राष्ट्र सर्वोपरी

विवेक मराठी    28-Apr-2021   
Total Views |

डॉ. हेडगेवारांचा एक मंत्र आहे, ‘राष्ट्रहित सर्वोपरी.’ राष्ट्र सर्वप्रथम, मग सिद्धान्त, मग पोथीनिष्ठा. मोदींनी हा मंत्र शंभर टक्के अमलात आणलेला आहे

first nation_5  जून महिन्यात संघसंस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या वचनांवर भाष्य करणारा एक स्वतंत्र विशेषांक प्रकाशित केला जाणार आहे. यानिमित्त त्यांची अनेक विचारसूत्रे मी शोधली, सर्वांचे बारकाईने वाचन केले आणि ही विचारसूत्रे भाष्यांसाठी ज्येष्ठ संघकार्यकर्त्यांकडे पाठवून दिली.

याच काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणाविषयी वाचन सुरू केले. काही पुस्तकांचे वाचन चालू आहे. त्यामध्ये एक शब्दप्रयोग Modi Doctrine - म्हणजेमोदी सिद्धान्तहा शब्दप्रयोग अनेक वेळा येतो. या शब्दांवर दोन पुस्तकेदेखील आहेत. डॉक्ट्रीन हा शब्द काही मला नवीन नाही. विदेश नीतीच्या संदर्भात हा शब्दप्रयोग सातत्याने वापरला जातो. भारताच्या विदेश नीतीचा विचार करतानेहरू डॉक्ट्रीन, इंदिरा डॉक्ट्रीन, गुजराल डॉक्ट्रीन, डॉ. मनमोहन डॉक्ट्रीनअसे शब्दप्रयोग विशेषज्ञ करतात. भारताच्या विदेश नीतीच्या सिद्धान्तांचे श्रेय विदेश नीतीचे काही अभ्यासक पं. नेहरू यांना देतात. त्यांना भारतीय परराष्ट्र नीतीचे शिल्पकार असे म्हटले जाते.

 

 संघसंस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिदिनानिमित्त एक स्वतंत्र विशेषांक प्रकाशित केला जाणार आहे.

विशेषांक खरेदी करण्यासाठी https://www.evivek.com/dr-hedgewar/


इंदिरा गांधी ते मनमोहन सिंग यांनी पं. नेहरू यांची परराष्ट्र नीती पुढे चालविली. नेहरूंच्या विदेश नीतीवर सर्वप्रथम घणाघाती टीका डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. नेहरूंच्या परराष्ट्र नीतीमुळे जगात भारताला कुणी मित्र राहिला नाही, शत्रूंची संख्या वाढली. त्याचे कारण असे की, नेहरूंनी डावी विचारसरणी हा परराष्ट्र नीतीचा पाया ठेवला. राष्ट्रहित हाच परराष्ट्र नीतीचा एकमेव आधार असावा लागतो. झापडबंद विचारधारा परराष्ट्र्र नीतीचा आधार होऊ शकत नाही. परंतु आजही काही लोकांना नेहरूंचे भलतेच प्रेम दिसते. अपर्णा पांडे यांच्याFrom Chanakya to Modiया पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणातील प्रत्येक वाक्य नेहरूस्तुतीने भरलेले आहे. परराष्ट्र नीतीच्या संदर्भात नरेंद्र मोदी नेहरूंचे अनुयायी नाहीत, मग ते कुणाचे अनुयायी आहेत?first nation_4   

ते बोलत नाहीत, पण ते डॉ. हेडगेवारांचे अनुयायी आहेत. एक तर ते गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी संघातील गुजरातमधील ज्येष्ठ प्रचारक होते. सर्व संघस्वयंसेवकांचे प्रेरणास्थान डॉ. हेडगेवार असतात. नरेंद्र मोदी त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. परराष्ट्र नीतीच्या संदर्भात डॉ. हेडगेवार त्यांचे प्रेरणास्थान आहेत, असे म्हटले तर अनेकांच्या भुवया उंचावतील, हे मला माहीत आहे. परराष्ट्र नीतीसंदर्भात डॉ. हेडगेवारांनी कोणते सिद्धान्त मांडले आहेत? असेही विचारले जाऊ शकते.

