वयं राष्ट्रे जागृयाम

विवेक मराठी    07-Apr-2021
Total Views |

 @आ. मंगल प्रभात लोढा

मकर संक्रांतीपासून माघी पौर्णिमेपर्यंत चाललेल्या राममंदिर निधी समर्पण अभियानात प्रत्येक कुटुंबाकडून किमान 10 रुपये योगदान व्हावे अशी अपेक्षा होती. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीदेखील घेतल्या. प्रत्यक्षात मात्र सर्वांनी भरभरून दिल्याचे दिसून येते. राममंदिरासाठी निधी समर्पण अभियानात घरोघरी जाऊन संकलन करणारे कार्यकर्ते आणि जात-धर्म-गोत्र विसरून केवळ मंदिर निर्माणकार्यासाठी निधी समर्पण करणारा समाज, हे चित्र खर्या भारताचे चित्र आहे, जे भारताच्या भारतीयत्वाचा विचार करते. 
bjp_3  H x W: 0
 

प्रभू श्रीराम या देशाचे आदर्श महापुरुष आहेत, त्यांनी बांधून दिलेल्या आदर्शावरच हे राष्ट्र अनादी काळापासून मार्गक्रमण करत आहे. ‘रामो विग्रहवान् धर्मः’ - म्हणजेच प्रभू रामचंद्र धर्माचे मूर्त स्वरूप आहेत, असे वर्णन वाल्मिकी रामायणात केलेले आहे. अशा या धर्मपुरुषाचे मंदिर त्यांच्या जन्मभूमीवर समाजाच्या योगदानातून बांधण्याचा विषय जेव्हा आला, त्या वेळी समाजातील प्रत्येक घटकाने आपले परमकर्तव्य, केवळ कर्तव्यच नव्हे, तर आपले परमभाग्य मानून या राष्ट्रकार्यात खारीचा वाटा उचलला!

अयोध्येत मूर्त रूप धारण करत असलेले प्रभू श्रीरामांचे हे भव्य मंदिर हे केवळ एखादे मंदिर नसून ती आपल्या राष्ट्रीय स्वाभिमानाची पुन:प्रतिष्ठापना आहे, ज्यामध्ये कोट्यवधी भारतीयांच्या भावना गुंतलेल्या आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताची निर्मिती सुरू आहे, या आत्मनिर्भर भारताचा आत्मविश्वास आणि आत्मभान जागृत करण्यासाठीच अयोध्येत प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीवर त्यांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. हे मंदिर आत्मनिर्भर भारताचे अधिष्ठान बनेल.

मागील काही दिवसांत आपल्याला या सर्वाची प्रचिती आली. अयोध्येतील राममंदिर निर्माणकार्यासाठी निधी समर्पण अभियानाला सुरुवात झाली, ज्यामध्ये 5 लाख 45 हजार स्थानी, 12 कोटी 47 लाख 21 हजार कुटुंबांनी आपले योगदान दिले. यात जवळपास 20 लाख कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. हा केवळ आकडा नाही, तर या देशातील श्रीरामजन्मभूमी आंदोलनाशी नाळ जोडलेली असल्याने त्याबद्दल आपलेपणाची भावना असल्याचे जिवंत उदाहरण आहे.

bjp_2  H x W: 0

देशात गेल्या काही वर्षांपासून राजकीय बदल घडले, त्यात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खंबीर नेतृत्व भारताला लाभले. त्याचबरोबर हिंदुत्व विचारधारा हीच देशातील सामाजिक, राजकीय इतर क्षेत्रातील मुख्यधारा बनली आहे, त्यामुळेच अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय हे हिंदुत्व विचारांचे अधिष्ठान बनून प्रबळ राजकीय इच्छाशक्तीमुळे सोडवले जात आहेत. त्यामुळेच श्रीरामजन्मभूमीची न्यायालयीन लढाईदेखील जिंकण्याची अपेक्षा होतीच. मा. गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या खंबीरपणामुळे काश्मीरमधील 370सारखा गुंतागुंतीचा प्रश्नदेखील सोडवला गेला. पाकिस्तान, बांगला देश, अफगाणिस्तान येथील प्रताडित हिंदूंना सन्मानपूर्वक नागरिकत्व देण्याची व्यवस्थासुद्धा याच हिंदुत्ववादी अधिष्ठानामुळेच शक्य होऊ शकली.

