“आजची शिवसेना म्हणजे चायनीज मॉडेल!” आ. नितेश राणे यांची घणाघाती मुलाखत

विवेक मराठी    19-Apr-2021   
Total Views |

भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांची साप्ताहिक विवेकने नुकतीच व्हिडीओ मुलाखत घेतली. यावेळी नितेश राणे यांनी राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीवर थेट आणि रोखठोक भाष्य केलं. सचिन वाझे - 100 कोटी वसुली प्रकरणात केवळ अनिल देशमुख नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थेट संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ आपणास साप्ताहिक विवेकच्याफेसबुक पेज https://fb.watch/4YXSVZ5VUc/  युट्युब चॅनेलवर https://www.youtube.com/watch?v=i2mMubt4rp4 पाहता येईल.


bjp_4  H x W: 0
राणे म्हटल्यावर कोकण हे एक समीकरण आहे, स्वतः खा. नारायण राणे हे कोकणात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत आणि आता तुम्हीदेखील आहेत. विद्यमान महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात कोकणासाठी काय झालं आणि काय व्हायला हवं होतं असं तुम्हाला वाटतं?

विद्यमान राज्य सरकारने गेल्या दीड वर्षाच्या काळात कोकणासाठी काय केलं, असा प्रश्न खरंतर विचारायला हवा. मी विधानसभेत दोनवेळा निवडून आलो आहे. कोकणामध्ये 1990पासून माझं कुटुंब काम करतंय. कोकणाची विकासात्मक वाटचाल गेली तीस वर्षं आम्ही पाहतोय आणि ते पाहता असं लक्षात येतं की गेल्या दीड वर्षांत राज्य सरकारने कोकणासाठी काहीही केलेलं नाही. उलट कोकणाचं अर्थकारण, विकासाची प्रक्रिया याबाबतीत कोकणाला दुजाभावच दिलेला आहे, असं मी म्हणेन. यावेळचा अर्थसंकल्प तुटीचा मांडला गेला, कोरोनामुळे आज सरकारकडे पैसा नाही असं म्हटलं जातं. मग अशावेळी कोकणासारख्या काही विशिष्ट भागांमध्ये काम करता आलं असतं, ज्यामध्ये सरकारला उत्पन्नाचे स्रोत विकसित करता आले असते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना देता आली असती. उदा. कोकणात शेतकरी आत्महत्या करत नाहीत. घेतलेलं कर्ज 100 टक्के परतफेड केलं जातं. येथील लोक कष्टकरी, मेहनती आहेत. पर्यटनाच्या आधारेही हा भाग उभा राहिलेला आहे. आंबा, काजू, नारळ, सुपारी, मच्छीमारी आदींच्या माध्यमातून कोकणाचं अर्थकारण चालतं. त्यामुळे या विषयांवर सरकारने काम केलं असतं तर सरकारचेही आर्थिक प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकले असते. परंतु, या सरकारने कोणत्याच बाबतीत कोकणाकडे पाहिलं नाही. पर्यटनाचाही एकही नवा प्रकल्प कोकणात आला नाही. सी-वर्ल्ड प्रकल्प, चिपी विमानतळ, ऊर्जा क्षेत्रातील नाणारसारखा प्रकल्प, पायाभूत सुविधा, पाण्याचं नियोजन अशा कुठल्याच बाबतीत सरकारने लक्ष दिलं नाही. दोन दगडांवर पाय अशी आपल्याकडे म्हण आहे, मात्र या सरकारचा पाय कुठल्याच दगडावर नाही. केवळ सत्ता भोगण्यात विद्यमान नेतृत्व मश्गुल आहे. आश्चर्य याचं वाटतं की ज्या कोकणाने शिवसेनेला मोठं केलं, बाळासाहेबांच्या प्रत्येक हाकेला दिली, त्याच कोकणातल्या जनतेची स्वतः बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यानंतरही अशी अवस्था व्हावी. त्यामुळे आज कोकणी माणूस हतबल झालेला दिसतो.


bjp_1  H x W: 0

गेली साधारण सहा-सात वर्षं आपण विधिमंडळात आहात. ‘आमदार नितेश राणेम्हणून केलेली ठळक कामगिरी, तीन महत्त्वाची उदाहरणं देऊन कशी सांगाल?

