शिकायला शिकणे हीच काळाची गरज

30 Apr 2021 17:31:15

@ज्योती केमकर

सकस शैक्षणिक अनुभव आणि त्यातून विकसित झालेली कौशल्ये मुलांना पुढच्या शिक्षणासाठी - विशेषतः स्वयंअध्ययनासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. इथून पुढे शिकायला शिकणे हीच काळाची गरज असेल.

education  _2  

प्रत्येक देशाप्रमाणे आपल्या देशातही आपण देशातील लहान मुलांना राष्ट्रीय संपत्ती मानतो. भविष्यात आपला देश चालवणारे आणि लोकशाहीचा अवलंब करणारे सुजाण नागरिक शिक्षणातून घडावेत, म्हणून मुलांच्याशिक्षणाचीजबाबदारी आपल्या सरकारने घेतली आहे. त्यासाठी अवाढव्य अशी यंत्रणाही उभारली आहे. यातून ज्ञानी, लोकशाही मूल्ये आत्मसात केलेले आणि विविध क्षेत्रांमध्ये कुशल असणारे, स्वतःची आणि समाजाची जबाबदारी घ्यायला सक्षम विद्यार्थी घडणे अपेक्षित आहे. तरीही आपल्या आजूबाजूला शिक्षण क्षेत्राबद्दल असमाधान दिसते. ‘शाळेत हेच शिकवले का?’ किंवाआता हे शाळेच्या अभ्यासक्रमात असायला हवेअसा सूर उमटताना दिसतो.

त्यात भर म्हणजे आपले घर, गाव, जिल्हा, राज्य, देश आणि संपूर्ण जग अशा सर्व पातळ्यांवर गेले वर्षभर आपण सगळेच अतिशय आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहोत. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडींशी आपला रोजच्या रोज थेट, प्रत्यक्ष संबंध येत नसला, तरी तिथे घडणार्या घटनांचे पडसाद आपल्या रोजच्या जीवनात उमटत आहेत. सर्वच क्षेत्रांतील व्यवहारांवर या परिस्थितीचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

अशा आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देताना विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहावे, म्हणून आपल्या देशात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला गेला. या शिक्षणातून मुले तंत्रज्ञानासह एरवी शिकली नसती अशा काही गोष्टी शिकली. शिक्षक डिजिटल तंत्रज्ञान वापरायला, शैक्षणिक साहित्य तयार करायला शिकले, पण बाकी शिक्षणाचे काय? शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल सर्वांनाच हवे आहेत. सध्याच्या संकटाकडे पाहता हा बदल करण्याची वेळही आलेली आहे असे वाटते. सुदैवाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण नुकतेच जाहीर झाले आहे. त्यात कृतियुक्त अध्ययनावर भर आहे. त्याचा योग्य प्रकारे उपयोग करून हे बदल घडवून आणणे शक्य आहे. शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल म्हणताना सध्याची शिक्षणव्यवस्था जाणून घेणे आवश्यक आहे.


आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात जे काही थोडेफार काम करता आले, त्यादरम्यानची सध्याच्या शिक्षणव्यवस्थेबद्दलची काही निरीक्षणे, अनुभव, आव्हाने आणि उपाय इथे मांडत आहे.

1. कोणतीही यंत्रणा काही गृहीतकांवर आधारित असते. शिक्षण क्षेत्रातही शिक्षणाची उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती . निश्चित करताना मुलांचे वय, त्यानुसार त्यांचा होणारा शारीरिक, भावनिक, बौद्धिक, भाषिक, सामाजिक, मानसिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत होणारा विकास, आर्थिक, सामाजिक पार्श्वभूमी, भौगोलिक घटक, उपलब्ध संसाधने, जगभरातील शिक्षण अभ्यासकांनी, मानसशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धान्त, गृहीतके या सर्वाचा विचार तज्ज्ञ मंडळी करत असतात. ही सर्व गृहीतके, शिक्षणाची व्याख्या, सिद्धान्त, आपल्या गरजा, यंत्रणेतील घटकांच्या भूमिका आणि आपल्या अंमलबजावणीच्या पद्धती यांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे.


