नक्षली हल्ल्याचा पंचनामा

विवेक मराठी    06-Apr-2021
Total Views |

@मंजूषा कोळमकर

या घटनेचे पडसाद जगभरात उमटले. निषेधाचे सूर उमटू लागले. पण या नक्षलवाद्यांना आतून मदत करणार्‍या तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या आघाडीवर अजून अपेक्षेप्रमाणे सामसूम आहे. एल्गारच्या नावाखाली समाजात दुही व अराजक पसरविण्याच्या उद्देशाने कार्यरत काही समाजसेवक, कवी, साहित्यिकांना पुराव्यानिशी गजाआड केले गेले, तर या पुरोगामी विचारवंतांच्या पोटात दुखते. त्या वेळी त्यांना या शहरी माओवाद्यांचे वृद्धत्व, कवित्व, दिसायला लागते. अभिव्यक्तिस्वातंत्र्यांचे डोहाळे लागतात. पण त्यांच्या विचारबंधूंनी केलेल्या निर्दयी हल्ल्यात पोलीस जवान ठार होतात, तेव्हा मात्र या पुरोगाम्यांच्या डोळ्यातून एक अश्रू येत नाही. या शहीद जवानांच्या घरातला आक्रोश त्यांना दिसत नाही.

nax_1  H x W: 0

छत्‍तीसगधील बस्तर क्षेत्रात असलेल्या सुकमा व बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या घनदाट जंगलात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात विविध सुरक्षा पथकांचे २२ जवान शहीद झाले. ४०हून अधिक जवान जखमी झाले. शनिवारी, दि. 3 एप्रिल रोजी झालेल्या या घटनेने नक्षली हिंसाचाराचे गाभीर्य समोर आले आहेच, त्याचबरोबर आंतरिक सुरक्षा मजबूत असल्याचा जो दावा सरकारी यंत्रणा करीत आहे, त्या दाव्यावरच एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. या हल्ल्यामुले झालेले नुकसान पाहता आंतरिक सुरक्षेत अक्षम्य चूक झाली हे उघड आहेच, तसेच नक्षलविरोधी कारवाईमध्ये जी इंटेलिजन्स इनपुट्स (गोपनीय माहिती) देणारी यंत्रणा असते, तीसुद्धा या हल्ल्याच्या घटनेत अचूक व नेमकी माहिती अगोदरच देण्यात निकामी ठरली होती, हेसुद्धा जगजाहीर झाले आहे. यानिमित्ताने हिंसाचाराच्या माध्यमातून लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या नक्षल्यांच्या रणनीतीत आणि ध्येयधोरणांमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर उलट ते आणखी क्रूर, निर्दयी बनत असल्याचे आणि रणनीती आखण्यात जास्त चतुर झाल्याचे दिसून आले आहे.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

रे तर ही वेळ सुरक्षा यंत्रणेतील कमतरता वा दोष काढण्याची नाहीच. उलट मोठ्या नक्षली हालचालींची गुप्त माहिती मिळताच विविध सुरक्षा यंत्रणांनी एकत्र येऊन रणनीती आखली व एकजुटीने नक्षली हालचाली रोखण्यासाठी घनदाट जंगलात मोहीम आखली, हे अमान्य करता येत नाही. त्यासाठी सुरक्षा यंत्रणेचे कौतुक केले पाहिजेच. सुकमा व बिजापूर जिल्हा सीमेवर असलेल्या जगरगुंडा-जोंगागुडा जंगलात मोठी नक्षली हालचाल सुरू असल्याची माहिती मिळताच १५००हून अधिक जवान या जंगलात शुक्रवार, दि. २ एप्रिलपासूनच शोधमोहिमेवर होती. या पथकात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफच्या) कोब्रा नावाच्या विशेष पथकाचे जवान व त्याबरोबरच काही अन्य सुरक्षा बटालियनचे, बस्तरिया बटालियनचे व छत्तीसगढ़ पोलिसांच्या जिल्हा रिर्व्ह गार्डचे (डीआरजीचे) जवान सहभागी होते.