डॉ. हेडगेवारांनी कोणतेही पुस्तकी सिद्धान्त मांडलेले नाहीत, त्यांनी मंत्र दिलेले आहेत. विदेश नीतीसंबंधीचा त्यांचा मंत्र, ‘हिंदू संस्कृतीचे ध्येय अत्यंत उदार असल्यामुळे जगहिताय कृष्णायही आमच्या कार्याची भूमिका असल्यामुळे हिंदुस्थानचे पारतंत्र्यच काय, जगातील संपूर्ण अन्याय दूर करण्याचे काम संघाच्या शिरावर आहे.’

डॉक्टरांच्या या मंत्राचे तीन अर्थ होतात. 1) हिंदू संस्कृतीचे ध्येय जगत् कल्याणाचे आहे. 2) आमचे कार्य केवळ हिंदुस्थानच्या स्वार्थाचे नाही. आणि 3) जगातील संपूर्ण अन्याय आपल्याला दूर करायचा आहे. ही एका अर्थाने परराष्ट्र नीतीची व्यवहारिक सूत्रे आहेत. मोदींनी या सूत्रांचा यथार्थपणे अवलंब केलेला आहे.


first nation_1  

कोरोनाग्रस्त जगाला गेल्या वर्षी त्यांनी लसींचा पुरवठा केला. अमेरिकेला औषधे पाहिजे होती, ती पाठविली. आफ्रिकेतील गरीब देशांना वैद्यकीय मदत केली. जागतिक पर्यावरणासंबंधी निश्चित भूमिका घेतली. आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये, मध्य आशियातील अनेक देशांमध्ये भारताला लागणार्या शेतमालाचे उत्पादन करण्यासाठी आर्थिक साहाय्य केले आहे. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे, तिच्याशी लढण्यासाठी त्यांनी जागतिक एकजूट करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादविरोधी युद्धात अमेरिकेला त्यांनी साहाय्य केले. डॉ. हेडगेवारांनी संघ बाल्यावस्थेत असतानाच संघाचे विशाल ध्येय कार्यकर्त्यांपुढे ठेवले, ते म्हणजे जगहिताय कार्य आपल्याला करायचे आहे.

परराष्ट्र नीतीच्या संदर्भात डॉ. हेडगेवारांचा आणखी एक मंत्र आहे, ‘आमच्यावर आजपर्यंत जेवढी आक्रमणे झाली आणि अन्याय झाले, त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे आम्ही प्रचंड शक्तिशाली झाले पाहिजे.” नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शक्तिशाली भारताचा आपण अनुभव घेत आहोत. काँगे्रसच्या कालखंडात भारतात दहशतवादी हल्ले झाले. ते पाकिस्तानने केले, त्यात आपले नागरिक मेले. आपण फक्त त्यांची प्रेते मोजत बसलो. ‘भ्याड हल्ला, माणुसकीला कलंकअसली अर्थहीन बडबड करीत बसलो. कॅन्डल मार्च काढीत बसलो. दहशतवादी हल्ल्यांना मोदींनी दिलेली उत्तरे नेहरूंना स्वर्गातही कापरे भरायला लावणारी होती. प्रथम त्यांनी सर्जिकल स्ट्राइक केला. नंतर हवाई हल्ला करून बालाकोटचा दहशतवादी तळ नष्ट केला. पैंगाँग लेक येथे चिनी सैन्याशी दोन हात केले. आपल्या सामर्थ्याची प्रचिती दिली. डॉ. हेडगेवारांना हेच अपेक्षित होते.