2. अनेक सामाजिक समस्या सोडवण्याचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते. म्हणूनच सद्य:स्थितीत पाठीच्या कण्याप्रमाणे असणार्या शिक्षण क्षेत्रात काही अत्यंत मूलभूत बदल करण्याची आवश्यकता जाणवत आहे. हे सोपे नाही, पण अशक्यही नाही. विशेषतः पहिली ते बारावीच्या शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये यांच्या कार्यपद्धतीत बदल आवश्यक आहेत. प्रश्न कामाच्या सोयीचा नसून दूरगामी परिणामांचा आहे. या बदलांसाठी स्वतःचा लेाषेीीं ूेपश सोडून रुळलेल्या वाटा सोडून काही नवीन बदल स्वीकारण्याचा आहे; त्यासाठी सर्वच संबंधित घटकांना थोडे जास्तीचे काम करावे लागेल, म्हणून इच्छाशक्तीचा आहे.

 

3. सध्या मूल पूर्वप्राथमिक शिक्षण घेऊन पहिलीत जाते. शिक्षक पाठ्यपुस्तकातील पाठ्यक्रम वेळापत्रकानुसार पूर्ण करतात. परीक्षा घेतात, मूल पुढील इयत्तेत जाते. सध्याच्या नियमानुसार एखाद्या इयत्तेत मूल अनुत्तीर्ण झाले, तरी त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून मुलाला पुढील इयत्तेत घातले जाते. आधीच्या इयत्तेतील कच्चा राहिलेला अभ्यास उपचारात्मक अध्यापनाने नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी पक्का करवून घेणे अपेक्षित असते. अन्यथा पाया कच्चा राहिल्यामुळे मूल एका दुष्टचक्रात सापडते आणि शिक्षणाबद्दलचा आत्मविश्वास हरवून बसते. दुर्दैवाने या प्रक्रियेतला महत्त्वाचा दुवा शिक्षक अभ्यासक्रमात असलेली लवचीकता आणि स्वत: शिक्षकाला असलेले स्वातंत्र्य अभावानेच वापरताना दिसतो, पठडीत अडकतो आणि शिक्षणातील आनंद, सर्जनशीलता हरवून बसतो. परिणाम? पुढच्या पिढ्या देशासाठी जबाबदार नागरिक होणे दूरच, स्वत:च्या आयुष्याची जबाबदारी घ्यायलादेखील असमर्थ ठरताहेत. बोर्ड परीक्षेला आणि गुणांना अवास्तव महत्त्व आले आहे. शिक्षण आनंददायक असायला हवे. परीक्षा रोजच्या कामाइतक्या सहज असाव्यात. शिक्षणाचा टप्पा बदलताना बोर्ड परीक्षा असावी. बोर्ड निवडण्याचे स्वातंत्र्य परीक्षा द्यायच्या वेळी विद्यार्थ्यांना असावे. परीक्षा घेऊन निकाल लावणे हे बोर्डांचे काम आहे, ते त्यांनी करावे. शाळांना बोर्डाने affiliation देण्याची पद्धत बंद करावी.

4. आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल माहिती घेणे, वेगवेगळ्या संकल्पना स्पष्ट होणे, त्यातील कार्यकारणभाव समजणे, रोजचे जगणे सोपे करण्यासाठी मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करणे, दैनंदिन आयुष्य सुरळीत चालावे यासाठी काही कौशल्ये आत्मसात करणे आणि स्वत:ला जे उत्तम करता येते, त्याचा संवेदनशीलतेने समाजाच्या भल्यासाठी उपयोग करणे हा माणूस म्हणून घडण्याचा, सहज शिक्षणाचा साधा प्रवास आहे. पण काही सन्मान्य अपवाद वगळता आजचे शिक्षण पुस्तकात आणि परीक्षेत अडकून पडले आहे. ते पुस्तकातून बाहेर येऊन रोजच्या जगण्याशी जोडले जायला हवे. शिक्षणव्यवस्थेला मदत करणार्या UGC, NCERT, SCERT, Text Book Burea त्यांचे काम करत राहतील. शाळांचे रूपांतर मात्र लहान लहान अभ्यासकेंद्रांत व्हावे.

 

education  _1   

5. शिक्षण क्षेत्रात शिक्षक-पालक-विद्यार्थी, उद्दिष्टे-अध्ययन अनुभव-मूल्यमापन, बुद्धी-भावना-कौशल्य (Head-Heart-Hand) असे अनेक त्रिकोण आहेत. या सर्व त्रिकोणांच्या मध्यभागी काही अपवाद वगळता संस्था, संस्थाचालक आणि कामे उरकण्याची सरसकट सोय या गोष्टी अलगद जाऊन बसल्या आहेत आणि बाकीचे कोन लांब ढकलले गेलेत. ज्यांच्या हातात निर्णय घेणे आहे, त्यांनी आपली शिक्षणव्यवस्था विद्यार्थिकेंद्रित असावी असा कितीही प्रयत्न केला, तरी हा निर्णय अंमलात येताना संस्थाकेंद्रित होतो. मूल केंद्रस्थानी असावे आणि बाकी व्यवस्था आधार देणारी असावी.