या पथकातील ७५० जवानांचे एक मोठे पथक याच जंगलातील तुर्रेम गावाजवळ शोध घेत असताना मोठ्या संख्येतील नक्षल्यांनी त्यांना घेरले. नक्षल्यांची जी संख्या विविध स्रोतांकडून समोर येत आहे, त्यात भिन्नता आहे. पण हा आकडा ५००च्या घरात असावा असा संशय आहे. जंगलाने आणि पहाडांनी वेढलेल्या या गावाजवळ पोहोचल्यावर नक्षल्यांकडून गोळीबार सुरू झाला. सुरक्षा पथकाची सर्वात मोठी गफलत इथेच झाली. शक्यतोवर नक्षली गावातून सुरक्षा जवानांवर हल्ला करीत नाही व सुरक्षा दलही गावावर वा गावकर्‍यांवर गोळीबार करीत नाही. वृत्तपत्रातल्या एका बातमीनुसार शनिवारच्या घटनेत सुरक्षा जवानांवरची पहिली गोळी गावातून डागली गेली. त्यामुळे सुरक्षा जवान गोंधळले. त्या दिशेने प्रत्युत्तर दिल्यास गावकरी हकनाक बळी जातील या शंकेने सुरक्षा दलाच्या प्रति-कारवाईत किंचित शिथिलता आली व त्याचा फायदा घेत गावात लपलेल्या व सभोवतालच्या पहाडांत दडून बसलेल्या नक्षल्यांनी चारी बाजूंनी रॉकेट लाँचरसह, मशीनगनने हल्ला चढवला. सुरक्षा जवानांनी सावरून प्रत्युत्तर दिले... पण तोवर सुरक्षा दलाची जी हानी व्हायची होती, ती होऊन गेली होती.nax_1  H x W: 0

कोण आहे हिडमा?

 या हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला माओवादी कमांडर हिडमा याचे नाव माडवी हिडमा असे आहे. तो हिडमान्ना उर्फ संतोष उर्फ इंदमुल उर्फ पोडियाम भीमा या नावांनीही ओळखला जातो. तो याच जंगलातील पोवार्ती गावचा रहिवासी आहे. ३३ वर्षीय हिडमा दक्षिणी बस्तरमधील सुकमा-बिजापूर क्षेत्रात सक्रिय असलेल्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी या माओवादी संघटनेच्या फर्स्ट बटालियनचा प्रमुख आहे व दबा धरून हल्ला करण्यातला तज्ज्ञ समजला जातो. त्याच्यावर ४० लाखांचे बक्षीस आहे. किरकोळ बांध्याचा व अस्खलित इंग्लिश बोलणारा हिडमा आपल्या चातुर्याने व क्रूर मानसिकतेमुळे कमी वयातच नक्षली संघटनेत मोठ्या पदावर पोहोचला. त्याच्या बटालियनमध्ये अडीचशेहून अधिक नक्षली असून त्यात महिलांचाही समावेश आहे. एप्रिल २०१०मधील दंतेवाडा व मे २०१३मधील जीराम खोर्‍यातील जंगलात झालेल्या नक्षली हल्ल्यातही त्याची भूमिका होती, असे मानले जाते.

 

ज्या जंगल क्षेत्रात ही चकमक झाली, ते क्षेत्र दुर्गम, पहाडी व घनदाट जंगलाचे आहे. या भागात सुरक्षा दलाची शिबिरेही कमी संख्येत आहे. त्यामुळेच या भागात नक्षल्यांच्या हालचाली मोठ्या संख्येत सुरू असतात. शनिवारच्या हल्ल्यात नक्षलवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी (पीएलजीए) बटालियन सहभागी असल्याचा व या बटालियनचा सर्वोच्च नेता माओवादी कमांडर हिडमा उर्फ हिडमान्ना व त्याची सहकमांडर सुजाता यांनी या हल्ल्याचे नेतृत्व केल्याचा संशय आहे. पीएलजीए बटालियनच्या नक्षल्यांसह पामेड, कोंटा, जगरगुंडा, बासागुड़ा एरिया कमेटीचेही सदस्य नक्षलीही या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय आहे. नक्षल्यांनी हल्ला करताना रॉकेट लाँचर्सचा, हलक्या मशीनगन्सचा (एलएमजीचा) आणि स्फोटकांचा वापर केला. इतकेच नाही, तर हल्ल्यानंतर आपल्या मृत व जखमी सहकार्‍यांना त्यांनी ट्रॅक्टर, ट्रॉलींनी अन्यत्र हलवले. सुरक्षा दलाची शोध मोहीम शुक्रवारपासूनच सुरू झाली होती. ते ध्यानात घेऊन नक्षल्यांनी तुर्रेम व नजीकच्या गावातील गावकऱ्यांना अगोदरच हटवले व तेथील घरांमध्ये गावकरी बनून नक्षलीच दबा धरून बसले. बाकी नक्षली सभोवतालच्या पहाडीत दडून होते. नक्षल्यांच्या या व्यूहरचनेत सुरक्षा जवान अडकल्यामुळे सुरक्षा जवानांचे मोठे नुकसान झाले. असे असले, तरी या चकमकीत १५ ते २० नक्षली मारले गेल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