मी निवडून येण्यापूर्वी मतदारांना काही शब्द दिले होते, काही व्हिजन डॉक्युमेंट मांडलं होतं. त्यामधील काही गोष्टींचा मी इथे उल्लेख करेन. यामध्ये प्रामुख्याने पर्यटनाच्या आधारे रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करेन, असं म्हटलं होतं. आज कणकवली - वैभववाडी - देवगड मतदारसंघ तुम्ही पाहिलात तर तीनही तालुक्यांत पर्यटनाचे अत्यंत वैविध्यपूर्ण प्रकल्प बघायला मिळतील. देवगडमध्ये देशातील पहिलं कंटेनरमधील चित्रपटगृह उभारण्यात आलं आहे. वॅक्स म्युझियम आहे, वैभववाडीमध्ये देशातील दुसरं महाराणा प्रताप कलादालन उभारण्यात आलं आहे. शिक्षणासाठी प्राधान्य देण्यात आलं. कोकणात साक्षरतेचं प्रमाण चांगलं आहे. त्यामुळे माझ्या मतदारसंघात टाटा, जिंदाल आदींच्या माध्यमातून सीएसआर निधी मी आणला. त्यातून दोनशे शाळा पूर्णपणे डिजिटल केल्या. पोद्दार इंटरनॅशनल स्कुलसारखी उत्तम शाळा कणकवलीत आणली. आमच्या मतदारसंघातील अनेक विद्यार्थी सीबीएसइ शाळेसाठी पुणे-कोल्हापूरला जात होते. त्यामुळे मी सीबीएसइमधील नामांकित शाळा मतदारसंघातच आणण्याचा निर्णय घेतला. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईमध्ये जाऊन शस्त्रक्रिया वगैरे करणार्यांसाठी संपर्काचं जाळं मी उभं केलं आहे. रुग्णवाहिकांची संख्या मतदारसंघात वाढवली आहे. आणखी बरीच उदाहरणं आहेत परंतु पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य या तीन क्षेत्रात मी प्रामुख्याने काम केलं आहे.

 

राणे कुटुंबीय त्यातही अलीकडे विशेषतः तुम्ही आणि तुमचे बंधू निलेश राणे यांच्या वक्तव्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. मग ती वक्तव्यं सभांतील असोत, पत्रकार परिषदेतील असोत वा ट्विटरवरची. अंगावर आलं की शिंगावर घ्यायचं ही वृत्ती कुठून येतं? ही बिनधास्त बेधडक वृत्ती कशी निर्माण झाली?

मुळात नारायण राणे साहेबांचे चांगले गुण आत्मसात करण्याचे आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. शिवाय शिवसेना पक्षप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत वा सध्याची शिवसेना यांना आम्ही जवळून ओळखतो, 39 वर्षे आम्ही त्यांना जवळून पाहतो आहोत. हे लोक काय आहेत, त्यांची क्षमता काय हे आमच्यापेक्षा चांगलं कुणी सांगू शकणार नाही. तेव्हा आमच्याबद्दल कुणी काही बोलतं तेव्हा त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या क्षमतांची, मर्यादांची जाणीव करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो! महाराष्ट्र जे दीड वर्षांपासून बघतोय ते आम्ही 39 वर्षं बघतोय. ही व्यक्ती काय आहे, ती आपल्या कुटुंबाच्या पलीकडे विचार करू शकत नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी महाराष्ट्र विकून टाकण्याची क्षमता या व्यक्तीकडे आहे, हे सगळं आम्ही ओळखून आहोत. आणि हीच बाब गेली अनेक वर्षं राणे कुटुंब बोलत होतं आता सारा महाराष्ट्र बोलू लागला आहे.

