अष्टावक्र गीता 1

विवेक मराठी    05-Apr-2021   
Total Views |

उपनिषदांमध्ये रहस्यविद्या, ब्रह्मज्ञान किंवा पराविद्या यांची चर्चा केलेली आहे. अष्टावक्र संहितेमध्ये आत्मज्ञानाची चर्चा आहे. अष्टावक्र संहितेमध्ये पहिलाच प्रश्न विचारला आहे कीज्ञान, मुक्ती आणि वैराग्य कसे प्राप्त होईल? अष्टावक्र संहिता ही या प्रश्नापासूनच योगपर आणि संन्यासपर अशा उपनिषदांपासून थोडी वेगळी आणि स्वतःचे वैशिष्ट्य घेऊन आलेली लक्षात येते.

bhagwat geeta_1 &nbs

राजा जनक त्या भयानक जंगलातून पुढे पुढे जात होता. प्रचंड भूक लागलेली होती. जवळ तांदळाची एक लहानशी पुरचुंडी केवळ होती. त्याने ती पुरचुंडी उघडली. त्यातील तांदूळ पाहून त्याची भूक पुन्हा एकदा वाढली. आजूबाजूच्या काटक्या त्याने गोळा केल्या. तीन दगडांची चूल मांडली. बाजूलाच पडलेल्या तुटक्या खापरात त्याने जवळच्या ओढ्यातून पाणी आणले. चकमकीने चूल पेटवली. खापराच्या तुकड्यात तांदूळ शिजायला टाकले आणि तो वाट बघत बसला.

तांदूळ अर्धे शिजून झाले, पांढरा फेस वर येऊ लागला होता. आता मात्र त्याला भूक आवरेना. त्याने तांदूळ बोटचेपे झाल्याचे बघितले आणि लगेच आजूबाजूच्या झाडांची मोठी पाने जमिनीवर पसरली शिजलेला भात त्यावर पसरला आणि थोडा निवला की खाऊ या, म्हणून तो त्या गरम अन्नाचा गंध घेऊ लागला.

 

तेवढ्यात एक मोठा वळू तेथे आला आणि त्याने आपल्या खुरांनी तो शिजलेला भात मातीत मिसळून टाकला. आता राजा जनकाला काही सुचेना! त्याच्या चेहर्यावर घामाचे थेंब गोळा झाले. हातांना थरथर सुटली. पावले अडखळायला लागली. एकातरी पानावर थोडासा चांगला भात शिल्लक आहे का, ह्याचा शोध तो घेऊ लागला. मातीमध्ये मिसळलेले भाताचे कण त्याला दिसू लागले. भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला. आपलाच आवाज त्याच्या कानावर पडू लागला आणि हलकेच त्याने डोळे उघडले.

आपण आपल्या मंचकावर झोपलेलो आहोत आणि स्वप्न पाहत आहोत हे त्याच्या लक्षात आले. तो अत्यंत अस्वस्थ झाला. सकाळी उठून राज्यकारभारातील महत्त्वाच्या गोष्टी त्याने पार पाडल्या. पण आतला अस्वस्थपणा काही जाईना. खरा जनक कोणता? दोन ओंजळ अन्नासाठी अस्वस्थ असलेला की हा आता राज्यकारभार बघणारा? या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल याबाबत त्याला दरबारातल्या एकाही विद्वानाविषयी स्पष्ट खात्री वाटेना.

शास्त्रार्थ करायला हे सर्व जण उत्तम आहेत, यात शंकाच नाही. परंतु या अतिशय आतल्या आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची क्षमता या कोणातच नाही, असे वाटून त्याला वैषम्य आले.

दुपारी जेवायला बसला. समोर सुवासिक तांदळापासून केलेला भात होता. पंचपक्वान्ने होती. उत्तमोत्तम भाज्या होत्या. परंतु तो मातीत मिसळलेला भात काही त्याचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. पहिला घास घेतल्याबरोबर त्याला एकदम आठवले की आर्य बंदिशी चर्चा करायला आलेला तो लहानगा कुरूप यती, तोच या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल!! आपल्या पिताश्रींना, कहोड यांना वरुणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी त्याने आर्य बंदिजवळ शास्त्रार्थ केला होता. तो नेहमीच्या बौद्धिक वाद-चर्चेपेक्षा काहीसा वेगळा होता.