या हल्ल्याच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेत, प्रशासनात काय चूक झाली, याची चौकशी होईलही. पण गेले काही दिवसांत, विशेषतः भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून नक्षली हिंसाचारात वाढ झाली आहे. गेल्या पंधरवाड्यात या प्रकारच्या दोन मोठ्या घटना झाल्या आहेत. त्यामुळे या नक्षली कारवायांना सरकारस्तरावरून पाठबळ मिळते काय, याचीही चोकशी करण्याची गरज आहे. नक्षल्यांना छत्तीसगडमधील चर्चेसचेही पाठबळ आहे. राज्यात डॉ. रमणसिंग यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकार असताना आदिवासींना फूस लावून त्यांचे धर्मांतर करण्याच्या मिशनर्‍यांच्या योजनेला रमण सरकारने सुरुंग लावला होता. त्यामुळे मिशनरी व राज्यातील चर्चेस नाराज होतीच. पण आता बघेल सरकारचे पक्षश्रेष्ठीच चर्चेसला चुचकारणारे असल्याने चर्च संघटनांचे सध्या फावले आहे. त्यामुळे नक्षली व चर्चेस यांचे नेक्सस व सत्ताधार्‍यांचे अदृश्य पाठबळ हे राज्यात नक्षली कारवाया वाढण्यास कारणीभूत आहेत का, याचीही चौकशी करण्याची गरज आहे.

 


कुठे चुकले..

* केंद्र सरकारचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार व सीआरपीएफचे माजी महासंचालक विजय कुमार यांच्यासह आयजीचे अनेक वरिष्ठ अधिकारी गेले वीस दिवस बिजापूर, रायपूर व जगदलपूर क्षेत्रात ठाण मांडून बसले आहे. त्यांच्या या उपस्थितीने नक्षल्यांना सावध केले.

* गावात गावकर्‍यांच्या वेशात नक्षली दबा धरून बसलेले असू शकतात, याची कल्पनाच सुरक्षा जवानांनी गृहित धरली नाही.

* कुख्यात नक्षली कमांडर हिडमा एखादी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची गुप्त माहिती सुरक्षा जवानांना होती. पण हे जंगल हिडमाचेहोमपिच आहे, याकडे दुर्लक्ष झाले

* मार्च ते जून या महिन्यांत नक्षली TCOC (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कँपेन) मोहीम चालवत असतात. या मोहिमेत नक्षली सुरक्षा दलांवर छोटेमोठे हल्ले चढवतात. हे माहीत असताना अधिक सुरक्षित व्यूहरचना तयार करावयास हवी होती.


nax_3  H x W: 0
 

या घटनेचे पडसाद जगभरात उमटले. निषेधाचे सूर उमटू लागले. पण या नक्षलवाद्यांना आतून मदत करणार्‍या तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या आघाडीवर अजून अपेक्षेप्रमाणे सामसूम आहे. एल्गारच्या नावाखाली समाजात दुही व अराजक पसरविण्याच्या उद्देशाने कार्यरत काही समाजसेवक, कवी, साहित्यिकांना पुराव्यानिशी गजाआड केले गेले, तर या पुरोगामी विचारवंतांच्या पोटात दुखते. त्या वेळी त्यांना या शहरी माओवाद्यांचे वृद्धत्व, कवित्व, दिसायला लागते. अभिव्यक्तिस्वातंत्र्यांचे डोहाळे लागतात. पण त्यांच्या विचारबंधूंनी केलेल्या निर्दयी हल्ल्यात पोलीस जवान ठार होतात, तेव्हा मात्र या पुरोगाम्यांच्या डोळ्यातून एक अश्रू येत नाही. या शहीद जवानांच्या घरातला आक्रोश त्यांना दिसत नाही. गेले काही दिवसांत नक्षली चळवळीत शिथीलता आली होती. विशेषतः पुरोगामी, विचारवंत, समाजसेवा यासारख्या गोंडस नावांच्या बुरख्याआड दडलेले काही चेहरे गजाआड झाल्यापासून जंगलातील नक्षली केडरला शहरातून मिळणारी वैचारिक, आर्थिक व नव्या रिक्रूटची रसद मंदावली आहे. त्याचा परिणाम नक्षल चळवळीवर झाला आहेच. अनेक कुख्यात नक्षली कमांडर शस्त्रे खाली ठेवून पोलिसांना शरण येत आहे. त्यामुळे आपले अस्तित्व दाखवण्यासाठी जंगलातले नक्षली केडर त्यांच्या शहरी सहकार्‍यांच्या मदतीने असे हल्ले वाढवण्याची शक्यता आहे.