 

पण या एकूणचस्टाईलबद्दल भाजपचा कुणी वरिष्ठ नेता उदा. देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांगतात का की आता थोडं दमानं घ्या वगैरे..

bjp_2  H x W: 0 

मुळात देवेंद्रजी किंवा भाजपचे सर्व ज्येष्ठ-वरिष्ठ नेतेमंडळी ही आमची काँग्रेसमधील 12 वर्षं सोडली तर आमच्या वडिलांबरोबर काम केलेली सहकारी मंडळी आहेत. त्यामुळे त्यांना आमचा स्वभाव, शैली माहिती आहे. आम्ही स्पष्टवक्ते आहोत, प्रामाणिक आहोत. जे मनात आहे ते ओठांवर असतं हाच आमचा स्वभाव आहे. आम्ही तिथल्या तिथे बिल फाडून देतो, बाकी काहीही ठेवत नाही!

 

आता थोडं सध्याच्या ताज्या विषयांकडे वळू.. नुकताच तृप्ती सावंतांचा भाजपप्रवेश झाला, त्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची होती. त्यावेळी तुम्ही म्हणालात की पुढील काळात असे अनेक भाजपप्रवेश बघायला मिळतील. पण हे तर आम्ही ट्रेलर बघतो आहोत, मुख्य पिक्चर आम्हाला कधी बघायला मिळणार?

त्या मुख्य पिक्चरची संपूर्ण राज्याची स्क्रिप्ट देवेंद्रजींकडे आहे. मुंबई अध्यक्ष या नात्याने मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आहे. त्यांनी त्या स्क्रिप्टमध्ये आम्ही दिलेल्या यादीतील नावांवर एकदा काटिकमार्ककेली की तुम्हालाब्रेकिंग न्यूजमिळतील! आजची शिवसेना ही तळागाळातील शिवसेना राहिलेलीच नाही. जे जे आज उद्धव ठाकरे यांच्या अवतीभोवती दिसतात, सत्तेचा लाभ घेतात, त्यांनी मुळात शिवसेनेसाठी काय केलं, हा प्रश्न त्यांना विचारायला हवं. यात कडवट शिवसैनिकाला कुठेही स्थान उरलेलं नाही. म्हणूनच राज्यपालांकडे पाठवायच्या 12 आमदारांच्या यादीत, पदं देताना, महामंडळांच्या यादीत शिवसेनेला भलतीच नावं दिसतात. नारायण राणे साहेब, राज ठाकरे, गणेश नाईक या सगळ्यांवर जो अन्याय झाला तीच प्रक्रिया शिवसेनेत सातत्याने सुरू आहे. मुळातचमाझं कुटुंब, माझी जबाबदारीहे उद्धव ठाकरे यांचं कोरोनापुरतंच नव्हे तर आयुष्यभराचं ब्रीदवाक्य आहे.

 

राज्यात लागलेला लॉकडाऊन आणि सचिन वाझे प्रकरण यांचा काही ना काही परस्पर संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण तुम्ही अलीकडेच ट्विट करत महिन्याभरात वाढलेल्या कोविड रुग्णांचे आकडे देत संशय व्यक्त केला होता.

हो कारण, जेव्हापासून कोरोना राज्यात आला तेव्हापासून या सरकारच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कोविडची माहिती लपवणं, मृत्यूचे आकडे योग्यप्रकारे बाहेर येणं, जम्बो कोविड सेंटर, ऑक्सिजन प्रत्येक बाबतीत काही ना काही गडबड.. त्यामुळे मुळात या सरकारवर विश्वास ठेवायचा का? हा प्रश्न आहे. जेव्हा जेव्हा सरकार अडचणीत येतं तेव्हा कोविडचे आकडे वाढतात. आधी कोरोना नव्हता का? सचिन वाझे प्रकरण आल्यावरच आकडे का वाढले? हे संशयास्पद आहे, याची चौकशी झाली पाहिजे, हेच मी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांचा राजीनामा तर झाला, चौकशीची प्रक्रियाही होईल. मात्र यात आणखी बड्या व्यक्ती सहभागी असल्याचा आरोप होतो. याबाबतीत काय सांगाल?