6. कोणत्याही निर्णयाच्या अंमलबजावणीची सुरुवातच अडचणींचा पाढा वाचण्यापासून होते. खरे तर यंत्रणेतील सर्व घटकांना आपल्या कार्यक्षेत्रातले निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असते, ते अभावाने घेतले जाते. अपवाद म्हणून काही संस्था, शिक्षक-मुख्याध्यापक मिळून अतिशय चांगले काम करत आहेत. दुसर्या कोणीतरी येऊन माझ्या अडचणी सोडवाव्या म्हणून रडत बसण्यापेक्षा आणि निष्क्रिय राहण्यापेक्षा या अडचणींकडे आव्हाने म्हणून पाहायला हवे आणि स्वतः त्यावर उपाय शोधायला हवेत. विद्यार्थिकेंद्रित शिक्षणासाठी वेगवेगळे शैक्षणिक अनुभव मिळतील असे वातावरण निर्माण करण्याचे स्वातंत्र्य शिक्षकांना आहे, ते त्यांनी घ्यावे आणि वरिष्ठांनी शक्य ते सर्व सहकार्य करावे.

7. शिक्षणव्यवस्थेतील आपल्या यंत्रणा अतिशय मजबूत आणि सक्षम आहेत. पण काही वेळा या सर्व संस्था समांतर चालतात असे जाणवते. त्यांच्यामधील समन्वय आणि सुसूत्रता वाढवण्याची गरज आहे. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने मुलांसाठीही ती तशीच असावी. प्राथमिक, माध्यमिक . वेगवेगळे विभाग केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी असावेत आणि या विभागांमध्येही समन्वय असावा.

(शिक्षक, विद्यार्थी यांच्यासाठी असणार्या अनेक योजना, सरकारी सुविधा यांची माहिती संबंधित घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पाठ्यपुस्तकांच्या बरोबरीने इतर शैक्षणिक पुस्तकांची निर्मिती करत असते. उदाहरणार्थ, शिक्षकांनी पाठ्यपुस्तकाचा उपयोग कसा करावा यासाठी मार्गदर्शन करणारी प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक विषयाची शिक्षक हस्तपुस्तिका. असे काही असते, हे पुण्यातल्यादेखील अनेक शिक्षकांना माहीत नव्हते. दर वर्षी बालभारती शिक्षकांसाठी संशोधन प्रकल्प योजना राबवत असे. ज्या वर्षी मी या प्रकल्पात सहभागी झाले, त्या वर्षी शिक्षक हस्तपुस्तिकांचा खप कमी का होतो? असा विषय संशोधनासाठी होता.)

8. शिक्षण क्षेत्रात एखादा प्रयोग यशस्वी झाला की त्याची मोठ्या प्रमाणात नक्कल/अंधानुकरण सुरू होते. हे थांबायला हवे. नक्कल/अंधानुकरण टाळून आपल्या विद्यार्थ्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याचे प्रयत्न व्हावेत.

9. मुलांच्या शिक्षणात त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची आहे. मुलाला महागड्या शाळेत किंवा क्लासमध्ये घातले की ते आपोआप शिकते किंवा शिकले पाहिजे, मुलांची सर्व क्षेत्रांत झटपट प्रगती झाली पाहिजे, अशा एक धारणा होत चालली आहे. पालक मुलांना वेगवेगळे क्लास, जायला-यायला वाहनव्यवस्था, रेडिमेड नोट्स, गाइड, रेडिमेड प्रोजेक्ट्स, महागडी उपकरणे.. इतकेच काय, वेळप्रसंगी मुलांचा गृहपाठ करून देणे अशा सर्व सुविधा द्यायला तयार आहेत. फक्त त्यांनी खूप गुण मिळवून चांगल्या संस्थेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळवावा आणि चांगल्या पॅकेजसह परदेशी नोकरी मिळवावी! अशाने मुले स्वतः कधी शिकतील? या गोष्टीमुळे भविष्यात अनेक सामाजिक समस्या निर्माण होऊ शकतात. तेव्हा मुलांच्या शिक्षणात नको तितका हस्तक्षेप करणे पालकांनी थांबवले पाहिजे. योग्य तिथे लक्ष देऊन अडेल तिथे जरूर तेवढीच मदत आणि मार्गदर्शन केले पाहिजे. यासाठी मुलांच्या शिक्षणाबरोबर आणि शिक्षकांच्या प्रशिक्षणाबरोबर पालकांचेही प्रशिक्षण व्हायला हवे.