जेव्हा सारे जण आठ ठिकाणी वक्र असलेल्या त्याच्या शरीराकडे बघून हसले होते, तेव्हा त्यानेही आपल्याकडे केवळ हसून बघितले होते आणि खणखणीत स्वरात म्हणाला होता, “राजा, तुझ्या दरबारात विद्वान आहेत असे ऐकून होतो, परंतु येथे तर सारेच चामड्याचे जाणकार बसलेले दिसतात!” असे म्हणून त्याने संपूर्ण दरबाराला विचारात पाडले होते!! कोणताही अभिनिवेश नाही, अहंकार नाही, परंतु स्वाभिमानाचा लखलखता दिवा शरीर-मनाच्या आत पेटत आहे, असे त्याच्या डोळ्यांमधून आणि वाणीमधून लक्षात येत होते. तोच आपल्याला या प्रश्नाचे उत्तर देऊ शकेल. पण कुठे असेल तो?

राजाला एकदम आठवले की उद्दालक ऋषींचा मुलगा श्वेतकेतू त्याचा मामा आहे. नक्कीच आश्रमातून त्याची माहिती मिळू शकेल. राजाने त्वरित घोडेस्वार आश्रमात पाठवले आणि अष्टावक्र यांची माहिती घेऊन येण्यास सांगितले. घोडेस्वार परतले. त्यांनी सांगितले की अष्टावक्र यांनी घनदाट अरण्यामध्ये त्यांचा आश्रम उभारलेला आहे. राजा लवाजम्यासह निघाला. जंगलाच्या सीमेवर आल्यानंतर त्याच्या लक्षात आले की, आतमध्ये अंबारी, हत्ती, तंबू इत्यादी नेणे अवघड आहे. सारे तेथेच ठेवून सहा घोडेस्वारांसह तो पुढे निघाला. पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आले की आता येथे एका वेळी एकच घोडा जाऊ शकतो. त्याने सहा घोडेस्वार तिथे थांबवले आणि केवळ एकटाच निघाला. बराच पुढे गेल्यानंतर त्याला एका झाडाखाली अष्टावक्र मुनी दिसले.

त्यांच्याकडे जाण्यासाठी रिकिबीतून उजवा पाय काढून तो त्याने हवेत वर घेतला आणि डाव्या पायावर शरीर तोलून तो खाली उतरणार, तेवढ्यात अष्टावक्र म्हणाले, “राजन, थांब.” त्याच अवस्थेत राजा स्तब्ध झाला. डावा पाय रिकिबीत, उजवा पाय घोड्यावरून बाहेर आलेला, हवेत, दोन्ही हात घोड्यांवर आणि शरीराचा तोल सावरला अशा अवस्थेत तो अष्टावक्रांकडे पाहू लागला. जरा वेळाने अष्टावक्र म्हणाले, “राजन, खाली उतरा.” डावा पाय काढून आणि उजवा पाय मागे घेत राजा उतरला.

बोधाने भारलेल्या अवस्थेमध्ये राजा मुनींकडे गेला. प्रणाम करून आपल्या स्वप्नाची हकीकत सांगून म्हणाला, “मला माझ्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.” अष्टावक्र म्हणाले, “राजन, त्यासाठी तुला आश्रमात राहावे लागेल.” राजा म्हणाला, “मी तयार आहेआणि मग या अद्भुत गुरु-शिष्यांच्या संवाद सुरू झाला. यालाच अष्टावक्र गीता असे म्हटले जाते.

जनकाची परंपरा एकोणीस जनक राजे होऊन गेले असे सांगते. त्यातील एक म्हणजे नरकासुराचा प्रतिपाळ करणारा कूर्मावताराच्या वेळेचा राजा जनक आणि दुसरा म्हणजे वैदेही सीतेचा पिता जनक हे आपणास ठाऊक असतातच. त्यांच्या आधीचा हा अष्टावक्र गीतेतला जनक होय.