पूजनीय डॉक्टरांनी परराष्ट्र नीतीचा पुढचा मंत्र दिला, ‘कोणत्या ध्येयसिद्धीसाठी आम्ही कंबर कसली आहे? आमची एवढीच इच्छा आहे की, आमचा पवित्र हिंदू धर्म आणि आमची प्रिय हिंदू संस्कृती यांनी विश्वात गौरवपूर्ण स्थान प्राप्त करावे आणि चिरंजीवन प्राप्त करावे.’ नरेंद्र मोदी यांनी हा मंत्र अमलात आणला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने आपल्या तत्त्वज्ञानाचा श्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता विदेशी नेत्यांना दिला नाही. मोदींनी तो जपानच्या पंतप्रधानांना प्रथम दिला. अनेक देशांच्या प्रमुखांना दिला. भगवद्गीता म्हणजे हिंदू धर्म आणि भगवद्गीता म्हणजे हिंदू संस्कृती. केवळ ग्रंथ दिल्याने आपली प्रिय हिंदू संस्कृती गौरवासहित चिरंजीवन प्राप्त करणार नाही. त्यासाठी आपली सांस्कृतिक मूल्ये जगाला देण्याची गरज आहे.


first nation_3  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनोपुढे प्रस्ताव ठेवला की, 21 जून हाजागतिक योग दिवसम्हणून पाळावा. युनोने ते मान्य केले आणि आज जगातील सर्व प्रमुख देशांत 21 जून हा योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योग ही भारताची जगाला दिलेली देणगी आहे. योग केल्यामुळे शारीरिक आरोग्य ठीक राहते, तसेच मानसिक आरोग्यदेखील उत्तम राहते. दहशतवादाचा अवलंब करणारे एका अर्थाने मानसिक रुग्ण असतात. त्या सर्वांना जर योग करायला लावला, तर निरापराध माणसांना मारण्याचे आघोरी काम ते करणार नाहीत.

परराष्ट्र नीतीच्या संदर्भातील डॉक्टरांचा पुढचा मंत्र आहे, ‘अहिंसा तेव्हाच शोभून दिसते, जेव्हा तिच्यामागे शक्ती उभी असते. शक्ती याचा अर्थ त्यांच्या लेखी राष्ट्रभावना, राष्ट्रजागृती आणि जनतेची संघटित ताकद असा आहे. बळाखेरीज संरक्षण अशक्य आहे.’ पं. नेहरू यांचे भावनिक गुरू होते महात्मा गांधी आणि वैचारिक गुरू होते मार्क्स. गांधी आणि मार्क्स एकत्र राहू शकत नाहीत. त्यांना नेहरूंनी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. गांधीजींच्या अहिंसेचे पाठ जगाला द्यायला सुरुवात केली. सामर्थ्यहीन देशाचे उपदेश ऐकायला जगाला वेळ नसतो. चीनने नेहरूंच्या पाठीत असा खंजीर खुपसला की, त्यातून नेहरू सावरू शकले नाहीत. भारताला शस्त्रे देण्याची याचना अमेरिकेचे अध्यक्ष केनेडी यांच्याकडे करावी लागली. गांधीजींच्या अहिंसेने चिनी सेना हिमालय पार करून आली. पाकिस्तानने एक तृतीयांश काश्मीर बळकावला.

नरेंद्र मोदी स्वतः अहिंसावादी आहेत, पण त्यांची अहिंसा सामर्थ्याच्या हत्तीवर बसलेली आहे. यामुळे त्यांच्या अहिंसेच्या उपदेशाला जगात काही किंमत आहे. जर ऐकले नाही तर प्रतिकार केला जाईल, हे मोदींनी पाकिस्तानच्या बाबतीत दाखवून दिले, चीनलादेखील दाखवून दिले. चीनच्या सरहद्दीपर्यंत लष्करी वाहने जातील, असे प्रशस्त रस्ते बांधण्यात आले आहेत. ते करण्याची हिम्मत नेहरू घराण्यातील राजकर्त्यांना कधी झाली नाही.