 


छत्तीसगडमधील नक्षली हल्ले

* रानीबोदली (बिजापूर), १५ मे २००७ - पोलिसांच्या एका शिबिरावर मध्यरात्री माओवाद्यांनी हल्ला केला व शिबिराला आग लावून दिली. त्यात ५५ जवान ठार झाले.

* उरपलमेटा (एर्राबोर), ९ जुलै २००७ - माओवाद्यांचा शोध घेऊन बेस कँपवर परतणार्‍या सीआरपीएफ आणि राज्य पोलीस दलाच्या जवानांवरील हल्ल्यात २३ ठार.

* मदनवाडा (राजनांदगाव), १२ जुलै २००९ - माओवाद्यांनी हल्ला केल्य़ाची सूचना मिळताच पोहोचलेल्या पोलीस दलावर हल्ला. त्यात पोलीस अधीक्षक विनोद कुमार चौबे यांच्यासह २९ पोलीस ठार.

* ताडमेटला (बस्तर), ६ एप्रिल २०१० - शोधमोहिमेवर असलेल्या सीआरपीएफ जवानांवर हल्ला. भूसुरुंग वापरुन माओवाद्यांनी ७६ जवानांना ठार केले.

* दंतेवाड़ा, १७ मे २०१० - एका यात्री बसमधून दंतेवाडावरून सुकमाकडे जाणाऱ्या सुरक्षा जवानांना भूसुरुंगाने उडवले. यात पोलीस अधिकार्‍यासह ३६ लोक मारले गेले.

* धोडाई (नारायणपूर), २९ जून २०१० - सीआरपीएफ जवानांवर केलेल्या हल्ल्यात २७ जवान मारले गेले.

* झीरम खोरे (सुकमा), २५ मे २०१३ - हा या दशकातला सर्वात मोठा नक्षली हल्ला मानला जातो. काँग्रेसची परिवर्तन यात्रा झीरम खोर्‍यातून जात असताना माओवाद्यांनी या यात्रेवर हल्ला केला. त्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल, आदिवासी नेता महेंद्र कर्मा, माजी केंद्रीय मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्यासह ३० लोक मारले गेले.

* दुर्गपाल (सुकमा), २४ एप्रिल २०१७ - नक्षल्यांनी दबा धरून सीआरपीआफच्या पथकावर हल्ला चढवला. त्यात २५ जवान ठार झाले. हे जवान रस्ते बांधकामाच्या सुरक्षेसाठी तैनात होते व घटनेच्या वेळी ते जेवण बनवत होते.


* श्यामगिरी (दंतेवाडा), ९ एप्रिल २०१९ - लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या अगोदरच्या दिवशी नक्षल्यांनी भाजपा आमदार भीमा मडावी यांच्या कारवर हल्ला करून मडावी व त्यांच्या चार सुरक्षा जवानांना ठार केले.nax_2  H x W: 0
 

नक्षल्यांचे हे हल्ले रोखण्यासाठी केवळ एका राज्याच्या सुरक्षा दलाने कारवाई करून चालणार नाही. त्यासाठी केंद्र सरकार, नक्षलग्रस्त राज्यांची सरकारे यांनी एकत्र येऊन रणनीती आखावी लागेल. त्यासाठी वेगळे दल तयार करावे लागेल. वेळ पडली तर सैन्यालाही त्यात सहभागी करून घ्यावे लागेल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घटनेनंतर त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून थेट झिरो पॉइंवर पोहोचले. त्यांनीही कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की नक्षली आता त्यांची शेवटची लढाई लढणार आहे. शब्दांचाच विचार केला तर हा इशारा चांगला आहे. पण ते केवळ शब्दांचे बुडबुडे राहता कामा नये. कठोर व निकराची लढाई करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ही लढाई केवळ जंगलात शस्त्रांनीच लढता येणार नाही. जंगलात शस्त्र घेऊन लढणारे नक्षली केडर भोळ्याभाबड्या आदिवासी घरांमधील मुले आहे. त्यांच्या डोक्यात या हिंसक क्रांतीचे भूत ज्यांनी घातले, ते काही जंगलात नाही. त्यांचे ते वैचारिक नेतृत्व शहरांमध्ये, महानगरांमध्ये पुरोगामी विचारवंत, कवी, साहित्यिक, कलाकार, समाजसेवक, मानवाधिकार चळवळे, अभिव्यक्तिस्वतंत्र्याच्या नावाखाली चळवळी करणारे असे विविध बुरखे घालून वावरत आहे. त्यांचे बुरखे या निमित्ताने फाडावे लागतील. हे सारे एकत्रित झाले, तरच नक्षली हिंसाचाराचे हे थैमान थांबेल.


[email protected]