अष्टावक्र गीतेचे वेगळेपण

अष्टावक्र गीता उपनिषद काळात रचली गेली. मात्र या ग्रंथासअष्टावक्र गीताअसे म्हटले गेले. संस्कृत साहित्याच्या दृष्टीने वेदांनंतर ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे, आर्ष महाकाव्ये - म्हणजे रामायण, महाभारत आणि तत्त्वज्ञान या क्रमाने एकामागोमाग एक येतात. वेदांमधील यज्ञाच्या कर्मकांडांची माहिती ब्राह्मणांमध्ये असते, तर आरण्यके ही वेदांच्या अंती येतात.

आरण्यके आणि उपनिषदे ही दोन्ही वेदांच्या शेवटी येणारी असली, तरी त्यांच्यात सूक्ष्म फरक आहे. आरण्यकांमध्ये यज्ञाच्या गूढ अशा तत्त्वाचा विचार केला जातो. आरण्यक हे यज्ञकर्माच्या सूक्ष्म रूपावर चिंतन करणारे असते, तर उपनिषद ब्रह्मचिंतन करणारे असते.

आरण्यकांचा आणि उपनिषदांचा सर्वात महत्त्वाचा भेद म्हणजे आरण्यकांपर्यंत मनुष्याच्या जीवनाचे ध्येय हे आनंद आणि स्वर्गप्राप्ती एवढेच होते. यज्ञकर्म हे त्याचे इष्ट कार्य होते. मात्र उपनिषदांनी ज्ञानयज्ञाला श्रेष्ठता देऊन मोक्ष हेच मनुष्याच्या जीवनाचे सर्वात महत्त्वाचे असे कर्तव्य ठरवले. उपनिषदांमध्ये ईश्वर, जगत्, आत्मा (जीव) आणि ब्रह्म यांची चर्चा केली जाते.

ज्या वेळी अष्टावक्र यांचे आजोबा, उद्दालक (आरुणी) छांदोग्य उपनिषद सांगत होते आणि त्यांचे मामा श्वेतकेतूतत्त्वमसिहे महत्त्वपूर्ण सूत्र मिळवत होते, अशा वेळी उपनिषदाप्रमाणेच गुरु-शिष्य संवादाचे तंत्र असलेल्या या समकालीन ग्रंथास मात्रअष्टावक्र संहिता’, ‘अष्टावक्र गीताकिंवाकौशिकीय संहिताअसे म्हटले गेले.

उपनिषदांमध्ये रहस्यविद्या, ब्रह्मज्ञान किंवा पराविद्या यांची चर्चा केलेली आहे. अष्टावक्र संहितेमध्ये आत्मज्ञानाची चर्चा आहे. ज्या वेळी उपनिषदांचा रोख हा सृष्टी काय आहे? जीव सान्त आहे की अनंत? जन्माच्या आधी काय होते, मृत्यूनंतर काय असेल? जीवन मृत्यूबरोबरच संपते का? मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो का? मिळत असेल तर कसे कळते? यासारख्या प्रश्नांकडे होता, त्या वेळी अष्टावक्र संहितेमध्ये पहिलाच प्रश्न विचारला आहे कीज्ञान, मुक्ती आणि वैराग्य कसे प्राप्त होईल?’ अष्टावक्र संहिता या प्रश्नापासूनच योगपर आणि संन्यासपर अशा उपनिषदांपासून थोडी वेगळी आणि स्वतःचे वैशिष्ट्य घेऊन आलेली लक्षात येते.

ब्रह्मसूत्रे, उपनिषदे श्रीमद्भगवद्गीता ही प्रस्थानत्रयी मानली जाते. साधकाच्या यात्रेची सुरुवात येथे होते. मात्र जसे कालिदासाचेअभिज्ञान शाकुंतलहे लोकप्रिय काव्य आहे, परंतु विद्वान आणि खरे रसिकरघुवंशामध्येअधिक रमतात, त्याप्रमाणेच अर्जुनाच्या विषादयोगाने सुरू झालेली श्रीमद्भगवद्गीता ही सर्वांना मोहवून टाकते, मात्र मुमुक्षू साधक भगवद्गीता, उद्धव गीता आणि अष्टावक्र गीता या मार्गाने पुढे जातो.

उपनिषदकाळातील असूनही उपनिषद नाही, अद्वैत तत्त्वज्ञानाची गंगोत्री मानली गेली असूनही दर्शन शास्त्र नाही, अशी ही मोक्षगीता - अष्टावक्र गीता.

(क्रमशः)