first nation_1  

डॉ. हेडगेवारांचा एक मंत्र आहे, ‘राष्ट्रहित सर्वोपरी.’ राष्ट्र सर्वप्रथम, मग सिद्धान्त, मग पोथीनिष्ठा. मोदींनी हा मंत्र शंभर टक्के अमलात आणलेला आहे. इस्रायलशी संबंध ठेवायला काँग्रेस सरकार खूप घाबरत होते. भारतातील मुसलमानांची मने दुखावतील, मते जातील, म्हणून इस्रायलशी संबंध ठेवण्याचे धाडस त्यांनी केले नाही. नरेंद्र मोदी हे इस्रायलला भेट देणारे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. तंत्रज्ञानात इस्रायलची प्रगती अफाट आहे. वाळवंटात त्याने शेतमळे फुलविलेले आहेत. इस्रायलकडून आपण खूप काही शिकू शकतो. भारतातील मुसलमानांना काय वाटेल, याची चिंता मोदींनी केली नाही. देशाचे हित कशात आहे, हे त्यांनी पाहिले.

देशहितासाठी मोदी यांनी सौदी अरेबिया, यूएई, इराण या देशांशीदेखील संबंध वाढविले. इराणला एक बंदर बांधून देण्याचे कामही स्वीकारले. या सर्व धोरणात कुठलाही ग्रांथिक झापडबंद विचार नाही. देशाच्या हिताचे काय आहे, ते करायचे. ग्रंथामध्ये ते बसते की नाही, हानेहरू विचारकरायचा नाही.

इतिहासकाळात भारत कधीही विस्तारवादी देश नव्हता. दुसर्या देशांना गुलाम करून लुटणे ही भारताची संस्कृती नाही. याउलट लहान-लहान देशांना त्यांच्या पायावर उभे करणे, त्यांना स्वयंपूर्ण करणे, ही भारताची संस्कृती आहे. दक्षिणेतील चौल राजवंशाने पश्चिम आशियातील बहुतेक सर्व देशांमध्ये आपल्या संस्कृतीचा प्रसार केला. तिथे हिंदू साम्राज्ये उभी केली. ती तलवारीच्या जोरावर उभी राहिली नाहीत, लोकमान्यतेवर त्यांची उभारणी झाली. युरोपातील देश जगभर पसरले. त्यांनी केलेली लूट आणि कत्तली यांचे इतिहास मनुष्यजातीला काळिमा फासणारे आहेत. आपल्याला असे काही करायचे नाही, हे डॉ. हेडगेवारांनी वारंवार सांगितले. जगाला आपला धर्म द्यायचा आहे, म्हणजे मनुष्याने मनुष्याशी प्रेमाने आणि आत्मीयतेने वागण्याचे तत्त्वज्ञान द्यायचे आहे. पूजनीय डॉक्टरांचे एक वचन असे आहे, ‘आज जगात सर्व बाजूला अन्याय, अत्याचार आणि अधार्मिकतेचे स्वछंद साम्राज्य पसरलेले आहे. ते जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत आम्ही कितीही जप-तप केले, तरी आम्हाला मोक्षाचा अधिकार प्राप्त होऊ शकत नाही.’

 

जगातील अन्याय, अत्याचार, अधार्मिकता ही नष्ट व्हायची असेल तर हिंदू समाज संघटित असला पाहिजे, त्याचे राजकीय नेतृत्व कणखर असले पाहिजे आणि या नेतृत्वाची परराष्ट्र नीती भारताचा गौरव वाढविणारी आणि जगाला शांती देणारी हवी. मोदी हेच काम करीत आहेत, असे मला वाटते. हेडगेवार विशेषांकापासून सुरू झालेला हा चिंतन प्रवास मोदींच्या परराष्ट्र नीतीपर्यंत मला अशा प्रकारे घेऊन गेला.