सहहृदयी गुरूदेव सोरदे

विवेक मराठी    22-Apr-2021
Total Views |


sarvode_1  H x

हा अघोरी कोरोनाचा काळ आपल्या पोटात काय काय दडवून घेऊन आला आहे हे परमेश्वरालाच माहित..! वैफल्याकडे नेणारी निराशा
, पराकोटीची हताशा, सर्व बाजूंनी होणारी कोंडी आणि घालमेल यांच्या आवर्तात जनजीवन सापडले आहे. चहूबाजूंनी अभद्र वार्तांचा भडिमार होताना अनुभवाला येत आहे. मंगळवार 20 एप्रिल रोजी अशाच प्रकारची एक अभद्र वार्ता भल्या सकाळीच कानांवरआदळली. ही बातमी खोटी ठरावा अशी वेडी आशा नेहमीप्रमाणेच विफल ठरली. सन्मित्र गुरूदेव सोरदे बुद्धचरणी विलीन झाला..!

साठोत्तरी काळातला, दलित समाजातला,मात्र संघ विचारांवर आरपार निष्ठा बाळगणारा एक तरुण गुरुदेव सोरदे 1970च्या दशकात विद्यार्थी परिषदेच्या कामाच्या माध्यमातून गुरुदेव सोरदे यांच्याशी संपर्क आला. भव्य म्हणावी अशी देहयष्टी,काहीशी रापलेली, करारी परंतु आश्वासक मुद्रा, अर्धोन्मिलीत भासणारे,परंतु अत्यंत स्नेहमय डोळे आणि खर्जातला घनगंभीर आवाज असे गुरुदेव चे व्यक्तिमत्व पाहताक्षणीच प्रेमात पडावे असे वाटले मला.

 

त्यानंतरची सुमारे 45 वर्षे प्रसंगा- निमित्ताने गुरुदेव च्या होणाऱ्या भेटी तशा तुरळक संख्येनेच होत राहिल्या. परंतु त्यातूनही होणारा संवाद आणि पुढच्या काळात विशेषतः फोनवरून राहिलेला संपर्क याची घनिष्टता वर्णनापलीकडची आहे.

आर्थिक स्तरावर संपन्नता आणि स्थैर्य त्याच्या वाट्याला मूळातच नव्हते. शिक्षण अर्धवटच सोडून चरितार्थाच्या धडपडीत त्याला गुंतावे लागले.गिरणी कामगार वडील, दुर्धर व्याधीग्रस्त आई आणि एक लहान बहिण असा सोरदे परिवार नागपूरच्या बेझनबाग, जरीपटका भागातल्या झोपडवस्तीमध्ये नाल्यालगतच्या खुराडेवजा घरात राहत असे.तशातच संघ, परिषदेच्या माध्यमातून, अगदी प्रचारक,पूर्णवेळ स्तरापर्यंत काम गुरूदेवने केले. याचेच वैषम्य वाटणाऱ्या पुरोगामी,साम्यवादी शेजाऱ्यांनी त्याच्या घरावर हिंसक हल्ला करण्यापर्यंत मजल मारली. परंतु डगमगून न जाता गुरूदेवने शांतपणे आपले काम सुरू ठेवले.कारण त्याच्या समजुतीला भक्कम वैचारिक अधिष्ठान आणि डोळस निष्ठेचे निधान होते. त्याच निष्ठेच्या बळावर सामाजिक समरसता मंचाचे काम विदर्भात स्थिर करण्याच्या कामी त्याचे योगदान मोठे राहिले.

गेल्या दोन तीन वर्षांपासून प्रकृतीच्या त्रासामुळे त्याच्या हालचालींवर मर्यादा पडल्या होत्या. पायाच्या विकारामुळे घरातच बंदिस्त होऊन गेला. काही करता येत नाही, कोणाच्या भेटीगाठीही होत नाहीत यामुळे निराशाग्रस्त होऊन ' कंटाळलो आता..' अशी हताश निर्वाणीची भाषाही बोलू लागला होता. मात्र ठामपणे त्याच्या पाठीशी उभी असलेली पत्नी प्रमिला, उत्तम शिक्षण घेऊन प्रगतीपथावर मार्ग चालू लागलेली सुबोध आणि केतकी ही मुले यांनी त्याची उमेद जागी ठेवली.

सुमारे वर्षभरापूर्वी बोलता बोलता एकदा म्हणाला, " डॉक्टर हेडगेवार यांचे नाना पालकरांनी लिहिलेले चरित्र पुन्हा एकदा आजच्या स्वयंसेवकांसमोर मांडले पाहिजे.." तोच धागा उचलून मी म्हटले, " त्या चरित्राचे छोटे छोटे भाग करू, तुझ्या गंभीर आवाजात बसल्या बसल्या ते रेकॉर्ड करून दे. आपण ती अभिवाचन मालिका प्रसारित करू." गुरूदेवने ते मान्य केले. सुमारे पंधरा भाग लिहून मी त्याच्याकडे रवानाही केले. पण लॉक डाऊनने संपर्कावर घातलेल्या मर्यादा, त्याचे आणि माझेही तांत्रिक बाबींमधील तुटपुंजे ज्ञान आणि काही प्रमाणात आवश्यक साधनांची कमतरता यांमुळे तो प्रकल्प पुढे जाईना.

" अरे, मी आता मुलाकडे ठाण्यालाच राहायला येणार आहे, तेव्हां दोघे मिळून हे काम करू.." असे गुरूदेवने म्हटले. पण त्याचे ठाण्याला येणेही लांबत राहिले. 'काशीस जावे नित्य वदावे' या न्यायाने ' येतो, येतो ' असे म्हणता म्हणता काल एकदम तो दूरवरच्या, अनंताच्या प्रवासालाच निघून गेल्याचीच दुर्वार्ता येऊन थडकली. मूळची विकलांगता, त्यात कोरोनाची लागण आणि त्यातच हृदयाघात अशा तिहेरी आवर्तात सापडून गुरूदेव बुद्धवासी झाला..! एक कायमची ठसठस आप्तमित्रांच्या अंत:करणात देऊन त्याचा देह शांत झाला.

परमकारूणिक भगवान बुद्धाच्या छायेत चिरविश्रांती त्याला लाभेलच. ही अंतरीची कळ सहन करण्याचेे सामर्थ्य गुरूदेवच्या कुटुंबीयांना आणि स्नेहीजनाना लाभो ही त्या जगन्नियंत्याच्या चरणी प्रार्थना..!

 
- अरुण करमरकर