10. अनेकदा मुलांना काही प्रश्न विचारले, तरआम्हाला शिकवले नाही”, “अभ्यासक्रमात हे नाहीअशी उत्तरे मिळतात. शिक्षण म्हणजे अभ्यासक्रम पूर्ण करणे, कोणीतरी शिकवले तरच मुले शिकतात, हा दृष्टीकोन बदलला पाहिजे आणि एकूण व्यवस्थेमध्येच सध्या अध्यापनावर असणारा भर अध्ययनावर येईल असे पाहिले पाहिजे.

शिक्षणाच्या दृष्टीने सध्याची परिस्थिती सुरळीत कधी होईल, मुले शाळा-कॉलेजमध्ये पुन्हा कधी जायला लागतील याचा अंदाज आत्तातरी येत नाहीये. त्यात आपल्या देशात शालेय शिक्षणात ऑनलाइन पद्धतीला अनेक मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण अभिव्यक्तीसारख्या अभ्यासानुवर्ती उपक्रमांतून सुरू ठेवून काही प्रमाणात अर्थपूर्ण करता येणे शक्य आहे. वातावरण सुरळीत झाले, तरी ही पद्धत कायमस्वरूपी, शाळेतही राबवता येण्यासारखी आहे.

मी 7 ते 12 या वयोगटातील मुलांसाठी गेल्या चौदा वर्षांपासून स्वतंत्रपणे आणि शाळांमधून अभिव्यक्ती हा उपक्रम राबवते. हा उपक्रम सुरू करताना मुलांना फक्त उपदेश करता त्यांचे भावविश्व समजून घेत खेळ, वेगवेगळ्या कृती यांतून त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांना स्वतःला ओळखायला, व्यक्त करायला मदत करणे हा हेतू होता. कारण गेल्या काही वर्षांपासून शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासविषयक आणि वर्तनविषयक समस्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. शिक्षणात इंग्लिश माध्यमाचा प्रभाव वाढत आहे. मुले मातृभाषेपासून दूर जात आहेत. विद्यार्थ्यांचे वाढते गुण, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, मनासारखे घडले नाही की विद्यार्थ्यांनी उचललेली टोकाची पावले, शिक्षण एका क्षेत्रात आणि करियर वेगळ्याच क्षेत्रात, एकीकडे मोठमोठ्या पदव्या घेऊन दर वर्षी नोकर्या शोधणारे भरमसाठ युवक-युवती, तर दुसरीकडे कुशल मनुष्यबळ मिळत नाही म्हणून अस्वस्थ असलेले नोकर्या निर्माण करणारे उद्योजक, एकीकडे अगदी विपरीत परिस्थितीत उत्तुंग यश मिळवणारे विद्यार्थी तर दुसरीकडे सर्व साधने हाताशी असून निष्क्रिय असणारी सुखवस्तू घरातली युवा पिढी, एकीकडे शिक्षणाची अनेक दालने खुली झालेली, तर काही जण या संधींपासून वंचित अशी विरोधाभास असणारी चित्रे दिसतात. लहानपणी योग्य प्रकारे व्यक्त व्हायला मिळालेले नसणे, त्यामुळे मुले तणावग्रस्त, दडपणाखाली असणे हे मोठेपणी जाणवणार्या अनेक समस्यांचे मूळ असते.

 

नोकरी व्यवसायात व्यग्र असल्याने मुलांशी बोलायला, गप्पा मारायला वेळ नसणारे आईवडील, विभक्त कुटुंबामुळे आजीआजोबांचा सहवास, प्रेम, बोलणे ऐकायला हक्काचे माणूस मिळणे, शाळा-क्लासच्या बांधील वेळांमुळे मैदानी खेळ खेळायला आणि मित्रमैत्रिणींबरोबर एकूणच खेळायला आणि व्यक्त व्हायला मिळणे, खेळायला मैदानच मिळणे, त्यामुळे ताण हलका होतो तो होणे ही तणावाची काही मुख्य कारणे. या जडणघडणीच्या काळात आपले बोलणे कोणी ऐकत नाही ही भावना एकदा मूळ धरू लागली की आत्मविश्वास कमी होत जातो आणि विविध समस्या वाढत जातात.

