ठेवून कारभार करणार, हे दोन्ही गटांकडून अनौपचारिकरित्या बिंबवलं गेलं आहेच की! हां, ह्यात सगळ्या द्राविडी तमाशात कुठेतरीचिन्नमाशशिकला नटराजनची एंट्री असती, तर हा खेळ बर्यापैकी एकतर्फी असता. पण शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांनी राजकारणातून निवृत्तीचा जो बॉम्बगोळा टाकला, तो आश्चर्यकारक होता!! अर्थात त्या बाईच्या वक्तव्यावर शेंबडं पोरही विश्वास ठेवणार नाही. पण शशिकला नटराजन ह्यांना निवृत्ती कुणी घ्यायला लावली, ही किल्ली महत्त्वाची आहे आणि त्यात राष्ट्रीय पक्षांचं तामिळनाडूतील भवितव्य लपून बसलंय! अम्मांच्या निधनानंतरची राजाजी हॉलमधील दृश्यं कुणाला आठवत असतील तर बघा, मोदींनी अण्णाद्रमुकच्या दोन्ही नेत्यांच्या - शशिकला आणि पनीरसेल्वम दोघांच्याही डोक्यावर हात ठेवून सांत्वन केलं होतं. ते फक्त जेश्चर नव्हतं, ती तामिळनाडूची वास्तविकता होती. तामिळ जनतेला सतत कुणीतरी हिरो लागणार्या राजकीय पटलावर जो मोठा व्हॉइड आहे, तो भरण्याचा ऑरा तर मोदींकडे आहे, पण ती राजकीय ताकद त्यांना कुणीतरी पुरवायला हवीय. अर्थात अण्णाद्रमुकशिवाय अधिक योग्य निवड कुठली असेल? चिन्नमांनी बंड करून भाच्याच्या - टी.टी.के. दिनकरनच्या पक्षात आपलं पारडं टाकलं असतं, तर अण्णाद्रमुक-भाजपा आघाडीचा पराभव तेव्हाच निश्चित होता. अर्थात शशिकला ह्यांच्यासारखी महत्त्वाकांक्षी व्यक्ती मोदींना आव्हान देण्याचा मूर्खपणा करणार नव्हतीच. त्यामुळे पळनीस्वामी आणि पनीरसेल्वम ह्यांना मोदींच्या कृपाशीर्वादाखाली वावरता आलं. इतकं होऊनही अण्णाद्रमुक-भाजपासाठी ही निवडणूक कठीण आहेच.


2021 Tamil Nadu Legislati

अम्मांच्या निधनानंतर आलेल्या वादळात पळनीस्वामी आणि पनीरसेल्वम ह्या जोडगोळीने गेल्या 4 वर्षांत सत्ता आणि पक्ष बर्यापैकी एकसंध ठेवला. पनीरसेल्वम ह्यांच्यासारख्या थेवर समाजाचा नेता, त्यामुळे बांधून ठेवलेली व्होट बँक आणि गौंडेर समाजाचे मुख्यमंत्री पळनीस्वामी ह्यांनी तामिळनाडूतल्या 15% जनसंख्या असलेल्या वन्नीयर समाजाला दिलेलं आरक्षण (त्याचीही गत महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणासारखीच झालीय) हे ह्या जोडगोळीचे ह्या निवडणुकीतले ॅसेट्स आहेत. सलग दोन टर्ममध्ये सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुकविरुद्ध अगदी अँटीइन्कबन्सी म्हणावी तशी नाराजीही नाही. तरीही फक्त द्रविड अस्मिता हे कार्ड चाललं, तर कलाईग्नार ह्यांचा पुत्र म्हणून स्टॅलिनला थोडा फायदा निश्चित आहे. तामिळनाडूतल्या स्त्रियांवर जयललितांचा जबरदस्त प्रभाव होता. त्यांच्यानंतर हा जवळजवळ अर्धा मतदार असलेला स्त्रीवर्ग कुठे वळतो, ह्यावरही बरंच काही अवलंबून असेल. हे सगळं ॅनालिसिस केल्यावर एक निष्कर्ष हमखास निघतो की कधी नव्हे ते हे राज्य राजकीयदृष्ट्या प्रचंड गुंतागुंतीचं झालंय!! सध्याच्या घडीला मी खालील शक्यता पक्क्या सांगू शकतो, ह्यापैकी एक सत्यात उतरेल.

1. निवडणुकांमध्ये द्रमुकचा विजय झाला, तर उरलेल्या सो कॉल्ड द्रविड अस्मितेला फेस सेव्हिंग जागा राज्यात राहील, करुणानिधींचा राजकीय वारसदार म्हणून स्टॅलिन पक्षावर मांड ठोकतील. पराभवामुळे अण्णाद्रमुक पक्ष फुटू शकतो, कोण जाणे कदाचित राजकीय विजनवासात ढकलल्या गेलेल्या चिन्नम्मांचा राजकीय पटलावर पुन्हा धडाक्यात प्रवेश होईल.


2. अण्णाद्रमुकचा विजय झाला, तर मात्र द्रविड अस्मितेची रक्षा विसर्जित होईल. भाजपाचा, पर्यायाने मोदींचा राज्यात दखलपात्र प्रवेश होईल. करुणानिधींचा राजकीय वारसदार म्हणून स्टॅलिन ह्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह लागेल (जे सध्या अण्णाद्रमुकचे नेते खुलेआम लावतायत) आणि कदाचित त्यांना करुणानिधींच्या इतर वारसदारांकडून आव्हान मिळेल.

आता कुठली शक्यता सत्यात उतरेल, हे तर 2 मेनंतर स्पष्ट होईल. पण जयललितांच्याच शब्दांत सांगायचं, तर हे सत्यात उतरवणारा जो मतदार आहे, तो सध्या शांतपणेतामारईलै तन्नीरभूमिकेत आहे!!


9028214605