भाऊसाहेब म्हणजे ग्राहक चळवळीतील नि:स्पृह कार्यकर्ता

विवेक मराठी    07-Apr-2021
Total Views |

@सूर्यकांत पाठक

संघाचे स्वयंसेवक, ग्राहक चळवळ, ग्राहक पंचायतपर्यंत सतत आमच्याबरोबर असलेला एक दुवा नुकताच निखळला. स्वत: केलेल्या कामातून नावारूपाला येऊन लोकांच्या मनात जागा मिळवणारे कार्यकर्ते आजकाल फारच दुर्मीळ होत चालले आहेत. अशा कार्यकर्त्यांपैकीच एक म्हणजे आमचे भाऊसाहेब उर्फ ठकसेन पोरे. त्यांच्या आकस्मिक निधनाने आमच्या ४५ वर्षांच्या मैत्रीतील एक सांधा निखळला. त्यांचे अशा प्रकारे जाणे मनाला हुरहुर लावणारे आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर गेल्या चार दशकांहून अधिक काळातील अनेक आठवणी मनात दाटून आल्या. त्यांच्यासारखा सर्वार्थाने नि:स्पृह कार्यकर्ता आज सहजासहजी सापडणार नाही, तो शोधावाच लागेल.

 
RSS_1  H x W: 0

ग्राहक चळवळीत काम करताना मीच त्यांना भाऊसाहेब पोरे असे नाव दिले आणि आज त्यांना देशभरातील कार्यकर्ते याच नावाने ओळखतात. त्यांचे खरे नाव ठकसेन पोरे. आम्ही दोघेही कसबा पेठेतील फडके हौद परिसरात राहणारे, एका अर्थाने आळीकरच. दोघांच्याही घरची परिस्थिती बेताचीच. दोघेही कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातूनच इथवर एकत्रित प्रवास करून आलो होतो. आम्ही दोघेही घराला हातभार म्हणून विद्यार्थिदशेपासूनच नोकरी करत होतो. मी आमच्या परिसरात असलेल्या नगरकरांच्या बेकरीत कामाला होतो आणि भाऊसाहेब तिथे ब्रेड वगैरे घ्यायला नेहमी येत, हीच आमची पहिली ओळख. सुरुवातीला ग्राहक म्हणून आमची असलेल्या ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत झाले. त्यानंतर शिक्षण पूर्ण होईपर्यंत दिवसातून एकदा भाऊसाहेब माझ्या घरी येणार किंवा ते नाही आले तर मी त्यांच्या घरी जाणार म्हणजे जाणारच. आम्ही कसबा पेठेत राहत होतो तोपर्यंत आमची सवय कायम टिकली. आमच्या मैत्रीत आणखी एक समान धागा होता, तो म्हणजे दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, दोघेही रोज शाखेत जाणारे. ते नेताजी शाखेचे, तर मी अभिमन्यू शाखेचा स्वयंसेवक.

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

पुण्यात ग्राहक चळवळीचे वारे वाहू लागले. या चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी कसबा पेठेतच राहत असल्याने आम्ही दोघेही या चळवळीत बिंदुमाधव जोशी यांच्यामुळे आकर्षित झालो. ग्राहक चळवळीला पुढे नेणारे माध्यम होते ते ग्राहक संघ. ग्राहक संघाच्या माध्यामातून ग्राहक चळवळ पुढे जात होती. या चळवळीत पहिल्या दिवसापासून आम्ही सक्रिय कार्यकर्ते असल्याने भाऊसाहेबांनी त्यांचा सुविधाग्राहक संघ सुरू केला आणि मी अतृप्तनावाने ग्राहक संघ सुरू केला. ग्राहक चळवळीला लोकांचे पाठबळ मिळत गेल्याने चळवळीचे रूपांतर ग्राहक पंचायतीत झाले. त्या वेळी मी बँकेत नोकरी करायचो, तर भाऊसाहेब हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करत होतो. घरासाठी पैसे मिळवणे ही आम्हा दोघांचीही त्या वेळची गरज होती.

 

रिक्षा व्यवसाय आणि ग्राहक पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते या दोन्हीतून भाऊसाहेबांच्या ओळखी वाढू लागल्या. ग्राहक पंचायतीची आंदोलने, सभा, वस्तू वितरण अशा विविध उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्याच वेळी भाऊसाहेबांनी रिक्षाचालकांच्या आरटीओमध्ये असलेल्या अडचणी सोडवण्यास सुरुवात केली. स्वत: रिक्षाचालक असूनही आपल्या व्यवसायातील उणिवांवरही ते बोट ठेवत. रिक्षाचालकांच्या अनेक गोष्टी पटत नसत, पण समव्यावसायिक असल्याने त्या बोलूनही दाखवता येत नसत. अशा वेळी ते माझ्याशी त्या बाबींवर चर्चा करत असत. त्यांच्यामुळे मला रिक्षा व्यवसायातील अनेक बारकावे, खाचाखोचा समजल्या. रिक्षांसाठी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचा विषय सुरू झाला, त्या वेळी प्रचलित मीटरमधील अनेक उणिवा भाऊसाहेबांनीच माझ्या निदर्शनास आणून दिल्या. त्या वेळी लोकांना माझे रिक्षा मीटरबाबतचे बोलणे अभ्यासपूर्ण वाटत होते, पण त्यामागे भाऊसाहेब पोरे यांचा अभ्यास होता. रिक्षा व्यवसाय म्हणजे हातावरचे पोट. ज्या दिवशी रिक्षा चालवाल त्या दिवशी पैसे मिळणार.असे असले, तरी भाऊसाहेब अनेकदा रिक्षा बंद ठेवून ग्राहक पंचायतीच्या कामासाठी बाहेरगावी फिरत असत. आंदोलन असले तरी ते सहभागी होत असत. इतकेच नव्हे, तर पुण्यात ग्राहक पंचायतीच्या कामासाठी स्वतःच्याच रिक्षामध्ये स्वतःचे पेट्रोल टाकून प्रवास करत असत.