उद्धव ठाकरे हेच याचं उत्तर आहे. विधिमंडळ अधिवेशन पाहा. वाझेला वाचवण्यासाठी कोण प्रयत्न करत होतं? सर्वपक्षीय बैठकीत वाझेला निलंबित करण्याचा निर्णय झाला असताना मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय का बदलला? पत्रकार परिषदेतवाझे हा काय ओसामा बिन लादेन आहे का?’ म्हणत त्याची वकिली मुख्यमंत्र्यांनी का केली? स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तीला पुन्हा सेवेत का घेतलं गेलं? वाझेवर सातत्याने हे एवढं प्रेम उद्धव ठाकरे यांनी का दाखवलं? वाझेदेखील सातत्याने कुणाकडून ऑर्डर घेत होता? तो तर थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनाच रिपोर्ट करत होता. परमबीर सिंह यांच्याही पत्रात 100 कोटी वसुलीबाबत मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते, असा उल्लेख आहे. तरीही त्यांनी वाझेला निलंबित का केलं नाही? कारण त्यात त्यांचे हितसंबंध होते हे उघड गुपित आहे. त्यामुळे या सर्व घटनांचे, संशयाचे धागेदोरे हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच जातात. आज नाहीतर उद्या सीबीआय, एनआयएच्या चौकशीत हे समोर येईलच. महाराष्ट्राचं प्रशासन हे स्वच्छ व्हायला हवं. आमच्या महाराष्ट्राची, महाराष्ट्र पोलिसांची या प्रकरणात खूप बदनामी झाली आहे. हा आमच्या अस्मितेला लागलेला डाग आहे. त्यामुळे सीबीआय-एनआयएच्या चौकशीत योग्य काय ते निष्पन्न होईल आणि राज्यातील पुढील पिढीला चुकीचा संदेश जाणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

तृप्ती सावंतांच्या प्रवेशावेळी आपण म्हटलंत की ही घटना म्हणजेबेगडी हिंदुत्वाकडून भगव्या हिंदुत्वाकडे वाटचालआहे. शिवसेनेचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व यांमध्ये तुमहाला जाणवणारा फरक कोणता?

आम्ही तीन दशकं बाळासाहेबांची शिवसेना पाहिली. आजची शिवसेना ही तरचायनीज मॉडेलआहे, जी उद्धव ठाकरेंची आहे. त्याचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. पैसे कमावण्यासाठीच ते हिंदुत्वाचं नाव घेतात. म्हणूनच सत्ता स्थापन करताना काँग्रेस ठणकावून सांगू शकते की शिवविकास आघाडीमधूनशिवकाढून टाका. हे मुद्दे उचलू नका, ते करू नका.. शिवसेना का त्यांना ठणकावून सांगू शकत नाही? हिंदुत्वासाठी का भूमिका घेऊ शकत नाही? यांच्या नाकाखाली मालाड-मालवणीमध्ये हिंदूंच्या हालअपेष्टा सुरू आहेत. पालघरमध्ये हिंदू साधूंची हत्या झाली. बाळासाहेब असते तर असं करण्याची कुणाची हिंमत तरी झाली असती का? आज शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही ही परिस्थिती आहे. आमची काँग्रेसमधील 12 वर्षं बाजूला केली तर आम्ही मूळ हिंदुत्ववादी विचारांचेच आहोत, शिवसेना - भाजप युतीमध्येच आम्ही काम केलं आहे. त्यामुळे आता दोन्ही बाजूंचा अनुभव घेतल्यानंतर आम्ही हे नक्कीच सांगू शकतो की, भाजपचं हिंदुत्व हे प्रामाणिक आणि राष्ट्र घडवणारं हिंदुत्व आहे.

आता एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील पुढील काही महिन्यांतील राजकीय चित्र कसं असेल असं तुम्हाला वाटतं?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने महाराष्ट्राची जी काही बदनामी केली आहे, जनतेच्या ज्या हालअपेष्टा सुरू आहेत ते पाहता महाराष्ट्र राज्य योग्य लोकांच्या हातात नाही, हे स्पष्टच आहे. ते योग्य लोकांच्या हातात गेलं पाहिजे, हिंदुत्व विचाराच्या माध्यमातून एक आदर्श राज्य घडवण्याच्या दृष्टीने आपली वाटचाल झाली पाहिजे. याचं प्रतिबिंब आपल्याला पुढील काही महिन्यांत दिसेल.