 

याउलट व्यक्त होण्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. स्वत:च्या आवडीनिवडी क्षमता कळणे, इतरांशी संवाद साधता येणे, त्यातून आत्मविश्वास वाढणे, आपल्या परिसराविषयी कुतूहल वाटणे, त्यातून माहिती मिळवणे, आपल्या सभोवतालची माणसे आणि घटना यांविषयी संवेदनशील असणे, स्वतंत्रपणे विचार करायला सुरुवात करणे, चुकण्याची भीती वाटणे, मदत मागता आणि करता येणे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणे अशा अनेक गोष्टींची सुरुवात अभिव्यक्तीतून होते.

अभिव्यक्तीसाठी कृती निवडताना त्या वयोगटाच्या अभ्यासक्रमाशी सुसंगती, भाषिक कौशल्यांचा विकास, परिसराबद्दलचे सामान्य ज्ञान, गणिती कौशल्यांचा विकास, बहुविध बुद्धिमत्ता यांचाही विचार केला जातो. त्यामुळे घेतलेल्या कृतींमधून सूचना समजणे (परीक्षेच्या लेखी सूचना अचूक कळण्यासाठीही याचा उपयोग होतो), इतरांशी जुळवून घेणे, निरीक्षण करणे, माहिती मांडणे, साम्य-फरक कळणे, वर्गीकरण करता येणे, मोजमाप, अंदाज येणे, काम पूर्ण वेळेत करणे, गटात काम करताना एकमेकांना सहकार्य करणे, नेटके लिहिणे, अडखळता वाचता येणे ही अभ्यास कौशल्येही मुले हसतखेळत आत्मसात करतात. एखाद्या मुलात काही विशेष क्षमता असतील, तर त्या लक्षात येतात आणि त्यासाठी विशेष मार्गदर्शन करता येते.

 

या उपक्रमात काही बदल करून सध्या ऑनलाइन किंवा मर्यादित संख्येने एकत्र येऊन मुलांचे अर्थपूर्ण शिक्षण सुरू ठेवणे शक्य आहे.सुरुवात करताना शिक्षक, मुलांबरोबर काम करण्याची आवड असलेल्या व्यक्ती, पालक, महाविद्यालयीन शिक्षण घेणारे ताई-दादा यांना प्रशिक्षण देता येईल. विषय कसा निवडायचा, कृती कशा ठरवायच्या, सूचना कशा द्यायच्या, मुलांशी कसे बोलायचे, त्यांचे निरीक्षण कसे करायचे, कसे नोंदवायचे, कृतींचे मूल्यमापन कसे करायचे इत्यादी गोष्टींचा समावेश प्रशिक्षणात असेल.

मुलांना प्रत्यक्ष शाळेत जाता आले नाही, तरी सोसायट्यांमधली, जवळपास राहणारी मुले (वेगवेगळ्या शाळांत जाणारी असली, तरी) छोट्या गटांमध्ये रोज एखादा तास एकत्र येऊन (सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून) कृतियुक्त शिक्षण सुरू ठेवू शकतील. सुरुवातीची काही सत्रे प्रत्यक्ष घेऊन पुढील सत्रे ऑनलाइन घेणे शक्य आहे.

 

ही पद्धत 7 ते 12 वयोगटातील मुलांसाठी विशेष उपयुक्त आहे. या वयातील मुलांमध्ये अमाप उत्साह असतो. उपद्य्वाप करून बघायला, नवीन गोष्टी शिकायला आवडतात. कोण काय म्हणेल या भीतीचे प्रमाण कमी असते. थोडक्यात, शिंग फुटायच्या आधीचे वय असल्याने सूचना ऐकण्याचे प्रमाणही अधिक असते. या वयात मुलांना मिळालेले सकस शैक्षणिक अनुभव आणि त्यातून विकसित झालेली कौशल्ये मुलांना पुढच्या शिक्षणासाठी - विशेषतः स्वयंअध्ययनासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. इथून पुढे शिकायला शिकणे हीच काळाची गरज असेल.

Powered By Sangraha 9.0