कोरोना कालखंड

मागील वर्षभरात लॉकडाउन आणि कोरोना काळामुळे सर्वांचीच परिस्थिती तशी पाहता हलाखीची झाली होती. अनेकांना रोजगारालादेखील मुकावे लागल्याचे आपण वर्तमानपत्रांतून वाचले असेल. परंतु अशा परिस्थितीतदेखील देशातील युवकांनी पुढाकार घेऊन, प्रत्येक भारतीयाने पुढाकार घेऊन अगदी कमी कालावधीमध्ये 2500 कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी संकलन करण्यात आले, ज्यामध्ये प्रत्येक घरातून फूल नाही फुलाची पाकळी स्वरूपात, तसेच खारीचा वाटा समजून प्रत्येकाने आपापले योगदान दिले, जे अभूतपूर्व आहे. हा नवा भारत आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीला विसरलेल्या ह्या भारत देशातील युवा पिढीच्या मनात आजही प्रभू श्रीरामांचे स्थान अढळ आहे, हे यावरून सिद्ध होते.

मकर संक्रांतीपासून माघी पौर्णिमेपर्यंत चाललेल्या राममंदिर निधी समर्पण अभियानात प्रत्येक कुटुंबाकडून किमान 10 रुपये योगदान व्हावे अशी अपेक्षा होती. त्यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीदेखील घेतल्या. प्रत्यक्षात मात्र सर्वांनी भरभरून दिल्याचे दिसून येते. राममंदिरासाठी निधी समर्पण अभियानात घरोघरी जाऊन संकलन करणारे कार्यकर्ते आणि जात-धर्म-गोत्र विसरून केवळ मंदिर निर्माणकार्यासाठी निधी समर्पण करणारा समाज, हे चित्र खर्या भारताचे चित्र आहे, जे भारताच्या भारतीयत्वाचा विचार करते.

प्रभू श्रीरामांवर श्रद्धा असणार्या, समाजातील अनेकांनी कोरोनासारख्या महामारीच्या काळातदेखील अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निधी समर्पण अभियान राबवले. कदाचित अशा पद्धतीने चालवले गेलेले हे अभियान भूतो भविष्यतीअसेच असावे. कारण निधी समर्पण करणार्या प्रत्येक व्यक्तीला त्याची पावती देण्यात आली, तसेच संकलित झालेल्या निधीचादेखील योग्य हिशोब करून तो मंदिर ट्रस्टपर्यंत योग्यपणे पोहोचवण्यात आला. यामध्ये देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सामान्यांतील सामान्य नागरिकांनीदेखील योगदान दिले.

सब के राम

प्रभू श्रीराम यांचे मंदिर राष्ट्र मंदिर असल्याचा उल्लेख केला आहे, याचे कारण या देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनात जात-पंथ-धर्म-भाषा-प्रांत या सर्वांच्या पलीकडे प्रभू रामचंद्रांची स्वीकृती आहे आणि या अभियानात पुन्हा एकदा याची प्रचिती आली. संपूर्ण समाज या अभियानानिमित्त एकवटल्याचे देशाने पहिले. सर्वांना धारण करणार्या, सर्वांना आपले मानणार्या, सर्वांची उन्नती करणार्या धर्माचे प्रतीक म्हणून प्रभू श्रीराम ओळखले जातात, त्यामुळेच राम सर्वांत वसतात!