ग्राहक पंचायतीच्या कामानिमित्त मी आणि भाऊसाहेबांनी स्कूटर, लाल डबा एसटी, रेल्वे, इतकेच काय अगदी एकदा विमानानेही एकत्र प्रवास केलेला आहे. अगोदरच ते वाहतूक व्यवसायात असल्याने ग्राहक पंचायतीचा प्रवास विभागही त्यांनी अनेक वर्षे निरपेक्ष भावनेने संभाळला आहे. पुढे त्यांना पुणे ऑटोरिक्षा सोसायटीच्या सचिवपदी नेमण्यात आले. त्यांच्या अथक परिश्रमातून श्री ऑटोरिक्षा सोसायटीआज नावारूपाला आली आहे. अनेक रिक्षाचालकांना ग्रीसिंग, पीयूसी इ. गोष्टी सवलतीच्या दरात उपलब्ध झाल्या. पुढे उत्तरायुष्यात स्वकष्टाने बांधलेल्या स्वत:च्या मालकीच्या घरात राहायला गेले, तो क्षण पोरे कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यानंदाचा होता.


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

ग्राहक पंचायतीचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यापासून ते शेवटी आवराआवर करण्यापर्यंत भाऊसाहेब त्यात आनंदाने सहभागी होत असत. ते कविमनाचे होते. त्यांना सूत्रसंचलनाची आवड होती. त्यामुळे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, गीत गायन हे त्यांचे विशेष आवडीचे. ते अधूनमधून कविताही करत. ग्राहक पंचायतीसाठी भाऊसाहेब म्हणजे उणे तेथे पोरेहे समीकरण त्यांनी आपल्या निर्व्याज, नि:स्पृह कामातून तयार केलेले होते. असे कार्यकर्ते आता सहजासहजी मिळत नाहीत. असे कार्यकर्ते गमावणे हे त्या चळवळीला हानिकारकच असते. भाऊसाहेबांच्या निधनामुळे ग्राहक पंचायतीच्या कामात अशीच मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी सार्वजनिक काम करताना कधीही आपल्या कुटुंबाची व्यथा किंवा परिस्थितीचे भांडवल केले नाही. किंबहुना त्याबद्दल त्यांनी कधी चर्चाही केली नाही.

हाडाचे कार्यकर्ते असलेले भाऊसाहेब पोरे हे त्यांच्या मुद्द्यांशी ठाम असायचे. त्यांचे आणि माझे अनेकदा मुद्द्यांवरून मतभेदही झाले आहेत. माझ्याशीच काय, अनेकाशी त्यांचे असे मतभेद झालेले मी बघितले आहेत. पण ते मतभेद तेवढ्या विषयापुरतेच असायचे. तात्त्विक मतभेदांचे रूपांतर त्यांनी मनभेदात कधीच होऊ दिले नाही, हे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जमलेल्या गर्दीनेच अधोरेखित केले. त्यांच्या पत्नीनेही त्यांची साथ अशीच अकस्मिकपणे सोडली. त्याने ते काही काळ निराश झाले, पण खचले नाहीत की त्यांनी त्यांचे काम थांबवले नाही. त्यांनी एकीकडे संसार, दुसरीकडे चळवळ, सामाजिक काम अशा दोन आघाड्यांवर ते कायमच लढत राहिले. त्यांनी आपल्या कृतीने कळत-नकळत सर्व मुलांवर उत्तम संस्कार केले. त्यातूनच चिन्मय पुढे काही काळ रा.स्व. संघाचा प्रचारक राहिला. त्यांचे पाळण्यातील नाव ठकसेन होते, पण एकत्रितपणे सार्वजनिक काम करताना हे नाव जाहीरपणे घेणे मला अवघड जात असल्याने मी त्यांना सार्वजनिक कार्यात भाऊसाहेब या नावाने हाक मारीत असे. तेच नाव पुढे रूढ झाले. पण याची परतफेड नाही केली तर ते भाऊसाहेब कसले! मला घरात सर्व जण हरी म्हणतात हे त्यांना महिती असल्याने त्यांनीही माझे नाव हरीभाऊ कसबेकर असे ठेवले, याच नावाने ते मला खासगीत संबोधत असत. या टोपणनावाने लेख लिहिण्यासाठी मला या नावाचा एक चांगला फायदा झाला.


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी

ग्राहक पंचायतीच्या कामातून उभ्या राहिलेल्या ग्राहक पेठ को-ऑप. डिपार्टमेंटल स्टोअरचेही ते १० वर्षे संचालक म्हणून सक्रिय कार्यरत होते.


त्यांच्या निधनाने मी एक चांगला नि:स्पृह, कष्टाळू, प्रामाणिक, निरपेक्ष बुद्धीने समाजाचे काम करणारा खंदा सहकारी गमावला, याचे शल्य मनात कायमच राहील. काही महिन्यांपूर्वीच आम्ही दोघे जण उज्जैनला ग्राहक पंचायतीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी एकत्रित गेलो होतो, पण हा शेवटचा एकत्रित प्रवास असेल असे कधीच वाटले नव्हते. भाऊसाहेब पोरे यांना समस्त ग्राहक परिवारातर्फे व व्यक्तिशः भावपूर्ण श्रद्धांजली!

 


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी