अविरत श्रमणे संघजिणे

विवेक मराठी    27-Apr-2021   
Total Views |

 

संघस्वयंसेवकाची ओळख त्याच्या सेवाभावातून प्रकट होत असते. आपल्या समाजबांधवांच्या वेदना, समस्या दूर करण्यासाठी स्वयंसेवक प्रसंगी जिवाची बाजी लावतो आणि सेवायज्ञातील आपली समिधा अर्पण करतो. सध्या महाराष्ट्रात कोरोना आपत्तीशी झुंजताना स्वयंसेवक याच भावाचा अनुभव घेत आहेत. आपल्या समाजबांधवांच्या वेदना, दुःख आपणच दूर केले पाहिजे असा मनाशी निर्धार करून ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपांतली कामे चालू आहेत, त्यांचा संक्षिप्त आढावा.

RSS_5  H x W: 0

 

देशात आणि विश्वात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि त्याचबरोबर या साथरोगावर उपयुक्त ठरणार्या लसीही उपलब्ध झाल्या आहेत. देशभर मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवली जात असून केंद्र सरकारने लसीकरणाची वयोमर्यादा अठरा वर्षांवर आणली आहे. एकूणच या आपत्तीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला असून आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत रा.स्व. संघ विविध प्रकारची कामे करताना दिसतो आहे. गेल्या वर्षीपेक्षा आताची परिस्थिती गंभीर आहे. विशेषत: वैद्यकीय सुविधा आणि औषधे यांची टंचाई जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार्यवाह मा. दत्तात्रय होसबळे यांनी संघस्वयंसेवकांना मार्गदर्शन करताना सांगितले कीपरिस्थिती बिकट असली, तरी समाजाची शक्ती कमी नसते. संकटांशी झगडण्याची आपली क्षमता जगाला माहीत आहे. धैर्य आणि मनोबल कायम ठेवून संयमाने, शिस्तीने आणि परस्पर सहयोगाने आपण या भीषण परिस्थितीवर नक्की मात करू, यावर आमचा विश्वास आहे.”

 

मा. सरकार्यवाहांनी कामाची जी दिशा दिली, त्याला अनुसरून आपल्या महाराष्ट्रात, संघदृष्ट्या चारही प्रांतांत कोरोना आपत्तीशी सामना करण्यासाठी संघस्वयंसेवक मैदानात उतरले आहेत. परिस्थिती गंभीर असली, तरी आपल्या पूर्ण क्षमतेचा वापर करत आलेल्या संकटाला तोंड देत समाजात काम करण्याचा स्वयंसेवकांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. या वेळी मात्र संकटानेच स्वयंसेवकांवर निर्बंध लादले आहेत. सेवा कार्य करताना सर्व वयोगटांतील स्वयंसेवक सहभागी होत असत. कोरोना आपत्तीत मात्र वय, व्याधी इत्यादी गोष्टींचा विचार करूनच संघस्वयंसेवकांना सेवा कार्यात सहभागी करून घेतले जात आहे. महाराष्ट्रात संघाच्या माध्यमातून जी सेवा कार्ये चालू आहेत, ती स्थानिक गरज लक्षात घेऊन सुरू झाली आहेत. कुठे विलगीकरण कक्ष तर कुठे अन्नदान, कुठे रक्तदान तर कुठे मानसिक आधार अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर संघकार्यकर्ते काम करताना दिसत आहेत. यामागे एकच उद्देश आहे, तो म्हणजे आपला देश, आपला समाजबांधव या व्याधीतून बाहेर आला पाहिजे. गेल्या वर्षी आलेली कोरोनाची पहिली लाट चालू असताना अनेक ठिकाणी संघस्वयंसेवकांनी खूप मोठे काम केले होते. आताही त्याचप्रमाणे गावोगावी स्वयंसेवक आपल्या क्षमतेनुसार आणि स्थानिक आवश्यकतेनुसार काम करत आहेत.


RSS_1  H x W: 0

या कार्याचा आढावा घ्यायचा, तर देवगिरी प्रांतात संभाजीनगर येथे हेडगेवार रुग्णालयाने तीनशे बेड, नागपूर येथे शंभर बेड, भंडारा येथे पन्नास बेड, जळगाव येथे पंचाहत्तर बेड, भुसावळ येथे पन्नास बेड, इचलकरंजी येथे पन्नास बेड अशा प्रकारे रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे पुण्यात बाया कर्वे वसतिगृहात साडेचारशे व्यक्तींसाठी विलगीकरण कक्ष सुरू केला गेला आहे. ज्यांना उपचाराची आवश्यकता आहे, अशा गंभीर व्यक्तींना विविध ठिकाणी सुरू केलेल्या केंद्रांतून उपचार मिळत आहेत, त्याचप्रमाणे ज्यांना केवळ विलगीकरण आवश्यक आहे, त्यांच्याही विलगीकरणाची सोय संघकार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. संघप्रेरणेने सुरू झालेल्या संस्था आणि संघटना पुढाकार घेऊन ही सर्व कामे करत आहेत. त्यामध्ये संघकार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आहे.


RSS_6  H x W: 0

या आपत्तीच्या काळात उपचाराइतकीच मानसिक आधाराची आणि समुपदेशनाची गरज लक्षात आली आहे. मुंबईसारख्या शहरात ही गरज प्रकर्षाने जाणवत आहे, म्हणून संघकार्यकर्त्यांनी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. ज्यांना मानसिक त्रास होतो आहे, अशा व्यक्तींसाठी ही सुविधा उपलब्ध असून औषधे, भोजन, रुग्णालयात दाखल होण्यासाठी आवश्यक असणारी मदत या हेल्पलाइनवरून केली जाते. त्याचप्रमाणे गृहविलगीकरणात राहणार्या बांधवांसाठी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथकही संघस्वयंसेवकांनी सुरू केले आहे. अन्य प्रांतांतून मुंबईत आलेल्या बांधवांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आपआपल्या गावाकडे जाऊ इच्छिणार्या बांधवांसाठी रेल्वे स्टेशनवर पाणी, भोजन, शौचालय अशा प्राथमिक गरजांची पूर्तता केली जात आहे. प्लाझ्मादानासाठी जनजागृती आणि प्रत्यक्ष प्लाझ्मा संकलन या विषयातही मुंबई परिसरात काम सुरू आहे.

कोकण प्रांतात अभाविपच्या माध्यमातून युवकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित केले जात असून त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे ही मोहीम पुढेही चालू राहणार आहे. या आपत्तीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असून रक्तपेढ्यांवर ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी रक्तदान करावे यासाठी संपर्क आणि प्रबोधन केले जात आहे. प्रत्यक्ष रुग्णालयात, विलगीकरण कक्षात मदत करण्यासाठी अभाविपच्या माध्यमातून काही विद्यार्थी पाठवले आहेत.RSS_3  H x W: 0

या काळात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे ऑक्सिजन - ऑक्सिजनचा आणि ऑक्सिजन बेडचा तुटवडा. या समस्येवर स्थानिक ठिकाणी आपआपल्या शक्तीनुसार संघस्वयंसेवक काम करत आहेत. उदाहरण द्यायचे, तर डोंबिवली नागरी बँकेच्या आणि जनकल्याण समितीच्या माध्यमातून शहरातील कोरोना बाधितांसाठी घरपोच ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून त्यासाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. जे गंभीर स्वरूपाचे रुग्ण स्वत:च्या घरीच उपचार घेत आहेत, अशांसाठी ही सेवा आहे.

जालन्यात वाढता प्रसार आणि रुग्णसंख्या लक्षात घेऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आणि वेळीच उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वाहतूक व्यवस्था विकसित केली असून रिक्षा रुग्ण्वाहिनी तयार केली आहे. या रिक्षामध्ये ऑक्सिजनची व्यवस्था केली गेली आहे. गोरगरीब जनतेला याचा फायदा होतो आहे. पुणे नाशिक, चिंचवड, औरंगाबाद, नागपूर या महानगरांत रक्तदान शिबिरे, प्लाझ्मा संकलन आयोजित केली जात आहेत, तसेच रुग्णांना आवश्यक असणारी औषधे इत्यादी गोष्टी उपलब्ध करून दिल्या जात असून या महानगरांत रुग्णाच्या आणि रुग्णाच्या कुटुंबीयांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे भाइंदर, जालना, मालेगाव, चांदवड, भुसावळ, जळगाव, उमरेड, मलकापूर, खामगाव अशा छोट्या शहरांतून भोजन, औषधे, रुग्णवाहिनी आणि लसीकरण या कामांवर भर दिला जात आहे.

RSS_4  H x W: 0

संघ काही करणार नाही आणि स्वयंसेवक काही सोडणार नाही असे म्हटले जाते, कारण संघाचे काम हिंदू समाजाचे संघटन करण्याचे आहे. मात्र समाजाच्या गरजा आणि व्याधी यांची जाणीव संघाइतकी कुणालाच नाही. जेव्हा जेव्हा समाजावर आपत्ती आली, तेव्हा तेव्हा संघस्वयंसेवक सर्वात आधी त्या आपत्तीशी टक्कर देण्यासाठी मैदानात उतरला आहे. याआधी समाजाने असा अनुभव बर्याच वेळा घेतला आहे. आपल्या आसपासच्या परिसरातील परिस्थिती लक्षात घेऊन आणि आपल्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करत समस्येवर मात करण्यास स्वयंसेवक नेहमीच सिद्ध असतात. ‘कमी तिथे आम्हीहा त्याचा बाणा असतो. या आपत्तीच्या काळातही समाजाला त्याचा अनुभव येत आहे. सरकारी यंत्रणेला मदतीचा हात देत परिस्थिती सुधारण्यासाठी संघस्वयंसेवक काम करतो.

कोरोना आपत्तीमुळे अनेक व्यवस्थांवर ताण आला आहे. अगदी स्मशानही त्यातून सुटले नाही. कोरोनामुळे होणार्या मृत्यूंची संख्या जशी अधिक आहे, तसेच भीती आणि मानसिक ताण यामुळेही अनेकांचे मृत्यू होत आहेत. गेल्या वर्षी नाशिकमध्ये दीर्घकाळ स्मशानात काम करून स्वयंसेवकांनी सेवाभावाचा आदर्श उभा केला होता. आता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत स्वरूपवर्धिनीचे कार्यकर्ते काम करत आहेत. भीतीचे मळभ सर्वत्र दाटले असताना, नैराश्य आणि उमेद हरवून गेलेली असताना सेवायज्ञात आपल्या समिधा अर्पण करत कोरोना आपत्तीशी मुकाबला करणार्या संघस्वयंसेवकांचा गौरव करण्यासाठी केवळ एकच वाक्य उपयोगात आणता येईल - अविरत श्रमणे संघजिणे.’