 

bjp_1  H x W: 0 

प्रभू श्रीरामांच्या मंदिर निर्माणकार्यातच रामराज्याची संकल्पना दडलेली आहेअसे श्रद्धेय अशोकजी सिंघल म्हणत असत. त्यांचे हे वाक्य आज सत्यात उतरताना दिसत आहे. 5 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्र सरकारनेश्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रया नावाने एका न्यासाची स्थापना केली. त्यानंतर 25 मार्च 2020 रोजी श्री रामलल्ला ताडपत्रीच्या मंदिरातून आपल्या तात्पुरत्या नवीन लाकडी मंदिरात विराजमान झाले आणि मंदिर निर्माणकार्याच्या महायज्ञास सुरुवात झाली, ज्यामध्ये संपूर्ण भारताने योगदान देण्याचा निश्चय केला. आजवर राममंदिर निर्माणकार्यासाठी चालवलेल्या नियोजनबद्ध मोहिमेमुळे देशातील नागरिकांनी लिंग, जात, वर्ण, भाषा, पंथ, प्रदेश या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्म भावनेने प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माणकार्यासाठी लढा दिला. बलिदान दिले. परंतु आता मंदिर निर्माणकार्य प्रगतिपथावर असल्याकारणाने यापुढील युवा पिढी या विषयाला अधिक महत्त्व देणार नाही, असे बोलले जात होते; परंतु मंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाने हा दावा खोडून काढला आणि आजही भारतीयांच्या मनामनात प्रभू श्रीरामांचे स्थान अढळ आहे, हेच सिद्ध झाले. संपूर्ण राष्ट्राने एकत्रित येऊन या कार्यात योगदान दिले.

कण कण देना, क्षण क्षण देना, यह जीवन का अर्थ है।

जो जैसा मन से देता है, वह उतना अधिक समर्थ है॥

मागील दिवाळीच्या वेळी भाजपा मुंबईच्या वतीनेएक दिया प्रभू श्रीराम के नामहा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. त्या वेळीदेखील समस्त मुंबईकरांनी उल्लेखनीय प्रतिसाद दिला. यात 5 लाख कुटुंबीयांना दिवे वाटप केले गेले. त्याचप्रमाणे मंदिर निधी समर्पण अभियानातदेखील सर्व मुंबईकरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

काम कोह मद मान मोहा। लोभ छोभ राग द्रोहा॥

जिन्ह कें कपट दंभ नहिं माया। तिन्ह कें हृदय बसहु रघुराया॥

जाति पाँति धनु धरमु बड़ाई। प्रिय परिवार सदन सुखदाई॥

सब तजि तुम्हहि रहइ उर लाई। तेहि के हृदयँ रहहु रघुराई॥

प्रभू श्रीराम सर्वांचे आहेत. विविधतेने नटलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाचे ते आजही श्रद्धास्थान आहेत, हेच यावरून दिसून येते. आज आपल्या भारत देशाने एकत्र येऊन ह्या महत्त्वपूर्ण निधी समर्पण अभियानात दिलेल्या योगदानाची नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही, तसेच भविष्यातील पिढ्या ह्या अभियानाची परिभाषा समजावून घेऊन राष्ट्र मंदिर निर्माणकार्यातील भारतवर्षाचे योगदान विसरणार नाहीत.

प्रभू श्रीराम यांचे जीवन विश्वकल्याणाने आणि सद्भावाने नटलेले होते, त्यामुळे ते केवळ भारताचे नाहीत, तर संपूर्ण विश्व त्यांना आदर्श रूपाने पाहत असतो. मंदिर निर्माणकार्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतवर्षाने त्यांचा विश्वकल्याणकारक ध्वज पुन्हा एकदा फडकावला. या राष्ट्राची जागृती हीच विश्वकल्याणाची नांदी आहे. ते या अभियानानिमित्त घडून आले.

 

आ. मंगल प्रभात लोढा

अध्यक्ष, भाजपा मुंबई